आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या इतिहासात अनेक क्रू*र शासकांचे संदर्भ मिळतात. त्यातीलच एक नाव म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. पद्मावत चित्रपटाच्या निमित्ताने अल्लाउद्दीनबाबत तर तुम्ही खूप काही वाचले आणि पाहिलेही असेल. अलाउद्दीन म्हटल्यावर दोन नावे चटकन डोळ्यासमोर येतात एक राणी पद्मावती, जिने जोहार केला आणि दुसरा मलिक कफुर, जो अल्लाउद्दिनचा प्रेमी म्हणून चर्चेत राहिला. मलिक कफुर आणि खिलजी यांच्या संबंधाबाबतचे गूढ आजही कायम आहे.
मलिक कफुर हा अल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम होता. पण, आपल्या बुद्धिमत्ता आणि पराक्रमाच्या जोरावर त्याने सेनानायक पदापर्यंत मजल मारली. असं असलं तरीही मलिक कफुर आणि अलाउद्दीन खिलजी यांच्या प्रेमसंबंधाचीही खूप चर्चा होते. मलिक कफुरचा हा वादग्रस्त आणि तितकाच रोचक इतिहास जाणून घेण्यासारखा आहे, त्यासाठीच हा लेखन प्रपंच!
१२९७ साली अलाउद्दीन खिलजीने गुजरातवर चढाई केली. गुजरातचा राजा कर्ण सिंह अलाउद्दीनच्या भीतीने शेजारी राज्यात लपून बसला. अलाउद्दीनच्या सैन्याने त्याची राणी कमला देवीला पकडून अलाउद्दीन खिलजीसमोर आणले. खिलजीने राणी कमला देवीशी लग्न करून तिला आपल्या जनानखान्यात भरती केले. याच दरम्यान गुजराती सैन्याने मलिक माणिक नावाच्या एका सुंदर युवकालाही बंदी बनवले होते.
खिलजीने या मलिक माणिकला एक हजार दिनार देऊन विकत घेतले आणि त्याला आपले गुलाम बनवले. मलिक माणिक हिंदू होता, पण अलाउद्दीनने त्याला विकत घेतल्यानंतर त्याचे धर्मांतर केले आणि त्याला मलिक कफुर असे नाव दिले.
एक हजार दिनारी देऊन विकत घेतलेला हा गुलाम लवकरच अलाउद्दीनचा खास माणूस बनला. गुलाम म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर दिन-दुबळी व्यक्ती येते. पण, त्याकाळी गुलामाचा अर्थ असा नव्हता. त्याकाळातील गुलामाचा अर्थ होता बादशहाचा प्रत्येक आदेश तळहातावर झेलणारा इमानी सेवक आणि असा इमानी सेवक बनून दाखवण्यात मलिक कफुरने कुठलीच कसर सोडली नाही.
कफुरचे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि बहाद्दुरीने अलाउद्दीनवर चांगलीच जादू केली होती. खिलजीने मलिक कफुरला आपल्या साम्राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद दिले. कफुर आणि खिलजी यांच्यात प्रेमसंबंध होते अशीही चर्चा व्हायची. बादशहाचा लेखनिक असलेला इतिहासकार जीयाद्दिन बरनी याने कफुर आणि खिलजी यांचे संबध अधिक दृढ आणि जवळचे होते असे लिहिले असले तरी त्यांच्यातील शारीरिक संबंधाचा मात्र कुठेही उल्लेख केलेला नाही. कफुर तृतीयपंथी होता हा दावा आजचे अनेक इतिहास अभ्यासकही मान्य करतात.
एका तृतीयपंथीय व्यक्तीला सुलतानने इतके महत्त्व देणे अनेक सरदारांना रुचत नव्हते. पण याच तृतीयपंथीयाने ते करून दाखवले जे भल्या भल्या बहाद्दूर सरदारांना जमले नाही.
पंजाबवर ह*ल्ला करणाऱ्या मंगोलांना धडा शिकवण्याची जबाबदारी खिलजीने कफुरवर सोपवली. कफुरने मंगोलांना सळो की पळो करून सोडले. दक्षिणेतील देवगिरीचा राजा राजा रामचंद्र यादव अलाउद्दीनला सनद पाठवत नव्हता. मलिक कफुरने देवगिरीवर ह*ल्ला करून त्याचे राज्य लुटले आणि ती सगळी लुट सुलतानाकडे सुपूर्द केली.
