आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कॅलिफ़ोर्नियामधील अश्रू ढाळणारी मदर मेरी असो की इस्त्रायलमधील आनंदी चेहर्याचा जिझस असो. जगभरात या घटना सतत घडत असतात आणि भाविक यानं भारावूनही जात असतात. मात्र कालांतरानं हे चमत्कार अंधश्रध्दांचे फ़ुसके बारच ठरतात. देव आहे की नाही? यावर चालणारा सर्वधर्मिय वाद अनंतकाळाचा आहे. मात्र देव आहे हे मानणारे कधी कधी त्याच्या अस्तित्वाचा असा काही दाखला देतात की खळबळ माजते. अशीच खळबळ काही वर्षांपूर्वी माजली होती जेंव्हा मुंबईतल्या एका चर्चामधील येशूच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते.
मुंबईतला विलेपार्ले परिसर. या भागातील एक चर्च साधारण दहा वर्षांपूर्वी चर्चेचा, बातम्यांचा आणि विवादाचा विषय बनलं होतं. याला निमित्तही झालं होतं तसंच खळबळजनक. ख्रिस्ती बाधवांच्या भावना दुखावणारं विधान सनल एडमार्क यांनी केलं आणि नंतर त्यांना जेलची हवाही खावी लागली.
तर ही घटना होती, विले पार्ल्यातील एका चर्चमधील येशूच्या डोळ्यातुन अश्रू वाहण्याची. म्हणता म्हणता वणव्यासारखी ही बातमी भाविकांत पसरली की येशूच्या डोळ्यातून अश्रू वहात आहेत आणि चर्चबाहेर भाविकांची रांग लागली. हे होली वॉटर समजून लोकांनी श्रध्देनं ते प्यायलाही सुरवात केली होती.
मागोमाग अशीही हवा झाली की हे पाणी प्यायल्यानं दुर्धर आजारातून मुक्ती मिळत आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी हा परिसर गजबजून गेला. ही बातमी जेंव्हा सनल यांच्या कानावर गेली तेंव्हा प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून मगच ती स्वीकारणाऱ्या अनेकांप्रमाणेच सनल यांचाही या अचानक ओघळू लागलेल्या अश्रुंवर विश्वास बसला नाही. त्यांनी ताबडतोब चर्चला भेट दिली.
चर्च परिसरात तोवर अश्रू वहाणार्या येशूच्या फ़ोटोंची जोरदार विक्री चालू झालेली होती. सनल यांनी केवळ चर्चला भेट दिली नाही तर आजूबाजूच्या परिसराचीही काळजीपूर्वक पहाणी केली. अनेक फ़ोटो आपल्या मोबाइलमधे बंदिस्त केले. तर्काच्या पटावर घटना मांडली आणि नंतर जे स्पष्टीकरण दिलं ते अर्थातच भाविकांच्या भावना दुखावणारं होतं.
सनल यांनी सांगितलं की कोणत्याही दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीतून आपोआप पाणी कधीही पाझरु शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अंधश्रध्देवर माझा तर कधीच विश्वास बसणारच नाही पण असा विश्वास ठेवून कोणी समाजात अंधश्रध्दा पसरवत असेल तर त्याला विरोधही करायलाच हवा. विरोध करायचा तर तर्काला पटणारं कारणही द्यायला हवं आणि सनल यांनी अश्रूंमागचं जे कारण शोधून काढलं त्यानं भाविक आणि चर्च दोघेही आधी हडबडले आणि मग संतापले.
या मूर्तीमागून जी ड्रेनेजची पाईप गेलेली होती ती तुंबल्यानं पाणी उलटं येत होतं आणि त्यामुळे मूर्तीवरून पाणी ठिबकू लागलं होतं. सनल यांनी फ़ोटोंच्या पुराव्यानिशी हे सिध्द केलं. मात्र जिथे धार्मिक भावना असतात तिथे अशा प्रकारच्या कोणत्याही तर्काचा कधीच उपयोग होत नाही.
सनल यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना विरोध झाला. येशूच्या नखातून पाणी पाझरण्यानं इतका भावनातिरेक झाला होता की लोक काही ऐकायलाच तयार नव्हते उलट त्यांनी सनल यांनाच जाब विचारला की कोणत्या अधिकारानं तुम्ही परिसराची पहाणी करत आहात?
मुंबई भेटीदरम्यान यासंदर्भात जेंव्हा ते एका वृत्तवाहिनीवर चर्चेसाठी गेले होते तेंव्हा मुंबई चर्चचे बिशपही ॲन्जेलिओ सनल यांचा मुद्दा खोडून काढू न शकल्यानं आणि उत्तर देऊ न शकल्यानं चर्चेतून मधूनच उठून निघून गेले.
