आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लोकांना एखाद्या ध्येयाने पछाडलं की ती व्यक्ती त्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला पणाला लावून घेत असते. असंच एका तरुणीला एका ध्येयाने पछाडलं आणि तिने काही काळातच एक मोठा चमत्कार घडवून आणला.
१.३ एकराच्या शेतात या तरुणीने २० वेगवेगळ्या प्रजातींच्या ५००० झाडांची लागवड केली असून यात विविध खाद्यान्न पदार्थांचा समावेश आहे.
यातून शेतात काम करणाऱ्या ६ लोकांच्या कुटुंबाची वर्षभरातील ७०% अन्नधान्याची गरज पूर्ण होत आहे. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतात हे धान्य उत्पादन करण्यात आलं आहे, त्याठिकाणी जमिनीची धूप झाली होती, जमिनीचा भाग प्रदूषित झाला होता. यामुळे त्याठिकाणी साधी गवताची काडी उगवणे दुरापास्त होते.
पण या तरुणीने सर्व समस्यांवर यशस्वीपणे मात करून लोकांना आपल्या कामाने अचंबित करून सोडले आहे. मालविका सोळंकी असे या तरुणीचे नाव असून स्वयम ट्रस्ट नावाच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ती हे काम करत आहे.
हे काम निश्चितच सोपे नव्हते, हे काम पूर्णत्वास नेण्यास मालविका सोळंकीला अनेक वर्ष पाण्यासारखा घाम गाळावा लागला, त्यातून हे शक्य झालं आहे. तिने ४०० प्रजातीच्या ५००० वृक्षांची लागवड केलेली असून त्यात विविध फळं, वेल आणि अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
मालविकाचा हा प्रवास सुरु होऊन बरीच वर्षे झाली होती. ती एकदा आपल्या बंगलोरजवळच्या गावी सुट्टीनिमित्त आली होती. आधी गावातील निसर्गसौन्दर्य बघून ती हरखून गेली, गावातील इतर कामांत तिने स्वतःला गुंतवून घेतले होते, तिला म्हशीचे दूध काढणे, शेतात रपेट मारणे, गांडूळखत तयार करणे इत्यादी गोष्टी करायला फार आवडत असे.
पण तिला गावात असलेल्या अल्प उत्पादनाच्या समस्येची जाणीव झाली. तिला तिथल्या महिलांच्या आणि सामाजिक समस्यांची जाणीव देखील या माध्यमातून झाली. पुढे त्यांनी माया नावाच्या संस्थेत काम केलं. जिथे त्यांना सामाजिक कामाचा अनुभव आला. यातूनच स्वयम या ससंस्थेच्या उभारणीची प्रेरणा त्यांना मिळाली.
स्वयमच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्याला उभारणी देण्याचं काम मालविका करत असून यात तिला बऱ्यापैकी यश देखील प्राप्त झाले आहे.
ती सांगते की स्वयमच्या स्थापनेमागचा उद्देश एकच होता, शेतीचे आणि शेती संबंधित उद्योगांचे पुनरुज्जीवन .
या कामासाठी लोकांच्या सहाय्याने ती हे पुनर्निर्माणाचं कार्य करत आहे.
लोकांचे नेटवर्क्स उभे करून त्या माध्यमातून योजनाबद्ध विकासाचा प्रयत्न ती करत आहे. तिला तिच्या गावाजवळ एक ओसाड पडलेलं माळरान आणि जमीन दिसली. तिने मनाशी निश्चय केला की या जागेचं रूपांतर जेवढं लवकर शक्य होईल तितक्या लवकर एका सुपीक जमिनीत करायचं आणि त्यातून उत्पन्न प्राप्तीचं साधन तिथल्या गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे. यासाठी लोकांना एकत्र करायला तिने सुरुवात केली.
तिने नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याची स्वतःची एक पद्धत विकसीत केली. या पद्धतीला परमाकल्चर म्हणून ओळखले जाते. ही पद्धती विकसित करण्याची प्रेरणा तिला मोन्सॅबू फुकोका यांच्या ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ या पुस्तकातून मिळाली. शूमाकरच्या स्मॉल इज ब्युटीफुल या पुस्तकातून तिला नवीन कल्पना मिळाल्या, यातून त्यांनी ही पद्धत विकसित केली.
२०१३ साली ती ही पद्धत घेऊन काम करू लागली. परमाकल्चर या पद्धतीच्या तत्वानुसार एकाच प्रकारचं पीक एकावेळी शेतात न घेता वेगवेगळी पिकं गरजेनुसार एकाच वेळी शेतात घेऊन त्यांची एक इको सिस्टम तयार करायची. या कामासाठी तिला तिच्या बंगलोरच्या मित्रांचे सहकार्य लाभले. अनेक स्वयंसेवक देखील तिच्या कार्यात सहकार्य करायला आले. 1000-ट्री प्रोजेक्ट असे त्यांनी याला नामकरण देखील केले.
या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या काही समूहांना मदत करण्याची रणनीती तयार केली. हवामानाच्या विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम या माध्यमातुन केलं जात आहे. त्यांनी दुष्काळ व रोगप्रतिकारक अशा पिकांची निवड यासाठी केली असून ॲग्रोकॉलॉजी, ॲग्रोफॅक्टरी, मिक्स क्रॉपिंग, वॉटर हार्व्हेस्टींग या अशा प्रकारच्या विविध आधुनिक पद्धतींचा वापर यासाठी केला आहे.
यातून धान्य उत्पादन, औषधी वनस्पती, खत, पशुखाद्य अशा प्रकारची शेती उत्पादने त्यांनी घेतली. तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी २० कुटुंबांना या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
आता ५० एकरच्या जमिनीच्या विकासाचे कार्य स्वयम या संस्थेने हाती घेतले असून, आज त्याला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होताना दिसत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.