आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
इतिहासात आपण नेहमीच वाचतो की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कायम मुघलांचे राज्य होते. पण हे सत्य नाही १७८३ साली शीखांच्या सैन्याने बादशहा शहा आलमला नमवत लाल किल्ल्यावर आपले निशाण साहिब फडकावले होते. लाल किल्ला आणि त्याचा आसपासच्या दिल्ली शहराच्या भागात शीख धर्मियांच्या अनेक गुरूंची ह*त्या करण्यात आली होती, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुरुद्वारा शीख समुदायाला उभारता आला नव्हता.
शीखांचे वीर सेनानी बंदा बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना या लाल किल्ल्यातील ‘दिवान-ए-आम’मधूनच शिक्षेचे आदेश देण्यात आले होते. यामुळे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपले वर्चस्व निर्माण करणे शीख बांधवांच्या आयुष्याचे ध्येय बनले होते.
असेच एकदा बाबा बघेलसिंह यांच्या मार्गदर्शनखाली जत्थेदार जस्सा सिंह अहलुवालिया आणि जत्थेदार जस्सा सिंह रामगढिया यांनी मुघलांवर आक्र*मण केले.
जत्थेदार अहुलुवालिया यांच्या पराक्रमाने त्यावेळी शीख सैन्य विजयी झाले, त्यांना ‘दिवाण-ए-आम’मध्येच ‘सुलतान-उल-कौम’ ही उपाधी देण्यात आली होती. त्यांना लाल किल्ल्यातील बादशहाच्या सिंहासनावर बसण्याची संधी देण्यात आली होती, पण त्यांनी अगदी विनम्रपणे याला नकार दिला होता. आज आपण याच वीर जस्सा सिंह अहलुवालिया यांच्या वीरगाथेला जाणून घेणार आहोत.
३ मे १७१८ रोजी जस्सा सिंह अहलुवालिया यांचा लाहोरजवळच्या अहलू या गावात जन्म झाला. ते बालपणापासून यु*द्धात पारंगत होते. १७४८ साली नवाब कपूर सिंह याने जस्सा सिंह यांना आपला वारसदार घोषित केले. शीखांच्या ६५ गटांना ११ समूहांमध्ये विभागण्यात आले होते, कपूर सिंहच्या काळात त्या समूहांना ‘दल खालसा’ असे नाव देण्यात आले. जस्सा सिंह अहलुवालिया यांना शीख सैन्याचा सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले.
१७६१ साली जस्सा सिंह यांच्या नेतृत्वात शीखांनी पानिपतच्या यु*द्धातून परतणाऱ्या अहमदशहा अब्दालीवर ह*ल्ला केला आणि त्याच्या तावडीतून २००० हिंदू स्त्रियांची मुक्तता केली. यानंतर त्यांचे पुढचे लक्ष्य दिल्ली होते. बाबा बघेल यांच्या मार्गदर्शनानुसार जस्सा सिंह अहलुवालिया आणि जस्सा सिंह रामगढिया यांनी एकत्रित रणनीती आखण्यास सुरुवात केली. हे तिघंही खरंतर वेगवेगळ्या प्रदेशांवर शासन करत होते, पण हे एकत्र आले आणि आपापले सैन्य एकवटले. या तिघांनी शत्रूचा पराभव करून यमुनेपर्यंत आपले वर्चस्व निर्माण केले होते.
पानिपताच्या यु*द्धात अब्दालीकडून पराभूत झाल्याने मराठ्यांची दिल्लीच्या आसपासची ताकद कमी झाली होती. याचवेळी इंग्रजही दिल्लीत आपली शक्ती अजमावून बघत होते. अशावेळी शीख वारंवार यमुना नदी ओलांडून त्याचा आसपासचा प्रदेश जिंकून घेऊ लागले.
दिल्लीच्या शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकानुसार शीख यमुना ओलांडून अलिगढ, टुंडला, हाथरस, खुर्जा आणि शेखूबाद या भागावर वर्चस्व निर्माण करत होते. त्यांनी नवाबाच्या दौलतीवर कब्जा केला. येथून मिळालेल्या पैशाचा वापर जस्सा सिंहने १७६२ साली अब्दालीच्या ह*ल्ल्यात बेचिराख झालेल्या दरबार साहिबच्या दुरुस्तीवर खर्च केले.
