आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या उन्मत्त औरंगजेबाला पाठ दाखवून त्याच्यापुढे लाचार होण्यास नकार देणाऱ्या शिवछत्रपतींचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. औरंगजेबाच्या दरबारात त्याचा अपमान केल्यास परिणाम काय होतील हे महाराजांना माहिती नव्हते असे नाही, पण त्यांनी स्वतःच्या जिवापेक्षाही स्वतःचा स्वाभिमान जपण्याला प्राधान्य दिले.
त्याच दिल्लीतील दरबारात जेव्हा राजा जॉर्ज पंचमचा राज्याभिषेक झाला आणि त्याला भारताचा राजा घोषित करण्यात आले, तेव्हा दरबारी नियम असा होता की राजाचे अभिनंदन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने तीन वेळा त्याच्यासमोर झुकावे आणि त्याला पाठ न दाखवता निघून जावे. अगदी इंग्लंडचे पंतप्रधानही या नियमाला अपवाद नव्हता. पण याच दिल्ली दरबारात राजा जॉर्ज पंचमच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक भारतीय राजा असा होता ज्याने जॉर्ज पंचमला फक्त एकदाच झुकून अभिवादन केले आणि त्याच्याकडे पाठ करून चालू लागले.
कोण होता हा स्वाभिमानी बाण्याचा राजा, ज्याने जॉर्ज पंचमपुढे कमीपणा घेण्यास नकार दिला?
राजा जॉर्ज पंचमच्या राज्याभिषेकासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. मूल्यवान हिऱ्या-रत्नांनी या मंडपाची शोभा आणखीनच वाढवली होती. ही सगळी मौल्यवान संपत्ती भारतातील ब्रिटीशांनी भारताची लुट करूनच जमवली होती, हे वेगळे सांगायला नको. राजा जॉर्ज पंचम आपल्या राजसिंहासनावर बसला होता, शेजारी त्याची पत्नी होती. भारतातील स्थानिक राजे एकेक करून राजाला अभिवादन करत होते. राजाला अभिवादन करण्यासाठी ते तीन वेळा नतमस्तक होत होते आणि राजाकडे पाठ होऊ नये म्हणून उलटे काही पावले उलटे चालत होते.
असाच एक राजा इंग्लंडच्या जॉर्ज पंचम समोर येऊन उभा राहिला. त्याने राजाचे अभिनंदन केले आणि अभिवादन करण्यासाठी तो फक्त एकदाच राजापुढे झुकला आणि झटक्यात वळून सरळ चालत गेला. सगळे राजे उलटे चालत गेले पण हा एकटाच असा होता ज्याने जॉर्ज पंचमला पाठ दाखवली होती. या राजाचे नाव होते सयाजीराव गायकवाड!
हो! बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांना राजा समोर तीनदा झुकण्याचा नियम अजिबात आवडला नव्हता. राजा प्रती आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी एक वेळ झुकणे ठीक आहे पण तीन वेळा झुकून मी कमीपणा घेणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.
१८ व्या शतकाच्या मध्यापासून भारत ब्रिटीशांच्या म्हणजेच कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली होता. १८५७ मध्ये कंपनी सैन्याच्या भारतीय सैनिकांच्यात उठाव झाला. कंपनीच्या सैन्यातील भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळी*बारात अनेक ब्रिटीश अधिकारी, स्त्रिया आणि लहान मुले मारली गेली. तेव्हा ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने भारताचा कारभार कंपनीकडून काढून स्वतःकडे घेतला. राणी व्हिक्टोरियाला एकदाही भारताला भेट देणे शक्य झाले नाही त्यामुळे भारताची सम्राज्ञी म्हणून कधीच तिचा राज्याभिषेक सोहळा पार पडू शकला नाही.
राणी व्हिक्टोरियानंतर ब्रिटनची सत्ता तिचा मुलगा जॉर्ज पंचमकडे हस्तांतरित झाली आणि भारतात त्याचा दरबार पद्धतीने राज्याभिषेक करण्याचे ठरले. दरबार ही पर्शियन लोकांची सोहळा भरवण्याची खास शैली आहे. यामध्ये राजासमोर लष्कराची परेड होते आणि स्थानिक राजे मोठमोठ्या मौल्यवान भेटी घेऊन त्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात.
ब्रिटीश अधिकाऱ्यांनी याची जोरात तयारी केली होती आणि यासाठी त्यांनी वारेमाप उधळपट्टीही केली होती. जॉर्ज पंचमच्या या दरबारातून हिंदुस्थानचीच श्रीमंती झळकत होती.
भारतात त्याकाळी ५६७ संस्थाने होती. यातील प्रत्येक संस्थानिकांनी राजाचा राज्याभिषेकासाठी काही ना काही मदत केली होती. या स्थानिक संस्थानिकांचा ब्रिटीशांनी एक क्रम ठरवला होता, स्थानानुसार त्या स्थानिक राजाला बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जात असे. ज्याचा सन्मान मोठा त्याच्यासाठी जास्त फैरी झाडल्या जात होत्या. ९, ११, १५ आणि २१ अशा बंदुकीच्या फैरी झाडून आदर व्यक्त केला जाई.
