एकेकाळी गुलामांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं ‘मातेरा’ आता युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून गौरवलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरातील विविध प्रसिद्ध स्थळांची आपण नावे ऐकतो, वाचतो. ज्या लोकांना फिरण्याची हौस असते ते लोक पैसे वाचवून विविध ठिकाणच्या स्थळांना भेटी देणे आणि ती स्थळे पाहणे पसंत करतात. सर्वसाधारणपणे आपण जी ठिकाणे पाहतो त्याची काही ना काही ख्याती तयार झालेली असते. ती ऐकून आपण अशा स्थळांना भेटी देण्यासाठी जातो. उदा. भारतात मथुरा, काशी, तिरुपती इत्यादी देवस्थाने तीर्थक्षेत्रे म्हणून पुराण कालापासून प्रसिद्धीस आहेत.

केरळ, नैनिताल त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जगभरात आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्ट्या प्रगत स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असतेच.

परंतु आज आपण अशा एका ऐतिहासिक प्रसिद्ध स्थळाविषयी माहिती पाहणार आहोत जे स्थळ गेल्या शेकडो वर्षापासून अत्यंत दुर्लक्षित राहिलेले होते. ज्या देशात हे स्थळ आहे त्या देशासाठी याचे नाव घेणे देखील एके काळी शरमेची बाब मानली जाई म्हणून त्यांनी या शहराचे नाव देखील तेच ठेवले होते. “द सिटी ऑफ शेम”!

आम्ही बोलत आहोत इटली देशातील “मातेरा” नावाच्या शहराबद्दल. एखाद्या शहराचे भाग्य कसे पालटू शकते याचे हे शहर उत्तम उदाहरण आहे. ज्या शहराने गेली अनेक वर्षे फक्त निंदा ऐकली होती, जे शहर त्याच्या देशासाठी एक कलंक बनून राहिले होते ते शहर आज युनेस्कोने एक जागतिक ठेवा म्हणून घोषित केलेले शहर आहे.

मातेरा हे दक्षिण इटलीमधील एक शहर आहे. हे शहर गुहांचे गाव म्हणून ओळखले जाते. म्हणजे इथे राहणारी माणसे ही अक्षरश: गुहेमध्ये राहात होती.

संपूर्ण शहर हे चुनखडीच्या खडकापासून बनलेल्या डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या अनेक गुहा येथे होत्या. ख्रिस्तपूर्व अनेक शतकापासून येथील लोक अशा नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या गुहांमधूनच वसाहती करून राहात होती.

मातेरा शहराचा इतिहास खरे पाहता ८००० वर्षे इतका जुना आहे. इतिहास संशोधकाच्या म्हणण्यानुसार इथली लोकवस्ती जगातील अत्यंत जुन्या लोकवस्तींपैकी एक मानली जाते. अगदी बायबलच्या जुन्या करारामध्ये देखील मातेराचा उल्लेख सापडतो असे म्हणतात.

आजचे आधुनिक मातेरा हे शहर ख्रिस्तपूर्व २५० वर्षापूर्वी रोमन सम्राट लुशियसने बांधले होते. गुहा खोदून त्यातून चर्च, राहण्याच्या वस्त्या आणि इतर शिल्पे त्यावेळी तयार केली गेली होती. रोमन काळापासून अनेक युद्धांचा सामना या शहराला करावा लागला त्यामुळे या शहरावर पडझडीच्या अनेक खुणा आढळतात.

अगदी प्राचीन काळापासून येथे लोक नैसर्गिक रित्या तयार झालेल्या गुहेतून वस्ती करून राहत होते. काळ बदलला तसा इथले लोक मात्र बदलले नाहीत. पहाडी प्रदेश, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि आधुनिकतेचा अभाव त्यामुळे हळूहळू इथले वातावरण बिघडू लागले. १९व्या शतकात तर मातेरा शहर म्हणजे इटलीची झोपडपट्टी म्हणून ओळखले जात होते.

आत्यंतिक गरीबी, राहण्याच्या सुविधेचा अभाव आणि रोगराई इथ प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. इटलीमध्ये दीर्घकाळ माफिया राज्य होते. त्यामुळे सगळा पाहायला गेला तर अनागोंदीचा कारभार होवून बसलेला होता.

देशाच्या विकासाकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना फारसा वेळ मिळत नव्हता. त्यात पुन्हा भूकंपामुळे सुद्धा येथल्या नैसर्गिक भागाची भरपूर हानी झाली.

या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सरकारने नंतर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केली. त्यांना दुसऱ्या ठिकाणी आधुनिक घरांत राहण्यासाठी पाठवले गेले. इथल्या गुहा हळूहळू रिकाम्या करण्यात आल्या. जे लोक जायला तयार नव्हते त्यांना नुकसानभरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

शेवटी मातेरामधून मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे विस्थापन झाल्यावर रिकाम्या झालेल्या शहराचे पर्यटन क्षेत्र करावे यासाठी विचार विनिमय सुरु झाले, इन्व्हेस्टर्स पुढे आले. शेवटी इथल्या जागेचा विकास आराखडा सरकारकडून निश्चित करण्यात आला.

२००४ साली मेल गिब्सन निर्मित पॅशन ऑफ ख्राईस्ट नावाचा इंग्लिश मुव्ही आला हा मुव्ही ख्रिस्ताच्या जीवनातील शेवटच्या काही तासांवर आधारित होता. या मुव्हीचे सगळे शुटींग हे मातेरामध्ये झाले होते. पॅशन ऑफ ख्राईस्ट त्या वर्षीचा बिग हिट मुव्ही ठरला आणि मातेरा हे नाव एकदम प्रकाशझोतात आले.

मातेराला टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून एक नवी ओळख मिळाली. रिकाम्या झालेल्या गुहांचे काय करायचे हा सरकारसमोर जो प्रश्न होता तो सुटला. रिकाम्या झालेल्या गुहेमध्ये हॉटेल, म्युझियम, रेस्टो बार, कॅफे सुरु झाले आणि हे ठिकाण खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.

आज मातेरा युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारशामध्ये येते. आज पर्यटनास्थळ म्हणून या जागेचा मोठा विकास झाला आहे. इथे हॉलीवूडच्या मुव्हीजचे शुटींगसुद्धा होत राहते. अगदी प्राचीन काळातील जीवन जर अनुभवायचे असेल, गुहेमध्ये राहण्याचा अनुभव घायचा असेल तर मातेरा हे उत्तम ठिकाण आहे.

आज मातेरा मधील एका हॉटेलमध्ये एका रात्रीचा राहण्याचा दर हा सहज ९ ते १० हजाराच्या घरात जातो. ज्या ठिकाणी एके काळी दिव्यांची सोय नव्हती तो संपूर्ण भाग आज लाईट्सने उजळून गेलेला आहे.

रोमन पूर्व काळातील स्वत:चे वैभवशाली रूप मातेराने पुन्हा धारण केलेले आहे. जे शहर कधी काळी सिटी ऑफ शेम म्हणून ओळखले जात होते ते शहर आज सिटी ऑफ प्राईड झालेले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!