ठिकेकरवाडी – या गावच्या सरपंचाने कोरोनालढ्याचं आदर्श मॉडेल उभारलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असताना भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातही परिस्थिती खास बरी नाही. पुणे आणि मुंबई शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून महाराष्ट्र राज्यातील कोरोना बधितांच्या संख्येने आता उच्चांक गाठला आहे.

आधी मुंबई आणि पुणे अशा शहरी भागातच असलेला कोरोना विषाणू आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही आपले हात पाय पसरू लागला. यासाठी शहरातून गावाकडे जाणारे लोंढे जबाबदार ठरले असून, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव ह्याच शहरातून आपाआपल्या गावी परतलेल्या मजूरांमुळे अथवा नोकरदार वर्गामुळे होतो आहे.

हे सर्व सुरू असतानाच महाराष्ट्रात राजकारण पेटले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या शीत संघर्षामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत राजकारणी अनुकूल नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतो.

पुण्या-मुंबईहुन गावाकडे जाणाऱ्या लोकांना तिथे तिरस्कार आणि सदृश्य अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असून गावकऱ्यांकडून अवहेलना सहन केल्याच्या तक्रारी सर्वदूर येत आहेत.

पण पुणे जिल्ह्यातील ठिकेकरवाडी हे गाव मात्र याला अपवाद ठरलं आहे.

मुंबई-पुण्याहून आपल्या मूळगावी परत येणारे लोक हे आपले शत्रू नसून आपल्या गावाचे मित्र आहेत आणि त्यांचा संकटसमयी संभाळ करणे आपले कर्तव्य असल्याचा संदेश ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर व्यवस्थित नियोजन केल्यास कोरोना हॉटस्पॉट शहरातून गावी परतणाऱ्या लोकांचा आणि गावकऱ्यांचा संघर्ष कसा टाळता येईल याचे हे गाव उत्तम उदाहरण म्हणून समोर आले आहे.

ठिकेकरवाडी हे कमी लोकसंख्या आणि आसपासच्या मोठ्या गावांच्या तुलनेत एक कमी वस्तीचं गाव आहे. जेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यावेळी ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीने उपाय योजना करायला सुरुवात केली.

स्थानिक पातळीवर त्यांनी २१ दिवसांच्या अत्यंत कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली. व्यापारी वर्गाला देखील यामध्ये संपूर्ण सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान शक्यतो सर्व व्यवहार यशस्वीरित्या बंद ठेवले आणि पुढे देखील सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन केले. बऱ्याचवेळा शासनाच्या विपरीत जाऊन स्थानिक पातळीवर नियोजन केले गेले आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

ठिकेकरवाडीसमोर कोरोनाचा संसर्ग होण्याचा एकमात्र मार्ग होता तो म्हणजे मुंबई आणि पुणे शहरात वास्तव्यास असलेले ठिकेकरवाडीचे नागरिक आणि विद्यार्थी.

ज्यावेळी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यावेळी मुंबई आणि पुणे शहरातून मोठ्याप्रमाणात लोक आपल्या मूळगावी जायला निघाले होते. अशाप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याच भागात स्थानिक आणि शहरातून येणाऱ्या भूमिपुत्रांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याच्या बऱ्याच कथा समोर आल्या. काही ठिकाणी शहरातून येणाऱ्या लोकांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. परंतु ठिकेकरवाडी ह्या सर्वांना अपवाद ठरली.

मुंबई आणि पुण्यात राहणारी माणसे ही आपलीच असून शत्रू नाहीत, ग्रामविकास निधीसाठी हेच मुंबई पुण्यात स्थायिक झालेले आपले ग्रामस्थ आपल्या गावाच्या विकासासाठी निधी देत असतात. हे लक्षात घेऊन संतोष ठिकेकर यांनी या मुंबई-पुण्याहून येणाऱ्या लोकांसाठी योजना आखायला सुरवात केली आणि गावात संस्थात्मक विलगिकरण कक्षाच्या उभारणीचे काम करायला सुरुवात केली.

सर्वप्रथम त्यांनी मुंबई आणि पुण्याच्या विविध भागातून गावाकडे येणाऱ्या लोकांची यादी बनवली त्यांच्याशी स्वतः गावच्या सरपंचांनी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाची एकूण एक माहिती घेतली. त्यांना धीर दिला आणि गावात तुमचं स्वागत आहे फक्त गावाच्या आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी १४ दिवसांसाठी संस्थात्मक विलगिकरण कक्षात निवास करावा लागेल.

त्यांना धीर दिला आणि गावातला विलगीकरण कक्ष कसा आहे याबद्दल त्यांना सांगितलं. तिथं त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयींबद्दल सांगितलं. यात ग्रामस्थांनी देखील संतोषजी ठिकेकरांना आपले संपूर्ण सहकार्य देत आपल्या परिवारातून कोणी मुंबई पुण्याहून गावाकडे येत असेल तर त्याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीला दिली.

मुंबई पुण्याहून जर कोणी गावात वाहन घेऊन येत असेल तर त्या वाहनाचे संपूर्णरित्या निर्जंतुकीकरण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले. गावात साधारणपणे १५ – २० कुटुंबे परतली. या सर्वांंना शाळेच्या हॉलमध्ये, मंदिराच्या हॉलमध्ये, समारंभ कक्षात संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरगावाहून आलेले ग्रामस्थ कुठल्याही प्रकारची हुज्जत न घालता त्यांना नेमून दिलेल्या विलगीकरण कक्षात राहत आहेत. विलगीकरण कक्षातील लोकांचा परस्पर संपर्क टाळण्यासाठी त्यांनी एका विलगीकरण कक्षात अगदीच मोजक्या लोकांची व्यवस्था केलेली आहे.

