आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगातील सर्वात जुने नियोजनबद्ध शहर म्हणून मोहेंजोदडोची ओळख आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये उत्खननात या शहराचे अवशेष मिळून आले होते. १९०२ ते १९२८ दरम्यान भारताच्या पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक राहिलेल्या जॉन मार्शल यांनी हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन महत्त्वाच्या शहरांचे उत्खनन केले होते.
मोहेंजोदडोच्या उत्खननावेळी जॉन मार्शल यांच्या पथकामध्ये एका मराठी माणसानेही मोलाची कामगिरी बजावली होती. ते होते, राव बहादुर काशीनाथ नारायण दीक्षित. दीक्षित यांच्या सन्मानार्थ मोहेंजोदडोच्या डीके भागातील अवशेषांना त्यांचं नाव देण्यात आलं आहे. मात्र, ही तर केवळ भारतीय पुरातत्व विभागातील दीक्षित यांच्या योगदानाची सुरुवात होती.
काशीनाथ नारायण दीक्षित, म्हणजेच के. एन. दीक्षित हे भारतीय पुरातत्व विभागातील मोठं नाव. १८८९ साली महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तेव्हा हा भाग मुंबई प्रांतात येत होता. सांगलीमध्ये आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. पदवी घेतली. विद्यापीठातील अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले.
यानंतर १९१२ मध्ये त्यांनी पुरातत्व विभागात प्रवेश घेतला. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात ही मुंबई आणि लखनऊ संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून झाली. क्युरेटर म्हणजे, संग्रहालयातील मौल्यवान आणि पुरातन गोष्टींची देखभाल करणारा. यासोबतच, या वस्तूंचे एक्झिबिशन कसे असावे, संग्रहालयात कोणत्या गोष्टी असाव्यात या गोष्टीही क्युरेटर पाहतो. हे काम करणाऱ्या व्यक्तीला अर्थातच या सर्व गोष्टींची माहिती, अभ्यास आणि आवड असणे गरजेचे असते. दीक्षित यांनी या कामातून आपली एक ओळख निर्माण केली.
यामुळेच पुढे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतरच त्यांनी मोहेंजोदडो आणि पहाडपूर या दोन साईट्सच्या उत्खननात मोलाची कामगिरी बजावली. ज्यामुळे १९३० साली त्यांची पुरातत्व सर्वेक्षणाच्या उपमहासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
१९३२ दरम्यान त्यांनी सरकारी एपिग्राफिस्ट म्हणूनही काम केले. पुढे १९३७ ते १९४४ दरम्यान ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालकही राहिले.
दीक्षित यांच्या कारकीर्दीमध्ये भारतीय पुरातत्व खात्यामध्ये मोठे बदल करण्यात आले. या काळातच भारतीय पुरातन स्थळांचे उत्खनन करण्यासाठी देशातील विद्यापीठे आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्यात आलं. काळाच्या ओघात कित्येक सहस्त्रकांपूर्वी भारताच्या जमिनीखाली दडलेला इतिहास समोर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत असं दीक्षित यांचं मत होतं.
दीक्षित यांच्या कार्यकाळापूर्वी हे काम करण्याची परवानगी केवळ देशाच्या पुरातत्व खात्याला होती. मात्र, मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याच्या दृष्टीने ही मोनोपॉली बंद करण्याची गरज दीक्षित यांना जाणवली. त्यामुळे त्यांनी पुरातत्व संशोधनाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहभागी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.
पश्चिम बंगालमधील मालदामध्ये असणाऱ्या देवकोट (बानगढ) या प्राचीन शहराचे उत्खनन करण्यासाठी दीक्षित यांनी कलकत्ता विद्यापीठाला परवानगी दिली होती. पुरातत्व उत्खनन करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले.
