आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सन १९६२ – चीनने भारतावर अचानक आक्र*मण करून भारताच्या शांतीप्रिय नीतीचे धिंडवडे काढले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तसेच “हिंदी-चीन, भाई भाई” या नाऱ्यानंतर हा विश्वासघात, भारतासाठी एक देश आणि एक सभ्यता म्हणून फार मोठा धक्का होता.
या यु*द्धामध्ये भारताला हार पत्करावी लागली होती. पण या यु*द्धामुळेच भारताने आपल्या चुकांचा मागोवा घेऊन भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाचा पाया रोवला.

या यु*द्धामुळे अनेक वीर यो*द्ध्यांचे नाव इतिहासामध्ये अमर झाले. असेच एक नाव आहे ‘मेजर शैतानसिंग भाटी’. मेजर शैतानसिंग आपल्या १३व्या कुमाऊं बटालियनच्या अहिर कंपनीच्या १२० सैनिकांसोबत पूर्व चुशुलच्या ‘रेजांग ला’ येथे तैनात होते.
रेजांग ला हा लडाखमधील चुशुल सेक्टरमधील प्रदेश. समुद्रसपाटीपासून याची उंची तब्बल ५००० मीटर (१६००० फूट) आहे. बर्फाळ प्रदेश, अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी, सोबत अपुरा दारुगोळा आणि एकबारी बंदुका. (या दुसऱ्या महायु*द्धानंतर कालबाह्य करण्यात आलेल्या आणि एका वेळी एकच गोळी झाडता येईल अशा बंदूका होत्या)
अशा अत्यंत प्रतिकूल परीस्थितीमध्ये मेजर शैतानसिंग आपल्या १२० वीर यो*द्ध्यांसोबत संपूर्ण तयारीनिशी चालून आलेल्या चिनी सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी उभे ठाकले होते.
१८ नोव्हेंबर, १९६२ – पहाटेच्या सुमारास भारतीय सेनेला ‘रेजांग ला’ चौकीजवळ हालचाल जाणवली. याठिकाणी चिनी सैनिकांनी याक प्राण्याच्या गळ्यामध्ये पेटते कंदील लटकवून त्यांना भारतीय सीमेजवळ सोडून दिले होते. उद्देश हाच की कंदिलाचा प्रकाश बघून भारतीय सैन्य बेछूट गोळीबार करेल आणि त्यांचा तुटपुंजा दारुगोळा अजूनच कमी होईल.
चिनी सैन्याची चाल ओळखून मेजर शैतानसिंगने अधिक मदतीसाठी वायरलेसवरून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. परंतु इतक्या कमी वेळेत मदत पाठवणे अशक्य असल्याचे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेजर शैतानसिंग आणि त्यांच्या तुकडीला माघार घेऊन आपले प्राण वाचवण्यास सांगितले.
मेजर शैतानसिंग यांना माघार घेणे अर्थातच मान्य नव्हते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि सांगितले की जर एखाद्याला माघार घ्यायची असेल तर तो माघार घेऊ शकतो. अतिशय दुर्दम्य इच्छाशक्तीच्या त्या सैनिकांनी आपल्या प्रमुखाच्या निर्णयाला पाठींबा दिला आणि अत्यंत आक्र*मकतेने चिनी सैन्याचा ह*ल्ला परतवून लावण्याची तयारी सुरु केली.

