आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पोपटराव बागूजी पवार, मूळचा हिवरेबाजारचा असणारा हा तरुण शिक्षणामुळे आजोळी राहायचा आणि हा फार उत्कृष्ट पद्धतीचा क्रिकेट खेळाडू होता. त्याचबरोबर अभ्यासातसुद्धा तेवढाच हुशार होता. ते वय असतं तेव्हा अंगात सळसळतं रक्त असल्याने लढण्याची उमेद असते तर तेव्हा याच काळात केडगावतील (म्हणजे त्यांचे आजोळ) तरुण मित्रांनी मैदानाच्या प्रश्नामुळे एकत्र येत पोपटराव पवारांना सरपंचपदाची निवडणूक लढायला लावली आणि त्यांनी ती लढवलीसुद्धा, पण या निवडणुकीत त्यांना अपयश आले, अपयशाने खचून जातील ते पोपटराव कसले…!
ते थांबले नाहीत…
दिवस जात होते, त्यांचं कॉलेज, क्रिकेटचा खेळ हे सगळं काही चालूच होतं. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय एवढेच काय तर महाराष्ट्र राज्याकडून खेळलेला हा खेळाडू भविष्यात भारताच्या संघातसुद्धा दिसू शकला असता… पण पोपटराव जेव्हा परत आपल्या गावात हिवरेबाजारला आले तेव्हा तिथे असलेली परिस्थिती त्यांना पाहवली नाही. प्रचंड निराशाग्रस्त वातावरण त्या वेळी हिवरेबाजारचे झाले होते. तो रंग दे बसंती चित्रपटात एक डायलॉग आहे ‘हो रहा है वो बर्दाश्त करो या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की”.
तर हा तरुण दुसऱ्या प्रकारातला होता, याने मनाशी ठरवलं की आता हे चित्र बदललं पाहिजे आणि हे बदलणे ही आपली जबाबदारी आहे. आणि सुरू झाला हा प्रवास….
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एवढा चांगला खेळाडू, शिवाय त्या काळात मास्टर्सपर्यंत शिकलेला हा हुशार तरुण कुठेही मोठ्या पदावर नोकरीला लागला असता.. पण त्यांना सुरवातीलाच जरासा विरोध झाला. पहिला विरोध हा झाला तो घरातूनच आणि तो होता आई वडिलांचा. अर्थात त्यात त्यांचीसुद्धा चूक नसावीच ना!? ज्या गावात सरकारी योजना येत नाहीत, रोज भांडणे होतात, दारू पिणारे लोक आहेत, जिथे कर्मचार्याची बदली ही शिक्षा बदली म्हणून संबोधली जात असे तिथे कुठलाही राजकिय वारसा नसणारा हा तरुण कसा काम करेल, असं त्या घरच्यांना वाटतंच असावं ना…
१९७२ साली पडलेल्या दुष्काळाचे परिणाम हिवरेबाजारवर झाले होते, लोक गाव सोडून जात होते. बेरोजगारी वाढत होती. नानाविध प्रकारच्या अडचणी होत्या. पण या तरुणाने घरचे विरोध झुगारून गावासाठी काम करण्याचा ध्यास घेतला होता.
कामाला सुरवात झाली आणि १९८९ साली ते हिवरेबाजार ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले, आणि सूत्र हाती घेतली.
महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खेड्याकडे चला, त्याप्रमाणे खेडेगाव सुजलाम्-सुफलाम् व्हावे हीच काय ती इच्छा-आकांक्षा घेऊन त्यांनी सुरुवात केली. बापूंच्या मनातल्या खेडेगावाच्या निर्माणाची. प्रश्न खूप होते पण त्यांच्यात सोडवण्याची जिद्दसुद्धा तेवढीच होती. मग चालू झालं ते हिवरेबाजारला दिशा देण्याचं काम.
शहरात शिकलेल्या सुशिक्षित तरुणाच्या हाती गावची ग्रामपंचायत दिल्याने गावचा विश्वास होताच त्यांच्यावर, पण गावातील तरुणांनी आणि महिलांनी त्यांना सुरवातीस विशेष सहकार्य केले.
