आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दुसऱ्या महायु*द्धादरम्यान अमेरिकन सैन्यातील ७० हजारपेक्षा अधिक सैनिकांनी कर्तव्यनिष्ठ आक्षेपक (conscientious objectors) म्हणून काम केलं. हे असे सैनिक होते ज्यांचा यु*द्धातील रक्तपाताला विरोध होता मात्र, त्यांचा यु*द्धात इतर सेवा देण्यास ते तयार होते. यातील २५ हजार सैनिक अमेरिकन सशस्त्र दलांमध्ये वैद्यकीय आणि इतर नॉन-कॉम्बॅटन्ट प्रकारच्या सेवा देण्यासाठी सामील झाले.
व्हर्जिनियातील लिंचबर्गचा रहिवासी असलेला डेसमंड टी. डॉस हा त्यापैकीच एक होता. कोणालाही तो अतिशय सामान्य व्यक्ती वाटेल मात्र, त्याची कामगिरी असामान्य होती. यु*द्धासारख्या परिस्थितीमध्ये स्वत:चा जीव वाचवणं देखील कठीण झालेलं असतं. मात्र, या अमेरिकन पठ्ठ्यानं तब्बल ७५ सैनिकांचे प्राण वाचवले अन् तेही कुठल्याही शस्त्राचा वापर न करता! त्याच्या शौर्याची आणि धैर्याची ही अनोखी गोष्ट खास तुमच्यासाठी..
१९१९ साली जन्मलेला डॉस, बायबल आणि ख्रिश्चन धर्मातील दहा आज्ञांवर दृढ विश्वास ठेवणारा होता. दर सात दिवसांनी भरणाऱ्या ॲडव्हेंटिस्ट चर्चमध्ये तो नियमित उपस्थित राहात असे. त्याचा रक्तपाताला विरोध होता. जेव्हा युनायटेड स्टेट्सनं दुसऱ्या महायु*द्धात उडी घेतली तेव्हा डेसमंड डॉस ‘न्यूपोर्ट न्यूज नेव्हल शिपयार्ड’मध्ये कार्यरत होता.
१९४२ साली डॉस नोकरी सोडू शकत होता. मात्र, ही वेळ आपल्या देशाची सेवा करण्याची आणि आपल्या माणसांची मदत करण्याची आहे, असं डॉसला वाटलं. म्हणून तो कर्तव्यनिष्ठ आक्षेपक म्हणून सैन्यात भरती झाला. प्रत्यक्ष यु*द्ध लढणार नसला तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सैन्याचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागलं.
डॉस स्वत:च्या इच्छेनं सैन्यात सेवा देण्यासाठी तयार झाला होता. त्याच्या युनिटमधील कोणत्याही इतर सैनिकाप्रमाणं त्याला कर्तव्याची जाणीव होती. त्याच्या मनात देशभक्तीची भावना देखील होती. मात्र, तरी देखील त्याला बूट कॅम्पमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांकडून त्याचा मोठ्या प्रमाणात मानसिक छळ केला गेला. रात्री जेव्हा तो प्रार्थना करायचा तेव्हा बूट आणि इतर वस्तू त्याच्या अंगावर फेकल्या जात. आपल्याचं युनिटमधील सैनिकांकडून वाईट वागणूक मिळून देखील डॉस आपल्या कर्तव्यापासून ढळला नाही.
१९४४ साली ३०७व्या इन्फन्ट्री रेजिमेंटमधील ७७व्या विभागात वैद्यकीय तुकडीचा सदस्य म्हणून डॉसला पॅसिफिकमध्ये पाठवण्यात आलं. इथूनच्या खऱ्या अर्थानं त्याच्या कामाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. जुलै १९४४ मध्ये त्यांची तुकडी गुआममध्ये दाखल झाली. त्यावेळी मात्र, ज्या लोकांनी बूट कॅम्पमध्ये डॉसला मारण्याची धमकी दिली होती. त्यांना बायबल आणि औषध घेऊन मिरवणाऱ्या डॉसचं महत्त्व पटलं.
गुआममधील लढाई दरम्यान त्यानं कमालीचं शौर्य दाखवून जखमी सैनिकांवर उपचार केले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, यु*द्धाच्या धुमश्चक्रीमध्ये तो उपचार करत फिरत होता. या दृश्याची कल्पना करा, नक्कीच तुमच्या अंगावर शहारे येतील. डॉसनं प्रत्यक्षात ते काम केलं होतं. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला ‘ब्रॉन्झ स्टार मेडल’ देण्यात आलं होतं. गुआमनंतर, त्याची तुकडी लेटे (फिलिपीन्स) येथे लढली. त्याठिकाणीसुद्धा डॉसने त्याच्या सहकाऱ्यांसाठी आपलं समर्पण आणि शौर्य दाखवले. यामुळेच त्याला दुसरं ‘ब्रॉन्झ स्टार मेडल’ मिळालं.
