आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मुंबईचं शिवाजी पार्क, दिवसाच्या कुठल्याही वेळेला त्याठिकाणी जा. विविध वयोगटातील असंख्य मुलं त्याठिकाणी क्रिकेट खेळताना दिसतील. क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहणारा असा एकही मुंबईकर मुलगा आपल्याला सापडणार नाही, जो शिवाजी पार्कवर गेलेला नाही. गेल्या कित्येक दशकांपासून याचं मुलांच्या गर्दीतून आपल्याला, सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, अजित आगरकर, विनोद कांबळी यांच्यासारखे कितीतरी प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर आपल्याला त्यात अनेक मुंबईकर चेहरे दिसतात. त्यातील काहींनी मिळालेल्या संधीचं सोनं केल तर काहींना मात्र, संधीचं रुपांतर प्रदीर्घ यशात करता आलं नाही.
निलेश कुलकर्णी हे असंच एक नाव म्हणता येईल. अष्टपैलू असलेल्या निलेशला भारतीय संघात स्थान मिळालं होतं. मात्र, त्याला या संधीचा फारसा फायदा घेता आला नव्हता. असं असूनही त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम दाखल आहे, जो आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही.
निलेशची क्रिकेट कारकीर्द कशी होती आणि त्याच्या नावावर असलेला तो विक्रम काय होता, याचा आढावा घेणारा हा लेख…
लेफ्ट आर्म स्लो बॉलर आणि लेफ्ट हॅन्डेड बॅट्समन असलेल्या निलेश कुलकर्णी यांचा जन्म डोंबिवलीमध्ये ३ एप्रिल १९७३ रोजी झाला . स्थानिक क्रिकेटमध्ये निलेशची कामगिरी शानदार होती. सचिन तेंडुलकर कर्णधार असताना ज्या मुंबईकर खेळाडूंना भारतीय संघात घेण्यात आलं होतं त्यापैकी निलेश एक होते. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा निलेश पहिला भारतीय गोलंदाज आहे.
१९९७ मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्या चमूमध्ये निलेश कुलकर्णीचा समावेश होता. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान कुलकर्णीनं मारवन अटापट्टूला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. अशी कामगिरी करणारा तो त्यावेळी पहिला भारतीय आणि जगातील बारावा खेळाडू ठरला होता. मात्र, तो सामना श्रीलंकेच्या धमाकेदार फलंदाजीमुळं सर्वांच्या लक्षात राहिला. श्रीलंकेनं सहा खेळाडूंच्या बदल्यात ९५२ धावा करून डाव घोषित केला होता. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर कुलकर्णीनं ७० ओव्हर्स बॉलिंग केली मात्र, त्याला यश आलं नाही.
निलेश कुलकर्णी भारतासाठी फक्त दोन कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळला. मात्र, त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही.
हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २७ धावांच्या बदल्यात मिळवलेले ३ बळी ही त्याची एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आकडेवारी आहे. हा सामना पाकिस्ताननं जिंकला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या निलेशची स्थानिक क्रिकेटमधील कारकीर्द चांगली होती. मुंबईच्या संघाकडून खेळताना त्याला ३००पेक्षा जास्त विकेट्स मिळवलेल्या आहेत. आंध्रप्रदेशविरुद्ध खेळताना त्याने एका सामन्यात ६० धावांच्या बदल्यात ७ बळी घेतले होते. २००७ आणि २००८च्या हंगामात यूकेतील सरे चॅम्पियनशिपमध्ये देखील कुलकर्णी खेळला. ओल्ड हॅम्प्टोनियन्स क्रिकेट क्लबच्या संघासाठी त्याने ऑलराऊंडर म्हणून खेळ केला होता. २८ जुलै २०१० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
जेव्हा निलेश कुलकर्णीनं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. त्या घटनेनं कुलकर्णींच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो क्रीडा शिक्षणतज्ज्ञ झाले. यामागे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हे सर्वात मोठं कारण ठरलं. डीएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुलकर्णीने आपल्या नवीन भूमिकेबद्दल माहिती दिली. –
‘भविष्यातील कुठल्याही प्लॅनशिवाय मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मला आयपीएलचं थेट कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नव्हतं. त्यावेळी ललीत मोदी आयपीएलचे कमीशनर होते. त्यांनी आयपीएल व्यवस्थापन करण्यासाठी युकेमधील एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. युकेमधील कंपनीला १०० ते १५० तज्ज्ञांची आवश्यकता होती. आयपीएलसारखी स्पर्धा खेळवण्यासाठी आपल्या सव्वाशे कोटी लोकसंख्येमधून जर २०० लोकं मिळत नसतील तर ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट होती. भारतात स्पोर्ट्स एज्युकेशन नावाची गोष्टचं अस्तित्वात नव्हती. याबाबत मी आणि माझ्या पत्नीनं विचार केला आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन संस्था (आयआयएसएम) स्थापन करण्याचं ठरवलं.’
निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी निलेशला ध्येय मिळालं. त्यांने २०१०मध्ये आयआयएसएम लाँच केली. या संस्थेत अॅथलीट्सचं व्यवस्थापन, मैदानांचं क्युरेटिंग, क्रीडा गुणधर्मांचं व्यवस्थापन आणि निर्मिती, खेळांच्या मदतीनं पैसा उभा करणं आणि विविध क्रीडा स्पर्धांचं नियोजन करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आयआयएसएममधील क्रीडा व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडून मान्यता देखील मिळालेली आहे.
२०१० पासून ते २०२० पर्यंतच्या १० वर्षांच्या काळात आयआयएसएमनं अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे.
याचंच फळ म्हणून ऑगस्ट २०२० मध्ये निलेश कुलकर्णी आणि आयआयएसएमला क्रीडा व्यवस्थापनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
आयआयएसएमच्या जबाबदारीशिवाय त्याच्याकडे आणखी देखील महत्त्वाची कामे आहेत. नॅशनल स्पोर्ट्स एज्युकेशन बोर्ड कमिटीचा तो सदस्य आहे. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स युनिर्व्हसिटीचे सल्लागार म्हणूनही तो काम करतो.
निलेश कुलकर्णीला एक खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. मात्र, त्याने भारतात खेळ संस्कृती सर्वांगाने आणि चांगल्या पद्धतीनं रुजावी यासाठी निश्चित प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याच्यासारखा विचार प्रत्येक निवृत्त झालेल्या खेळाडूनं केला तर भविष्यात नक्कीच विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा राहिल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