मुलाखत संपल्यावर सनल यांच्या असं लक्षात आलं की ते आता स्टूडिओतून बाहेरच पडू शकणार नाहीत कारण स्टुडिओ बाहेर संतप्त जमाव लाठ्या काठ्या घेऊन तयारीत उभा होता.
चॅनल अधिकार्यांनी सांगितलं की बिशप चर्चेतून उठून गेल्यानंतर ही माणसांनी भरलेली व्हॅन स्टुडिओबाहेर आली होती. यातून उतरलेले व्यावसायिक गुंड असल्याचंही ओळखलं. भारतात घडणारे मॉब लिंचिंगचे प्रकार सनल यांना नवीन नव्हते. आता सनल यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि धोक्याची चाहूलही लागली. त्यांनी स्टूडिओ न सोडण्याचा निर्णय घेतला. वाहिनीप्रमुखांसोबत त्यांच्या खोलीतच त्यांनी रात्रीचं जेवण घेतलं आणि तिथेच काहीकाळ ते विश्रांतीसाठी थांबले. दरम्यान पोलिसांना संपर्क केला गेला होता मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
अखेर चार तास प्रतिक्षा केल्यानंतर त्यांनी स्टुडिओचं मागचं दार उघडण्याविषयी विनंती केली आणि समोरच्या प्रवेशद्वारातील ठगांना चकवून ते ताबडतोब दिल्लीला त्यांच्या घरी गेले. दुसर्या दिवशी त्यांना कळलं की ख्रिस्ती समाजाकडून त्यांच्या विरोधात साधारण २७ प्रकारचे गुन्हे विविध पोलिस स्टेशनमधे नोंदविण्यात आले होते.
इंडियन पिनल कोड सेक्शन २९५ अ अंतर्गत त्यांच्यावर जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सनल यांनी याला उत्तर देताना म्हटलं की, इतर नागरिकांप्रमाणेच मला भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या आणि मानवी अधिकारांतर्गत येणार्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. मात्र कॅथलिक चर्चनं याचा प्रतिवाद करताना म्हटलं की, सनल यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना एखाद्याच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचा काहीही अधिकार नाही. एखाद्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसर्याच्या भावना दुखावणारं असेल तर ते निषेधार्ह आहे.
यानंतर सनल यांचा अटकपूर्व जामीन फ़ेटाळून लावत जनक्षोभ लक्षात घेत आणि जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर करत सनल यांना अटक वॉरंट जारी करण्यात आलं. त्यानंतर जर सनल यांनी ख्रिस्ती बांधवांची जाहीर माफ़ी मागितली तर त्यांच्याविरोधात असणारी तक्रार मागे घेण्याचही तयारी दर्शविण्यात आली होती.
मात्र सनल यांनी त्यांच्या बंडखोर आणि तार्कीक स्वभावाला जागत ही मागणी तर फ़ेटाळून लावलीच वर खडसावून सांगितलं की, खरं तर माझे आभारच मानायला हवेत कारण सांडपाणी हॉली वॉटर म्हणून लोकांत वाटत असताना काही रोगराई पसरली असती, त्याला माझ्या शोधामुळे अटकाव बसला आहे.
या अटकेनंतर सनल यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सध्याचा ईश्वरी निंदा संबंधित कायदा हा ब्रिटीशांनी बनविलेला कायदा असल्यानं आता बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सध्याच्या भारतीय कायद्यात बदल करण्याची विनंती केली.
सनल यांच्यावर आलेली ही पहिलीच वेळ नव्हती कारण सनल सातत्यानं ख्रिस्ती समाजातील चमत्कार आणि अंधश्रध्दांविरोधात शास्त्रीय कारणं देत जागृती करत होते. काही कडवे आणि कट्टर लोक यानं नाराज होतेच, त्यांना हे निमित्त मिळालं. सनल यांच्या या येशूच्या अश्रूंच्या सत्यतेमागच्या खुलाशानं भारतीय घटनेनं दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इंडियन पिनल कोडमधील धार्मिक भावना संदर्भातील कायदा यात घमासान चर्चा झाली.
दरम्यान ना कोर्टात केस उभी राहिली ना पुढे काही घटना घडल्या मात्र धमकी सत्र चालूच राहिलं. साधारणपणे तीन महिने भूमिगत राहिल्यानंतर सुरक्षेची बाब लक्षात घेत सनल यांनी पोलिस कमिशनर, दिल्ली आणि गुहमंत्रालयाला कल्पना देत सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला आणि ते फ़िनलॅण्डला गेले. त्यानंतर युरोपमधून हे यु*ध्द चालूच राहिलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