विद्यापीठे आणि संस्थांमार्फत जास्तीत जास्त लोकांना या फील्डमध्ये आणण्याव्यतिरिक्तही भारतीय पुरातत्व खात्याच्या विकासासाठी दीक्षित यांचं मोठं योगदान राहिलंय. आपल्या एकूण कारकीर्दीमध्ये अनेक खाती सांभाळल्यामुळे त्यांची बरीच ओळखही होती. त्यांनी पुरातत्व खात्याला प्रांतीय संग्रहालये आणि राज्यांमधील पुरातत्व खात्यांसोबत जोडण्यास आणि त्यांमधील समन्वय वाढवण्यास मदत केली.
त्यांनी राजस्थानच्या अजमेरमधील राजपुताना संग्रहालयाच्या विकासासाठी आर्थिक आणि इतर सहाय्य पुरवले. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात ‘कन्नड रिसर्च सोसायटी ऑफ धारवाड’ची स्थापना करण्यामध्येही दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. तर, गुजरातमध्ये प्रिहिस्टॉरिक रिसर्च एक्पिडिशन सुरू करण्यामध्ये दीक्षित यांचा सहभाग होता.
दीक्षित हे पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक असताना १९४० ते १९४४ दरम्यान उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील ‘अहिच्छत्र’ या पुरातन शहराचे उत्खनन करण्यात आले होते. अहिच्छत्र ही उत्तरी पंचाल प्रांताची राजधानी असलेल्या या शहराचा उल्लेख महाभारतामध्ये आढळला होता. बरेलीमधील रामनगर गावात अहिच्छत्रचे अवशेष आढळून आले आहेत.
या शहराच्या उत्खननावेळी त्यांनी या उत्खननात मिळालेल्या सिरॅमिकच्या टायपोलॉजिकल वर्गीकरणाकडे विशेष लक्ष दिले. टायपोलॉजी म्हणजे चिन्हे व अक्षरांचा अभ्यास. याठिकाणी आढळून आलेल्या सिरॅमिकच्या वस्तू या सुमारे १५ शतकांपूर्वीच्या असल्याचे समोर आले.
यासोबतच, बांगलादेशमधील राजशाही येथील पहाडपूरमध्येही त्यांनी उत्खनन केले. या उत्खननात एक मोठं मंदिर आढळून आलं, गुप्त आणि पाल राजवटीच्या काळातील बरेचसे टेराकोटा फलक या मंदिरासोबत सापडले. अहिच्छत्र आणि पहाडपूरमध्ये आढळलेले मातीकामाचे नमुने या गोष्टींचे पुरावे आहेत, की हजारो वर्षांपूर्वी मातीकामाच्या बाबतीत लोक चांगलेच प्रगत होते.
दीक्षित यांनी पुरातत्व उत्खननासंबंधी, तसेच त्यांच्या कारकीर्दीमध्ये झालेल्या संशोधनाबाबत कित्येक पुस्तके प्रकाशित केली. यासोबतच न्युमिस्मॅटिक्स म्हणजेच मुद्राशास्त्र विषयातही ते पारंगत होते. याबाबतचे बरेच शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. कित्येक वर्षे ते न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. दीक्षित यांनी अखिल भारतीय संग्रहालय संघाची स्थापना केली, या संघाचे ते अध्यक्षही राहिले.
इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांची अलीगढच्या हिस्ट्री काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना मराठीसह हिंदी, उर्दू, बांगला आणि इतर भाषाही अवगत होत्या. यामुळेच देशभरातील विविध प्रांतांमधील पुरातत्व खात्यासोबत ते सहजपणे काम करू शकायचे. त्यांनी इतिहास संशोधनासाठी इंग्लंड, युरोप, इजिप्त अशा देशांना भेट दिली होती.
जॉन मार्शल यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या सुवर्णयुगाचा पाया रचला होता. दीक्षित यांनी मार्शल यांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. १९४४ मध्ये ते आपल्या पदावरुन निवृत्त झाले. यानंतर अवघ्या दोनच वर्षांमध्ये, १२ ऑगस्ट१९४६ ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यासोबतच भारतातील इतिहास संशोधनाच्या सुवर्णयुगाचा अस्त झाला. मात्र, त्यांनी लिहून ठेवलेली पुस्तके आणि शोधनिंबंध आजही कित्येकांना प्रेरणा देण्यासोबतच मार्गदर्शनही करतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










