आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जर्मन सैन्य आपल्या रणगाड्यांसह पॅरिसमध्ये दाखल झाले होते. लाखोंच्या संख्येने पॅरिसमध्ये दाखल झालेले जर्मन सैन्य निश्चितपणे फ्रेंच नेव्हीकडे आपला मोर्चा वळवणार हे लक्षात घेऊन, फ्रेंच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी टूलॉन येथील जहाजांवरील वाल्व्हस उघडले आणि घाईघाईने त्यांमध्ये स्फोटकं ठेवली.
ही काही शत्रूची जहाजं नव्हती तर खुद्द फ्रेंच नौदलाचीच ही जहाजं होती. काही मिनिटांतच स्फोट होऊन शेकडो फ्रेंच जहाजं भूमध्य समुद्राच्या तळाशी पोहोचली. ज्या जर्मन सैनिकांनी हे स्फोट पहिले ते तुमच्या-आमच्या सारखेच आश्चर्यचकित झाले होते. कारण फ्रेंच नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचीच जहाजे समुद्रात बुडवली होती.
दुसऱ्या महायु*द्धाचा हा दुःखद आणि विचित्र भाग होता. आपल्या जहाजांच्या ताफ्यावर जर्मन लोकांनी ताबा मिळवू नये यासाठी फ्रेंच नेव्हीने आपलीच जहाजं बुडवली होती. असं नेमकं काय घडलं जेणेकरून फ्रेंच नौदलाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू..
दुसऱ्या महायु*द्धात जर्मनीने पोलंडवर आक्र*मण केल्यानंतर फ्रान्स आणि ब्रिटनने जर्मनीविरुद्ध यु*द्ध घोषित केले. जर्मन सैन्याने फ्रांस-बेल्जियम सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती सुरु केली होती. जर्मन सैन्याने ओर्डेनेस फॉरेस्टचा मार्ग वापरून मित्रराष्ट्रांच्या सैन्याला गुंगारा दिला आणि प्रचंड वेगाने जर्मन रणगाडे अटलांटिककडे गेले, त्यामुळे फ्रान्समधील मित्र-राष्ट्रांचे सैन्य विखुरले गेले.
फ्रान्सच्या काही भागांमध्ये फ्रान्सने जर्मनीला पराभूत केले होते तर काही ठिकाणी याउलट घडलं होतं. यामुळेच जर्मनीने फ्रान्सला दोन झोन्समध्ये विभागलं होतं. एक होता जर्मन-व्याप्त झोन आणि दुसरा फ्री फ्रेंच झोन. जर्मन नियंत्रित फ्रान्सला नंतर ‘विची फ्रान्स’ असे नाव देण्यात आले. विची फ्रान्स ना*झी जर्मनीच्या हातातील बाहुली होती आणि ते जर्मन्सच्या निर्देशांनुसार वांशिक धोरणे अंमलात आणत होते.
जगभरातील फ्रेंच वसाहती विची फ्रान्सच्या ताब्यात होत्या. फ्रेंच नौदलही आता विची फ्रान्सच्या नियंत्रणाखाली आले. फ्रेंच नौदल हे युरोपमधील दुसरे सर्वात मोठे नौदल होते आणि ब्रिटिशांनी ते नाझींच्या नियंत्रणाबाहेर ठेवण्याचा निश्चय केला होता. स्वयंघोषित “फ्री फ्रेंच”चा नेता जनरल चार्ल्स डी गॉल याला ब्रिटनने ही सर्व फ्रेंच नौदलाची जहाजं एखाद्या बंदरामध्ये किंवा ब्रिटिश बंदरामध्ये ब्रिटिशांना शरण येतील असे आदेश दिले होते. तसेच ब्रिटनच्या रॉयल नेव्हीला विची फ्रांसच्या नियंत्रणाखालील फ्रेंच यु*द्धनौका बुडवण्याचे किंवा त्या सीझ करण्याचे आदेश दिले गेले होते.
ब्रिटिशांच्या अल्टीमेटमला एका ठराविक डेडलाईन होती. फ्रान्सचा सगळ्यात मोठा जहाजांचा ताफा अल्जेरियात मर्स-अल-कबीर बंदरात होता. मर्स-अल-कबीर येथील फ्रेंच अधिकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या या सर्व गोष्टी नाकारल्या आणि काहीही झालं तरी जर्मन नौदलाशी हातमिळवणी करणार नाही हे वचन दिले. पण रॉयल नेव्हीने हे स्पष्टीकरण न स्वीकारता अल्जेरियातील मर्स-अल-कबीर बंदरातील फ्रेंच जहाजांवर हल्ला करून १४०० फ्रेंच खलाशांना ठार केले. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या या ह*ल्ल्यानंतर फ्रेंच नौदलाने दक्षिण फ्रान्समधील ‘टूलॉन’ बंदरात उर्वरित फ्रेंच नौदलाची जहाजे आणली.
