सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला निझाम आता दोन खोल्यांत आयुष्य काढतोय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात अनेक श्रीमंत संस्थानिक होऊन गेले. या संस्थानिकांकडे इतकी खाजगी संपत्ती होती, की याची चर्चा जगभर होत असे. अशाच संस्थानिकांपैकी एक हैद्राबादचे निजाम संस्थान. त्याकाळी हे निजाम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गणले जात असत.

१९४८ साली भारत सरकारने जेंव्हा पोलो ऑपरेशन अंतर्गत या संस्थानावर ताबा मिळवला तेंव्हा हे संस्थान देशातील सर्वात मोठे संस्थान होते. सर्व संस्थानांत अधिक शक्तिशाली आणि श्रीमंतही होते.

त्यावेळी या संस्थानावर सातवा निजाम उस्मान अली खान याची सत्ता होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या निजामाचे नाव घेतले जाई.

या निजामाकडे अमाप संपत्ती होती, असे म्हटले जाते. त्याच्या वैयक्तिक खजिन्यात किलोंनी हिरे होते आणि सोने तर टनात मोजले जात होते. त्याशिवाय कित्येक मूल्यवान वस्तूंची तर मोजदादही करता येणार नाही. 

सोबत भरपूर जमीन जुमला, महाल आणि रोख पैसे. या सातव्या निजामाचे निधन १९६७ मध्ये झाले. या निजामानंतर खरेतर त्याच्या सर्वात मोठ्या मुलाला निजाम पद मिळायला हवे होते. पण, कायद्याने आजम जाह या त्याच्या मोठ्या मुलाला निजामपद न देता आजम जाहच्या मोठ्या मुलाला थेट हे निजामपद देण्यात आले. याचे नाव होते मुकर्रम जाह.

मुकर्रम जाहचा जन्म फ्रांसमध्ये झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या मुकर्रमला मात्र हे वैभव टिकवून ठेवणे जमले नाही. मुकर्रम जाह यांची आई धुर्रशहवर सुल्तान हिचे नाव त्याकाळी जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये घेतले जात होते. आज मुकर्रम जाह भारत सोडून तुर्कीच्या एका २ बीएचके फ्लॅटमध्ये राहत आहे.

मुकर्रम याचे शिक्षण डून स्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण हॅरो लंडन आणि केंब्रीजमधून. पुढच्या शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. पुढे १९६७ साली सातव्या निजामाच्या निधनानंतर मुकर्रमला हैद्राबादचे निजाम बनवण्यात आले. 

परंतु मुकर्रमला हैद्राबादमध्ये राहायला आवडत नव्हते. उच्च राहणीमान, शानशौकीच्या, भोगविलासी आणि ऐषोआरामाच्या जीवनशैलीने त्याने सगळी इस्टेट हवेत फुंकून टाकली.

१९७०च्या दशकात त्याने भारत सोडून ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा ऑस्ट्रेलियामध्ये त्याने मोठी इस्टेट विकत घेतल्याच्या चर्चा सुरु होत्या. पर्थमध्ये त्याने घेतलेल्या बंगल्याचीही जागतिक प्रसारमाध्यमातून बरीच चर्चा झाली.

इथे त्याने इथे एक फार्महाउस देखील घेतले होते. ज्यात मेंढ्यांसाठी त्याने खूप मोठा गोठा बांधला होता.

ऑस्ट्रेलियात आपल्या पत्नीसोबत राहण्याची त्याची इच्छा होती. पण, त्याची पहिली पत्नी इजराने त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाला जाण्यास नकार दिला. एवढ्या कारणावरून त्याने पत्नीला घटस्फोट दिला. तिला भरपाई देण्यासाठीही त्याला खूप मोठी रक्कम मोजावी लागली.

यानंतरच त्याच्या खुश मिजास आणि ऐषआरामी आयुष्याला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलीयात तर त्याने किती संपत्ती उधळली असेल याचा हिशेबच नाही. त्याचे राहणीमान असे होते की कुणालाही हेवा वाटावा.

ऑस्ट्रेलियात असताना तो एका हवाई सुंदरीच्या प्रेमात पडला. सिमोंस नावाच्या या तरुणीने काही वर्षे आधी बीबीसीतही नोकरी केली होती. सिमोंसने या निजामशी लग्न केल्यानंतर मुस्लीम धर्म स्वीकारला. तिने आपले नावही बदलले. लग्नानंतर ती सिमोंसची आयशा झाली. या लग्नाचीही ऑस्ट्रेलियात बरीच चर्चा झाली.

काही दिवसातच आयशाच्या मृत्यूने पुन्हा खळबळ उडाली आणि मुकर्रमच्या वाट्याला पुन्हा एकाकीपण आले. त्याच्या चैनीसाठी त्याला सतत पैशाची गरज भासत असे. तेंव्हा तो हैदराबादमधील आपल्या संपत्तीची आणि महालाची देखभाल करणाऱ्या लोकांकडून पैसे मागून घेऊ लागला. त्याला इकडून किती पैसे पाठवण्यात आले याचाही कुणाजवळ हिशेब नाही. 

