The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती : शिवकालीन संघर्षाच्या आठवणी जपत आपल्याला प्रेरित करणारा ‘राजगड’

by सोमेश सहाने
4 February 2025
in ब्लॉग, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कॉलेजला असताना रोजच्या जगण्याचा शीण यायला काही विशेष कारण लागत नाही. पण न संपणारी प्रेरणा वाटावी असं काही मिळणं मात्र तितकंच अवघड असतं. असाच एक शीण आलेला दिवस होता. आपण काय करतोय? का करतोय? इथपासून तर Who am I पर्यंतचे प्रश्न पडणं रोजचंच असायचं त्यावेळी.

एक दादा म्हणावा या वयाचा मित्र अचानक संध्याकाळी रूमवर आला, त्याला पण बोर होत होतं. तो म्हणे मी एकटाच जाऊन बसत असतो अशावेळी राजगडावर, तू पण चल. तेव्हा ती गोष्ट फक्त सांगून सगळ्यांसमोर मिरवता येईल असा “चाळा” होता, आणि हे कारण पुरेसं होतं त्यावेळी रूममधून निघायला.

उद्या सकाळी प्रॅक्टिकलच्या आधी पोहोचणार याची खात्री करून निघालो. जाताना कुठल्यातरी पेठेतून डोक्याला लावता येईल असा टॉर्च पण घेतला. नवरात्र होती. पायथ्याच्या गुंजवणे गावात गरबा सुरू होता.

कॉलेजला असतात तसे कट्टेदार पातळ शूज, रात्री घालायला एक ट्रॅकपॅन्ट, कॉलेजची सॅक, पाण्याची बाटली, बिस्किटं आणि पुढे न दिसणारा डोंगर. एकमेकांचं आयुष्य उगाच उकरणाऱ्या त्या गप्पांचा एक राउंड होइपर्यंत किल्ला दिसू लागला होता.

याआधी ४-५ ट्रेक केले असल्याने चोर दरवाज्याखालची खडी चढाई करण्यात थ्रिल वाटलं. थ्रिल कितीही असलं तरी ग्रीलवरचा हात सुटत नव्हता. चोर दरवाज्यातून आत वाकून जाताना बॅग अडकली की काही क्षण श्वास थांबतोच. अंधारात भुताखेताच्या गप्पा गोष्टी झाल्या, थंडी होतीच पण शेकोटी करून त्याभोवती फोटो काढण्याची हौस त्यापेक्षा जास्त होती. गप्पागोष्टी, गोंधळ घालून रात्री २-३ वाजता मंदिरात झोपी गेलो.



एवढ्या थंडीत एवढ्या उंचीवर पद्मावती मंदिरात झोपलो तर सूर्योदय चुकणारच ना! मग, सकाळी उठून मागे बघितलं तर तो अवाढव्य बालेकिल्ला दिसला आणि डाव्या हाताला पसरलेली सुवेळा माची. भीती वाटली पण कसंबसं ग्रीलला धरत ती खडी चढाईही केली. मला वाटत होतं की वर विशेष काही नसेल. एवढं सगळं चढून कशाला कोण वर येत असेल? केवळ पहाणीसाठी ठेवली असेल ही जागा. त्याकाळी तर बाजूला धरायला या ग्रीलही नव्हत्या. थोडासा पाय इकडचा तिकडं झाला तर जीव गमवावा लागेल अशी ती चढाई त्यावेळचे लोक तरी का करतील?

पण वर गेल्यावर मला अवाढव्य महादरवाजा दिसला. अगदी कुठल्याही किल्ल्याला असतो तेवढा मोठा. जिथं नीट उभंही राहता येत नाही तिथं हा दरवाजा कसा बांधला असेल आणि का? असे प्रश्न पडणं सहाजिक. माझ्याबरोबर असणाऱ्याला विचारलं तर तो उडत उडत बोलला, म्हणे “अरे, हा बालेकिल्ला आहे, म्हणजे ते राजपरिवार सगळा इथंच रहायचा. महाराज आग्र्याला होते तेव्हा जिजामातांनी इथूनच सगळं सांभाळलं, मग महादरवाजा लागेलच ना?” मी “हं” म्हटलं खरं पण तिथून पुढें माझा मुड बदलला.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

आपण जिथे उभा आहोत, जे बघत आहोत, ती महाराजांची कर्मभूमी होती ही पहिल्यांदाच झालेली जाणीव मला भावुक करत होती. महादरवाज्यातून वर जाणाऱ्या पायऱ्या चढत सदरेपर्यंत जाताना, धाप टाकत डोक्यात एकच विचार फिरत होता. तो तो पुस्तकात वाचलेला, स्वराज्याची पहिली राजधानी अशी रिकामी जागा भरायला लावायचे तो हाच राजगड.

