आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
‘जपान’ म्हटलं की, पहिल्यांदा आपल्याला सुमो कुस्ती, सुशी, ॲनिमे आणि पांढराशुभ्र मोहक चेरी ब्लॉसम आठवतो. या गोष्टी जपानी संस्कृतीचा मुख्य आधार आहेत. जपानी लोकांची कामसू वृत्ती, लोकांप्रती असलेला आदर या गोष्टी जपानला अधिक आकर्षक बनवतात.
याशिवाय आणखी गोष्ट आहे जी जपानची जागतिक ओळख झाली आहे. ती म्हणजे वाहनउद्योग. कार, बांधकामाची वाहनं, मोटारसायकली, एटीव्ही आणि इंजिन तयार करणार्या असंख्य कंपन्यांचं जपान माहेरघर आहे. टोयोटा, होंडा, डायहात्सु, निसान, सुझुकी, मजदा, मित्सुबिशी, सुबारू, इसुझू, कावासाकी, यमाहा आणि मित्सुओका यासारख्या अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपन्या जपानच्याच आहेत. यातील ‘होंडा’ नावाची कंपनी तर जवळपास घरा-घरात जाऊन पोहचलेली आहे. आज दर दुसऱ्या घरात होंडाची एखादी तरी गाडी नजरेस पडते. ‘होंडा’ कंपनीचा निर्मिता आणि कंपनीच्या निर्मितीमागची गोष्ट मोठी रंजक आहे.
‘होंडा’ ही जगातील सर्वांत मोठी ऑटोमोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. १९४८ मध्ये सोइचीरो होंडा यांनी ‘होंडा मोटर कंपनी लिमिटेड’ची स्थापना केली. १७ नोव्हेंबर १९०६ रोजी जपानमधील एका लहानशा खेड्यात सोइचीरो होंडा यांचा जन्म झाला. होंडा यांचे वडील लोहारकाम व सायकल दुरुस्तीचं काम करत आणि आई विणकाम करत असे.
लहानपणापासूनच होंडा अतिशय जिज्ञासू होते. नवनवीन गोष्टी बनवण्याचं, उपकरणांचं आणि मशीन्सचं त्यांना खूप आकर्षण होतं. कार, वाहने कशी चालतात? कसे तयार होतात? याबाबत त्यांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. गाड्यांची निर्मिती होंडाला अतिशय रहस्यपूर्ण वाटायची. यामुळेच वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत होंडाकडं पुरेसं तांत्रिक ज्ञान जमा झालं होतं. याउलट अभ्यासाचा विचार केला तर, त्यात त्यांना अजिबात रस नव्हता. पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा व्यावहारिक गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळं सोइचीरो होडांनी शाळा सोडली आणि आपल्या वडिलांच्या सायकल दुकानात काम सुरू केलं.
एक दिवस सोइचीरोची नजर एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवर पडली. टोकियोमधील ‘आर्ट शोकाय’ या कंपनीला काही मेकॅनिकची आवश्यकता होती. शोकाय ही त्यावेळी जपानमधील गाड्या दुरुस्ती आणि मेटेनन्स ठेवणारी मोठी कंपनी होती. या कंपनीत आपण गेलो तर गाड्यांविषयी आणखी माहिती आपल्याला मिळवता येईल, असा विश्वास सोईचीरो यांना होता. या विश्वासातूनचं त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि आपलं घर सोडून टोकियोची वाट धरली.
टोकियोमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांची काहीशी निराशा झाली. वय कमी असल्यानं शोकाय कंपनीनं त्यांना पूर्णवेळ कामावर घेण्यास नकार दिला. मात्र, कमी वयात होंडाला असलेलं ज्ञान पाहता कंपनीनं त्यांना ‘इंटर्न’ म्हणून काम करण्याची संधी दिली. आपल्याला याठिकाणी इंटर्न म्हणून देखील खूप काही अनुभव मिळवता येतील हा विचार करून सोईचीरोनं कंपनीत काम स्विकारलं.
हा काळ त्यांच्यासाठी सर्वात कठीण होता. कारण इंटर्न असल्यामुळं त्यांना कामाचा मोबदला मिळणार नव्हता. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांनी टोकियोमध्ये इतर लहानमोठी कामं करण्यास सुरुवात केली होती. समोर अडचणी असून देखील त्यांनी आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही.
