आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मायक्रोसॉफ्ट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर बिल गेट्सचे नाव उभे राहते. पण, मायक्रोसॉफ्टला उभं करण्यात बिल गेट्स इतकेच योगदान पॉल ॲलनने दिले होते. आज आपण ज्या मायक्रोसॉफ्टला हाताळतो आहोत ते पॉल ॲलनशिवाय शक्य झालंच नसतं.
गेट्स आणि ॲलन यांनी एकत्रितपणे काम केले नसते तर मायक्रोसॉफ्ट एवढा मोठा ब्रँड म्हणून अस्तित्वात आला नसता. परंतु काळाच्या ओघात त्यांची मैत्री तुटली ती कायमचीच!
ॲलन आणि गेट्स यांची भेट सियाटल शहरातील एका शाळेत झाली होती. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खरंतर अभ्यास हा त्यांच्यासाठी कायमच दुय्यम विषय असायचा, ते दोघेही आपल्या स्वप्नांच्या जगातच रममाण असायचे. या दोघांना अभ्यास करायला आवडत नसला तरी दोघे कॉम्प्युटरबाबत खूप चर्चा करायचे, दोघांना कॉम्प्युटर हातळण्यात मोठा रस होता. यामुळेच कदाचित दोघांचीही मैत्री घट्ट होत गेली. पुढे बिल गेट्स हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेले तर ॲलन वॉशिंग्टन विद्यापीठात गेले. ॲलन एकीकडे प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण घेत होते तर बिल गेट्स वयाच्या तेराव्या वर्षांपासून स्वतःचा बिझनेस उभारण्याचा विचारात होते.
दोघांचीही आवड कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असल्याने त्यावर आधारित उद्योग उभा करायची तयारी सुरु केली.
दोघांनीही त्यावर्षी कॉलेज सोडले आणि आपल्या व्यवसायाची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली.
ॲलन त्याकाळी बेसिक कॉम्प्युटर लँग्वेजवर काम करत होते. ज्यावेळी या लँग्वेजचे पहिल्यांदा प्रेझेंटेशन द्यायचे होते त्यावेळी दोन्ही मित्र रात्रभर काम करत एकत्र बसले होते. ॲलन काम करत असताना बिल गेट्स रात्रभर जागून त्यांना मदत करत होते. त्यांनी जो आविष्कार त्या रात्री केला होता त्याने पुढे भविष्यात मोठे क्रांतिकारक बदल घडवले होते.
ॲलन आणि गेट्स दोघांकडे पण कल्पनांची कमतरता नव्हती. जेव्हा गेट्स ॲलन यांना एखाद्या आयडियाची विचारणा करत त्यावेळी ॲलन त्यांना दहा नव्या आयडिया सांगायचे. गेट्स एक परफेक्ट सेल्समन होते, त्यांना मार्केटिंग आणि फायनान्सचे प्रचंड ज्ञान होते.
आपल्या पहिल्या कमर्शियल प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांनी एका नवीन कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला त्यांनी मायक्रोसॉफ्ट ॲ असे नाव दिले. १९७५ ज्यावेळी ही कंपनी सुरु करण्यात आली त्यावेळी गेट्स आणि पॉल ॲलन हे दोनच लोक त्यावेळी कंपनीत कामाला होते, पुढे कंपनी झाली तशी त्यांच्या कंपनीतील कर्मचारी वर्गाची संख्या देखील वाढायला लागली.
पॉल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे की गेट्स हा एक सौदेबाज व व्यवहारी मनुष्य आहे. पॉल म्हणतात की कंपनीची स्थापना करण्यात आली त्यावेळी गेट्सने स्वतःजवळ कंपनीचे ६० टक्के समभाग ठेवले तर पॉल ॲलन यांच्या वाट्याला फक्त ४० टक्के समभाग आले. सुरुवातीच्या काळापासूनच गेट्स यांना असे वाटायचे की कंपनीचा डोलारा ते सांभाळतायत, त्यामुळे त्यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात आपला हात नेहमी मजबूत ठेवला.