आम्हा मराठवाड्याच्या लोकांना अजूनही महाराज दूरचेच वाटतात. आम्ही असं एक तास गाडीवर फिरत जाऊन ही देवळं अनुभवू शकत नाही. तेव्हा शाळेत असताना तर असं वाटायचं की एखादा महाल असेल राजगड म्हणजे, सिनेमात दाखवतात तसे रेशमी पडदे असतील.

इतिहासाच्या पुस्तकात तर त्या पायऱ्या आणि त्यावरून उतरतानाचे महाराज असा फोटो असायचा. कुठे घेतला असेल तो फोटो नक्की? फोटोचं सोड रे, पण हाच तो किल्ला. म्हणजे हे जिंकणं, आणि राजधानी बांधणं वगैरे प्रकार एवढा सोपा नसायचा असंच म्हणायचं.

कोणी जर राजा असेल तर त्याने एवढ्या बिकट परिस्थितीत का रहावं? “स्वतःच्या निवांतपणापेक्षा पण काहीतरी महत्त्वाचं असू शकतं का आयुष्यात?” या प्रश्नासाठीच मी इथपर्यंतचं पुराण लिहिलंय. मुळात असे प्रश्न पडणे हीच किती भाग्याची गोष्ट ना? प्रश्नरहित झोपा काढत घालवलेलं आयुष्य किती निरर्थक वाटतं ना अशावेळी? मला नाही वाटत अशी एखादी गोष्ट जी मला माझ्या निवांतपणापेक्षा मोठी वाटेल. पण असू शकते असं वाटतंय.

नितीन बानगुडे पाटलांचं भाषण आठवलं. आमच्या मराठवाड्यात असं पोटतिडकीने सांगितल्याशिवाय भाषणात पारितोषिक नसतं मिळत. ते म्हणायचे “प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षेत्रातलं शिवाजी होता आलं पाहिजे”.

सकाळी आठलाच उन्हाचे चटके बसत होते. आम्ही उगाच कुठेतरी उभे राहून कॅमेराकडे न बघणारे फोटो काढत होतो. डोक्यात शाळेतलं पुस्तक, रिकामी जागा आणि बानगुडे पाटील फिरत होते. तिथून परत आल्यावर मी प्रॅक्टिकलला गेलो. यावेळी सगळ्या रिडींग नीट आल्या.

ॲस्ट्रो फिजिक्सची मीटिंग होती, मला यावेळी जावंसं वाटलं. आपल्या क्षेत्रात, आपल्याला जमतं त्यात, कितपत शिवाजी होता येतं ते बघण्याची उर्मी आली. पुढे स्वतःचं स्वराज्य म्हणता येईल असं काही तरी करावं अशी तळमळ वाटू लागली…

संदीप माहेश्वरी तुमच्यासोबत रहायला आला म्हणजे तुम्हाला कधीच निराश वाटणार नाही असं नसतं ना. तुम्हाला प्रेरणा टिकेल यासाठीही स्वतःवर काम करत रहावं लागतंच. कितीही मोठी प्रेरणा असली तरी माणूस भरकटतोच. पुन्हा त्याला मूळ रस्त्यावर आणेल अशी ताकद त्या प्रेरणेत असावी.

आवड म्हणून लोकांना डोंगरं चढवण्याचा उपक्रम छान सुरू होता. नाईट ट्रेक पण सुरू करावेत म्हणून राजगड नाईट ट्रेकची ट्रीप करायचं ठरवलं. अगदी लहान मुलांपासून सवय नसलेल्या संसारी लोकांपर्यंत सगळ्यांना सुखरूप नेऊन झोपवलं. विकेंड असल्याने गडावर भरपूर गर्दी. सकाळी सगळ्यांना बालेकिल्ल्याला घेऊन गेलो. निघायच्या आधी मी विकिपीडिया वाचलं होतं. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यात सगळ्यांना नीट बसायला जागा आहे म्हणून तिथं बसवलं आणि माहिती सांगण्याची औपचारिकता करावी म्हणून सुरू झालो.

