आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्ली येथील बिर्ला भवनमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना गांधींची ह*त्या करण्यात आली. नथुराम गोडसे यांनी आधी गांधींचे दर्शन घेतले आणि समोरून त्यांच्यावर बॅरेटा पिस्तुलीतून तीन गोळ्या झाडल्या. गांधींचे असंख्य अनुयायी यावेळी त्यांच्या भोवताली जमले होते.
नथुराम गोडसे यांच्या सहित आठ आरोपींना या ह*त्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणाने दोषी मानण्यात आले. या आठ आरोपींमध्ये शंकर किस्तैया, दिगंबर बडगे, वीर सावरकर यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आले.
बाकी गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा आणि विष्णू रामकृष्ण करकरे यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. तर नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली.
गोडसे आणि आपटे यांना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ८ नोव्हेंबर १९४९ रोजी दोघांनाही फाशी दिली जाणार होती. परंतु, गांधीजींच्या दोन मुलांनी त्यांची फाशी रद्द करण्याची मागणी केली.
लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयाने गोडसे आणि आपटे यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गांधींच्या रामदास आणि मणिलाल या दोन मुलांनी पटेल आणि नेहरू यांना पत्र लिहून त्यांची फाशीची शिक्षा माफ करावी अशी विनंती केली होती.
याबद्दल बंगालचे माजी राज्यपाल गोपाल कृष्ण गांधी यांनी २०१७ साली खुलासा केला होता. ब्रिटीश लेखक रॉबर्ट पेन यांच्या “द लाइफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी” या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे.
गांधींच्या ह*त्येसंदर्भात सुनावणी करण्यासाठी लाल किल्ल्यात विशेष न्यायालय नेमण्यात आले. या विशेष न्यायालयासमोर आठ महिने या खटल्यावर सुनावणी सुरु होती. न्या. आत्मचरण यांनी १० फेब्रुवारी १९४९ रोजी या खटल्याचा अंतिम निकाल घोषित केला. यावेळी न्यायालयात १४९ साक्षीदारांची तपासणी झाली. आरोपींच्या वतीने साक्ष देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
गांधीं ह*त्येच्या कटात वीर सावरकर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आठ लोकांना या ह*त्येमध्ये आरोपी ठरवण्यात आले होते. यापैकी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायाधीशांच्या या निर्णयावर नथुराम गोडसे वगळता सर्व आरोपींना आक्षेप होता. त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २ मे १९४९ रोजी उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली.
याच वेळी मणिलाल आणि रामदास या गांधीजींच्या दोन मुलांनी नथुरामची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, उपपंतप्रधान आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल तसेच गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांच्याकडे तशी लेखी विनंती केली.
गांधीजींच्या या दोन्ही मुलांच्या मते गोडसे आणि आपटे यांना फाशीची शिक्षा द्यायला नको होती. खुद्द गांधी मृत्यूदंडाच्या विरोधात होते. त्यांच्या मते मृत्युदंड हे एक क्रू*रतेचे प्रतिक आहे. अपराध्याला माफ करणे आणि त्याला प्रायश्चित्त करायला लावणे हीच त्याच्यासाठी योग्य शिक्षा ठरू शकेल असे त्यांचे मत होते. म्हणून गोडसे आणि आपटे यांना फाशीची शिक्षा देऊ नये, असे त्यांचे मत होते.
गांधींवर आपल्याकडील पिस्तुलातील गोळी झाडल्यावर गोडसे यांनी पळून जायचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. गांधींच्या शरीराच्या आरपार दोन गोळ्या गेल्या होत्या आणि तिसरी गोळी त्यांच्या शरीरातच राहिली होती.
रक्ताच्या थारोळ्यात गांधींचे शव झाकून ठेवण्यात आले होते. पण, त्यांचे थोरले चिरंजीव देवदास गांधी यांनी गांधींच्या देहावर टाकलेले कापड काढले. कारण जन्मभर अहिं*सा आणि शांतीची पूजा करणाऱ्या या संताची शेवटच्या क्षणी काय अवस्था झाली हे पाहणाऱ्यांना समजले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
रामदास आणि देवदास यांनी जेलमध्ये जाऊन गोडसेंची भेट देखील घेतली. रामदास आणि गोडसे यांच्यात पत्रव्यवहारही होत होता. मणिलाल आणि रामदास यांनी गोडसेंना माफ करण्याची विनंती केली तेव्हा त्यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली.
गोडसे आणि आपटे हे त्यावेळी अंबाला जेलमध्ये होते. मणिलाल आणि रामदास यांनी केलेल्या माफी देण्याच्या विनंतीवर पटेल, नेहरू आणि सी. राजगोपालचारी यांनी चर्चा केली. परंतु या मारेकऱ्यांना माफी देणे मान्य नव्हते.
या दुष्कर्मींना फाशी झाली पाहिजे यावर त्या तिघांचेही एकमत होते. त्या तिघांनीही गोडसे आणि आपटे यांना माफी देण्याची मणिलाल आणि रामदास यांची विनंती अमान्य केली.
सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले तरी गोडसेंनी तसे केले नव्हते. जेव्हा कोर्टात त्यांना सुनावणीसाठी हजर केले जायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चात्तापाची भावना दिसत नसे.
“गांधी वध क्यों” या पुस्तकात नथुरामचे भाऊ आणि या खटल्यातील आणखी एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी लिहिले आहे की, “देशभक्ती जर पाप असेल तर मी मानतो, मी या पापाचा धनी आहे. मात्र जर देशभक्ती हा अभिमान असेलत तर या अभिमानाचा मी पाईक आहे, असे मला वाटते. देशासाठी आणि जातीच्या भल्यासाठी मी हे कार्य केले आहे.”
१५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला जेलमध्ये या दोघांना फाशी देण्यात आली. फासावर जाताना दोघांच्याही हातात भगवा झेंडा आणि भगवद्गीतेची प्रत होती.
गोडसे हे संघाचे स्वयंसेवक असल्याचाही दावा करण्यात येतो, मात्र त्यावेळी संघाने हात झटकत गोडसे आणि आमचा काहीही संबंध नाही अशी भूमिका घेतली होती.
गांधीजींचे नातू गोपाल कृष्ण गांधी हे २०१७ साली उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. या निवडणुकी दरम्यान प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांनी या गोष्टीचा खुलास केला. गांधीवादी विचार मानणारा माणूस असल्याने विचारधारा , मानवता आणि सहिष्णुता या विचारांना माझ्यालेखी खूपच महत्व आहे. खुद्द गांधींनी देखील अशा शिक्षेला विरोधच केला असता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