जेव्हा डॉस आणि त्याचं युनिट ओकिनावा येथे पोहचलं तेव्हा त्याच्या सहकारी सैनिकांचे त्याच्याबद्दल असलेले सर्व आक्षेप आपोआप गळून पडले होते. डॉस त्यांच्यासाठीच यु*द्धात आला आहे. जेव्हा शत्रूच्या गोळ्या आणि तोफा आपल्या अंगाची लाहीलाही करतील तेव्हा डॉसच त्यांचा जीव वाचवण्यासाठी आगीत धावून येईल, याची त्यांना खात्री झाली होती.
३०७ वी रेजिमेंट २९ एप्रिल १९४५ रोजी ओकिनावातील हॅक्सॉ रिजवर चाल करून गेली. शत्रू पक्षातील जपानी सैनिकांनी त्याठिकाणी बोगद्यांचा चक्रव्यूह तयार केला होता. टेकडीवर ताबा मिळवण्याच्या मोहिमेत कंपनी ए पूर्णपणे जायबंदी झाली होती.
ज्याठिकाणी अमेरिकन सैन्य लढा देत होतं, तो अंदाजे ४०० फूट उंचीचा खडक होता. वरच्या बाजूनं ओव्हरहँग तयार करण्यात आला होता. माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. काही दिवस अमेरिकन सैन्यानं जपानी सैन्याविरुद्ध लढा दिला. मात्र, जपानी मशीन-गन्सचा मारा फार भयानक होता.
अशा परिस्थितीमध्ये निःशस्त्र डॉसनं वरून शत्रूच्या गोळ्यांचा मारा होत असताना देखील जखमींवर उपचार केले. एक वैद्य असल्याच्या आपल्या अंगावरील सर्व खाणाखुणा त्यानं काढून टाकल्या होत्या. कारण त्याला माहित होत जर जपानी सैन्यानं त्याला लक्ष्य केलं तर अमेरिकन सैन्याला वैद्यकीय मदत देण्यास कुणीही शिल्लक राहिलं नसतं. पुढील कित्येक दिवस, आपल्या साथीदारांना मदत करण्यासाठी डॉसनं सतत स्वतःचा जीव धोक्यात घातला.
५ मे पर्यंत लढाई इतकी तीव्र झाली की अमेरिकन सैन्यातील सर्व सैनिकांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, डॉसनं माघारी येण्यास नकार दिला. कारण त्यावेळी ७५ सैनिक खडकाच्या माथ्यावर जखमी अवस्थेत पडलेले होते. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी डॉस नक्कीच त्यांना मागे सोडणार नव्हता.
डॉसनं वरती अडकलेल्या ७५ जणांना यशस्वीरित्या खाली आणण्याची किमया करून दाखवली. २१ मे रोजी ग्रेनेडच्या तुकड्यांनी आणि स्नायपरच्या गोळीनं तो जखमी झाला. स्वत: गंभीर जखमी असूनही त्यानं माघार घेतली नाही. त्याने इतरांना प्राधान्य देत उपचार सुरू ठेवले. नंतर मात्र, त्याची प्रकृती जास्त खालावल्यानं मे महिन्याच्या अखेरीस त्याला यु*द्धातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अनेक दिवस तो आपल्या जखमा आणि क्षयरोगाशी झगडत होता.
१२ ऑक्टोबर १९४५ रोजी राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमॅन यांनी व्हाईट हाऊसच्या लॉनमध्ये एक समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभात त्यांनी डॉसला ‘मेडल ऑफ ऑनर’ प्रदान केलं. एक राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉससारख्या व्यक्तीचा सन्मान करणं आपल्यासाठी खरंच भाग्याचं असल्याचं ट्रुमन म्हणाले होते.
दुसऱ्या महायु*द्धात शस्त्र हाती न घेता ‘मेडल ऑफ ऑनर’ मिळवणारा डॉस हा एकमेव सैनिक आहे. २३ मार्च २००६ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी डॉस यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक मिल गिब्सन यांनी ‘हॅक्सॉ रिज’ या चित्रपटाच्या माध्यमातून डेसमंड टी. डॉसच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर आणली. विशेष म्हणजे या चित्रपटाला दोन ऑस्कर देखील मिळाले.
साधारपणे जो सैनिक हातात शस्त्र घेऊन यु*द्धात उतरतो त्याला पराक्रमी म्हटलं जातं. मात्र, डॉसनं या समजाला आव्हान देत तो मोडीत काढला. सैनिकांचे जीव वाचवून देखील आपण देशसेवा करू शकतो, हे त्यानं सिद्ध करून दाखवलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










