जाणून घ्या, अक्षय कुमारचा वादग्रस्त “लक्ष्मी” कसा आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


टिपिकल दाक्षिणात्य सिनेमा ही एक चौकट आहे. हवेत उडणारी गुंड, कपटी खलनायक, स्मार्ट हिरो, हिरोवर प्रेम करणं सोडून इतर काहीच काम नसलेली सुंदर हिरोईन, आयुष्यात काहीच काम नसलेलं मेलोड्रमॅटीक कुटुंब आणि स्वतःशीच बडबड करणारं एक मूर्ख विनोदी पात्र, फ्लॅशबॅक आणि या सगळ्यांना जोडणारी भयंकर ट्विस्टने भरलेली उत्तम कथा. ही चौकट अडथळा न बनता एका मनोरंजक थिएट्रीकल अनुभवाला पुरेशीच ठरते, म्हणून फक्त मज्जा म्हणून दाक्षिणात्य सिनेमांचे फॅन्स वाढतच आहेत. ते एवढे वाढले की, आता बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेते त्या सिनेमांचे रीमेक बनवत आहेत. अशाच एका रिमेकचा- “लक्ष्मी”चा हा रिव्ह्यू.

अक्षय कुमार अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या विरोधात लढणाऱ्या आसिफचं पात्र साकारत असतो. त्याची बायको (कियारा आडवाणी) त्याला सासरी नेते आणि तिथे त्याला भूतबाधा होते.

हो! तुम्ही बरोबर वाचलंत! अंधश्रद्धेचा विरोध करण्याच्या सीन्समधून सुरू झालेला सिनेमा भूतबाधेने संपतो. मूळ दाक्षिणात्य सिनेमात हा समाज प्रबोधनाचं नाटकी दबाव नव्हता पण रिमेकमध्ये तो अतिरिक्त सिन टाकायचा निर्णय उगाच घेतलाय असं वाटतं.

ट्रेलरमुळे प्रेक्षकांना आतुरता होती आपल्या आवडत्या हिरोला पहिल्यांदाच तृतीयपंथी पात्रात बघण्याची! पण यासाठी आपल्याला सिनेमा बराच पुढे जाऊ द्यावा लागतो. सिनेमाच्या शेवटी असलेले काही सीन्स आणि त्यापूर्वी “व्हायरस-उल्लूमीनाटी” यांनी बनवलेलं रॅप-सॉंग याच कारणांसाठी प्रेक्षकांना मजा येते. गाण्याची प्रोडक्शन व्हॅल्यू एवढी जास्त आहे की त्याचा मूळ कथेत फार संबंध नसला तरी बघायला छान वाटतं.

सिनेमाची मूळ कथा “लक्ष्मी” या तृतीयपंथीच्या संघर्षगाथा आहे. परिवार आणि समाजाकडून स्वतःला झालेला त्रास दुसऱ्या कोणाला होऊ नये म्हणून तिने कष्टाने एक जागा विकत घेतलेली असते. त्या जागेवर झालेला अवैध कब्जा आणि त्यातुन वाढणारं वैर हे सगळं समजल्यानंतर कथेला गती येते. हा सिनेमा ‘गोलमाल अगेन’प्रमाणे हॉरर कॉमेडी प्रकारातला आहे.

यात सासू-सुनेचे जे पात्रं विनोदाची बाजू चांगली रंगवतील असं वाटतं पण कथा पुढे जाते तशी निराशा पदरी पडते आणि हॉररची सगळी जबाबदारी अक्षय कुमारच्या पात्रावर असते. अक्षयने त्याच्या क्षमतेप्रमाणे ठीक ठाक काम केलंय पण पात्र लक्षात राहावं असं साकारायला लागणारी कसब त्यात नव्हती. स्वतः दिगदर्शक राघव लॉरेन्स याने मूळ सिनेमात हे पात्रं कित्येक पटीने छान साकारलं आहे. मूळ सिनेमा कंचना आणि कंचना 2 मध्ये त्याचं काम बघता इथेसुद्धा त्याने अभिनय करण्यास हरकत नव्हती. पण अक्षयच्या ब्रँडचा वापर आणि त्यामुळे वाढणारी प्रोडक्शन व्हॅल्यू यासाठी केलेला त्याची निवड केली हे लगेच लक्षात येतं.