त्यांच्या जिल्हा परिषद शाळेत पाच खोल्या आणि तीन शौचालये आहेत तर त्याठिकाणी फक्त तीनच व्यक्तींना ठेवण्यात आलं आहे. तसेच दोन विलगीकरण कक्षांंमध्ये अंतर देखील राखलं आहे. जेणेकरून दोहोंमधला संक्रमणाचा धोका टाळता येईल.

गावातील मुस्लीम परिवाराने विलगीकरण कक्षासाठी त्यांच्या दोन खोल्या ग्रामपंचायतीला विनामूल्य दिल्या आहेत. कोरोना संकटकाळात मुस्लीम समाजाला ज्याप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे अशा काळात ही घटना धार्मिक सौहार्दाच्या दृष्टीने आशादायी आहे.

इतकंच नाही तर आसपासच्या लोकसंख्येने मोठ्या गावात जर शक्य असेल तर त्या ठिकाणी देखील संस्थात्मक विलगिकरणाची व्यवस्था तिथल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्माण करता येते का यासंबंधित पाहणी करण्यात आली होती.
गावच्या ग्रामपंचायतीची क्षमता नसताना देखील लोकांनी वर्गणी जमवून गावात नवीन संस्थात्मक विलगिकरण कक्षांचे बांधकाम सुरू करण्यात आले.

गावाने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक कुटूंबाला आणि व्यक्तीला स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवले. त्यांचा एकमेकांशी संपर्क होऊन संसर्गाचा धोका वाढणार नाही, याची काळजी घेण्यात आली. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय आणि स्नानगृह निर्माण करण्यात आले. रात्री अपरात्री येणाऱ्या लोकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी आधीच संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली होती.

१४ दिवस त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात कसलीच कमतरता भासणार नाही, याची संपूर्ण काळजी ग्रामपंचायतीने घेतली, त्यांना अन्न पुरवठा करण्यात आला, अत्यावश्यक सामान व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकारने सांगितलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप, डासांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत त्या लोकांना गुड नाईट, ऑल आउट सारखे यंत्र आणि डास मारणाऱ्या अगरबत्ती यांचे वाटप करण्यात आले.

ज्या लोकांची गावात घरे होती त्या लोकांना सक्तीने विलगिकरण कक्षात संपूर्ण १४ दिवस ठेवण्यात आले.

त्याचबरोबर इन्फ्रा रेड गनने त्यांच्या शरीराच्या तापमानाच्या नोंदी देखील घेतल्या जात होत्या. ज्या लोकांची गावाच्या बाहेर शेतात घरे होती, अशा लोकांना त्यांच्या त्या घरात गृह विलगीकरण करण्यात आले. या माध्यमातून ते बाहेर ग्रामस्थांशी कुठलाच संपर्क प्रस्थापित करणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली. त्यांना अत्यावश्यक वस्तू वेळोवेळी देण्यात आल्या. अत्यंत आपुलकीने त्यांची काळजी घेण्यात आली.

ज्यांना ऑनलाईन काम करायचं आहे अशांसाठी त्यांनी वायफाय सुविधा देखील उपलब्ध करून दिली.

हे सगळं करत असताना एक प्रशासकीय पेच भेडसावत होता तो म्हणजे या कामासाठी ग्रामपंचायत निधी वापरता येईल का? तर प्रोसिजरल दुविधेत न अडकता सर्व ग्रामस्थांच्या मताने ग्रामसभेत निर्णय करून त्यांनी हे सर्व करण्याचा निर्णय घेतला.

प्रशासकीय पेचांपेक्षा गावातील लोकांच्या आरोग्याला त्यांनी महत्व देत येणाऱ्या संभाव्य अडचणींशी दोन हात करण्याची तयारीही त्यांनी मनोमन केली आहे.

त्यामध्ये त्यांना त्यांच्या गावचे ग्रामसेवक गणेश औटी यांनी मोलाचे सहकार्य केलं आहे.
लॉकडाऊन दरम्यान अनेक शासन निर्णय येत होते. त्यात वेगवेगळ्या प्रकारची तफावत आढळून येत होती. ३० तारखेला एक निर्णय तर ५ तारखेला वेगळा निर्णय, अशाप्रकारे गौडबंगाल निर्माण झाले होते, अशाप्रसंगी शासनाच्या निर्णयाला अधीन न जाता गावाने स्वतंत्रपणे नियोजनबद्धपणे बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांची आणि गावातील लोकांची काळजी घेतली.

अत्यल्प संसाधनं व निधीचा आभाव या सर्वांवर मात करून ठिकेकरवाडीने आपल्या शहरातून गावी आलेल्या बांधवांना सामावून घेतलं. या सर्व प्रक्रियेत गावचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती.

संतोष ठिकेकर म्हणतात की, ”गावातून बाहेर गेलेला प्रत्येक नागरिक ही गावाची जबाबदारी असते, जेव्हा अशा संकटाच्या काळात ते लोक आपल्या गावी परत येतात, तेव्हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, त्यांची व्यवस्थित आरोग्य तपासणी करून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचे वेगवेगळे संस्थात्मक विलगिकरण शक्य आहे, यातून त्या शहरातून गावी आलेल्या ग्रामस्थांना देखील कुठल्याही प्रकारची सापत्न वागणुक मिळणार नाही, याची काळजी घेता येते.”

ठिकेकरवाडीच्या संस्थात्मक विलगिकरणाच्या प्रयत्नांना यश आले आहे. आज संपुर्ण तालुक्यात व जिल्ह्यात विलगिकरणाचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी गावचे सरपंच संतोष ठिकेकर यांनी ग्रामस्थ, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

एकजुटीने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, याचे उत्तम उदाहरण ठिकेकरवाडीने आपल्यासमोर उपस्थित केले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!