आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यसंग्रामात भारतीय तिरंग्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. तिरंग्याचा मान ठेवण्यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. याच ध्वजाच्या सन्मानासाठी लढताना बिहारमधील ७ तरुणांनी आपले प्राण दिले.
प्रशासकीय कार्यालयावर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करताना या ७ जणांना इंग्रज सैन्याने गोळ्या घातल्या.
११ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या या घटनेची स्मरण म्हणून पटण्यात शहीद स्मारक बांधण्यात आले. आज आपण याच शहीद स्मारकाच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
भारतात गांधीजींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केले आणि देशात देशभक्तीची लाट उसळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या या आंदोलनात सगळ्याच वयाच्या लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यात विशेष सहभाग होता तो म्हणजे बिहारमधील ७ युवकांचा.
‘भारत छोडो’ चळवळ सुरु होऊन ३ दिवस झाले असताना म्हणजेच ११ ऑगस्टला ६००० पेक्षाही जास्त विद्यार्थी पटना प्रशासकीय कार्यालयासमोर गोळा झाले. त्यांच्या हातात कोणतेही ह*त्यार नव्हते. त्यांच्या एकत्र येण्याचा हेतु एकच होता, तो म्हणजे कार्यालयावर भारताचा तिरंगा ध्वज फडकावणे.
प्रमुख गांधीवादी विचार असलेले डॉ. अनुराग नारायण यांनी पटनामध्ये झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अटक केली गेली. या अटकेचा निषेध करण्याचा हेतुदेखील या जमावामागे होता.
पोलीसांवर विश्वास ठेवत ब्रिटिशांनी त्यावेळी जिल्हाधिकारी असलेल्या डब्ल्यू. जी. आर्चर याच्या नेतृत्वाखाली हा जमाव हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस पण बिहारी आहेत हे ब्रिटिशांच्या लक्षात आले नाही. जमावावर गोळी*बार करण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यावेळी ब्रिटिशांनी गोरखा पोलिसांची कर्तव्यनिष्ठा तपासण्याचे ठरवले. त्या ब्रिटिश पोलिसांनी युवकांना कार्यालयापासुन लांब ठेवण्यात यश मिळवले असे दिसत असतानाच दुपारी २ वाजता हा जमाव कार्यालयासमोर येऊन पोहचला.
या जमावाचे नेतृत्व केले देवीपद चौधरी याने. त्याचे वय होते फक्त १४ वर्षे. सिल्हटमधील (आताच्या बांगलादेशमध्ये येणारे ठिकाण) जमालपुर गावात राहत असलेले देवीपद आपल्या सहा मित्रांबरोबर कार्यालयात प्रवेश करण्यास सरसावले तेव्हा त्यांना अडवले गेले.
देवीपदने तिरंगा हातात घेऊन पुढे चालायचे सुरुच ठेवले. त्याच वेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळी झाडली. देवीपदला खाली पडताना बघून त्याचे मित्र असलेले रामगोविंद सिंग पुढे आले आणि त्यांनी तिरंगा हातात घेतला. रामगोविंद सिंग त्यावेळी पुनपुन विद्यालयात दहावीत शिकत होते.
रामगोविंद सिंग तिरंगा हातात घेऊन पुढे चालत असताना पोलिसांनी त्यांच्यावरही गोळी झाडली. त्यावेळी तिरंगा खाली पडू न देता रामानंद सिन्हा यांनी तिरंगा हातात घेतला. पटनाचेच रहिवासी असलेले रामानंद सिन्हा दहावीत शिकत होते. त्यांचं लग्न झालं होतं. रामानंदलाही पोलिसांनी गोळी झाडली. त्यांच्या जागी मग सारण जिल्ह्यातील दिघवारा गावातील रहिवासी असणाऱ्या राजेंद्र सिंग यांनी झेंडा हातात घेतला. गर्दनीबाग उच्च विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राजेंद्र सिंग यांचेही लग्न झाले होते. राजेंद्र सिंग कोसळल्यानंतर तिरंगा हातात घेतला तो औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले जगपती कुमार यांनी.
जगपती कुमार यांना तीन गोळ्या मारल्या गेल्या. तरीही त्यांनी झेंडा खाली न पडू देता भागलपुर जिल्ह्यातील बरापुर गावातील मथुरा प्रसाद यांचे पुत्र सतिश झा यांच्याकडे. ते पटना कॉलेजमध्ये शिकत होते. तिरंगा फडकावताना त्यांना पण गोळी घालण्यात आली. नंतर झेंडा हातात आला तो उमाकांत प्रसाद सिंग यांच्या. ते फक्त १५ वर्षांचे होते. पटनाच्या बी. एन. कॉलेजमध्ये ते शिकत होते. पोलिसांनी त्यांनाही गोळी झाडली.
या ७ लोकांच्या बलिदानाचे स्मारक म्हणून याच सचिवालयात शहीद स्मारक बांधण्यात आले. या सगळ्यात इतिहासाच्या पानात हरवून गेलेला एक व्यक्ति म्हणजे राम कृष्ण सिन्हा. पटना विद्यालयातील तिसऱ्या वर्षात असणारे राम कृष्ण सिन्हा स्वत: माळी म्हणून सचिवालयात शिरले. झेंडा फडकावण्याचा एकमेव उद्देश घेऊन ते आत गेले आणि त्यांनी सचिवालयावर तिरंगा फडकावला.
झेंडा फडकवला आणि लगेचच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. नंतर त्यांना तुरुंगातुन मुक्त करण्यात आले. नंतर सरकारी सेवेत असतानाच १९८४ साली त्यांचा मृत्यू झाला.
शहीद स्मारकाच्या स्थापनशिलेचे उदघाटन १५ ऑगस्ट १९४७ रोजी बिहारचे तत्कालीन राज्यपाल श्री. जयराम दास दौलतराम यांनी केले. शिल्पकार देवीप्रसाद रॉय चौधरी यांनी ७ विद्यार्थ्यांचे पितळाचे पुतळे बनवले. पुतळे इटलीतून बनवून घेतले नंतर पटनामध्ये बसवण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले होते.
हे स्मारक आजही पटना शहराच्या मध्यभागी त्या ७ युवकांच्या बलिदानाची ग्वाही देत उभे आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत कित्येक लोकांनी प्राण देऊन मोजली आहे या गोष्टीची जाणीव आपल्याला या स्मारकाकडे बघून होते. पटना शहरात कधी जाणे झालेच तर स्वातंत्र्यासाठी ऐन तेजात आलेल्या ज्योतींनी दिलेल्या बलिदानाची निशाणी असणाऱ्या या स्मारकास भेट नक्की द्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








