आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी परदेशी मुलींशी लग्न करण्याचे विनोद तुम्ही ऐकले ही असतील. परंतु परदेशी मुलीसाठी देशाचे नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीय राजाबद्दल तुम्ही ऐकलंय का?
आज आपण याच राजाबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतातील पहिली इंग्रजी भाषिक पत्नी म्हणून मान मिळवलेल्या त्याच्या पत्नीची आणि या राजाची प्रेम कहाणी आज आपण पाहणार आहोत.
तर, या राजाचे नाव आहे – मार्तंड भैरव तोंडाईमन. मद्रास प्रांतातील पदूकोट्टाई राज्याचा राजा असलेला मार्तंड भैरव तोंडाईमन एका ऑस्ट्रेलियन मुलीच्या प्रेमात पडला होता. या प्रेमासाठी त्याने आपला देश सोडायलाही मागेपुढे बघितले नाही.
१८७५ साली जन्म झालेल्या मार्तंडला ११ वर्षांचा असतानाच राजगादी मिळाली. लहान असल्यामुळे सगळा कारभार त्यावेळी दिवाणजी सांभाळत होते. राजाला पश्चिमेतील रितीरिवाज अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आले होते. भारतीय असला तरी राजाला सगळे आधुनिक रीतिरिवाज शिकवले गेले होते.
पुढे १८९४ साली मार्तंडने सगळे अधिकार आपल्याकडे घेतले. दिवाणाच्या हाती असलेला कारभार त्याने स्वत: बघण्यास सुरुवात केली. १९११ साली वेस्टमिन्सटरमध्ये तो पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेक कार्यक्रमाससुद्धा उपस्थित होता.
मोठा झाल्यानंतर १९१५ साली त्याला ऑस्ट्रेलियाला राहण्याची संधी मिळाली. एका हॉटेलमध्ये राहत असताना तिथे त्याची ओळख मॉली फिन्क नावाच्या ऑस्ट्रेलियन मुलीशी झाली. मॉली त्यावेळी एका पार्टीत आली होती. मॉली स्वत: एक अतिशय हुशार आणि सुंदर महिला होती. ५ महिने एकत्र राहिल्यानंतर त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली.
आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी राजाचा साखरपुडा एका अमेरिकन महिलेशी आधीच झाला होता. मॉलीवर असलेल्या प्रेमापोटी त्याने तो साखरपुडा मोडला. एवढेच काय पण मॉली त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान आहे हासुद्धा विचार त्याने केला नाही.
मॉलीच्या आईला देखील मार्तंड पसंद होता. १० ऑगस्ट १९१५ रोजी त्यानी मेलबर्न येथील रजिस्ट्रार कार्यालयात लग्न कले. अमेरिकेत हनिमून साजरा करुन ऑक्टोबर १९१५ साली ते पदूकोट्टाईला परत आले.
तेथील जनतेने आपली सफेद राणी म्हणून तिचे उत्साहाने स्वागत केले. त्यांनी पुन्हा सगळ्या भारतीय प्रथा पार पाडल्या. इंग्रजांनी या कार्यक्रमाची पत्रिका छापण्यास परवानगी दिली नाही. दोघे ५ महिने भारतात राहिले.
दुर्दैवाने काही कारणास्तव इंग्रजांना मात्र हे लग्न काही पटले नाही. इंग्रज सरकारने मॉलीला वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर गरोदर असताना तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेला.
या छळाला कंटाळून मॉलीने आत्मह*त्या करण्याचा प्रयत्न केला होता. उटीमध्ये मॉलीकरिता एक राजवाडा घेण्याचा मार्तंडचा प्रयत्नसुध्दा इंग्रजांनी हाणून पाडला.
पुढच्या वर्षी सरकारच्या त्रासाला कंटाळून राजाने भारत सोडण्याचा निर्णय घेतला. मेलबर्नला जाऊन त्यांनी आपले कुटुंब बसवण्याचा निर्णय घेतला. १९१६ साली त्यांना मुलगा झाला. १९१९ साली ते सर्व इंग्लंडला गेले आणि राजा जॉर्ज पाचवा याला भेटले.
त्याच वेळी भारताच्या मुख्य सचिवाने त्यांना एक बातमी दिली. त्यांच्या मुलाला त्यांची राजाची गादी मिळणार नाही असा तो संदेश होता. आपल्या मुलाला पदूकोट्टाईचा राजा होता येणार नाही हे कळले तेव्हा त्याने आपल्या राजपदाचा त्याग केला. आपली गादी त्याने आपला भाऊ राजगोपाल तोंडाईमन याला दिली आणि फ्रांसमध्ये राहण्यास गेला.
१९२० साली मार्तंडने फ्रांसमधील कांस शहरात राहण्यास सुरुवात केली. तिथल्या समाजात राजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. राजाजवळ असलेल्या अमाप धनसंपत्तीमुळे तेथील पार्ट्यांमध्ये त्याला विशेष आमंत्रण दिले जात असे. आपल्या राज्यातून राजाला भरपूर पेंशनसुद्धा भेटत असे. फ्रांसमधील मोठ मोठे लोक राजाच्या ओळखीचे झाले होते.
१९२८ साली राजाचे पॅरिसमध्ये निधन झाले. त्याचे अंत्यसंस्कार भारतात करण्यात यावेत अशी मॉलीची इच्छा होती. इंग्रजांनी तिची विनंती नाकारली. अशा वेळी मॉलीने लंडनमध्ये त्याच्यावर हिंदू धर्मपद्धतीने अंत्यसंस्कार केले. आजही लंडनमध्ये राजाचे स्मारक उभे आहे.
राजाच्या मृत्यूनंतर मॉलीला दारुचे व्यसन लागले. तिची आर्थिक परिस्थिती घसरतच गेली. पुढे ७३ वर्षीय मॉलीचा १९६७ मध्ये मृत्यू झाला.
इंग्रजांनी लग्न यशस्वी न होऊ देण्याचे अनेक प्रयत्न केले. यामुळे तोंडाईमन कुटुंबाला सतत स्थलांतर करावे लागले. असे असूनही मार्तंड आणि मॉली यांचा संसार बाकीच्या तत्कालीन भारतीय राजांपेक्षा कित्येक पटींनी चांगला होता असे म्हटले जाते.
प्रेमात भाषा, रंग याला काहीच किंमत नसते हे खरं करुन दाखवणारी ही जोडी प्रेमाच्या खऱ्या व्याख्येच्या परीक्षेत अगदी हसत खेळत उत्तीर्ण झाली एवढं मात्र खरं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