कोणत्या साली काय झालं, वगैरे सांगून आता शेवट जवळ आला होता. जवळून जाणारी, दरवाज्यावर गेलेले सगळे लोकं ही ऐकत होते. तेव्हा आपसूक माझ्या तोंडून मला वाटणारं काहीतरी बाहेर पडलं.

“जेव्हा जेव्हा आयुष्यात काही राम वाटत नसेल तेव्हा तेव्हा इथं यावं, डोकं ठेवावं. आयुष्यात काहीही झालं तरी हे एक ठिकाण नेहमीच असं उरतं, जिथून प्रेरणा मिळते. ही भग्नात अशा एका प्रेरणादायी संघर्षाची सुंदर आठवण आहे”. 

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा मला शुद्धीत आल्यासारखं वाटलं. कॉलेज संपत आलं तेव्हा प्रेरणा, श्रद्धा असं सगळं जाऊन मुक्तता डोक्यात भरते, भावनिक होणं वगैरे कमी दर्जाचं वाटायला लागतं. त्या फेजमध्ये आपण परत राजगडला आलो तर पुढे पाय टाकताना किमान लाज वाटणार नाही असं आपलं वर्तन असावं याचा धाक बसला तो नेहमीसाठीच.

एकदा अगदीच काहीच कारण नसताना एका विचारी मित्रासोबत रात्री राजगडला गेलो होतो. सोमवार असल्याने वर कोणीच नाही. रात्रीचे २ तास सोडले तर आम्ही न थांबता १२ तास गप्पा मारत होतो. आयुष्यातल्या क्लिष्ट प्रश्नांवर सहज गप्पा मारताना बरेच उत्तर मिळाले होते, त्यापेक्षा महत्त्वाचं, एक चांगला मित्र अजूनच जवळचा झाला.

एकदा तर ऑफिसमध्ये सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं, सगळेच म्हणाले चला राव कुठंतरी! निघाले राजगडला. सगळ्यांच्या बॅगा ओढत आणि चला चला म्हणत ४-५ तास गेले. तेव्हापासून परत कधी जायचं याचेच प्लॅन बनणं सुरू आहे.

एव्हाना मध्ययुगीन कालखंडातल्या एका महान राजाची प्रेरणा किंवा कसलीही प्रेरणा असल्यापेक्षा वास्तववादी तर्कशुद्धपण आवडायला लागलं होतं. पण तरी राजगडाशी जिव्हाळा कमी नव्हता झाला. मग अतिविचार करत आम्ही बोलू लागलो की काय उरतं? तो राजा त्यावरची श्रद्धा हे सगळं नसलं तरी त्या संघर्षाचे परिणाम आहेतच ना. इतिहासकार म्हणतात तसं अखंड मानव जातीला प्रेरणा मिळेल असा हा वारसा.

तुम्ही इथं डोकं टेकवलं नाही तरी ही ते भारावून जाणं थांबत नाही. ४-५ किल्यांच्या स्वराज्याची ही राजधानी होती. पुढे याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे नेले.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फेसबुक जेव्हा स्टार्टअप होतं ना तेव्हाचं त्याचं पहिलं ऑफिस असल्यासारखा आहे राजगड! हे ठेवण्यात काही तर्क नाही तरी हा वारसा म्हणून जपण्यात प्रेरणा आहे. लहानपणी एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाल्याचा एखादा फोटो बघून आपलं सेल्फ एस्टिम वाढतोच ना? कुठलाही सामान्य जीव इथून उठून एवढं काही तरी महान करू शकतो, याचं हे उदाहरण. एका सामान्य वाटणाऱ्या संघर्षाची ही सुरुवात होती.

फक्त हेच नाही उरत. त्या सुवेळा माचीतली नेढं ही उरतेच. एकदा तिथं माकडांनी खूप त्रास दिला होता, पडता पडता वाचलो होतो. सुवेळा माचीच्या टोकापर्यंत चालत गेलो होतो एकदा भर दुपारी. तिथं जाऊन खाल्लेल्या ब्रेड जॅमचा फोटो कमाल आला होता. तिथल्या त्या देवळ्या आहेत की शौचकूपं यावरून चर्चा ही केली होती.