पूर्वार्धात दोन गाणे टाकायचं काहीच प्रयोजन नसताना ते गाणे अचानक सुरू होतात. गेल्या काही वर्षात वास्तववादी सिनेमे जास्ती आलेत म्हणूनही कदाचित हे गाणे बघणं जड जातं, त्यात मोबाईलवर बघत असल्याने तर आपण ते सहज फॉरवर्ड करतो. ऍक्शन सीन्स अत्यंत अवास्तववादी असतील हे अपेक्षित होतं पण भूतांचे सीन्सही निराशच करतात.

हॉररमध्ये भुताची एन्ट्री, अंगात भूत येणं वगैरे गोष्टींमध्ये काहीच सरप्राईज नाहीये. अचानक उघडणारे दरवाजे, खिडक्या, वाऱ्याचा आवाज, हे ही सगळं एकदम टिपीकलच. भूत पळवायला जो बाबा येतो, तो आणि त्याचे कारनामे पण तसेच.

कथा माहीत नसली तरी पुढचा सिन काय असेल हे आपल्याला लगेच कळतं. कंचना आणि कंचना 2 यातून दिग्दर्शक राघव लॉरेन्सने अपेक्षित असणारा सामान्य भयपट जर बनवला असला तरी त्यात होणारं मनोरंजन तो सिनेमा बोरिंग होऊ देत नाही. इथं मात्र बारीक सारीक चुका नजरेआड केल्यातरी मनोरंजन होत नाही.

सिनेमा लक्षात राहील तर तो फक्त आणि फक्त शरद केळकरमुळे.

फ्लॅशबॅकच्या फक्त तीन-चार सीन्समधून शरद केळकरने त्याच्या दर्जेदार अभिनयाची अजून एक छाप सोडली आहे. त्याने तान्हाजी सिनेमात साकारलेले शिवाजी महाराज अजून आपण विसरलो नव्हतो तेवढ्यात हा तृतीयपंथी लक्ष्मीचा रोल करून त्याने अजून एक सरप्राईज दिलं आहे. त्याचा एखादा सिन प्रमोशनमध्ये दिसला असता तर सिनेमाला नक्कीच फायदा झाला असता. इतर पात्रं साकारणारे सगळे अभिनेते उत्तम आहेत पण त्यांच्या वाट्याला फार काही आलंच नाही.

एकंदर काय, फार तर लहान मुलांना आवडेल असा हा हलका हॉरर कॉमेडी सिनेमा!

तृतीयपंथीयांना आदर देण्याबाबत हा सिनेमा थोडं भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यातले मुद्दे बरोबर असले तरी अपेक्षित भावनिक परिणाम वाटत नाही. मुळात अस्ताव्यस्त केस, टाळ्या वाजवणारी, साडी अर्धी वर करून भांडायला उतावीळ असणारी तृतीयपंथी पात्रं ही आपल्या डोक्यातील संकुचित इमेज निर्मात्यांनी प्रबोधनाच्या नावाखाली आपल्यालाच विकली आहे.

तृतीयपंथी तुमच्या आमच्या सारखा सामान्य दिसणारा आणि सामान्य स्वभावाचाही असू शकतो असा विचार यात फारसा दिसत नाही. सामाजिक संदेश आणि हॉरर एकत्र करून चांगला परिणाम आणि दर्जेदार मनोरंजन देणारा एक सिनेमा याआधी बॉलिवूडमध्ये येऊन गेला पण त्याकडे फारस लक्ष दिलं गेलं नाही, तो म्हणजे अनुष्का शर्माचा “परी”. यानिमित्ताने का होईना तो सिनेमा नक्की बघा.

बाकी दिगदर्शक राघव लॉरेन्स (उर्फ डॉन सिनेमातला जाधव) याने अभिनय आणि दिग्दर्शन केलेले कंचना, कंचना 2 हे युट्युब बघायला आहेच, ते ही अजिबात मिस करू नये असे आहेत.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!