वारंगळ हे त्याकाळचे एक बलाढ्य राज्य. या राज्यावर ह*ल्ला करून मलिकने येथेही मोठी लुट केली. कफुरला याच राज्यातील खजिन्यात कोहिनूर हिरा सापडला होता असे म्हणतात. याच कालखंडापासून भारतीय इतिहासात कोहिनूर हिऱ्याचा उल्लेख आढळतो.
राजा वल्लालदेवच्या होसल्या राज्यावरही ह*ल्ला करून त्याने इथेही प्रचंड लुटालूट केली. मदुराईच्या पांड्य वंशीय राजांनाही मलिकने जेरीस आणले. कफुरने मदुराईच्या मीनाक्षी मंदिरावर ह*ल्ला करून ते मंदिर लुटण्याचा घाट घातला होता पण, पांड्य राजांनी मोठ्या चतुराईने आणि धीराने कफुरला थोपवून धरले. पराभवाची लक्षणे दिसताच कफुरने पांड्य राजांशी तहाची बोलणी सुरु केली आणि त्यांच्याकडून मोठी भरपाई वसूल केली. या तहाने पांड्य राजांना मोठी आर्थिक आणि लष्करी हानी सोसावी लागली. यामुळे त्यांचे राज्य कमकुवत बनले.
या तहात कफुरने मिळवलेली संपत्ती दिल्लीला नेण्यासाठी वीस हजार घोडे आणि सहाशे बारा हत्ती लागले होते. यावरून त्याने किती मोठी लुट केली असेल याची कल्पना येते. दक्षिणेकडे मलिक कफुरने मिळवलेल्या या यशामुळे खिलजीचा कफुरवरील विश्वास आणखी वृद्धिंगत झाला.
अलाउद्दीनने मलिकला आपल्या राज्याची सगळी माहिती दिली होती. त्याला मलिक नायबपदी नियुक्त केले. या शेवटच्या काळात अलाउद्दीन खिलजीने आपल्या राज्याचे आणि सैन्याचे सारे नियंत्रण त्याच्या हाती सोपवले होते. असे म्हटले जाते कफुरसारखा कपटी माणूस भारतीय इतिहासात शोधूनही सापडणार नाही. ज्या खिलजीने त्याला इतके मोठे पद दिले, इतका विश्वास दाखवला त्याच खिलजीला संपवण्यासही त्याने मागे पुढे पाहिले नाही.
मलिकने खिलजीला संपवण्यासाठी त्याच्यावर विषप्रयोग केला आणि मलिकच्या या विषप्रयोगामुळेच खिलजीची तब्येत खालावत गेली. तरीही खिलजीला फक्त मलिकवरच विश्वास होता. त्याच्या शेवटच्या क्षणीही त्याचा सेवक म्हणून मलिक कफुरच त्याच्यासोबत होता. अलाउद्दीनच्या मृत्युनंतर मलिक कफुरने अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरु केले. त्याने अलाउद्दीनच्या कुटुंबियांची धरपकड सुरू केली. अलाउद्दीनच्या सर्व कुटुंबियांना बंदी बनवून ठेवले. या कामात जो कोणी त्याच्या आडवा येईल त्याला संपवून टाकले.
खिलजीच्या सर्व मुलांना पकडून त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा दिली. खिलजीच्या इमानदार सरदारांची ह*त्या करण्याचे आदेश दिले. खिलजीच्या तीन वर्षाच्या मुलाला गादीवर बसवून तो स्वतः दिल्लीचा सुलतान झाला.
कफुरने पस्तीस दिवसांत रक्ताचे पाट वाहिले. खिलजीचा मुलगा शादी खांला त्याने सारीच्या किल्ल्यात कैद केले होते. खिलजीचा तिसरा मुलगा मुबारक खिलजी कसाबसा कफुरच्या तावडीतून निसटला. मुबारकला मारण्यासाठी कफुरने जे सैनिक पाठवले होते ते मुबारकला सामील झाले. मुबारकने याच सैनिकांना हाताशी धरून कफुरचा काटा काढण्याचा कट रचला.
रात्रीच्या वेळी कफुर आपल्या महालात निश्चिंत होऊन निद्राधीन झाला असताना याच सैनिकांनी त्याचे शीर धडावेगळे केले आणि एका कारस्थानी नाटकाचा अंत झाला. फक्त एक महिन्याच्या काळासाठी सुलतान झालेला कफुर इतिहासजमा झाला होता.
एक गुलाम ते बादशहा असा प्रवास करणाऱ्या मलिक कफुरचा हा प्रवास रंजक असला तरी, कपटाचा आधार घेऊन उभे केलेले साम्राज्य जास्त काळ टिकत नाही, हे सत्य अधोरेखित करणारा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










