आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुल्ये दिलीच. पण, याशिवाय फ्रेंच क्रांतीने जगाला आणखी दोन शब्द दिले. कोणते हे दोन शब्द? तर डावी आणि उजवी विचारसरणी. याआधीही खुल्या, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे लोक होते तसे त्यांना विरोध करणारे पण, होते. सरंजामशाही आणि धर्मसंस्थांच्या सत्तेला सर्वोच्च स्थानी मानणारेही होतेच. पण यांची अशा पद्धतीने याआधी विभागणी केली गेली नव्हती. ही विभागणी फ्रेंच राज्यक्रांतीतून झाली.
आज जवळपास जगभर या दोन्ही विचारधारांचे अनुयायी आपल्याला दिसून येतात. आजकाल तर प्रत्येकालाच डावे किंवा उजवे असा शिक्का मारण्याची घाई झालेली दिसते. जणू पृथ्वी दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागली आहे आणि तिच्यावरील मनुष्यजात डाव्या-उजव्या विचारसरणीत.
राजकारणात तर या दोन्ही शब्दांचा कमालीचा प्रभाव जाणवतो. या दोन्ही विचारधारा कुरवाळत राजकारणी मात्र आपली भाकरी भाजून घेताना दिसत आहेत. आज सर्वत्र हेच चित्र आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीतून हे शब्द नेमके कसे निर्माण झाले? जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
१७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती घडली, ज्यातून राजकीय पटलावर मोठा बदल घडून आला. या काळापर्यंत जगात सर्वत्रच राजेशाही आणि सरंजामशाही होती. या प्रकारच्या शासनात जनतेला कवडीचेही स्थान नसते हे तर आपण जाणतोच. भल्या माणसाच्या हाती शासन आलेच तर जनतेला चार सुखाचे दिवस पाहायला मिळत होते. पण, तोच राज्यकर्ता जर जुलमी आणि आपल्या ऐषोआरामात मग्न असलेला असेल तर जनतेची दशा मुकी बिचारी कुणीही हाका अशी होऊन जाते.
तर १७८९ साली फ्रांसमध्ये राजा १६वा लुई याने एक सभा बोलावली. या सभेसाठी राजा तीन वर्गाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करतो. या प्रतिनिधींना एस्टेट म्हटले जात असे. यात पदरी, जमीनदार आणि सामान्य नागरिक अशा तिन्ही वर्गांच्या प्रतिनिधींना म्हणजे एस्टेट्सन बोलावले जाते.
या सभेकडून राजा काही सल्ले घेतो आणि आपली मते मांडतो. पण, अशी सभा घ्यावी किंवा नाही हे संपूर्णत: राजावर अवलंबून असे. यापूर्वी फ्रांसमध्ये अशी सभा १६१४ साली बोलावण्यात आली होती. म्हणजे सुमारे दीडशे वर्षापूर्वी. त्यानंतर थेट १७८९ मध्ये. इतका मोठा कालावधी गेल्याने खरे तर राज्यात कुणालाच अशीही एखादी सभा बोलावली जाते हे माहितीच नव्हते.
राजा १६वा लुई याच्या काळात फ्रांसची अवस्था फारच बिकट होती. राज्याचा खजिना रिता झाला होता आणि लोकांच्या गरजा भागात नव्हत्या त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष माजला होता. नागरिकांतील वाढता असंतोष पाहून अशी एखादी सभा बोलवावी असे राजाला वाटत होते, म्हणून त्याने ही सभा बोलावली. यात नागरिकांच्या प्रतिनिधीने राजासमोर काही मागण्या ठेवल्या. परंतु राजा आणि बाकीच्या दोन एस्टेट्सनी सामान्य नागरिकांच्या या मागण्या साफ धुडकावून लागल्या. नागरिकांची मागणी होती की राज्यासाठी एक संविधान तयार करण्यात यावे, अशा इतरही अनेक मागण्या होत्या.