या वृत्तीचा होंडा यांना फायदाच झाला. इंटर्न म्हणून काम करताना त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यांचं ज्ञान इतकं सुधारलं की लवकरच इतर वरिष्ठ तंत्रज्ञ देखील त्यांना हाताखाली मदतील घेऊ लागले. होंडा वाहनदुरुस्तीचे नवीन आणि सोप्या मार्ग शोधत असे. यासाठी त्यांनी काही सोपी साधनं देखील तयार करण्यास सुरुवात केली होती. यामुळं कंपनीतील सर्व लोक त्यांचा आदर करत. सोइचीरो होंडाचं कौशल्य आणि क्षमता पाहून कंपनीच्या मालकानं त्यांना व्यवसाय आणि उलाढालीसंबंधीत गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली.
अल्पावधीतच तिथे देखील सोइचीरो निष्णात झाले. यावर खूश होऊन कंपनी मालकानं त्यांना शाखा व्यवस्थापकाचं पद दिलं. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी होंडा एक संपूर्ण शाखा सांभळत होते. महत्त्वकांशी असलेल्या होंडा एवढ्यावरच समाधान मानणार नव्हते. त्यांना नविन गोष्टींच्या निर्मितीमध्ये रस होता. वाहनांमध्ये वापरली जाणारी ‘पिस्टन रिंग’ निर्मिती करण्याचा प्रस्ताव त्यांनी आपल्या कंपनीसमोर ठेवला. मात्र, ही कल्पना कुणालाही रुचली नाही. म्हणून होंडा यांनी कंपनी सोडली.
कंपनी सोडल्यानंतर त्यांनी स्वत: लहान स्वरूपात पिस्टन रिंग निर्मिती सुरू केली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी सर्वोत्तम गुणवत्तेच्या रिंग तयार केल्या. त्यानंतर काही काळातचं टोयोटासारख्या अनेक मोठ्या कंपन्या, पिस्टन रिंगसाठी त्यांच्या ग्राहक बनल्या. मात्र, चीनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर होंडाला सर्वांत मोठा झटका बसला. कारण त्यांचे बहुतांशी पुरुष कामगार यु*द्धात गेले आणि केवळ महिला कामगार मागे राहिल्या.
महिला कामगारांना निर्मिती प्रक्रिया माहिती नव्हती, त्या फक्त पॅकिंगचं काम करत. मात्र, परिस्थितीला शरण जाईल तो होंडा कसला! त्यांनी रिंग निर्मितीची नवीन आणि सोपी पद्धत तयार केली. या पद्धतीनं महिला अतिशय सहजपणे पिस्टन रिंग तयार करू लागल्या. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाचं होंडाला पुन्हा एक झटका बसला. चीनवर विमानानं बॉ*म्ब ह*ल्ला करता-करता होंडाची कंपनीदेखील अपघातानं निशाण्यावर आली. त्यात कंपनी पूर्णपणे नष्ट झाली.
राखेतून उभी राहण्याची वृत्ती जपानी लोकांच्या रक्तातच असते. त्याच बळावर होंडा यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि ‘होंडा मोटार्स’ उभी राहिली. त्यांना रेसिंग आणि मोटारसायकल्समध्ये रस होता. म्हणून त्यांनी मोटार सायकल तयार करण्याचा निर्णय घेतला.
मात्र अगोदर झालेल्या नुकसानीमुळं त्यांच्याकडे फारसा पैसा शिल्लक राहिला नव्हता. आहे त्या भांडवलात त्यांनी इंजिनला जोडलेली एक सायकल तयार केली. त्यांची ही अनोखी मोटारसायकल लोकांच्या पसंतीस उतरली आणि अल्पावधीतच त्यांना मोठा नफा मिळाला. हळूहळू त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण मोटारसायकलची निर्मिती केली.
जगभरात होंडा कंपनीच्या गाड्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक रेसिंग स्पर्धांमध्ये होंडाच्या गाड्या धाऊ लागल्या होत्या. मोटारसायकल निर्मितीमध्ये पाय घट्ट केल्यानंतर होंडानं चारचाकी गाड्या निर्मितीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि त्यात देखील यश मिळवलं.
१९५९ पासून आतापर्यंत सोइचीरो होंडा यांची मोटारसायकल कंपनी ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या मोटारसायकली अजूनही अनेक मोटार बाईक शर्यती जिंकतात. कार आणि मोटारसायकल निर्मिती व्यतिरिक्त होंडा सागरी इंजिन, वॉटरक्राफ्ट, जनरेटरर्स, बागकाम उपकरणं आणि एरोस्पेसचे सुटे भाग देखील तयार करते. होंडा कंपनीचं यशामागे सोइचीरो होंडा या अवलियाचे कष्ट आहेत, ही गोष्ट विसरून चालणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










