आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतातील त्रावणकोरचे साम्राज्य आशिया खंडातील पहिले साम्राज्य होते ज्यांनी युरोपियन वसाहतवाद्यांना धूळ चारली होती. या साम्राज्याचा राजा, मार्तंड वर्मा हा प्रचंड पराक्रमी होता. त्याने डच सैनिकांना आव्हान दिले होते की, जर त्यांनी त्याच्या साम्राज्यावर आक्र*मण केले तर तो त्यांचे अस्तित्व मिटवून टाकेल. त्याने डचांना यु*द्धात पराभवासाठी तयार रहा असे ठणकावून सांगितले होते. एवढेच नाही, मार्तंड वर्माने युरोपियन देशावर आक्र*मणाची योजना देखील आखली होती. तो सहजा सहजी हार मानणारा नव्हता.
त्याच्या यु*द्धाच्या आव्हानाला डचांनी स्वीकरले आणि मार्तंड वर्माने त्यांना धूळ चारत त्यांच्या ११ हजार सैनिकांना बंदी बनवले होते. मार्तंड वर्मा कोण होता आणि त्याचा हा पराक्रम काय होता हे जाणून घेऊ,..
भारतात व्यापाराच्या दृष्टीने सोळाव्या शतकात डच लोकांचे आगमन झाले. १६०५ साली डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. व्यापारासाठी आलेले डच व्यापारी मलबारच्या तटावर येऊन पोहचले. इथून त्यांनी संपूर्ण आशिया खंडात पाय पसरण्यास सुरुवात केली.
हळूहळू श्रीलंका, केरळ, म्यानमार आणि सुरत या बंदरांवर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. श्रीलंका आणि त्रावणकोरचे राज्य डचांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.
त्याकाळी केरळ छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. डचांनी एक एक करत कोचीन बंदर व त्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
मार्तंड वर्मा हा त्रावणकोरचा तत्कालीन शासक होता. त्याच्या जन्म १७०५ साली कार्तिकी थिरूनल आणि राघव वर्मा यांच्या पोटी झाला. मार्तंड सुरुवातीपासूनच समंजस आणि धाडसी होता. त्याने तरुण वयात त्याचे काका, महाराज राम वर्मा आणि मदुराईच्या राजामध्ये संधी घडवून आणली होती. यामुळे मार्तंड एक राजा होण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे, हे सर्वांच्या लक्षात आले होते. त्याच्यात एका कुशल शासकाचे सर्व गुण होते.
त्याचे काका राम वर्मा यांनी त्याला ‘नेयन्तीकराचा राजपुत्र’ हे बिरूद प्रदान केले.
वयाच्या २३व्या वर्षी मार्तंड वर्माने त्रावणकोर नगरीवर आक्र*मण केले, ज्यावर त्याकाळी नायरांचे वर्चस्व होते. त्याने नायर राजांना सत्तेतून बेदखल करत आपल्या बुद्धी व शौर्याच्या बळावर कोल्लम, कायकुलम आणि कोट्टाराकरा साम्राज्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. अशा अनेक राज्यांना एकत्र करून मार्तंड वर्माने त्रावणकोर साम्राज्याची स्थापना केली.
मार्तंड वर्माने जरी आपले साम्राज्य स्थापन केले होते, तरी त्याच्या विरोधात पराभूत रियासतींच्या राजांमध्ये मोठा असंतोष खदखदत होता, त्यांना आपले गमावलेले राज्य परत हवे होते. यासाठी त्यांनी डचांची मदत घेण्याचे ठरवले.
कायकुलम या राज्याचा पराभूत राजा याने डचांना मदतीसाठी याचना केली. डच देखील मदतीसाठी तयार झाले. त्यांनी मार्तंड वर्माला संदेश पाठवला आणि साम्राज्य सोडण्यास अथवा यु*द्ध करण्यास सांगितले. श्रीलंकेचा गव्हर्नर गुस्ताफ विल्यमने मार्तंड वर्माला पत्र पाठवून धमकी दिली.
त्याला वाटलं मार्तंड वर्मा सपशेल नांगी टाकेल, पण झाले भलतेच. त्याने उलट डचांनाच आमच्या अंतर्गत व्यवहारात लुडबुड करू नका, नाहीतर तुमच्या हॉलंड देशावर आमचे मच्छिमार नाविक ह*ल्ला करतील, असे खडे बोल सुनावले.
यामुळे डच गव्हर्नर चांगलाच चवताळला. त्याला वाटले की आपल्या आधुनिक सैन्यशक्तीच्या बळावर तो मार्तंड वर्माचा सहज पराभव करू शकेल, पण तसे झालेच नाही. त्याने कोट्टारकराच्या राजकुमारीला त्रावणकोरची सम्राज्ञी घोषित केले व डच-कोट्टारकराच्या सैन्य तुकड्या घेऊन मार्तंड वर्मावर आक्र*मण केले. पण दोन्ही बाजूच्या तुकड्यांना मार्तंड वर्माने सहज पराभूत केले. इतकेच नाही, कोट्टारकराच्या राज्याला देखील आपल्या साम्राज्याला जोडले.
त्याने तब्बल ११ हजार डच यु*द्धकैद्यांना पकडले. उरलेल्या डचांना त्याने कोचीन आणि इतर आसपासच्या भागातून पळवून लावले. मार्तंड वर्माच्या या शक्तिशाली प्रहाराने डचांची तारांबळ उडाली. त्यांचा मोठा मानहानीकारक पराभव झाला होता. पण, त्यांनी अजिबात हार मानली नाही.
त्यांनी कोलाचेल म्हणजेच आजच्या कन्याकुमारीवर १७४० साली ४०० समुद्री जहाजे घेऊन आक्र*मण केले आणि तेथील किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. हे ठिकाण मार्तंड वर्माच्या राजधानीपासून जवळ होते. त्याने १० हजार सैनिकांची मोठी फौज कोलाचेलच्या किनारपट्टीवर पाठवली. एवढी मोठी फौज आणि सोबतच मोठ्या संख्येने मच्छिमार बोटी येताना बघून डच मागे सरकले आणि त्यांनी शरणागती पत्करली. अशाप्रकारे मच्छिमार आणि दुर्दम्य साहसाचा बळावर मार्तंड वर्माने आपल्या साम्राज्याला मजबूत केले होते.
१० ऑगस्ट १७४१ रोजी त्याने डचांच्या तावडीतून केरळ मुक्त केला. इतकेच नाही, देशभरातील डचांच्या सत्तेचा पाया खणून काढला. संपूर्ण आशिया खंडात डच आक्र*मकांना यु*द्धात धूळ चारणारा तो एकमेव शासक होता.
मार्तंड वर्माचा हा इतिहास आजही आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाही हे मात्र दुर्दैव, त्यामुळे ही माहिती नक्की शेयर करा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










