आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अठराव्या शतकामध्ये पृथ्वीवर काही निळ्या रंगाची माणसं अस्तित्वात होती. उत्तर अमेरिकेच्या ‘केन्टकी’ राज्यातील ‘ट्रबलसम क्रीक‘(ट्रबलसम नावाची खाडी) परिसरात हे निळे लोक वास्तव्याला होते. १८२० मध्ये मार्टिन फगेट नावाचा एक फ्रेंच अनाथ पूर्व केन्टकीमधील एका दुर्गम खाडीजवळ वास्तव्याला आला होता. तिथं त्यानं एलिझाबेथ स्मिथ नावाच्या महिलेसोबत लग्न करून संसार सुरू केला. मार्टीन फगेट हा इतर पुरुषांसारखा नव्हता.
मेथमोग्लोबनेमिया या दुर्मिळ आनुवंशिक अवस्थेमुळं त्याच्या त्वचेचा रंग निळा होता. मार्टीन आणि एलिझाबेथ यांना सात अपत्ये झाली. त्यापैकी चारजण आपल्या वडिलांप्रमाणं निळी त्वचा घेऊन जन्माला आले होते. अठरावं शतक म्हणजे पृथ्वीच्या वयाचा विचार केला तर अगदी अलिकडच्या काळातील गोष्ट आहे. मात्र, अशा असामान्य रंगाच्या व्यक्ती दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
१२व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये देखील दोन चमत्कारीक मुलं आली होती. त्यांच्या त्वचेचा रंग हिरवा होता! ‘द चिल्ड्रन ऑफ वुलपिट’ म्हणून ही मुलं प्रसिद्ध आहेत.
ही मुले अचानक कुठून आणि कशी आली याची गोष्टही तितकीच रंजक आहे.
या मुलांची गोष्ट पूर्व आंग्लियातील सफफोकमध्ये असलेल्या वुलपिट या गावात घडलेली आहे. हा भाग मध्ययुगीन ग्रामीण इंग्लंडमधील सर्वात जास्त कृषी उत्पादक आणि दाट लोकवस्तीचा प्रदेश होता. बरी सेंट एडमंड्स नावाच्या एका श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीच्या निगराणीखाली वुलपिट होतं.
एका गोष्टीनुसार, पिकांच्या कापणी करत असताना शेतकऱ्यांना एक मुलगा आणि मुलगी शेतात आढळले होते. लांडग्यांना अडकविण्यासाठी खोदण्यात आलेल्या शेतातील खड्डयामध्ये ही मुलं होती. ते दोघे बहीण-भाऊ होते. आश्चर्याची गोष्टी म्हणजे त्या मुलांची कातडी हिरव्या रंगाची होती. त्यांचे कपडे देखील विचित्र सामग्रीपासून तयार केलेले होते. त्यांची भाषा शेतकऱ्यांना आणि मजूरांना समजण्यापलीकडील होती. शेतकऱ्यांनी त्या हिरव्या मुलांना जमीन मालक सर रिचर्ड डी केन यांच्या घरी नेलं. केन यांनी त्या मुलांना ठेवून घेतलं.
ही मुलं प्रचंड भुकेली दिसत होती त्यामुळं त्यांना जेवण देण्यात आलं. मात्र, त्यांनी एकाही अन्नपदार्थाला हात लावला नाही. मुलांना काय खायला द्यावं हा प्रश्न सर्वांना पडला होता. तितक्यात एका शेतकऱ्यानं त्यांच्या समोर नुकतेच काढलेले बीन्स मुलांच्या पुढ्यात ठेवून पाहिलं. त्या मुलांनी ते बीन्स आनंदानं खाल्ले. असं सांगितलं जातं, जोपर्यंत त्यांना ब्रेडची सवय लागली नाही तोपर्यंत कित्येक महिने त्या मुलांनी फक्त बीन्सवर दिवस काढले.
काही महिन्यांनी मुलगा अचानक आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र, मुलगी सशक्त होती आणि हळूहळू तिच्या त्वचेचा हिरवा रंगही फिकट होत गेला. ती स्थानिक इंग्लिश भाषा देखील शिकली. इंग्लिश शिकल्यानंतर त्या मुलीनं तिच्या आणि तिच्या भावाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.
तिनं सांगितलेल्या माहितीनुसार, ते दोघे ‘लँड ऑफ सेंट मार्टीन’ या ठिकाणावरून आलेले होते. त्याठिकाणी सूर्यप्रकाश नव्हता.
कायम संधीप्रकाश असे आणि त्या ठिकाणच्या सर्व व्यक्ती त्यांच्यासारख्याच हिरव्या रंगाच्या होत्या. दोन्ही भावंड त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांच्या शोधात होते. ते एका गुहेमध्ये भरकटले आणि बाहेर निघण्याचा मार्ग शोधत असताना ते शेतात आले.