पुढे कंपनी नफा कमवू लागल्यावर बिल गेट्स यांनी ६५ % टक्के नफा स्वतःच्या खिशात घालायला सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या ॲलन यांचे बिल गेट्स यांच्याशी सतत वाद होऊ लागले आणि दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.
पुढे ८० च्या दशकाच्या सुरुवातील स्टीव्ह बामर यांना मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी बसवण्यात आले आणि बामर यांच्या वाट्याला पाच टक्के कंपनीचे शेयर देण्याचे ठरले असताना बिल गेट्स यांनी त्यांना ८.७५ टक्के शेयर देऊ केले. ॲलन यांच्याशी चर्चा न करता गेट्सने हा निर्णय घेतला म्हणून ॲलन नाराज झाले, दोघांमधील दरी यानंतर अधिकच वाढत गेली.
सुरूवातीच्या काळात कंपनीशी निगडित लहान लहान गोष्टींवर एकमेकांशी चर्चा करणारे, एकत्र बसून संशोधन करणारे हे दोन्ही मित्र नंतर मात्र फारच दुरावले.
बामर यांच्या एंट्रीनंतर पॉल ॲलन आणि बिल गेट्स यांच्यात जास्तच वाद होऊ लागले. १९८३ साली पॉल ॲलन यांना कॅन्सर असल्याची पुष्टी झाली. मग ते कामांत लक्ष देत नसत, अशा कठीण प्रसंगी मित्राची साथ देण्याऐवजी बिल गेट्स मात्र व्यवसायात पॉल यांचे काहीच योगदान नसल्याची बतावणी करू लागले.
१९७५ साली ज्यावेळी कंपनी सुरु करण्यात आली होती, त्यावेळी पॉल यांच्या संशोधनामुळे कंपनीचा विकास होत गेला. त्यांच्या मॉंडर्न इनोव्हेशनने कॉप्म्युटरच्या जगात एक अभूतपूर्व क्रांती आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. पॉल आणि बिल गेट्स यांच्या सुपीक मेंदूमुळे कंपनीचा विकास झाला होता. पण १९८२ साली स्टीव्ह बामर आले आणि पॉलची कंपनीमधील पत ढासळत गेली. शेवटी पॉल हे एकटेच उरले. २००० सालापर्यंत पॉल यांचे मायक्रोसॉफ्टमधील अस्तित्व संपुष्टात आले होते. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सल्लागारपदाचा देखील राजीनामा दिला होता.
भविष्यात दोन्ही मित्र फार क्वचितच एकमेकांना भेटायचे. भेटले तरी हाय हॅलोच्या पुढे दोघातील संवाद सरकायचा नाही.
२०११ मध्ये ॲलन यांनी आपले आत्मचरित्र प्रकाशित केले, ज्यामुळे या दोन्ही मित्रांमधील संबंध अधिकच ताणले गेले. दोघांनाही एकमेकांशी साधी चर्चा करायला वेळ मिळत नव्हती.
पॉल यांना आशा होती की बिल गेट्स आणि त्यांची मैत्री पुन्हा आधीसारखी होऊ शकते. ते सदैव त्या मैत्रीला पुन्हा जुन्या धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करत राहिले पण त्यांना यश आले नाही. ते पुन्हा कधीच एकत्र येऊ शकले नाही.
मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यानंतर पॉल ॲलन यांनी त्यांच्याकडील सर्व शेयर्स विकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे त्यावेळी मायक्रोसॉफ्टचे शंभर मिलियन शेयर्स होते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. अमेरिकेतील रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉल या खेळातील काही टीम्स त्यांनी विकत घेतल्या होत्या. पॉल ॲलन यांनी आयुष्यभर विवाह केला नाही.
पॉल ॲलन म्हणायचे की बिझनेस अवश्य करा पण आपल्या आयुष्याला देखील तितकेच महत्त्व द्या, कारण जान है तो जहां है !
बिल गेट्स यांनी पॉल ॲलन हयात असताना कधी त्यांची आठवण काढली नाही, पण पॉल ॲलन यांना मात्र आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र काम करण्याची आशा शेवटपर्यंत होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