गुंजवणे दरवाज्यातील शिल्प बघून मूर्तीशास्त्राच्या गप्पांची सुरुवात झाली. सोबतचा मित्र एकदा सकाळी उठून एकटाच त्या तुबावर चढला होता. मिलिंद परहाडकरांचं पुस्तक चाळत एकदा काळेश्वरीच्या बुरुजापर्यंतही गेलो होतो. तिथले २००० वर्षांपूर्वीचे अवशेष बघून तर काय आनंद झाला होता. त्या देव्हाऱ्यातल्या मुर्त्या नेमक्या कशाच्या आहेत याचा शोध आजही सुरू आहे. तिथल्या कुठल्या तरी कपारीत “ब्रह्मदेवाने” तपश्चर्या केली असेल. आपल्यासारखेच प्रश्नांची उत्तर शोधायला आला असेल तो.

संजीवनी माचीचं सौंदर्य अजबच! गो. नि. दांडेकरांनी सांगितल्या त्या लेण्या बालेकिल्ल्याच्या डोंगरात नेमक्या कुठे आहेत त्या अजून सापडल्या नाहीत मला. आम्हा फिजिक्सवाल्यांना या झाडाझुडप्यातलं काही कळत नाही, पण आप्पा म्हणतात तसं इथं खूप दुर्मिळ झाडं आहेत. वेगवेगळ्या ऋतूत दुसणारे राजगडाचे वेगवेगळे रूपं मोबाईलमध्ये कैद केलेत.

आप्पांनी म्हणे बिबट्या पण बघितलाय इथे. बाबुदा भिकुल्या रहायचा म्हणे वर, त्याने शिकार केली होती. आता शासनाने त्याला किल्ल्याच्या पायथ्याशी रहायला सांगितलंय.

आप्पांनी वर्णन केल्याप्रमाणे एक झोपडी गुंजवण्याच्या मार्गाने वर चढताना उजव्या हाताला दिसते बघा. तीच असावी ती. बाबुदाच्या नातवांना भेटायला जावं म्हणतोय कधीतरी. बऱ्याचदा अमराठी ग्रुपही असतो सोबत त्यांना कित्येकदा भावनाविरहित राजगडाचं महात्म्यसुद्धा सांगितलंय आणि त्यांनाही ते भावनिक करणारं वाटलं म्हणे.

पुढे दरवर्षी २-३ राजगडवाऱ्या होऊ लागल्या, प्रत्येक वेळी नवीन ग्रुप. काही वेळेस इतिहास सांगणाऱ्या लोकांना घेऊन, काही वेळेस फक्तच ट्रेक, तर कधी मित्रांसोबत. वळीवाचा पाऊस-वीजा-वारं, मान्सूनमधलं दाट धुकं, चिखल, हिवाळ्यातली थंडी, अमावस्येचा काळोख आणि पौर्णिमेचा लख्ख उजेड, घाम काढणारं ऊन…

राजगडाचे आणि माझे सगळे ऋतू आम्ही सोबत बघितलेत.

कोरोना विषाणूमुळे काही काळ गप घरी बसावं लागलं! काही काळ हताश झालो तरी किमान घरच्यांचा आधार होता. पुण्यात आल्यावर ती निवांत घरी राहण्याची सवय त्रास देते. एकटेपण आहे या स्वतंत्र जीवनशैलीत. त्यात कोणीतरी वडीलधाऱ्याने येता जाता जेवलास का? विचारल्यानंतर वाटणारा आधार हा आमच्या मोकळ्या वागणाऱ्या समाजात इंटरफेअर केल्यासारखा वाटतो म्हणे. राजगड हे काही पाळत नाही. मला शाश्वती आहे की आताही गेलो की तो विचारेल, “कसा आहेस ?”

जायलाच हवं आता. गेलंच पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

Tags: RajgadTravel Blogs
ShareTweet
Previous Post

भारतीय संघाच्या पहिल्या ओपनरला पुण्याच्या साखर कारखान्यात वॉचमनचे काम करावे लागले होते

Next Post

गांधी ह*त्येवरील या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकासाठी तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते !

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
Next Post

गांधी ह*त्येवरील या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकासाठी तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते !

जनतेला न कळू देता अमेरिकेने कॅनडाच्या विमानतळावरून ब्रिटनला शस्त्र पुरवले होते !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.