आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
तुमचा धर्म कोणताही असो, तुमचं आराध्य दैवत कोणतंही असो, आपल्या सुगंधाने अब्जावधी मनांवर मोहिनी घालणाऱ्या अत्तराचा सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग असलेला दिसून येतो. सत्यनारायणाची पूजा असो वा ईद, मंदिर असो वा मशीद, तिथल्या आसमंतात ओसंडून वाहणारा अत्तराचा सुगंध हा पावित्र्याची परिसीमा गाठणारा असतो. मांगल्याची अनुभूती देणारं हे अत्तर फक्त धार्मिक विधींपुरतंच मर्यादित नसून, याचा वापर अनेकदा अशुभप्रसंगी केल्याचेही दाखले आपल्याला इतिहासात सापडतात.
अत्तर बनवण्याची प्रक्रिया कालौघात बरीच उत्क्रांत होत आली असून त्याच्या मूळ निर्मिती आणि संशोधनावर हक्क सांगणारेही बरेच संदर्भ आजवर इतिहासकारांनी आणि संशोधकांनी शोधले आहेत. यातील बहुतांश संदर्भ अत्तराच्या शोधाचं श्रेय एका स्त्रीला देतात. होय, एक स्त्री!
पश्चिम आशियातील मेसोपोटामिया हा जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात मेसोपोटामियाच्या दक्षिणमध्यावर असलेल्या बाबिलोन राज्यातील तापुती बेलातेकालीम या स्त्रीने अत्तराचा शोध लावल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
तापुती ही फक्त एक रसायनशास्त्रामध्ये विशेष रस असलेली सामान्य स्त्री नव्हती तर धर्म, राजकारण आणि प्रशासनावर भाष्य करून मेसोपोटामियन संस्कृतीमध्ये विशेष योगदान देणारी विदुषी होती. तिने निरनिराळ्या फुलांपासून तसेच वनस्पतींपासून सुगंधाचा नैसर्गिकरीत्या अर्क काढण्याची आणि तेलांचा वापर करून अत्तर बनवण्याची प्रक्रिया विकसित केली. तिचं हेच संशोधन खऱ्या अर्थाने भविष्यकाळातील सुगंधी अत्तरांच्या व्यवसायाची पायाभरणी करणारं ठरलं.
अत्तराच्या निर्माणप्रक्रियेत नक्की हात कुणाचा हा वाद तूर्तास संशोधकांनी तापुतीला श्रेय देऊन संपवला असला तरी त्यामुळे इतर संशोधनं फोल ठरत नाहीत. काही इतिहासकार अत्तराचा संबंध इजिप्शियन संस्कृतीशी जोडतात. तर काही संशोधकांच्या मते, भूमध्य समुद्रातील सायप्रसमध्ये एकरभर जमिनीत पसरलेला कारखाना हा ताम्रयुगामध्ये सुगंधी द्रव्यनिर्मितीसाठी वापरला जात असावा. इथे सापडलेल्या अवशेषांवरून बदाम, राळ, मर्टल फुले, धणे आणि लिंबासारख्या दिसणाऱ्या बर्गामॉट फळांचा वापर सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी केला जात असावा, असा निष्कर्ष काढला गेला. आणखी काही संशोधनांमध्ये प्राचीन भारतीय ग्रंथसाहित्यांनाही अत्तराच्या निर्माणासाठी जबाबदार धरलं जातं.
आपल्या भारतीय इतिहासात ‘इत्तर’ या नावाने अत्तर बनवण्याची प्रक्रिया आयुर्वेदावर आधारित असलेल्या ‘चरकसंहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथांमध्ये वर्णिली आहे. त्याचसोबत, उज्जैनमधील वराहमिहिर या भारतीय गणितज्ञ, ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञाने लिहिलेल्या ‘बृहत-संहिता’ या ज्योतिषशास्त्रावर आधारित असलेल्या ग्रंथातही अत्तर आणि त्याच्या निर्माण प्रक्रियेवर सविस्तर भाष्य केलं आहे.
ख्रिस्तपूर्व ३४व्या शतकात, भारतात नांदत असलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये अत्तर बनवणारे कारखाने अस्तित्वात असल्याचं काही संशोधनांमध्ये आढळून आलं आहे. संशोधन आणि कालगणनेनुसार, हे सर्व ग्रंथ तसेच सिंधू संस्कृती ही मेसोपोटामियन संस्कृतीपेक्षाही फार प्राचीन समजले जातात.
इतकं असूनही आधुनिक भारतात अत्तरं बनवायला सुरुवात होण्यासाठी बराच काळ लागला. त्या मानाने, रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर जोर धरु पाहणाऱ्या इस्लामी चळवळीत हा व्यवसाय अधिक भरभराटीस आला.
