आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काही दिवसांपूर्वी पूर्व रशियात असलेल्या एका द्वीपकल्पात २८ प्रवासी घेऊन जाणारं रशियन विमान बेपत्ता झालं. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ‘AN-26’ असं नाव असलेल्या या विमानानं Petropavlovsk-Kamchatskya पासून पलानासाठी उड्डाण घेतलं होतं. रशियाच्या सुदूर भागात आगमन झाल्यापासून हे विमान कुणाच्याही संपर्कात नाही. विमानात २२ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर असल्याची माहिती रशियानं दिली आहे. विमान अचानक बेपत्ता होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विमान बेपत्ता झाल्याचं समजताच तत्काळ शोध मोहिम हाती घेण्यात आली.
अद्याप शोधपथकांच्या हाती काहीही लागलेलं नाही. काहींनी हे विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, विमान असं अचानक बेपत्ता झाल्यानं जगभरात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, यापूर्वी देखील विमानं बेपत्ता होण्याच्या काही घटना घडल्या आहेत आणि त्यातील काही विमानांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही.
विमानं बेपत्ता होण्याच्या रहस्यमयी घटनांमध्ये पाकिस्तानच्या PK-404चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. १९८९मध्ये बेपत्ता झालेल्या पाकिस्तानच्या या विमानाबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. ३३ वर्षांपूर्वी हे विमान कसं बेपत्ता झालं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तो ऑगस्ट महिन्यातील दिवस होता. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशाचं वातावरण अल्हाददायी आणि आकाश निरभ्र होतं. फ्लाइट पीके-४०४ या विमानात प्रवासी आपापल्या सीटवर स्थिरस्थावर झाले. क्रू मेंबर इस्लामाबादला उड्डाण घेण्यासाठी तयार होते. यातील अनेक प्रवासी उत्तर पाकिस्तानमधून निसर्गरम्य सहलीचा आनंद लुटून घरी परतत होते तर, काही त्यांच्या प्रियजनांना भेटण्याच्या तयारीत होते. मात्र, आपला हा विमानप्रवास शेवटाला जाणार आहे की नाही, याचा त्यापैकी कुणी कदाचित विचारही केला नसेल.
सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी विमानानं ५४ प्रवाशांसह उड्डाण केलं. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ९ मिनिटांत विमान कधीही न सापडण्यासाठी अचानक नाहीसं झालं.
२५ ऑगस्ट १९८९ यादिवशी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान बेपत्ता झालं होतं. १९६२ मध्ये तयार केलेलं हे विमान ‘फॉकर एफ २७-२०० फ्रेंडशिप टर्बोप्रॉप’ प्रकारात मोडत होतं. बेपत्ता होईपर्यंत विमानानं सुमारे ४४ हजार ५२५ तासांचा प्रवास पूर्ण केलेला होता. बेपत्ता विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आजही आपल्या लोकांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत.
‘विमानाचं काय झालं हे शोधण्यात पाकिस्तान सरकारला आजपर्यंत यश आलं नाही. काही दिवस शोध घेऊन त्यांनी शोधमोहिम थांबवली. कदाचित ते विसरूनही गेले असतील मात्र, आम्ही विसरू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया आरिफ हुसेन यांनी दिली. या घटनेत आरिफ यांनी आपले काका, काकू, पत्नी आणि दोन मुलं गमावली आहेत.
गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांपैकी एक असलेल्या हिमालयाचा हा भाग आहे. या डोंगराळ भागामध्येच गिलगिट शहर वसलेलं आहे असून या ठिकाणी एक लहानसं विमानतळ आहे. चोहोबाजूंनी डोंगर असल्यानं तसंही या ठिकाणाहून विमानउड्डाण करण धोकादायक समजलं जातं.
ज्यादिवशी पीके-४०४ बेपत्ता झालं त्यादिवशी गिलगिटचं हवामान एकदम ठीक होतं मात्र, हवाईमार्गावरील वातावरण खराब असल्याचं सांगितलं जातं. विमानानं सकाळी नियोजित वेळेत उड्डाण घेतलं होतं.
७ वाजून ४० मिनीटांनी विमानानं रूटीन रेडिओ कॉल करून उड्डाण यशस्वी झाल्याचं विमानतळावरील कंट्रोल रूमला सांगितलं होतं. विमानाशी झालेला तो शेवटाचा संपर्क होता.
अनेकांचा असा विश्वास आहे की, हे विमान उत्तरेकडच्या डोंगराळ भागात कोसळलं असावं. मात्र, असं झालं असतं तर इतक्या वर्षांत विमानाचे अवशेष नक्कीच सापडले असते. २५ ऑगस्टच्या शुक्रवारी विमान बेपत्ता झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम हाती घेण्यात आली. पाकिस्तानी हवाईदलानं आपल्या एका विमानासह काही जवान शोध मोहिमेसाठी पाठवले. त्यांनी हिमालयाचा कोपरान्-कोपरा शोधला मात्र, विमानाचा मागमूस लागला नाही.
पाकिस्तानी नागरी विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच भारतीय वायुसेनेनं देखील आपल्या हद्दीमध्ये विमानाचा शोध घेतला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नांना यश आलं नाही. अगदी ‘नंगा परबत’च्या प्रदेशातही विमानाचा शोध घेण्यात आला परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पाकिस्तानी विमान बेपत्ता होण्याच्या या घटनेची तुलना एअर इंडियाच्या १०१ या भारतीय विमान दुर्घटनेशी देखील केली गेली. १९६६ साली फ्रान्सच्या माऊंट ब्लाँकमध्ये भारताचं विमान कोसळलं होतं. हे विमान सापडण्यास तब्बल २९ वर्षांचा कालवधी लागला होता.
काही वर्षांपूर्वी, २२ जुलै २०१६ रोजी, भारतीय वायुसेनेचं एन -32 ट्विन इंजिन टर्बोप्रॉप ट्रान्सपोर्ट विमान बंगाल उपसागरावर उड्डाण करताना गायब झाल आहे. हे विमान बंगाल उपसागराच्या पश्चिम किनारपट्टीवरील चेन्नई शहरातील तांबाराम एअरफोर्स स्टेशनवरून अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअरकडं जात होतं. विमानात २९ लोक होते. चेन्नईच्या पूर्वेला २८० किलोमीटर अंतरावर असताना सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला होता.
विमान बेपत्ता झाल्यानंतर वायुसेनेनं शोधमोहीम राबवली होती. ती आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी शोधमोहीम होती. मात्र, या विमानाचा किंवा त्यातील लोकांचा शोध लागला नाही. भारतीय वायुसेनंचं विमान आणि पीके-४०४ हे विमान बेपत्ता होण्याच्या घटना काहीशा सारख्या वाटतात. कारण ना विमानांचा तपास लागला ना त्यातील लोकांचा.
अचानक बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी विमानाबाबत अनेक अफवा पसरलेल्या आहेत. काही पाकिस्तानी नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मते, विमानानं चुकून पाकिस्तान आणि भारताला विभाजित करणारी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली आणि भारतीय सैन्यानं हे विमान पाडलं. जागतिक पातळीवरील टीका टाळण्यासाठी आणि संभाव्य भारत-पाक यु*द्ध टाळण्यासाठी भारतानं ही गोष्ट अतिशय गुप्त ठेवली. विमान जर पाकिस्तानी हद्दीत कुठेही कोसळलं असतं तर, इतक्या दिवसात त्याचे अवशेष नक्कीच सापडले असते. त्या विमानाचं नेमकं काय झालं? हा प्रश्न ३३ वर्षांनंतरही कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










