आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
विश्वभराच्या चित्रपटसृष्टीत ऑस्कर किंवा ज्याला अकॅडमी पुरस्कार असंही म्हटलं जातं त्याला मनाचं स्थान आहे. नुसतं ऑस्करसाठी नामांकन मिळणं हेही त्या क्षेत्रात सर्वोत्तमच्या जवळ केलेलं असं काम म्हणून गणलं जातं. आजवर चित्रपट क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विभागात कित्येकांनी ऑस्कर साठी नामांकनही मिळवलं आणि काही दिग्गजांनी ऑस्कर पुरस्कार स्वतःच्या खात्यात जमाही केला.
कित्येकांना एकदाच मिळालेला ऑस्कर हा त्यांना त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी घेऊन जातो, तेच त्यांचं सर्वोत्तम काम ठरतं. पण या क्षेत्रात अशीही काही व्यक्तिमत्त्व होऊन गेली किंवा आहेत ज्यांनी असं मोठं काम केलं की ज्यामुळे त्यांना एकाहून अधिक ऑस्कर पुरस्कार मिळाले ज्यातून आपण त्यांच्या कामगिरीचा अंदाज करू शकतो.
आपल्या कार्यकाळात तब्बल ४ ऑस्कर मिळवणारी अशीच एक अभिनेत्री होऊन गेली, जिचं नाव आहे कॅथरीन हेपबर्न.
कॅथरीन ही एक अमेरिकन अभिनेत्री होती. चित्रपट, टेलिव्हिजन या माध्यमांमध्ये अनेक बहुरंगी, बहुढंगी अशा अनेक भूमिका करून कॅथरीनने जवळपास ६० वर्षे मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. रोमँटिक कॉमेडी ते गंभीर स्त्री पात्र अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून कॅथरीन पुढे येत गेली आणि तिने तिचा ठसाही उमटवला.
१२ मे १९०७ साली जन्मलेली आपल्या आई-वडिलांच्या सहा अपत्यांमधली दुसऱ्या क्रमांकाची ही मुलगी. कॅथरीनची आई एक स्त्रीवादी कार्यकर्ती होती आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी तिने अमेरिकेत अनेक कामं केली. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत कॅथरीनने तिच्या आई ने ‘स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळावा’ यासाठी सुरू केलेल्या अभियानामध्ये अनेक प्रत्यक्षिकांमध्ये, अभियानांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन काम केलं होतं.
ही सहा भावंडं अत्यंत मुक्त वातावरणात मोठी झाली. सर्व गोष्टी जाणून घेण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे अनेक गोष्टींमध्ये कॅथरीन बरोबरच बाकी भावंडांचाही सहभाग असे. कुणाशीही कोणत्याही विषयावर मुक्तपणे बोलणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करण्याचं मुक्त स्वातंत्र्य या आईवडिलांनी दिलं. त्यामुळे साहजिकच समाजाच्या रोषाला त्यांना तोंड द्यावं लागलं.
अशा या मोकळ्या वातावरणात वाढल्यामुळे कॅथरीनला अनेक गोष्टींमध्ये सहभागी होता आलं आणि त्यातलं महत्वाचं क्षेत्र होतं ते म्हणजे अभिनयाचं क्षेत्र. बालपणापासूनच चित्रपट बघण्याची आवड आणि उत्साह तिला होता. कोणत्याही विषयावरचा असो पण दर शनिवारी रात्री चित्रपट बघणे हा तिचा साप्ताहिक क्रम होता. यातूनच निर्माण झाली ती अभिनयाची आवड.
‘५० सेंट’ च्या आपण तयार केलेल्या तिकिटावर शेजाऱ्यांना, नातेवाईकांसमोर एकपात्री, नाटक, असं सादरीकरण करून दाखवणं हा तिचा नित्याचा उद्योग आणि त्यातही सामाजिक बाजू अशी की यातून मिळालेले पैसे ती गरीब कल्याणासाठी देत असे.
कॅथरीन १५ वर्षांची होती त्यावेळी एक अशी घटना घडली जिचा तिच्यावर विपरीत परिणाम झाला. तिच्या मोठ्या भावाने, टॉमने आत्महत्या केली. तिने त्याचा मृतदेह बघितला ज्याचा तिच्या मनावर प्रचंड परिणाम झाला. गुंड प्रवृत्तीची असलेली कॅथरीन अचानक शांत झाली, एकटी एकटी राहू लागली.