पुढे या मुलीनं किंग्ज लीनमधील एका व्यक्तीशी लग्न केलं, असं सांगितलं जातं. काही जणांचा असही म्हणणं आहे की, तिनं ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं तो, किंग हेन्रीचा राजदूत होता. पण, तिच्या लग्नाबाबतच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
शतकानुशतके, या मुलांविषयी आणि त्याच्या त्वचेच्या हिरव्या रंगाविषयी अनेक सिद्धांत मांडले गेले. काहींच्या म्हणण्यानुसार ही मुले ‘हायपोक्रोमिक अनिमिया‘नं ग्रस्त होती. ज्याला ‘क्लोरोसिस’ असंही म्हटलं जातं. अत्यंत खराब आणि कमी आहारामुळं ही स्थिती उद्भवते. त्यामुळं लाल रक्तपेशींच्या रंगावर परिणाम होतो आणि त्वचेवर हिरव्या रंगाची झाक दिसून येते. या सिद्धांतामध्ये तथ्य वाटते कारण चांगला आहार घेतल्यानंतर मुलीच्या त्वचेचा रंग सामान्य व्यक्तींसारखा झाला होता.
मुलीनं ज्या प्रदेशाचं वर्णन केलं होतं त्यानुसार पॉल हॅरिस यांनी ‘फोर्टन स्टडीज ४'(१९९८) मध्ये असं लिहिली आहे की, ही मुलं फ्लेमिश असण्याची शक्यता आहे. लार्क नदीनं वुलपिटपासून वेगळ्या केलेल्या ‘फोर्नहॅम सेंट मार्टिन’ या प्रदेशाचे दोघे रहिवासी होते.
१२व्या शतकात अनेक फ्लेमिश निर्वासितांनी किंग हेन्रीच्या राज्यात आसरा घेण्याचा प्रयत्न केला होता. ११७३ मध्ये बरी सेंट एडमंडस् जवळ अनेक फ्लेमिश मारले गेले होते. यातील काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलांचा आधार घेतला असावा. त्यांचीच ही मुलं असावीत.
मुलीच्या सांगण्यावरून ते अशा ठिकाणी राहत होते जिथे सूर्यप्रकाश नव्हता. जंगलांमध्ये सूर्यप्रकाश हा संधीप्रकाशासारखाच दिसतो. या मुलांबाबत आणखी देखील काही शकत्या वर्तवण्यात आल्या आहेत. रॉबर्ट बर्टन यांनी आपल्या ‘अॅनाटॉमी ऑफ मेलॅन्कली’ या पुस्तकात काही संदर्भ दिले आहेत. रॉबर्टच्या मतानुसार हिरव्या रंगीची ही मुलं स्वर्गातून पडली होती. तर फ्रान्सिस गॉडविनच्या मते ही मुले परग्रहावरील होती. चुकून ती वुलपिटमध्ये आली होती.
ऑस्ट्रेलियन कादंबरीकार आणि कवी रँडॉल्फ स्टो यांनी १९८० मध्ये ‘द गर्ल ग्रीन एज एल्डरफ्लावर’ या कादंबरीत या हिरव्या मुलांचा संदर्भ दिला आहे. सोनरी डोळे, लाल केस आणि हिरव्या रंगाची मुलगी त्याच्या कांदबरीची मुख्य पात्र आहे. याशिवाय अनेक साहित्यिकांच्या लेखनामध्ये या मुलांचे संदर्भ घेण्यात आले आहेत.
केव्हिन क्रॉस्ले-हॉलंड यांनी लिहिलेल्या आणि निकोला लेफानू यांनी रचलेल्या काही कम्युनिटी ऑपेरांचा मुख्य विषय ही हिरवीगार मुलं आहेत. २००२ मध्ये इंग्लिश कवी ग्लेन मॅक्सवेल यांनी ‘वुल्फपीट'(अगोदर त्याचं नाव वुलपीट होतं) नावाची नाटिका लिहिली आहे. न्यूयॉर्कमध्ये तिचं एकदा सादरीकरणं देखील झालेलं आहे.
मॅक्सवेलच्या नाटिकेतील मुलगी एका सामंताकडे गुलाम म्हणून काम करते. एक दिवस जॅक्सन नावाचा अनोळखी मुलगा येऊन तिला खरेदी करतो आणि नंतर तिला मुक्त करतो.
गेल्या अनेक शतकांपासून वुलपीटची ही हिरवी मुलं अभ्यासक, साहित्यिक आणि स्थानिक लोकांच्या कुतुहलाचा विषय ठरलेली आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










