आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
‘श्रीलंका’, आपल्या भारताच्या दक्षिणेला असलेला एक छोटासा देश. साधारण सव्वा लाख वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या या देशाला निसर्ग सौंदर्याची देणगी लाभलेली आहे. मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला हा देश भारतीयांना रामायणामुळं ‘रावणाची लंका’ म्हणून परिचयाचा आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अंतर्गत यादवीमुळं अशांत आणि बदनाम असलेल्या या देशाला जागतिक स्तरावर उभारी देण्याचं काम केलं ‘क्रिकेट’ या खेळानं. श्रीलंकन क्रिकेटनं जगाला अनेक दिग्गज आणि प्रतिभावान खेळाडू दिलेत.
९०च्या दशकात अर्जुन रणतुंगा, मार्वन आट्टापटू, मुथय्या मुरलीधरन, माहेला जयवर्धने या लंकन खेळाडूंचा जागतिक क्रिकेटमध्ये दरारा होता. यात आणखी एक खेळाडू होता ज्यानं श्रीलंकन जनतेच्या आणि क्रिकेट रसिकांच्या मनावर निर्विवाद राज्य केलं. १९९५नंतर तर ‘सनथ जयसूर्या’ हे नाव श्रीलंकन क्रिकेटचा चेहरा झालं होतं. जयसूर्यानं १९९६ मध्ये अवघ्या १७ बॉलमध्ये ५० धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याच्या या खेळीनं जागतिक क्रिकेमध्ये धुमाकूळ घातला होता.
७ एप्रिल, १९९६ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात सनथ जयसूर्यानं ‘सलामीवीर’ या शब्दाची नव्यानं व्याख्या लिहिली. ११९६ ला १ ते ७ एप्रिल दरम्यान सिंगापूरमध्ये ‘सिंगर कप’ नावानं तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती. यात भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांचा सहभाग होता. ९६चा सिंगर कप सिंगापूरमध्ये होणारी पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. ही तिरंगी मालिका पाकिस्ताननं जिंकली होती.
अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून पाकिस्तानचा संघ विजयी झाला होता. मात्र, हा सामना खऱ्या अर्थानं गाजवला होता तो, लंकन सलामीवीर सनथ जयसूर्यानं! त्याच्या तूफानापुढे पाकिस्तानचा विजय धुसर होऊन गेला. आजही जयसूर्याच्या खेळीमुळं सिंगर कप ओळखला जातो.
भारताचा पराभव करून पाकिस्तान मालिकेच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. पहिल्यांदा बॅटिंग करून, एजाज अहमदच्या अर्धशतकाच्या मदतीनं २१५ धावांचं आव्हान त्यांनी श्रीलंकेसमोर ठेवलं होतं. २१५ धावा आता आपल्याला एकदम किरकोळ वाटतात. मात्र, तेव्हा ती नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या होती. श्रीलंकेला नमवण्यासाठी पाकिस्तानला लवकर विकेट्स मिळवण्याची आवश्यकता होती. यासाठी त्यांची मदार वकार युनिस आणि आकिब जावेद या वर्ल्डक्लास गोलंदाजावर होती.
पण, श्रीलंकन सलामीवीर जयसूर्यानं जणू पाकिस्तानच्या या योजनेवर पाणी फिरवण्याचा विचार करूनच मैदानावर पाय ठेवला होता. त्यानं चौफेर फटकेबाजी करत पाक गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या केल्या होत्या. त्याची फलंदाजी पाहून वकार युनिस देखील चकित झाला होता.
जयसूर्यानं ऑफ-स्टंपच्या बाहेर असलेल्या एकाही बॉलवर दया दाखवली नाही. सुरेख कव्हर ड्राईव्ह, मिड-ऑन आणि ऑफवर खेचलेले षटकार आणि चौकारांच्या मदतीने पाक बॉलर्सला हैराण करून सोडलं. जयसूर्याचा मैदानावर उधळलेला वारू रोखण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार आमिर सोहेलनं खूप प्रयत्न केले. त्यानं बॉलिंगमध्ये पहिला बदल करत अता-उर-रहमानच्या हातात बॉल दिला. मात्र, तो अपयशी ठरला. जयसूर्यानं त्याची देखील यच्छेद धुलाई केली.