तिचा या भावावर खूप जीव होता. त्यामुळेच की काय वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत, टॉमच्या जन्मदिनाची तारीख हीच स्वतःची म्हणून ती लावत असे. म्हणून तिचा खरा जन्मदिवस कुणालाच माहीत नव्हता. तिच्या ८४ व्या वर्षी, १९९१ साली तिने जेव्हा आत्मचरित्र लिहिलं तेव्हा तिची खरी कहाणी आणि तिचा खरा जन्मदिवस जगाला समजला.
कॉलेज काळातच कॅथरीन अभिनय कलेकडे आकर्षित झाली आणि तिथे बसवल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये आपण अभिनय करावा अशी इच्छाही तिने काही जणांना बोलून दाखवली. पण इथे प्रश्न वेगळाच होता, या कॉलेजमध्ये तुमची शैक्षणिक गुणवत्ता बघून, परीक्षेत चाले गुण असतील तरच महाविद्यालयीन नाटकांमध्ये सहभागी होता येत असे. आणि नेमकं या आधीच काही वर्षं भावाच्या मृत्यूमुळे शैक्षणिक गोष्टींमध्ये आणि वर्तनातही कॅथरीन मागे पडल्यामुळे यात जरा अडचण येऊ लागली.
पण बालपणापासूनच जिद्दी असल्यामुळे आणि त्यातही अभिनयाची आवड असल्यामुळे कॅथरीन कसून तयारीला लागली आणि तिने प्रयत्नपूर्वक आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आणि चांगले गुण मिळवू लागली.
त्याचा फायदा असा झाला की त्याच वर्षात तिला ‘वूमन इन द मुन’ या नाटकात मुख्य भूमिका करायला मिळाली आणि तिचं उत्तम झालेलं काम बघून सर्वांनी कौतुकही केलं. आणि इथेच तिने ठरवलं की आपल्याला रंगभूमीवर नाटकांमधूनच आपलं ‘करियर’ घडवायचं!
यानंतर कॉलेज संपवून काही बाल्टिमुर इथं जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेतल्या आणि तिला कामंही मिळाली. ‘झरीना’ या नाटकात कॅथरीनला एक छोटी भूमिका मिळाली पण छोटं मोठं न बघता तिने मनापासून काम केलं. यानंतर काही छोटी मोठी कामं करताना तिला एका नाटकात कामं करताना कर्कश्श आवाजामुळे तिच्यावर टीका झाली.
करियरच्या सुरवातीलाच असं होणं ठीक नाही याचा अंदाज तिला आला आणि खास त्यावर मेहनत घेण्यासाठी तिने बाल्टिमुर सोडलं आणि न्यूयॉर्कला जाऊन आवाज या विषयात काम करणाऱ्या व्यक्तीकडून व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या आवाजावर काम केलं.
आता चित्रपट, टेलिव्हिजन, नाटक अशा तिन्ही माध्यमांमधून तिला ‘ऑफर’ येऊ लागल्या आणि तिने तिच्या अभिनयाच्या बळावर प्रत्येक ठिकाणी शब्दशः चमकू लागली. द आफ्रिकन क्वीन, ब्रिंगिंग अप बेबी अश मोठ्या चित्रपटांमधून तिच्या करियरचा पूर्वार्ध सगळ्यांनाच आकर्षित करणारा ठरला.
अ वॉरिअर्स हजबंड या चित्रपटाने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. आणि या सुरवातीच्या काळातच करियरचं पहिलं शिखर तिने गाठलं. १९३२ ते १९३४ या दोन वर्षात तिने पाच चित्रपट केले आणि हे सर्व सुपरहिट झाले. यातल्याच तिसऱ्या ‘मॉर्निंग ग्लोरी’ या चित्रपटासाठी तिला पहिला ऑस्कर मिळाला. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ऑस्कर मिळणारी त्या काळातली कॅथरीन पहिली अभिनेत्री ठरली.