ऑपेरेशन टॉर्चच्या दरम्यान, उत्तर आफ्रिकेत मित्र राष्ट्रांचे सैन्य उतरल्यानंतर विची फ्रान्सचा नौदल कमांडर ॲडमिरल डार्लानसह अनेक विची नेत्यांनी मित्रराष्ट्रांच्या नेत्यांची भेट घेतली. आपल्या अधिपत्याखालील सरकारने बाजू बदलू नये यासाठी विची फ्रान्सवर ताबा मिळवण्याची गरज असल्याचे हिटलरच्या लक्षात आले. यासाठी हि*टल*रने ऑपेरेशन अँटोन सुरू केले.
ऑपरेशन अँटोनचे मुख्य ध्येय विची फ्रान्सवर ताबा मिळवून जर्मन नौदलाच्या ‘ऑपरेशन लीला’ला आवश्यक तो सर्व सपोर्ट करणे हे होते, याशिवाय टूलॉनमधील फ्रेंच नौदलाच्या जहाजांच्या ताफ्यावर ताबा मिळवणे आणि हा फ्रेंच जहाजांचा ताफा आपला सहयोगी इटलीकडे सोपवणे हेसुद्धा या ऑपरेशनचे ध्येय होते. पण हि*टल*रला हे संपूर्ण ऑपरेशन रक्तपात न करता पूर्ण करायचे होते.
जर्मन सैन्याने विची फ्रान्स ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यावर, फ्रेंच जहाजे हीच जर्मन सैन्याची लक्ष्य आहेत हे फ्रेंच नौदल कमांडरला समजले. त्यामुळे फ्रेंच कमांडरने आपल्या खलाशांना जहाजे जर्मन सैन्यापासून दूर ठेवावीत यासाठी जहाजे नष्ट करण्याचा आदेश दिला. जर्मन सैन्याच्या ‘सिक्सथ पँझर डिव्हिजन’ने टूलॉन बंदर गाठले खरे, पण त्यांना मोठी फाईट मारावी लागली.
टूलॉन बंदराचे रक्षण करणाऱ्या खलाशांनी जर्मन सैन्याला मोठा प्रतिरोध केला. फ्रेंच कमांडर ॲडमिरल लेबॉर्डेने त्याच्या मुख्य स्ट्रासबर्ग जहाजातून सर्व फ्रेंच जहाजे बुडवण्याचे किंवा नष्ट करण्याचे आदेश दिले. लेबोर्डेने काही वेळ जर्मनांशी वाटाघाटी सुरू ठेवल्या तर यावेळेत फ्रेंच खलाशांनी जहाजांवर स्फोटके ठेवली.
जर्मन सैन्याने स्ट्रासबर्गचा स्फोट होताना पाहिला आणि काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतर जहाजांना वाचवण्यासाठी त्यांनी बंदरात धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यातील काही जर्मन सैनिक आणि खलाशी जहाजांमधून पळून गेले. काही जहाजांनी उत्तर आफ्रिकेत पलायन केले.
या सर्व गोंधळात फ्रेंचांनी टूलॉनमध्ये १६४ जहाजे बुडवली, पण एकही शत्रूच्या हाती लागू दिले नाही. ‘फ्री फ्रांस’चा नेता जनरल चार्ल्स डी गॉल याने लेबोर्डेच्या कृत्याचा निषेध नोंदवला आणि जहाजांचा ताफा ब्रिटनमध्ये आला पाहिजे असा युक्तिवाद केला. पुढील कित्येक दिवस ही जहाजे जळतच होती आणि सुमारे दोन वर्षे हे बंदर असुरक्षित होते.
जर्मनीचे सहयोगी इटालियन लोक या नष्ट झालेल्या जहाजांची पुनर्बांधणी करू शकले नाहीत, म्हणून त्यांनी जहाजांवरील लोह आणि इतर धातू स्क्रॅप केले. १९४४ साली मित्र राष्ट्रांचे सैन्य फ्रान्सच्या दक्षिणेस उतरले तेव्हा जहाजाच्या काही तोफा आणि बंदुका टूलॉन बंदराच्या संरक्षणासाठी जर्मन सैन्याने वापरल्या.
जर फ्रेंच नौदल जर्मन सैन्याच्या हाती लागले असते तर भूमध्य समुद्रात रॉयल नेव्ही आणि यूएस नेव्हीसाठी ते मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरले असते. सुदैवाने, फ्रेंचांनी ब्रिटिशांना दिलेले शब्द पाळले आणि दुसरे महायु*द्ध लवकर संपले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