तिसऱ्या दिवशी ही सभा पुन्हा भरणार होती. पण, नागरिकांसाठी या सभेचे दरवाजे बंद केले. चारही बाजूंनी कडवा पहारा बसवण्यात आला. कोणी सामान्य नागरिक आत फिरकू शकणार नाही याची आवर्जून दक्षता घेण्यात आली. त्यांना सभागृहात प्रवेश करता येऊ नये म्हणून चारही बाजूंनी कुलुपे लावण्यात आली.
सभागृहाबाहेरच ही परिस्थिती पाहून सामान्य नागरिक खूपच संतापले आणि त्यांनी तिथेच राजाच्या टेनिस कोर्टमध्ये ठिय्या देण्याचे ठरवले. यावेळी एकूण ५७६ लोक जमले होते. सर्वांनी मिळून निर्धार केला की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते जागचे हलणार नाहीत.
मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा होऊ लागले आणि आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढाई सुरु ठेवण्याची शपथ घेऊ लागले. हीच ती ऐतिहासिक शपथ जिला ‘टेनिस कोर्ट ओथ’ म्हटले जाते.
हळूहळू पादरी आणि जमीनदार देखील सामान्य लोकांच्या या उठावाला पाठींबा देऊ लागले. हळूहळू जसजशी या आंदोलनातील सहभागी लोकांची संख्या वाढू लागली. तसतसे राजावर दडपण येऊ लागले. शेवटी त्याने सामान्य नागरिकांची संविधान निर्मितीची मागणी मान्य केली. यासाठी त्याने एक ९ जुलै १७८९ रोजी संविधान समिती स्थापन केली. एस्टेट जर्नलने संविधान निर्मितीचे काम हाती घेतले. दोन वर्षांनंतर ९ जुलै १७९१ रोजी फ्रांसचे संविधान सादर करण्यात आले.
यानंतरच्या सगळ्या सभा या संविधानातील नियमांनुसार होऊ लागल्या. पूर्वी सभा भरत असे तेव्हा सभेचा अध्यक्ष राजाच असे. राजाच्या अध्यक्षतेखाली भरल्या जाणाऱ्या या सभांची बैठक व्यवस्था अर्धवर्तुळाकार असे. परंतु संविधानानुसार घेण्यात आलेल्या सभांचे अध्यक्षपद राजाकडे नसे. या सभेसाठी अध्यक्षाची निवड केली जात असे. अशा निवडलेल्या अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली सभा भरू लागली तेव्हा अध्यक्ष मध्यस्थानी आणि त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एका रांगेत इतर सभासद बसत असत.
योगायोगाने डाव्या बाजूला सामान्य नागरिक आणि क्रांतिकारी लोक बसू लागले तर उजव्या बाजूला त्यांचे विरोधक. काळाच्या ओघात डाव्या बाजूला, सुधारणेची मागणी करणारे क्रांतिकारी, पुरोगामी, खुल्या विचारसरणीचे आणि मुक्त बाजारपेठेचे समर्थक होते, त्यांना लेफ्टीस्ट म्हटले जाऊ लागले. आणि नेमके याच्या उलट त्यांच्या विरोधी विचारसरणीचे समर्थक ज्यांना राईटीस्ट म्हटले जाऊ लागले.
पुढे जाऊन सगळीकडेच संविधान, कायदे आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून चालणारे शासन यंत्रणा अस्तित्वात आली. या दोन्ही विचारधारा मानणारे लोकही जगभरात पसरत होते. शासन यंत्रणेतील हा बदल सर्वच देशांनी स्वीकारला.
१८४८ साली कार्ल मार्क्सने आपले विचार मांडले. त्याच्या विचाराने प्रेरित झालेल्या साम्यवादी लोकांनाही डाव्या विचारसरणीचे हीच बिरुदावली मिळाली.
पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धातील उजव्या विचारसारणीच्या नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेने संपूर्ण जग वेठीस धरल्याचेही आपण पहिले.
आज या विचारधारांना जगभर मान्यता मिळाली आहे. कुणी स्वतःहून आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत ही ओळख सांगण्याचीही आता गरज उरलेली नाही. प्रगत, सुधारणावादी विचार मांडणारे म्हणजे डावे आणि त्यांना विरोध करणारे उजवे. विचारसरणीतील ही तफावत अशाप्रकारे उदयास आली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