इस्लामी संस्कृतीने अत्तर बनवण्याच्या प्रक्रियेत आमुलाग्र बदल घडवून आणत रसायनशास्त्रातीलही कित्येक संशोधनांना चालना मिळवून दिली. त्यांनी अत्तर बनवताना अधिकाधिक कच्च्या मालाचा वापर करत नवनवी सुगंधी द्रव्ये निर्माण केली. मुस्लिमांनी अत्तराचा व्यवसाय हा फक्त आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्या ठराविक गटांपुरता मर्यादित न ठेवता तो जनसामान्यांसाठी खुला केला. इतकंच नव्हे, हे अत्तर त्यांच्याकडून रोजच्या धार्मिक विधींमध्येही वापरलं जाऊ लागलं आणि लोकांना अत्तर खरेदीसाठी प्रोत्साहन मिळालं.
नवव्या शतकातील अरब तत्त्ववेत्ता अल-किंदीने ‘बुक ऑफ द केमिस्ट्री ऑफ परफ्युम अँड डिस्टीलेशन्स’ हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलं, ज्यात अत्तर बनवण्यासाठी लागणाऱ्या साधनांवर आणि विविध प्रकारच्या सुगंधी द्रव्यं, तेलांवर दोनशेहून अधिक लेख लिहिले होते.
अत्तरांचा हा व्यापार सातासमुद्रापार युरोपमध्ये पोचवण्याचं खरं श्रेय अरबांना दिलं जातं.
चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये आलेल्या अरबांना युरोपमधील अत्तरनिर्माण प्रक्रियेचं श्रेय दिलं जात असलं, तरी युरोपमध्ये पहिलं अत्तर बनवण्याचा मान दिला जातो तो हंगेरीच्या एलिझाबेथ नावाच्या राणीला!
त्या राणीच्या आदेशावरून बनवलं गेलेलं हे अत्तर ‘हंगेरी वॉटर’ या नावाने प्रसिद्ध झालं. त्यानंतर युरोपचा मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे प्रवास सुरु असताना इटलीमध्ये हा व्यवसाय अधिक समृद्ध होत गेला. सोळाव्या शतकात या व्यापाराने फ्रान्समध्येही प्रवेश केला आणि पाहतापाहता फ्रान्सने संपूर्ण युरोपच्या अत्तर व्यवसायावर एकहाती पकड मिळवली.
फ्रान्समध्ये जोमात चाललेल्या अत्तराच्या निर्माणप्रक्रियेमुळे अत्तराची मागणी, व्यापार आणि वेड पुढे जाऊन इतकं वाढलं की अठराव्या शतकात फ्रान्सच्या गादीवर आलेल्या चौदाव्या लुईच्या दरबाराला ‘सुगंधित दरबार’ म्हणून संबोधित केलं जात असे. हा संपूर्ण राजवाडा त्याच्या कानाकोपऱ्यात फवारल्या गेलेल्या अत्तरामुळे लोकप्रिय ठरला. अगदी दररोज फक्त दरबाऱ्यांच्या अंगावरच नव्हे तर संपूर्ण राजवाड्यातल्या पडद्यांवर, पायघड्यांवर, फर्निचरवरही नवं अत्तर फवारलं जात असे. त्या काळात अंघोळीच्या पाण्याची व साबणाची जागाही अत्तरानेच घेतली होती. अत्तरावर होणारा हा अंधाधुंद खर्च स्वतः नेपोलियनही रोखू शकला नव्हता.
एकोणिसाव्या शतकात अत्तरावरील संशोधन अधिक वाढत गेलं आणि त्यांची परिणामकारकता वाढवण्यासाठी अल्कोहोलिक द्रव्यांचाही वापर होऊ लागला. रसायनशास्त्रातील नवनव्या संशोधनांमुळे अधिक मादक सुगंधी द्रव्यांच्या निर्मितीला चालना मिळाली. आजमितीला जगभरात विविध ब्रँड्सची अत्तरे उपलब्ध असून, यात मोठ्या प्रमाणात भेसळही वाढली आहे.
खास धार्मिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या भारतीय आणि अरेबिक अत्तरांची किंमत त्यातील चंदनाच्या, कस्तुरीच्या वापरामुळे अधिक असतेच, पण त्याहूनही उंची आणि महागडी अत्तरे सध्या लोकांच्या ‘फॅशनेबल’ जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. आजही गेल्या पाच शतकांपासून युरोपमधील अत्तराच्या व्यवसायावर आपली मक्तेदारी चालवत असलेला फ्रान्स जगभरातील अत्तर व्यापाराचा ३०% भाग व्यापून आहे.
अत्तराचा शोध लावणारी मेसोपोटेमियाची तापुती असो वा त्याला चालना देणारी हंगेरीची राणी एलिझाबेथ, सर्जनशीलतेचं स्त्रीला लाभलेलं हे ‘सुगंधी’ वरदान कायमच मानवजातीच्या उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण ठरत आलेलं आहे..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