पहिला ऑस्कर मिळतो न मिळतो तोच आपोआप यशाच्या शिखरावरून तिचं खाली येणं सुरू झालं आणि त्याला कारण ठरलं तिच्यात निर्माण झालेला गर्विष्ठ स्वभाव. तिच्या या स्वभावाबद्दल चित्रपटसृष्टीत आणि इतरत्र चर्चा होऊ लागली आणि तिची कामं कमी झाली. याचा परिणाम झालाच आणि तिच्या पुढच्या चित्रपटाला लोकांनी येणंच नाकारलं.
एकेकाळी गर्दी करून कॅथरीनचे चित्रपट बघणारी मंडळी दूर जाऊ लागली. पुढच्या ५ वर्षात तिच्या दोनच चित्रपटांना यश मिळू शकलं. पण यातल्याच एका चित्रपटासाठी तिला दुसरं ऑस्कर नामांकन मिळालं. याचा अर्थच असा की तिचा अभिनय या त्याच दर्जाचा होता पण तिची वर्तणूक तिला प्रसिद्धीपासून दूर करत होती. त्याचा विपरीत परिणाम होत गेला. लागोपाठ अनेक चित्रपट ‘फ्लॉप’ दिल्यामुळे तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का बसला.
यातून तिने स्वतःला सवरायचं ठरवलं आणि पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘द फिलडेल्फिया स्टोरी’ हा १९३८ चा चित्रपट ने यशस्वी करून दाखवला आणि त्यासाठी तिला तिसरं ऑस्कर नामांकन मिळालं. पुढची जवळपास २० वर्षं तिने सलग उत्तमोत्तम चित्रपट केले आणि समाजात आपली प्रतिमा चांगली राहील याची खबरदारी घेतली.
या काळात तिच्या चित्रपटांना अनेक ऑस्कर नामांकनं मिळत गेली. ६० च्या दशकात ‘लॉंग डे जर्नी इंटू नाईट’ साठी नववं ऑस्कर नामांकन ती मिळवू शकली. आणि अखेर १९६७ साली तिच्या ‘गेस, व्हु आज कमिंग टू डिनर’ ला १०वं ऑस्कर नामांकन मिळालं आणि तिने यासोबत तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
विक्रम असा की पुढच्याच वर्षी तिने ‘लायन इन दि विंटर’ हा चित्रपट केला त्यासाठी ११ व्या ऑस्कर नामकनासह तिने आपला तिसरा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
एकापाठोपाठ एक असे दोन ऑस्कर मिळवल्यानंतर तिने पुढचा बराच मोठा काळ टेलिव्हिजन हे माध्यम निवडलं आणि त्यातही तिने आपलं काम दाखवून दिलं. पण हे करता करता एखादं दुसरे चित्रपटही ती करत होतीच. पण त्यातही कॅथरीनने स्वतःचा दर्जा अशाप्रकारे राखला होता की त्या वेळी चित्रपटांमध्ये कमी काम करणाऱ्या कॅथरीनने टेलिव्हिजनच्या कामातून जरा आराम घेऊन १९८१ साली केलेल्या ‘रूस्टर कॉगबर्न’ या चित्रपटासाठी १२ वं ऑस्कर नामांकन आणि तिचा ४था ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही संख्या आजही चित्रपटांच्या इतिहास लिहून ठेवली गेली आहे.
यानंतरही तिने काही छोट्या छोट्या चित्रपटांमधून कामं केली, नाटकांमध्ये काम केलं, टेलिव्हिजनवर थोडा वावर ठेवला. वयाची ८० ओलांडली तरीही कॅथरीनने काम थांबबलं नव्हतं. ८४ व्या वर्षी तिने आत्मचरित्र लिहिलं.
८७ व्या वर्षी कॅथरीन ने १९९४ साली आपला शेवटचा चित्रपट केला. नव्वदी पार केल्यावर मात्र तिने सामाजिक जीवनातून अंग काढून घेतलं आणि ती एकटी राहू लागली. वयाच्या ९४ व्या वर्षी कॅथरीनचं निधन झालं.
९४ वर्षांच्या जीवनात ६० वर्षांची चित्रपट कारकीर्द, त्यात १२ ऑस्कर नामांकनं आणि ४ ऑस्कर पुरस्कार मिळवून चित्रपटाबरोबरच जगाच्या इतिहासातही कॅथरीन हेपबर्न हिने आपलं नाव नोंदवून ठेवलं आणि अजूनही चित्रपटसृष्टी तिचा आदर्श ठेऊन आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.