शीखांच्या वारंवार होणाऱ्या आक्र*मणाने मुघल सम्राट शहाआलम त्रस्त होता. या विषयी वजिरांनी शीखांशी चर्चा केली पण यात कुठलेच समाधान निघाले नाही. यानंतर शीख सैन्याने १२ एप्रिल १७८१ रोजी यमुनेच्या पल्याड बागपतवर आक्र*मण केले आणि आपले विजयी अभियान पुढे चालवत १६ एप्रिलला शाहदरा आणि पडपडगंजवर ह*ल्ला केला.
८ एप्रिल १७८३ रोजी बाबा बघेल सिंह, जस्सा सिंह अहलुवालिया आणि जस्सा सिंह रामगढिया यांनी ४० हजार सैन्य घेऊन यमुनेच्या पल्याड बुराडी घाट ओलांडून दिल्लीत प्रवेश केला. अहलुवालिया यांच्या निर्देशानुसार सैन्याचे तीन भागांत विभाजन करण्यात आले.
५ हजार सैनिकांना मजनू टिल्यावर तैनात करण्यात आले. बाकी ३० हजारांच्या सेनेला ज्यात घोडेस्वार होते, त्यांना भाजीबाजार व काश्मिरी गेटच्या दरम्यान उभं करण्यात आलं. हा भाग आज तीस हजारी म्हणून ओळखला जातो.
हे नाव देखील लाल किल्ल्यावर आक्र*मण करणाऱ्या तीस हजार सैनिकांचा नावावरून देण्यात आले आहे. हे सैनिक तलवार घेऊन मुघलांचे पतन करण्याच्या तयारीत होते. हे सैन्य मलकागंज, मुगलपुरा आणि भाजी मंडई या भागांत विखुरले होते.
शीख सैन्य दिल्लीत असल्याची बातमी ऐकून शहा आलमची झोप उडाली. मिर्जा शुकोहच्या नेतृत्वात त्याने मेहताबपूर किल्ल्यावरून शीख सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण पराजित होऊन तो लाल किल्ल्यात जाऊन लपला.
फझल अली खानने शीखांना रोखण्याचा असफल प्रयत्न केला. यानंतर ‘वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह’चा जयघोष करत शीख सैन्याने लाल किल्ल्याकडे धाव घेतली आणि दुसरीकडे अजमेरी गेटवर तैनात असलेल्या शीख सैन्याने शहरावर आक्र*मण केले. मुघल सैन्य यु*द्ध न करता लपून बसले. पुढे ११ मार्चला मीना बाजारातून शीख सैन्य लाल किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’मध्ये घुसले व त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला.
‘दिवाण-ए-आम’वर विजय मिळवल्यानंतर खालसा पंथाने त्यांचा केसरी ध्वज ‘निशाण-ए-साहिब’ लाल किल्ल्यावर फडकवला. इतिहासात पहिल्यांदा शिखांनी लाल किल्ल्यावर विजय मिळवला होता.
शाह आलम आपला वकील रामदयाळ आणि बेगम समरू यांच्या समवेत स्वतःच्या प्राणांची भीक शीखांकडे मागू लागला. बेगम समरू ही एक हुशार बाई होती, तिने लगेचच शीख सरदारांना आपला भाऊ मानले. तिने त्यांच्याकडे शहा आलमचा जीव आणि लाल किल्ल्याची मागणी केली.
यानंतर शीख सरदारांनी चार अटी ठेवल्या. पहिली अट होती ज्या ठिकाणी गुरु तेगबहादूर, माता सुंदरी आणि माता साहिब कौर यांना शहीद करण्यात आले त्याठिकाणी आपला माथा टेकून माफी मागावी व लाल किल्ल्याच्या आसपास सात ठिकाणी गुरुद्वारा बांधण्याचे शहा आलमने आदेश द्यावे. ही अट मान्य करण्यात आली.
शहा आलमने बांधकाम खर्चाचा काही भाग शीख सरदारांना देण्यास सुरूवात केली. बाबा बघेल सिंह हे सर्व ठिकाणी गुरुद्वारा बांधून होत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतच राहिले. जस्सा सिंह अहलुवालिया आणि जस्सा सिंह रामगढिया यांनी लाल किल्ल्यातील ६ फूट उंच आणि ५ फूट लांब दगडी सिंहासन उखडून टाकले व आपल्या सोबत घेऊन गेले. आजही अमृतसर जवळच्या रामगढीया किल्ल्यात हे सिंहासन ठेवण्यात आले आहे.
या तीन वीर शीख सरदारांचा पराक्रमाने मोठ्या कालावधीनंतर मुघलांच्या किल्ल्यावर इतर कोणाचे वर्चस्व निर्माण झाले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










