आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या भारतातील सगळे न्यूज चॅनेल, सोशल मीडिया आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी फक्त एकच नाव फिरत आहे ते म्हणजे नीरज चोप्रा! भारताच्या भालाफेकपटूनं अप्रतिम कामगिरी करत अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. २३ वर्षीय नीरजनं ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत झेक प्रजासत्ताकचे खेळाडू जेकूब वाडलेज्च आणि विटझस्लाव व्हेसेलीला मात दिली. सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारताचं पहिलं सुवर्णपदक आहे तर, २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर देशासाठी हे दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं आहे.
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरजनं इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, हे विसरून चालणार नाही.
‘ट्रॅक स्टार’ होण्यासाठी नीरजचा मोठा प्रवास केलेला आहे. पानिपतच्या खांद्रा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलानं टोकियोच्या मातीवर इतिहास घडवण्याची लहान असताना कधी कल्पनाही केली नव्हती.
१६ सदस्य असलेल्या एका अत्यंत साध्या कुटुंबातून नीरज आलेला आहे. लहान-सहान नोकरी आणि शेती उत्पन्नावर त्याच्या कुटुंबाची उपजिवीका चालते. अशी आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलाला योग्य प्रशिक्षण आणि सराव उपकरणांची अपेक्षा ठेवणंही कठिण होतं. मात्र, त्याचा निश्चय आणि मेहनतीच्या बळावर त्यानं सर्व अडचणींवर मात केली. त्याच्या कुटुंबानंही त्याला पाठिंबा देऊन त्याच्या स्वप्नांना बळ दिलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला शारीरिक कष्टाची काम करण्याचा प्रचंड तिटकारा होता. याचीच परिणिती म्हणजे, वयाच्या १२व्या वर्षी त्याचं वजन तब्बल ९० किलो होतं! जिममध्ये जाण्यासाठी आणि मूलभूत तंदुरुस्ती मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना त्याला अक्षरश: विनंती आणि आग्रह करावा लागला होता. त्यामुळं सुरुवातीला फक्त आपलं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी त्यानं खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवलं होतं. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आता हातात भाला घेऊन पळणारा ‘हॅन्डसम हंक’ होण्यासाठी त्याला किती घाम गाळावा लागला असेल.
शिवाजी स्टेडियममध्ये जबरदस्तीनं सकाळचा जॉगिंगसाठी जाणं त्याच्यासाठी फायद्याचं ठरलं. त्याच ठिकाणी त्याची आणि भालाफेकपटू जय चौधरीची भेट पहिली भेट झाली होती. जय त्याठिकाणी सराव करण्यासाठी जात असे. पहिल्या भेटीत जयनं नीरजला सहज एकदा भाला फेकून पाहण्यास सांगितलं होतं.
त्यावेळी कमालीचा जाड असलेल्या नीरजनं फेकलेला भाला पहिल्याचं प्रयत्नात ४० मीटरपर्यंत गेला होता. ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट होती. जयनं नीरजमधील गुण अचूक हेरला होता. त्याच्याचं सल्ल्यानं नीरजनं भालाफेक करण्यास सुरुवात केली. आज जो इतिहास घडला त्याची ती नांदी होती.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी कमालीचा फिटनेस लागतो. भालाफेकीची आवड निर्माण झाल्यानंतर नीरजनं अतिशय गांभीर्यानं आपली कसरत आणि सरावावर लक्ष केंद्रित केलं. अल्पावधीतचं त्यानं स्पर्धा गाजवण्यास सुरुवात केली. २०१६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजनं ८२.२३ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. तिथे त्यानं भारताच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर त्यानं पोलंडमधील बायडगोस्झ्झ येथे झालेल्या २०१६ आयएएएफ वर्ल्ड यु २० चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं. त्याठिकाणी या पठ्ठ्यानं कनिष्ठ वयोगटात जागतिक विक्रमही प्रस्थापित केला.
या स्पर्धेनं रातोरात त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. इतकी प्रभावी कामगिरी असूनही, तो २०१६ च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. मात्र, त्यानं धीर सोडला नाही. ८५.२३ मीटर थ्रोसह त्यानं २०१७च्या आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक सुवर्णपदक जिंकलं.
२०१८मध्ये त्यानं आपली पहिली राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धा खेळली. या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८६.४७ मीटरचा थ्रो केला होता. तो त्याचा हंगामातील सर्वोत्तम प्रयत्न होता. पदक जिंकून पदार्पणातच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव सामील झालं.
राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकमध्ये विजय मिळवणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू आहे. मे २०१८ मध्ये, त्यानं दोहा डायमंड लीगमध्ये ८७.४३ मीटर भाला फेकून पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला.
नीरज चोप्रा हा एकमेव ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे ज्याला एएफआयनं २०१८ च्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली होती. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पोर्तुगालच्या लिस्बन येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्यानं २०२१च्या हंगामाची शानदार सुरुवात केली होती. या स्पर्धेत त्यांन ८३.१८ मीटर अंतरावर भाला फेकला होता.
सध्याच्या घडीला नीरज चोप्रा स्टार आहे. मात्र, याठिकाणी पोहचण्यासाठी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रशिक्षण ही त्याची सर्वात मोठी अडचण होती. त्याला सध्या जर्मन बायो-मेकॅनिक्स तज्ज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ प्रशिक्षिण देत आहेत. यापूर्वी, गॅरी कॅल्वर्ट, वेर्नर डॅनियल्स आणि उवे होन यांच्याकडेही त्यानं भालाफेकचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स एक्सलन्स प्रोग्रामचा ‘लाभार्थी’ म्हणून त्यानं ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक गॅरी कॅल्वर्ट यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं होतं. अडचणींना न जुमानता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचलेला नीरज आपल्या यशाचं श्रेय गॅरी कॅल्वर्ट यांना देतो. आपण आतापर्यंत मिळवलेल्या यशामध्ये सर्व प्रशिक्षक, जेएसडब्ल्यूचं समर्थन आणि पालकांचा मोठा वाटा असल्याचं तो नम्रपणे सांगतो.
नीरज भारतीय अॅथलेटिक्सचा अग्रदूत झाला आहे. सर्किटवर सातत्यानं चांगली कामगिरी करून त्यानं आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. देशाच्या खात्यात आणखी एक ऑलिम्पिक सुवर्णपदक जोडून, आपण एक दुर्मिळ रत्न असल्याचं त्यानं सर्वांना दाखवून दिलं आहे.
१३ वर्षांपूर्वी अभिनव बिंद्रानं नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून कित्येक दिवसांचा दुष्काळ नाहीसा केला होता. आज नीरजनं सुवर्णपदक मिळवून पुन्हा एकदा भारतीयांना आनंद साजरा करण्यासाठी कारण दिलं. आपल्याला आयुष्यात नेमकं काय मिळवायचं आहे हे निश्चित करून प्रामाणिक कष्ट केले की, यश पायाशी लोळण घेतं, हेच नीरजकडे पाहून सिद्ध होतं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










