आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मॅन्ग (मेटा, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गुगल) कंपन्यांबद्दल माहिती नाही असे लोक आजच्या युगात क्वचितच असतील. या कंपन्यांना त्यांनी मिळवलेल्या प्रचंड व्यावसायिक यशासाठी आणि विस्तारासाठी तर ओळखलं जातंच, शिवाय या कंपन्यांच्या सुरु होण्यामागे अनेक वर्षांचा खडतर प्रवास आणि चढ-उतार असतात.
या सर्वच बाबी सामान्य माणसासाठी एक प्रेरणा बनून अनेक पुस्तके, नियतकालिके, लेख आणि व्हिडीओज् इत्यादींच्या रूपात सतत उपलब्ध आहेत. या कंपन्यांप्रमाणेच ‘स्टीव्ह जॉब्स’सुद्धा असंच यशस्वी आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. अनेकदा अशा ‘बड्या’ लोकांचा वाईट भूतकाळ लपवला जातो, स्टीव्ह जॉब्सच्या अशाच भूतकाळाचा परामर्श घेण्यासाठी आजचा विशेष प्रयत्न..
आपापल्या आयुष्यात प्रत्येकाने कोणत्या न कोणत्या टप्प्यावर काहीतरी असे चुकीचे काम केलेले असते, ते कधीही जगासमोर येऊ नये असे वाटत राहते. पण आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर भूतकाळात केलेली चूक जगासमोर येतेच आणि त्यावेळी आपल्याला पश्चात्ताप होतो. स्टीव्ह जॉब्सच्या बाबतीतही असंच घडलं. त्याने आपल्या मित्राकडून अनेक दिवस रात्रभर काम करून घेतलं पण सरतेशेवटी पगाराच्या बाबतीत मात्र स्टीव्हने आपल्या मित्राची फसवणूक केली.
जॉब्सच्या ‘स्टीव्ह वॉझनियाक’ नावाच्या मित्राच्या बाबतीत हे दुर्दैवी कांड घडले आहे. वॉझनियाक आणि स्टीव्ह जॉब्स एकाच ठिकाणी, ‘अटारी व्हिडियो गेम’ कंपनीमध्ये काम करत होते. अटारी गेम्स म्हणजे व्हिडिओ गेम मार्केटमध्ये क्रांती घडवणाऱ्या पहिल्या व्हिडिओ गेम कन्सोल्सपैकी एक.
त्यावेळी अटारी कंपनीची मालकी याच गेम कंपनीच्या संस्थापकाकडे अर्थात ‘नोलन बुशनेल’कडे होती. या कंपनीने सर्वप्रथम रिलीज केलेली गेम म्हणजे ‘पॉन्ग’. १९७२ साली ही गेम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. या गेमच्या अभूतपूर्व यशामुळे १९७५ साली बुशनेलने याच गेमची पुढची आवृत्ती, ‘ब्रेकआउट’ तयार करण्याचे ठरवले. या आवृत्तीमध्ये ‘सिंगल-प्लेयर’ मोड असणार होता.
‘ब्रेकआउट’ या प्रकल्पाची जबाबदारी बुशनेल स्टीव्ह जॉब्सवर सोपवणार होते. त्यावेळी स्टीव्ह जॉब्स प्रचंड क्षमता असलेला, तरी निम्न-स्तरीय तंत्रज्ञ मानला जात होता. हा गेम त्याच्या पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा खूपच चांगला असण्याची अपेक्षा असल्याने, जॉब्सने स्टीव्ह वॉझनियाकलासुद्धा आपल्या प्रकल्पात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वॉझनियाकला एक उत्तम अभियंता म्हणून सन्मान प्राप्त होता. यावेळी स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनियाक हे दोघेही घनिष्ट मित्र होते. दोघेही ‘ॲपल-1’ या संगणकनिर्मितीच्या दृष्टीने एकत्र काम करत होते. हाच संगणक पुढे सुप्रसिद्ध ‘ॲपल’ कंपनीचा पहिला प्रॉडक्ट म्हणून प्रसिद्ध झाला.
गेम तयार करताना पन्नासपेक्षा कमी चिप्स वापरल्यास, अटारी कंपनीने प्रत्येक चिपवर “बोनस” जाहीर केला होता. यावेळी स्टीव्ह जॉब्सने वॉझनियाकचे कौशल्य वापरून घेण्यासाठी खोटं वागायला सुरुवात केली. गेम तयार करायला एक महिन्याचा अवधी दिलेला असूनही स्टीव्ह जॉब्सने वॉझनियाकला चार दिवसांची अंतिम मुदत असल्याचे आणि कमीतकमी चिप्स वापरून गेम तयार करण्याबद्दल सांगितले. पण बोनसबद्दल स्टीव्ह जॉब्सने अवाक्षरही काढले नाही. जॉब्सने वेझीयानिकला चारच दिवसांची मुदत देऊ केली, कारण त्याला त्याच्या कम्युन फार्मवर सफरचंद काढणीच्या कामात मदत करण्यासाठी परत जाणे आवश्यक होते.
वॉझनियाक त्यावेळी हेवलेट-पॅकार्डसाठीही (एच.पी.) काम करत होता, त्यामुळे त्याला त्याच्या प्रमुख कामासह या प्रकल्पाचा समतोल साधावा लागला. त्यामुळे तो दिवसा त्याच्या कामावर जात असत आणि रात्रभर ‘ब्रेकआउट’वर काम करत असे. पन्नासपेक्षा कमी चिप्स असल्याची खात्री करून आवश्यक चिप्सचे इम्प्लिमेंटेशन इतकेच काम स्टीव्ह जॉब्सने केले.
चार दिवसांत आणि फक्त पंचेचाळीस चिप्स वापरून गेमची डेव्हलपमेंट पूर्ण करण्याचे अवघड काम वॉझनियाकने केले होते. पण जेव्हा पगाराचा दिवस आला, तेव्हा स्टीव्ह जॉब्सने वॉझनियाकला फक्त अर्धा पगार दिला, बाकीचा पगार आणि बोनस स्वतःसाठी ठेवला. सुमारे दहा वर्षांनंतर हे सगळं वॉझनियाकला कळालं.
स्टीव्ह जॉब्सच्या ‘आयझॅकसन’ या वॉझनियाकने लिहिलेल्या चरित्रात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे: “जेव्हा तो आता याबद्दल बोलतो, तेव्हा तो संकोच करतो. म्हणतो, “तो प्रामाणिक राहायला हवा होता एवढीच माझी इच्छा आहे. जर त्याने मला पैशाची गरज आहे हे सांगितले असते तर मी त्याला पैसे दिले असते. तो एक मित्र होता आणि आपण आपल्या मित्रांना मदत करतोच की.. माझ्यासाठी नैतिकता नेहमीच महत्त्वाची आहे आणि मला अजूनही त्याने असे का केले असेल हे कळत नाही. पण, तुम्हाला माहिती आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात.”
जॉब्सने असे का केले याचे कारण कोणालाही माहीत नाही. अनेकांच्या मते ॲपल-1 कॉम्प्युटरवर काम करत राहण्यासाठी त्याला पैशाची गरज होती, तर इतरांच्या मते, हेच त्याचे खरे रंग होते. याठिकाणी स्टीव्ह जॉब्सला ‘जज’ करण्याचा कोणताही उद्देश नाही. कारण आधीही सांगितल्याप्रमाणेच आपण सर्वांनी, कधी ना कधी चुकीचा मार्ग निवडला आहे, विशेषत: आपल्या तरुण वयात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