हळूहळू हैद्राबादच्या या महालातील किमती वस्तू गायब होऊ लागल्या. खजिन्यातील दागिने गायब होऊ लागले. एकवेळ तर अशी आली की, अख्खा खजिना मोकळा झाला. 

निजामाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढू लागला. तेंव्हा त्याने आपली हैद्राबादमधील संपत्ती हैद्राबादच्या सारादुद्दिन जवेरीच्या ताब्यात दिली आणि त्याला इस्टेट मॅनेजर बनवले. मग या इस्टेट मॅनेजरकडून तो पैसे घेऊ लागला.

जवेरी त्याला लागेल तसा पैसा पुरवत होता. पण नंतर मात्र त्याने आपली दिलेली रक्कम येनकेन प्रकारे वसूल करून घेतली. ही रक्कम वसूल करण्यासाठी त्याने निजामची ऑस्ट्रेलियातील सगळी प्रॉपर्टी विकून टाकली.

एवढेच नाहीतर, निजामने माझे पूर्णत: कर्ज फेडले नाही असं म्हणून त्याला कर्जबुडव्या जाहीर करूनही मोकळा झाला. त्याला अजूनही वाटते की निजामने आपली सगळी रक्कम परत दिलेली नाही. म्हणून, त्याने निजाम विरोधात कोर्टात दावा ठोकला आहे.

आर्थिक स्थिती इतकी खालावलेली असताना निजामने तुर्कीच्या एका मॉडेलशी तिसरे लग्न केले. या मॉडेलला मिस तुर्कीचा किताबही मिळाला होता. त्याची ही तिसरी पत्नी ओत्तोमान वंशाची राजकुमारी होती जिचे नाव मनोलीया ओनुर होते.

परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही. त्या दोघांचा पाचच वर्षानंतर घटस्फोट झाला. या घटस्फोटातही त्याला पोटगीपोटी मोठी रक्कम मोजावी लागली. 

तरीही यानंतर त्याने पुन्हा दोन लग्ने केली. या निजामाची एकूण पाच मुले आहेत.

सध्या गेली कित्येक वर्षे तो तुर्कीच्या एका फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. अगदी क्वचितच त्याचे हैद्राबादला येणे-जाणे होते. हैद्राबादमधील त्याची संपत्ती त्याची पहिली पत्नी इजराने ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःच्या ताब्यात घेतली आहे.

हैद्राबादमध्ये त्याची अजूनही जी उरलीसुरली संपत्ती आहे, ती पत्नी इजरामुळे सुरक्षित आहे. पण, ही संपत्ती ट्रस्टच्या ताब्यात असल्याने ही संपत्ती तो विकू शकत नाही. इजराने ही संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेतल्याने याची अवस्थाही सुधारत आहे आणि ही संपत्ती सध्या थोड्या बऱ्या स्थितीत आहे.

हैद्राबादमधील फलकनुमा पॅलेस तिने हॉटेल ताज ग्रुपला देऊन टाकला.

सातव्या निजामने फाळणीच्या वेळेस पाकिस्तानला काही रक्कम दिली होती. पण, नंतर त्याने आपले मन बदलले आणि पाकिस्तानला दिलेले पैसे परत मिळावेत म्हणून आंतरराष्ट्रीय कोर्टात दावा दाखल केला. त्या दाव्याचा निकाल आता निजामाच्या बाजूने लागला आहे.

१९४८ साली पाकिस्तानच्या बँकेत हैद्राबादच्या ७ व्या निजामाने ३० कोटी रुपये जमा केले होते. त्याची रक्कम वाढून आता ३०० कोटी झालेली आहे. 

परंतु ही सगळी रक्कमही एकट्या निजामाला मिळू शकत नाही. यातील काही रक्कम त्याला, काही त्याच्या इतर भावांना आणि काही रक्कम भारत सरकारच्या ताब्यात जाईल.

आयुष्यभर चैनीत आणि शानशौकीचे दिवस जगलेल्या निजामावर आयुष्याच्या संध्याकाळी मात्र अत्यंत वाईट वेळ आली आहे. त्याच्याजवळची संपत्ती तर गेलीच पण, याकाळात तो पूर्ण एकटा पडला आहे.

पाच लग्ने केली आणि पाच मुले असूनही सध्या मात्र त्याच्यासोबत कुणीही राहत नाही. वयोमानानुसार अनेक व्याधींनीही त्याला बेजार केले आहे. त्याची स्मरणशक्तीही साथ देत नाही. 

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या या निजामाला मात्र अखेरच्या क्षणी प्रचंड एकटेपणाला सामोरे जावं लागतं आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!