आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘अशी ही बनवाबनवी’, हा चित्रपट न पाहिलेला मराठी माणूस शोधणं कठीणचं असेल. कारण, हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील ‘माइल स्टोन’ ठरला होता. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ रे चौकडीनं अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत मिळून मराठी प्रेक्षकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावलं होतं. गेल्या दोन दशकांपासून हा चित्रपट मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. हा भन्नाट विनोदी चित्रपट तयार करण्यामागे असणारा चेहरा देखील भन्नाट आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला आहे. आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती असेल, १९८८ मध्ये आलेला हा चित्रपट अभिनेता ‘सचिन पिळगावकर’ यांनी दिग्दर्शित केला होता!
अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळापासून सचिन पिळगावकर या नावानं अभिनय, गायन, निर्मीती, दिग्दर्शन, लेखन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेलं आहे. मात्र, याही पलिकडे जाऊन सचिन यांना आणखी एका गोष्टीमुळं ओळखलं जातं, ती गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव. आतापर्यंत चित्रपट सृष्टीतील अनेकांनी त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं आहे. मग यात प्रसिद्ध गायक सोनू निगम तरी कसा मागे राहील.
सोनू निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. त्यात त्यानं सचिन पिळगावकर यांना आपलं ‘हिरो’ म्हटलं आहे. हा व्हिडिओ २०१४ मधील आहे.
सचिन यांनी चित्रपटसृष्टीतील ५० वर्षांचा प्रवास ‘हाच माझा मार्ग’ या पुस्तकात शब्दबद्ध केला. २०१४ मध्ये या पुस्तकाचं ई-व्हर्जन अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत गायक सोनू निगम यांच्या हस्ते रिलीज करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात सोनूनं सचिन आणि त्याच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सोनू निगम ८-९ वर्षांचा असताना पहिल्यांदा एका अभिनेत्याला भेटला होता आणि तो अभिनेता म्हणजे सचिन पिळगावकर होते. त्यानंतर गायक होण्यासाठी तो आपल्या वडिलांसोबत जेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये आला होता. तेव्हा सर्वात अगोदर तो सचिनच्याच घरी गेला होता. इतकंच नाही तर त्याचे सर्वात पहिले जज देखील सचिनचं होते आणि त्याला मिळालेला पहिला पुरस्कारसुद्धा त्यांच्याच हातून मिळाल्याचं सोनूनं सांगितलं.
सोनूचा पहिला विदेश प्रवास (बहरिन) देखील सचिन यांच्या सोबत झाला होता. ज्या चित्रपटातील सर्व गाणी सोनूनं गायली होती, तो चित्रपट सचिन यांच्यामुळेच आपल्याला मिळाला होता, असं सोनूनं आवर्जून सांगितलं.
‘सचिन पिळगावकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. मात्र, इतकं यश मिळवूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर असल्याचं मी पाहिलं आहे. माझ्यासारख्या नवख्या आणि काहीही फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या मुलाला ते सहज हाकलून लावू शकले असते. मात्र, त्यांनी एकदम याच्या उलट केलं. त्यांनी मला जवळ केलं. मला गरज पडली तेव्हा त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांच्यासारखा साधासरळ माणूस शोधूनही सापडणार नाही’, असं सोनू निगमनं सांगितलं. सचिन पिळगावकर यांच्यामुळेचं मला पहिलं मराठी गाणं मिळालं आणि त्यांनीच एका मराठी चित्रपटात माझ्याकडून अभिनय देखील करून घेतला.
गाणं शिकताना आपल्या आयुष्यातील जी पहिली मुरकी मारली ती देखील सचिन पिळगावकर यांच्याच गाण्यातील होती, असं देखील सोनूनं सांगितलं.
१७ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या सचिन यांच्या अंगात उपजतच अभिनय कौशल्य होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बालपणापासून त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. १९६२ साली बालकलाकार म्हणून त्यांना पहिला सिनेमा (हा माझा मार्ग एकला) मिळाला. या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी त्यांना बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांतर तब्बल ६५ चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. १९७५ मध्ये त्यांनी ‘गीत गाता चल’ या सुपरहिट चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. पहिल्याच चित्रपटात यश मिळाल्यानंतर त्यांनी बालिका वधू (१९७६), अखियों के झरोखों से (१९७८) आणि नदियाँ के पार (१९८२) सलग सुपरहिट सिनेमे दिले. त्यांनी अनेक हिंदी, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं.
त्रिशूल, चित्रपटापासून त्यांनी पुन्हा सहकलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातही त्यांनी प्रशंसा मिळवली. भूमिका कुठलीही असो सचिन जीव ओतून अभिनय करत. शोले, अवतार, सूर संगम आणि सत्ते पे सत्ता या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकाराच्या भूमिका केल्या. त्यांनी हिंदी दिग्दर्शन क्षेत्रातही आपला हात आजमावला. १९९२मध्ये त्यांनी सुभाष घई यांच्या ‘प्रेम दिवाने’ आणि ‘ऐसी भी क्या जल्दी है'(१९९६) या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यापूर्वी त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्येही अभिनय आणि दिग्दर्शन केलेलं आहे. माय बाप (१९८२) हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (१९८४), ‘अशी ही बनवा बनवी’ (१९८८), आमच्यासारखे आम्हीच (१९९०) आणि नवरा माझा नवसाचा (२००४), असे एक से बढकर एक चित्रपट केले.
१९८४ मध्ये ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटादरम्यान त्यांची सुप्रिया सबनीस यांच्याशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. अल्पावधीत त्यांची जोडी लोकप्रिय झाली. आपल्या आयुष्याच्या सुप्रिया अविभाज्य घटक असल्याचं सचिन सांगतात.
एप्रिल २०१९ मध्ये सचिन पिळगावकर यांची पीटीआयनं एक मुलाखत घेतली होती. त्यात आपल्या कारकिर्दीविषयी सचिन यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ‘चित्रपट सृष्टीमध्ये योगदान देण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. अभिनय ही एक कला आहे. लोकांचं मनोरंजन करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. यश मिळाल्यानंतरही त्यात सातत्य ठेवण्याचा दबाव असतो. जो कलाकार हा दबाव खुल्या मनानं स्विकारतो तो नक्कीच यशस्वी होतो,’ असं मत सचिन यांनी व्यक्त केलं होतं. एकूणच सचिन पिळगावकर यांनी वेळोवेळी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक दाखवून दिल्याचं दिसतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