त्यानंतर आमिरनं स्पिनर सकलैन मुश्ताकला संधी दिली. तो देखील अपयशी ठरला. पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर जयसूर्यानं वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा जुना विक्रम मोडला. त्यानं मुश्ताकच्या बॉलिंगवर एक गगनचुंबी षटकार खेचत केवळ १७ बॉलमध्ये ५० रन पूर्ण केले. पूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू सायमन ओ’डॉनेल यांच्या नावावर होता. त्यांनी १९९० मध्ये श्रीलंकेविरुद्ध १८ बॉल खेळून ५० रन केले होते.
गंमत म्हणजे जेव्हा जयसूर्याचा पाकिस्तानी बॉलर्सवर हल्ला सुरू होता, तेव्हा त्याचा सलामीचा साथीदार रोमेश कालुविथर्णानं भोपळा देखील फोडला नव्हता. सहाव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जावेदनं त्याला शून्यावर बाद केलं आणि लंकेची सलामीची जोडी फुटली.
पहिल्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप झाली होती. शेवटी, जयसूर्याला रोखण्यात युनुसला यश आलं. तोपर्यंत त्यानं २८ बॉलच्या बदल्यात ७६ रन केले होते. २७१.४२ च्या स्ट्राईक रेटनं आणि ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीनं त्यानं हे रन जमवले होते. जयसूर्याच्या ह*ल्ल्यानंतरही श्रीलंकेला २१५ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. फटकेबाजी करण्याच्या नादात आशंका गुरुसिन्हा लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार अर्जुन रणतुंगा तर शून्यावरच बाद झाला. हशान तिलकरत्नेनं संयम ठेवत ६५ बॉल्सच्या बदल्यात ३३ रन केले. मात्र, श्रीलंकेचा डाव १७२ रन्सवरचं आटोपला आणि अंतिम सामना त्यांनी ४३ रन्सनी गमावला.
श्रीलंकेनं जरी सामना आणि मालिका गमावली असली तरी जयसूर्याची बॅट मात्र, चांगलीच तळपली होती. त्याच्या वेगवान अर्धशतकाचा विक्रम पुढची १९ वर्षे आबादित राहिला. पुढे दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं वेस्ट इंडिजविरुद्ध १६ बॉल्समध्ये ५० रन काढून हा विक्रम मोडला. या अर्धशतकाच्या पायावरचं डिव्हिलियर्सनं १४९ रन्सची तडाखेबंद खेळी केली होती. त्याचवर्षी नंतर, कुशाल परेरा आणि मार्टिन गुप्टिल यांनी जयसुर्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
अंतिम सामन्यापूर्वी सिंगर कपमध्ये जयसूर्यानं भारताविरुद्धच्या सामन्यात देखील ८ फोर आणि ३ सिक्सच्या मदतीनं नाबाद १२० रन्स केले होते. विशेष म्हणजे त्याचं सामन्यात सचिन तेंडुलकरनं देखील शतक (११० रन) ठोकलं होते. असामान्य खेळीसाठी सनथ जयसूर्याला सिंगर कपमध्ये ‘मॅन ऑफ दी मॅच’चा किताब देण्यात आला होता.
सनथ जयसूर्याचं क्रिकेटमधील योगदान कायम लक्षात ठेवण्याजोगं आहे. त्यानं देशासाठी ११० कसोटी सामने खेळले असून त्यात ४०.०७ च्या सरासरीनं ६९७३ रन केले आहेत. यात १४ शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. ३४० ही त्याची कसोटीमधील सर्वोच्च धावसंख्या होती. याशिवाय कसोटीमध्ये त्यानं ९८ विकेट्स देखील घेतलेल्या आहेत. ४४५ एकदिवसीय सामन्यात ३२३ विकेट्स घेतल्या आहेत. तर, ३२.३६ च्या सरासरीनं व ९१.२० च्या स्ट्राइक रेटनं १३ हजार ४३० धावा केल्या आहेत. यामध्ये २८ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात १८९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
याशिवाय जयसूर्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही सहभागी झाला होता. त्यानं आयपीएलच्या पहिल्या तीन सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून ३० सामने खेळले आहेत. यात २७.५७ च्या सरासरीनं व १४५.११ च्या स्ट्राइक रेटनं ७७२ रन्स केले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एक शतक(नाबाद ११४) आणि चार अर्धशतकांचीही नोंद आहे.
दिवसेंदिवस क्रिकेटचं स्वरुप आणि नियम बदलत आहेत. अनेक नवनवीन विक्रमही प्रस्थापित होत आहेत. मात्र, १९९६च्या सिंगर कपमधील जयसूर्याची २८ बॉलच्या बदल्यात केलेली ७६ रन्सची खेळी क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहिल अशीच आहे. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर आता सनथ जयसूर्या लंकन राजकारणात खेळी करत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