चीनने केलेल्या ह*ल्ल्याला प्रखर प्रत्युत्तर देण्यात आले. चीनच्या तब्बल १०००-१२०० सैनिकांना यमसदनी धाडण्यात आले. परंतु चिनी सैन्याच्या तुकड्या एकामागून एक आक्र*मण करत राहिल्या. मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या शिलेदारांनी याठिकाणी पराक्रमाची शर्थ करत चिनी आक्र*मण थोपवून धरले होते परंतु या धुमश्चक्रीमध्ये अनेक भारतीय सैनिक वीरगतीस प्राप्त झाले.
स्वतः मेजर शैतानसिंग जबरदस्त जखमी झाले होते. दोन सैनिकांनी जखमी मेजर शैतानसिंग यांना एका मोठ्या बर्फाळ खडकामागे नेले. तेथे वैद्यकीय मदत उपलब्ध नव्हती. त्यासाठी बर्फाच्छादित डोंगरावरून खाली यावे लागणार होते.
सैनिकांनी मेजरना वैद्यकीय मदत घेण्यासाठी सांगितले पण त्यांनी सपशेल नकार दिला. त्यांचे दोन्ही हात निकामी झालेले होते. त्यांनी सैनिकांना मशीनगन आणण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की बंदुकीच्या ट्रिगरला आणि माझ्या पायाला दोर बांधा. त्यांनी दोर बांधून शत्रूवर गोळीबार सुरू केला. ही कृती बघून भारतीय सैनिकांचे मनोबल वाढले पण अफाट शत्रू संख्येपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
१२० पैकी ११४ सैनिकांना वीरमरण आले. ६ सैनिकांना यु*द्धकैदी म्हणून पकडण्यात आले होते परंतु ते स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी झाले.
२१ नोव्हेंबरला चीनने यु*द्ध थांबवत असल्याची घोषणा केली. यु*द्ध थांबल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर मेजर शैतानसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह बर्फाने गोठलेल्या अवस्थेत सापडले. मेजर शैतानसिंग यांचा मृतदेह पायाला आणि बंदुकीच्या ट्रिगरला दोर बांधलेल्या अवस्थेत होता. भारतीय सैनिकांची बोटे रायफलच्या ट्रिगरवर होती. अनेक सैनिकांच्या हातात ग्रे*नेड्स होते.
वैद्यकीय मदत करणाऱ्या सैनिकांच्या हातात सिरींज आणि बँडेजेस होती. तब्बल १०००-१२०० चिनी सैनिकांचे मृतदेह ही थोड्याच अंतरावर सापडले.

या यु*द्धात चीनने भारताचा पराभव केला होता हे खरे, परंतु त्यांचे सर्वाधिक नुकसान ‘रेजांग ला’मध्येच झाले होते. हीच एक चौकी होती की जिथून चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरू शकले नव्हते.
आज भारताच्या ताब्यात लडाखमधील हा प्रांत आहे याचे संपूर्ण श्रेय या शूर नरवीरांना जाते. त्यांनी चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले होते.
भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल टी. एन. रैना म्हणतात, “जगाच्या लष्करी इतिहासाच्या सुवर्णपानांत असे उदाहरण क्वचितच आढळेल की, जेव्हा एखादी तुकडी शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत लढली. ‘रेझांग ला’ची लढाई हे निश्चितपणे याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.”
आपल्या असामान्य साहस आणि कर्तृत्वाबद्दल मेजर शैतानसिंग यांना १९६३ मध्ये परमवीर चक्र हा देशाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय सेनेने या यु*द्धानंतर अहिर कंपनीच्या सैनिकांच्या स्मरणार्थ लडाखमध्ये स्मारक उभारले आहे, शिवाय या तुकडीतील अनेक सैनिक हरियाणाच्या रेवारी जिल्ह्यातील असल्याने त्याठिकाणी देखील एक स्मारक उभारण्यात आले आहे. ही स्मारके एकच संदेश देतात, “स्वातंत्र्य फुकट मिळत नाही, त्याची किंमत म्हणजे सैनिकांचे प्राण..”

“त्यांच्यासाठी ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण जगतोय..”
शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या मेजर शैतानसिंग आणि त्यांच्या १२० शूर सैनिकांनी रेजांग ला येथे दिलेला हा लढा UNESCO ने “8 Stories of Collective Bravery” मध्ये समाविष्ट केला आहे. परमवीर चक्र विजेता मेजर शैतान सिंह भाटी आणि सर्व वीर जवानांना टीम पोस्टमनतर्फे मानाचा मुजरा. आम्ही सर्व भारतीय तुमचे कायम ऋणी राहू.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