दारूबंदी, कुटुंब व्यवस्थापन, उघड्यावर शौच बंदी, कुर्हाडबंदी, पीक नियोजन, श्रमदान, आणि मुक्त चारण्यास बंदी या सात सूत्रांनी काम करायला सुरवात झाली. सामाजिक एकोपा, भुजलाचे नियोजन या गोष्टींवरसुद्धा कालांतराने कामे होऊ लागली. विकासकामे व्हायला लागली, सरकारी योजना गावात पोहचू लागल्या, संपूर्ण गाव या तरुणाच्या मागे उभे राहीले आणि गावचा विकास होत गेला.
लोकसहभागाच्या आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्याने हिवरेबाजार ग्रामपंचायतीला २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार मिळाला.
‘गावात डास दाखवा आणि १००/- रुपये मिळवा” असे पवार साहेब म्हणतात तेव्हा त्याच्या मागे त्यांना गावाबद्दल असलेला आत्मविश्वास दिसून येतो. हिवरेबाजारात आज एकही टपरी नाहीये. तसेच दवाखानासुद्धा नाहीये, यावरून कळते की गावात रोगराईचे प्रमाण किती कमी असावे.
सर्वधर्म समभावाच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं ते गावात एकमेव मुस्लिम कुटुंबीय असूनसुद्धा त्या गावात मशीद आहे.
आपली जमीन बाहेरच्याला गावातल्या व्यक्तीने विकायची नाही, बोरवेल घ्यायचे नाहीत, तसेच जास्त पाणी लागणारी पिके घ्यायची नाहीत असे घेतलेले काही निर्णय सगळे ग्रामस्थ अगदी काटेकोरपणे पाळतात.
हिवरेबाजारच्या ३० वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना पोपटराव पवार नेहमी सांगतात की हे सर्व गावकऱ्यांचे श्रेय आहे, कोणा एकाच्या असण्याने हे कधीच शक्य नव्हतं. या सगळ्या प्रवासात आलेल्या अडचणींच्या वेळी हे गावकरीच माझ्या मागे उभे राहिल्याने हे सगळं इथे आलं आहे, असा ते आठवणीने उल्लेख करतात. यातूनच त्यांचे पाय आजही जमिनीवर असल्याचे दिसून येते. मागे वळून पाहताना क्रिकेटच्या खेळाबद्दल पोपटराव म्हणतात की क्रिकेट जरी मागे पडलं असलं तरीसुद्धा त्यातला हार कधीच मानायची नाही हा गुणधर्म कधीच सुटणार नाही व त्यानेच कामे होत राहतील.
आजवर पोपटराव जलसंधारणाच्या कामाच्या निमित्ताने तब्बल चौदा लाख किलोमीटर फिरले आहेत, १२५ पेक्षा जास्त देशातील अनेक व्यक्तींनी तसेच विविध संस्थांनी हिवरेबाजार या गावास भेटी दिल्या आहेत.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले पोपटराव पवार आजसुद्धा हिवरेबाजारचे सरपंच आहेत. तसेच ते महाराष्ट्र शासनाच्या आदर्शग्राम योजनेचे सल्लागार आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आज हिवरेबाजारसारखी १०० गावे घडवण्याचं काम चालू आहे.
आज एवढं सगळं असूनसुद्धा पोपटराव पवार यांच्या जीवनशैलीत कुठलाही बदल झालेला नाही की त्यांनी ग्रामपंचायतीच आपल्या गावच्यासाठी काम करण्याचं थांबवलं नाही, असे बरेच राजकारणी दिसतील जे नगरसेवक नंतर आमदार आणि पुढे मोठे मोठे स्वप्न पाहतात पण या सगळ्यात तीस वर्षांपासून आपली ग्रामपंचायत सांभाळणारे पोपटराव आदर्श ठरतात..
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









