आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
ज्यावेळी चंबळच्या खोऱ्यातून जाण्याची गोष्ट निघते त्यावेळी त्याचा विचार करूनच लोकांच्या अंगाचा थरकाप उडतो. तिथून जाताना कुठल्या डाकूशी सामना नको व्हायला, अशी आपण मनोमन कामना करतो. आजवर भारतात जेवढे डाकू होऊन गेलेत त्यातील सर्वांत जास्त हे चंबळच्या या खोऱ्यातच जन्माला आले . माळरान आणि जंगलाने व्यापलेला हा भाग काही खतरनाक डाकूंचे निवासस्थान होता.
असाच एक डाकू होता, डाकू मान सिंह. पण तो त्याच्या गुन्ह्यांपेक्षा त्याने केलेल्या चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होता.
त्याला चंबळच्या आसपासच्या भागात एखाद्या देवाप्रमाणे पुजले जाते. लोकांनी त्याचे मंदिर देखील बांधले आहे.
मान सिंहचा जन्म चंबळच्या एका आग्रा गावातील एका राठोड कुटुंबात झाला होता. त्याचे कुटुंब एका राजपूत राजघराण्याचे वंशज होते. मान सिंह चंबळच्या खोऱ्यात वास्तव्य करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. पण, तो गुन्हेगारी मार्गाकडे वळून डाकू बनेल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. शेवटी परिस्थितीने त्याला या मार्गाचा अवलंब करण्यासाठी भाग पाडले. त्याने ह*त्यार का उचलले यासंदर्भात अनेक लोककथा आहेत.
असे म्हणतात की त्याच्या पिढीजात जमिनीवर काही सावकारांनी कब्जा केला होता. मान सिंहने त्यांचा विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही, यामुळे मान सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेरीस आपली जमीन परत मिळवण्यासाठी त्याने ह*त्यार उचलले आणि त्यानंतर तो फरार झाला.
आपल्याप्रमाणे इतर गरिबांवर होणाऱ्या अ*त्याचारांच्या विरोधात मान सिंहने आवाज उठवला, अनेक लोक त्याला सामील झाले. यात काही त्याचे नातेवाईक होते तर काही मित्र होते. यात त्याचे मुलं, भाऊ नबाब सिंह आणि भाचा प्रमुख होते. हळूहळू त्याच्या टोळीचे सदस्य वाढत गेले. १७ लोकांना सोबत घेऊन मान सिंहने एक वेगळी गॅंग बनवली होती. त्याने या गँगच्या माध्यमातून जुलूम करणाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारले होते.
गरिबांना त्रास देणाऱ्यांचा मान सिंह कर्दनकाळ बनला होता. १९३९ ते १९५५ या काळात त्याने आपल्या बंदुकीच्या बळावर चंबळच्या खोऱ्यात एक वेगळाच दरारा निर्माण केला. त्याने लुटमारी दरम्यान १,११२ ह*त्या केल्या होत्या आणि त्याच्या विरोधात १८५ खटले चालू होते. त्याने अनेक पोलीस अधिकाऱ्यांची ह*त्या केली होती. तो किती क्रू*र होता, हेच हे आकडे सांगतात.
मान सिंहच्या टोळीचे एक वैशिष्ट्य होते, ते श्रीमंतांसाठी वाईट स्वप्न, तरी गरिबांसाठी देवदूत होते. त्याच्या टोळीने लुटमारी दरम्यान गरिबांना कधीच लक्ष बनवले नाही. त्याने गरिबांच्या मुलींची लग्ने लावली, त्यांच्या आजारपणात त्यांना मदत केली. तो गरिबांच्या मदतीला धावून जात असे. तो महिलांचा फार सन्मान करायचा.
एकदा त्याच्या टोळीतल्या एकाने एका महिलेवर जबरदस्ती केली, मान सिंहने त्याला कठोर शिक्षा करून टोळीतून हद्दपार केले होते. गरिबांच्या मनात त्याची चांगली प्रतिमा तयार झाली होती. त्याला गरीब लोक डाकू मानतच नव्हते.
पण मान सिंहने केलेल्या पापांचा घडा एक दिवस भरलाच. त्याने कायद्यांचे उल्लंघन केले त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली होती. १९५५ मध्ये भिंड पोलिसांनी त्याला एन्काउंटरमध्ये मारले. अशाप्रकारे मान सिंहाचा किस्सा कायमचा संपला. संघाशी संबंधित एन. एस. सुब्बाराव यांनी मान सिंहच्या मृत्यूपूर्वी त्याचे एक भाषण ऐकले होते. ते म्हणाले होते की एका डाकूचे भाषण ऐकतोय असं मला अजिबात वाटत नव्हते. एखाद्या नायकाप्रमाणे तो लोकांना संबोधित करत होता.
मान सिंह हयात नसला तरी तेथील जनतेच्या मनात तो अजूनही जिवंत आहे. त्याचे गाव राठौर खेडा येथे त्याचे एक मंदिर लोकांनी उभारले आहे. त्याच्या मंदिरात लोक त्याची स्तोत्रे देखील गात असतात. त्याच्या आयुष्यावर अनेक नाटकांची निर्मिती लोकांनी केली आहे.
१९९१ साली बाबुभाई मिस्त्री यांच्या दिग्दर्शनाखाली मान सिंह यांच्यावर एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. प्रसिद्ध पहिलवान आणि अभिनेते दारा सिंह यांनी त्याची भूमिका साकारली होती.
मान सिंहची लढाई सामान्य माणसांशी नव्हती तर दमणकारी व्यवस्थेशी होती. तो अनेकांचे भले करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची पद्धत चुकीची होती
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










