या सरकारी जाहिरातीमुळे चक्क शाकाहारी लोकसुद्धा अंडे खाऊ लागले

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातल्या विविध धर्म-संप्रदायानुसार खाण्याचेही काही नीतीनियम आहेत. भारतातील बऱ्याच संप्रदायात शाकाहारी जेवणाला फार महत्व दिले जाते. पण, फक्त शाकाहारी खाण्याने चौरस पोषक आहार घेतला जातो का, याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. अर्थात, भाजीपाला कडधान्ये, दही, दुध, ताक, लोणी, तूप अशा अनेक पदार्थांतून शरीराला आवश्यक पौष्टिक घटकांची पूर्तता होते. पण, हे इतके सारे पदार्थ एकाचवेळी आणि सातत्याने आहारात घेणे शक्य नाही.

भारतातील अनेक मध्यमवर्गीय लोक शाकाहाराचे समर्थन करत असतानाच आहारात पौष्टिक घटकांचा समावेश कसा करावा याबद्दलही बरेच प्रयोग करत असतात. अशा देशात टीव्ही चॅनेलवरून अंडी खाण्याची शिफारस करणे कितीसे सोयीचे ठरू शकेल?

पण, १९८०-९० च्या दशकात ‘अंडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ या पंचलाईनने टीव्हीवरून अंडे खाण्याची शिफारस केली. विशेष म्हणजे या जाहिरातीने शाकाहारी लोकांना देखील अंडे खाणे आरोग्यासाठी कसे फायद्याचे असते हे पटवून देण्यात यश मिळवले.

ही जाहिरात इतकी प्रभावी आणि लोकप्रिय ठरली होती की, भारतीयांची खाद्यसंस्कृतीच यामुळे बदलून गेली. या जाहिरातीमुळे भारतात अनेक शाकाहारी लोकांच्या घरीही अंडे हा पदार्थ रोजच्या आहारात सामावला गेला.

नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीसाठी बनवण्यात आलेल्या या जाहिरातीतून परंपरेपेक्षा आहारातील पौष्टीकतेला महत्व देण्याचा सल्ला देण्यात आला. अर्थातच असा काही सल्ला जाहिरातीच्या माध्यामातून देण्याची ही पहिलीच वेळ होती.

अनेक मध्यमवर्गीय शाकाहारी कुटुंबात या जाहिरातीच्या प्रभावाने लोकांनी आपल्या आहारात अंड्याचा समावेश अगदी बिनदिक्कत केला. किमान मुलांना तरी शारीरिक आणि बौद्धिक पोषण मिळावे म्हणून त्यांना दररोज अंडे खायला देण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून बऱ्याच शाकाहारी कुटुंबात अंड्याविषयी असलेली पारंपारिक मते बदलली.

या जाहिरातीची पंचलाईन होती, ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.’ भारतात मांसाहार कधी करावा कधी नको याचेही बरेच नियम आहेत. मांसाहार करणारे लोकही याबाबतचे नीतीनियम पाळतात. आता या पंचलाईनमध्ये म्हटल्याप्रमाणेच अनेक मांसाहारी लोक सोमवारी मांसाहार करत नाहीत. याशिवाय, गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी असे कितीतरी तिथी आणि वार आहेत. त्यादिवशी लोक मांसाहार टाळतात.

अमुक-अमुक दिवशी मांसाहार करू नये. याबाबत भारतातील प्रत्येक घरात त्यांची त्यांची एक नियमावली बनलेली असते. काही झाले तरी लोक या स्वतःहून बनवलेल्या नियमावलीला कधीच धक्का लागू देत नाहीत. परंतु या अशा समजुतींना धक्का देण्याचे काम या जाहिरातीने केले.

मुळात अंड्यामध्ये काही मांस नसते, त्यामुळे अंडे मांसाहारी आहे हा समजच त्यांनी गैर ठरवला.

अंडे मांसाहारी की शाकाहारी यावर अनेक वादविवाद आणि मतप्रवाह प्रचलित आहेत. त्यातील कोणत्या एक मतप्रवाहाची पुष्टी म्हणून नव्हे तर संपूर्ण पौष्टिक असलेल्या अंड्याच्या आहारात कटाक्षाने समावेश केला जावा. त्याविषयी असलेले समज गैरसमज दूर सारून हा घटक पोटात जाणे महत्वाचे हेच या जाहिरातीने पटवून दिले.

अंडे खाल्ल्याने मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ चांगली होते. डब्लूएचओने देखील अंडे हा एकमेव असा पदार्थ आहे ज्याला पौष्टिकतेच्या बाबतीत १०० गुण दिले आहेत.

याच काळात अनेक जण अंडे खाण्याविरोधात मोहिमा चालवत होते. पुण्यातील एका मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना अंडे खायला दिले म्हणून भारतीय शाकाहारी कॉंग्रेसने निषेध करणारी आंदोलने केली होती.

पेपरमधून अंडे खाण्यास उद्युक्त करणाऱ्या जाहिरातींचाही या काळात निषेध केला जात असे. परंतु अंड्याची अशी जाहिरात करून अंड्याविषयी बरेच गैरसमज असणाऱ्या शाकाहारींमध्येच त्यांना अंडी विकायची होती.