हैद्राबाद, मैसूर आणि बडोदा संस्थानाच्या राजांना २१ फैरींची सलामी दिली जात असे. समान फैरींचा मान असणारे दोन राजे ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयात एकाच वेळी येणार असतील तर त्यांना एकाच वेळी आत प्रवेश करता यावा यासाठी या कार्यालयाला दोन दरवाजे ठेवण्यात आले होते.
सुरुवातीला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी ११ फैरींचा मान असणाऱ्या संस्थानिकांनी राजाला अभिवादन करावे असे ठरवले होते. नंतर यावरून खूपच गदारोळ माजला आणि सर्वांसाठीच एकच नियम लागू करण्यात आला.
तर राज्याभिषेकासाठी उपस्थित राहणाऱ्या स्थानिक संस्थानिकांसाठी करण्यात आलेला नियम असा होता – या संस्थानिकांनी शाही आणि रुबाबदार पोशाखात उपस्थित राहावे आणि भारतीय राजांना दिला जाणारा हिऱ्याचा बिल्ला आपल्या पोशाखावर लावावा. त्यांनी राजासमोर तीन वेळा झुकावे आणि उलटे चालत जावे जेणेकरून राजाला त्यांची पाठ दिसणार नाही.
हैद्राबाद, मैसूर आणि बडोदा संस्थानच्या संस्थानिकांनी राजासमोर तीन वेळा झुकण्याच्या नियमाबद्दल आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की आम्ही राजाचे सहकारी आहोत गुलाम नाही आणि म्हणून आम्ही राजासमोर झुकणार नाही. खरे तर हे तीनही राजे जॉर्ज पंचमपेक्षाही श्रीमंत होते आणि ज्या दरबारात राजाचा राज्याभिषेक होणार होता त्यासाठी या तिघांनीही भरपूर मोठी रक्कम दिली होती.
आमच्याकडूनच दान घेऊन हा राजा राज्याभिषेक करवून घेणार आणि आम्हीच याच्या समोर झुकायचे? असा त्यांचा प्रश्न होता. जो रास्तच होता. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचे काही एक ऐकून घेतले नाही. उलट ब्रिटीश पंतप्रधानही या नियमाला अपवाद नाही असे उलटे बोल या संस्थानिकांनाच सुनावले. हे नियम कुणासाठीही बदलले जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट सांगून सोडले.
ठरल्याप्रमाणे दिल्लीमध्ये दरबार सुरु झाला. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भारतातील सर्व संस्थानिक हजर झाले होते. आता स्थानिक संस्थानिकांनी राजाला अभिवादन करण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनीच ब्रिटीश अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. पहिल्यांदा हैदराबादच्या निजामाने अभिवादन केले आणि ठरल्याप्रमाणे उलटे चालून निघून गेला. त्यानंतर आला मैसूरचा राजा, त्याने नियमांनुसार तीन वेळा वाकून अभिवादन केले आणि उलटे चालत निघून गेला.
आता बडोदा संस्थानचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड राजा समोर उभे राहिले त्यांनी एकदाच वाकून अभिवादन केले आणि झटक्यात राजाकडे पाठ फिरवली आणि आपली छडी गरागरा फिरवत ते तिथून निघून गेले. यावेळी सयाजीरावांच्या चेहऱ्यावर एक मिश्कील स्मित होते.
ब्रिटीश अधिकाऱ्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे हे वागणे अजिबात पटले नाही. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. पण, सयाजीरावांना हा दुजाभाव अजिबात मान्य नव्हता आणि त्यांनी त्यांच्या वर्तनातूनच आपली नापसंती दर्शवली होती.
दुसऱ्या दिवशी ब्रिटीशांनी वर्तमानपत्रातून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. महाराजांच्या या वागण्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांचा प्रचंड संताप होत होता. त्यांनी राजांना दिला जाणारा २१ फैरींचा सन्मान काढून घेण्याची भाषा केली. त्यांना कंपनीकडून ज्या काही विशेष सवलती दिल्या जात होत्या त्या काढून घेण्याविषयीही राजाला सुचवले.
नंतर सायाजीरावांनी आपल्याला आपल्या वर्तनाचा खेद वाटत असल्याबद्दल एक पत्र लिहून राजा जॉर्ज पंचमला पाठवले. राजानेही सयाजीरावांच्या या वागण्याचा फारसा बाऊ केला नाही.
ब्रिटिशांसमोर मान तुकवणारे राजे तर खूप होते पण, त्यांच्यासमोरही स्वतःचा सन्मान आणि स्वाभिमान जपणारा राजाही होता हे वाचून राजा सयाजीराव यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो. महाराजा सयाजीराव हे छत्रपतींचे खरे वारसदार निघाले याचा अभिमानच वाटायला हवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










