आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात राहणाऱ्या कोणालाही ‘टाटा’ माहिती नाही असे होणार नाही. संपत्तीबरोबरच टाटा परिवारासाठी आणि कंपनीसाठी नीतिमत्ता फार महत्वाची आहे. याशिवाय गेली शंभर वर्षे टाटा समूह हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. अनेक प्रमुख चेअरमन्सच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वाखाली टाटा समूह गेल्या एका शतकाहून अधिक काळ भारतासारख्या बाजारपेठेत टिकून आहे. टाटा समूह आणि त्याचे शेअरहोल्डर्स दिलेल्या शब्दाला किती जपतात हे आपल्याला ‘नॅनो’ कारच्या प्रकरणावरून लक्षात आलेच असेल.
पण ‘टाटा सन्स’ला एकेकाळी एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. यावेळी कंपनी डायरेक्टर्सच्या बोर्ड मेम्बर्सनी ‘चेअरमनला’ (अध्यक्षांना) आपल्या पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. ते अध्यक्ष टाटा समूहातील सर्वात मोठ्या शेअरहोल्डर्सच्या कुटुंबातील होते. त्यांचे नाव सायरस मिस्त्री. नेमकं काय होतं ते प्रकरण जाणून घेऊया या विशेष लेखातून..
टाटा समूहाचा संक्षिप्त इतिहास:
पारशी समाजाच्या बाबतीत एक कथा नेहमी सांगितली जाते, ती म्हणजे जेव्हा पारशी लोक भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले, तेव्हा एका स्थानिक राजाने त्यांच्यापुढे काठोकाठ भरलेला दुधाचा पेला ठेवला आणि सांगितले, आमचा प्रदेश या दुधाच्या पेल्याप्रमाणे काठोकाठ भरला आहे, यात तुम्हाला राहण्यासाठी जागा नाही. तेव्हा त्या पाहुण्यांनी दुधाने काठोकाठ भरलेल्या त्या पेल्यात साखर टाकली आणि सांगितलं ज्याप्रमाणे ही साखर या दुधात विरघळली, त्याप्रमाणे आम्ही तुमच्या सोबत राहू!
आजही पुण्या-मुंबईसह भारताच्या अनेक भागांमध्ये पारशी समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. जमशेदजी टाटा आणि त्यांचे कुटुंब धार्मिक द्वेषामुळे इराण सोडलेल्या पारशी समाजातीलच होते. त्यांनी अठराव्या शतकात “टाटा समूहा”च्या निर्मितीची कल्पना मांडली. टाटा कुटुंबाची ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीशी ओळख झाली आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीबरोबर काम करण्यास सुरुवात केली. टाटा समूहाने लवकरच आयात-निर्यात क्षेत्रातही आपला पाय रोवला आणि चीनसोबत अफूचा व्यापार करण्यास सुरुवात केली.
प्रचंड श्रीमंती आणि राजकीय क्षेत्रातील प्रभावामुळे जमशेदजी टाटा यांना भारतातील पहिला स्टील कारखाना उभारण्याची परवानगी मिळाली. दुर्दैवाने, त्याचे अनावरण करण्यासाठी ते हयात नव्हते. टाटा स्टील कंपनीने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला स्टीलचा पुरवठा केला. जेआरडी टाटा चेअरमन असताना टाटाने नवीन बाजारपेठेत प्रवेश केला आणि एव्हिएशन क्षेत्रात येण्याचाही प्रयत्न केला.
सामाजिक विषयांमध्ये टाटा समूहाचे योगदान:
नफ्याच्या आधी कामगार कल्याणाला प्राधान्य देणारी पहिली भारतीय कंपनी म्हणजे टाटा समूह. ब्रिटनने अंमलबजावणी करण्यापूर्वी, टाटा कंपन्यांनी ८ तासांच्या कामाच्या शिफ्ट्सबरोबरच मोफत रुग्णालये, मोफत शिक्षण आणि अगदी कामगारांची पेन्शन योजनासुद्धा सुरु केली. परोपकाराच्या क्षेत्रात टाटा समूहाला कोणतीही कंपनी मागे टाकू शकली नाही.
टाटा समूहाचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदानसुद्धा बहुमूल्य आहे. टाटा परिवाराचे गांधीजींशी उत्तम ऋणानुबंध होते. १९०९ सालापासून सर रतन टाटा यांनी २५ हजार रुपयांपासून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीला देणग्या देण्याचे काम केले. सत्याग्रहाचे जन्मस्थान असलेल्या गांधींच्या ‘फिनिक्स सेटलमेंट’च्या अस्तित्वात टाटा समूहाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचे मुखपत्र, ‘टॉल्स्टॉय फार्म’ आणि ‘इंडियन ओपिनियन’ यांनाही टाटा समूहाने पाठिंबा दिला होता.
रतन टाटांनंतर:
रतन टाटा हे १९९१ साली टाटा सन्सचे चेअरमन बनले. टीसीएस किंवा ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’ भारतातील सर्वोत्तम आयटी कंपनी म्हणून विकसित करण्यात तसेच जगातील सर्वात स्वस्त ‘टाटा नॅनो कार’ लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अध्यक्षपदाच्या शेवटच्या टप्प्यात, रतन टाटा यांनी ‘सायरस मिस्त्री’ यांना पुढील चेअरमन म्हणून नॉमिनेट केले. सायरस मिस्त्री हे पालनजी मिस्त्री यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडे टाटा समूहाचे १७ टक्के शेअर्स होते.
सायरस यांचा दृष्टिकोन रतन टाटा यांच्यापेक्षा वेगळा होता. सायरसने टाटा समूहातील तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात जाऊन त्यांना विकण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला. सायरसने प्रत्येक टाटा विभागाची स्वायत्तता रद्द केली आणि त्यांना थेट आपल्याला रिपोर्ट करण्याचे आदेश दिले.
सायरसने रतन टाटा यांच्या काही विश्वासार्ह लोकांनाही बोर्डातून काढून टाकले. सायरसचे निर्णय निश्चितच स्वागतार्ह नव्हते. त्यामुळे टाटा बोर्डची २०१६ साली बैठक झाली आणि त्यात सायरसला त्याच्या पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोर्डच्या निर्णयानुसार सायरसने लगेच राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसं न करता बोर्डाचा ठराव रद्द करण्यासाठी तो सर्वोच्च न्यायालयात गेला. पण न्यायालयानेही सायरसच्या विरोधातच निकाल दिला. अखेर सायरसने राजीनामा दिला. डायरेक्टर्स बोर्डच्या शिफारस आणि अनेक तक्रारींमुळे टाटा समूहाच्या ‘चेअरमन’ पदावरून पायउतार होणारे सायरस मिस्त्री हे पहिले व्यक्ती बनले.
बोर्डाला योग्य उत्तराधिकारी मिळेपर्यंत रतन टाटा यांनी पदभार स्वीकारला. २०२० साली ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विस’चे सीईओ नटराजन चंद्रशेखरन यांना टाटा समूहाचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. हे पद भूषविणारे ते पहिलेच गैर-पारशी व्यक्ती आहेत. यावरून टाटा समूह आपल्या नीतिमत्तेशी कधीही तडजोड करणार नाही हेच सिद्ध होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.