भारतात काही लोकांमध्ये असाही समज आहे की उन्हाळ्याच्या दिवसात अंडे खाल्ले नाही पाहिजे. कारण या दिवसात अंडे खाल्ल्यास त्याचे शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. मात्र आरोग्य तज्ञांनी या गोष्टी नाकारल्या आहेत.

अनेक जण आजही आठवड्यातील एखाद्या दिवशी अंडे खात नाहीत. तो दिवस त्यांच्यासाठी पवित्र असतो. अंडे खाण्याबाबत अशा ज्या काही समजुती होत्या त्यांना धक्का देण्याच्या विचारातूनच ही जाहिरात सुरु करण्यात आली होती.

अंडे खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे सांगणाऱ्या या जाहिरातीने किमान पालकांवर तरी प्रभाव पाडलाच. लहान मुलांच्या बौद्धिक वाढीबाबत पालक नेहमीच जागरूक असतात. वाढत्या वयात मुलांना अधिकाधिक पौष्टिक घटकांची गरज असते. म्हणून पालकांनी मुलांच्या आहारात अंड्याचा समावेश जरूर केला.

एनइसीसी ही पोल्ट्री उद्योजकांची संघटना आहे. बंडा वासुदेव राव हे या संघटनेचे अध्यक्ष होते. या लोकांना अंड्याचे महत्व पटवून देण्यासाठी अशाप्रकारची जाहिरात मोहीम राबवण्याची कल्पना त्यांचीच होती.

१९८०-८१ च्या दरम्यान पोल्ट्री उद्योगावर मोठे अरिष्ट कोसळले. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी अंड्याची मागणी वाढणे गरजेचे होते. म्हणूनच राव यांनी या जाहिरात मोहिमेच्या माध्यमातून पोल्ट्री उद्योगातील या संकटावर मात करण्याचा उपाय शोधून काढला.

या जाहिरातीमुळे बाजारातील अंड्यांची मागणी नक्कीच वाढली. शिवाय या कल्पक जाहिरातीला ऍडव्हर्टाइजिंग क्लब ऑफ बॉम्बे कॅम्पेनिंग ऑफ द इअर अवॉर्डही मिळाला. या जाहिरातीची ही पंचलाइन आनंद हळवे या ज्येष्ठ जाहिरातकारांनी लिहिली होती.

एखाद्या उत्पादनाची प्रभावी जाहिरात किती परिणामकारक ठरू शकते हेच या जाहिरातीतून दाखवून दिले. या जाहिरातीचे निर्माते कक्कर यांच्या मते, “भारतासारख्या देशात लोकांना मांसाहारी बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जाहिराती बनवणे या जाहिरात निर्मार्त्यासाठी सोपी गोष्ट नसते.”

या जाहिरातीमुळे लोकांना अंडे आहारात असणे किती म्हत्वाचे आहे हे पटले. अंडे म्हणजे मांस नाही हेही पटले. या जाहिरातीमुळे बाजारात अंड्यांची मागणी वाढली ज्यामुळे पोल्ट्री उद्योजकांना चांगला फायदा झाला.

या जाहिरातीमुळे भारतात आणखी एका असा विशिष्ट गट निर्माण झाला जो ना शाकाहारी होता ना मांसाहारी तो फक्त अंडाहारी (eggitarians) वर्ग होता.

या जाहिरातीत पहिल्यांदा दारा सिंग यांनी काम केले होते. दारा सिंग म्हणजे ८०च्या दशकात शक्ती आणि मजबुतीचे एक जिवंत उदाहरण होते. त्यांच्या नंतर सचिन तेंडुलकर, देवांग पटेल पासून ते सायना नेहवाल पर्यंत अनेक खेळाडू आणि कलाकारांनी या जाहिरातीसाठी काम केले आहे.

एनएइसीसीच्या प्रत्येक जाहिरातीत अंडी खाणारी हुशार आणि निरोगी मुले, सुखी आनंदी कुटुंब दाखवले जात असे. वर्तमानपत्रातील एका जाहिरातीत उत्तम चौरस आहार कोणता असा प्रश्न विचारून एनएइसीसीने जाहिरात केली होती.

रोज एक अंडे खाणे हा चौरस आहार होऊ शकतो का? असा प्रश्न तो प्रश्न होता. शिवाय, स्त्रियांना आपले मुख्य लक्ष्य बनवत या जाहिरातीतून अंड्याच्या वेगवेगळ्या चटपटीत रेसिपी सुद्धा दाखवण्यात आल्या. त्यासोबत अंड्यातील पौष्टिक घटकांचे वर्णनही असे.

ही जाहिरात म्हणजे आरोग्य जपण्यासाठी देण्यात येणारा सल्ला आहे असाच लोकांचा समज होता आणि आजही आहे. एक चांगली जाहिरात लोकांच्या मनावर प्रभाव पाडून त्यांच्या जीवनशैलीत कसा बदल घडवून आणू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!