आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब |
निसर्गाने आपल्या खजिन्यात कितीतरी अद्भुत गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. पृथ्वीवरील हे जीवनचक्र अबाधित राहण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाचे योगदान तितकेच मोलाचे आहे. निसर्गाच्या एका जरी घटकात असमतोल निर्माण झाला तर संपूर्ण जीवचक्राला त्याचा फटका बसू शकतो. म्हणूनच निसर्गातील प्रत्येक घटकाचे सरंक्षण आणि जतन करणे आपले कर्तव्य आहे. किमान आपल्या कृत्यांमुळे निसर्गातील कुठल्याही घटकाला हानी पोहोचता कामा नये इतकी तरी दक्षता आपण घेऊच शकतो.
भारतातही निसर्गाने मुक्त हस्ताने आपल्या खजिन्याची उधळण केली आहे. विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आणि बघता क्षणीच धडकी भरवणारे काही वन्यजीव यांनी भारतीय जंगले एकेकाळी अगदी समृद्ध होती. भारतातील राजे-रजवाड्यांना शिकारीची भारी हौस. क्रूर जंगली प्राण्यांच्या शिकारीचे अनेक किस्से इथल्या राजांच्या इतिहासातून वाचायला मिळतात.
कधी शिकारीमुळे, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी मानवी हस्तक्षेपामुळे (जंगलतोड, जनावरांच्या अवयावांचा व्यापार) अशा अनेक कारणांनी भारतातील काही वन्यजीवांची प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे.
आज या वन्यजीवांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्रीय उद्याने उभी केली आहेत. भारतातील अशा प्रकारचे पहिले राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमधील रामनगर येथे वसवण्यात आले. या उद्यानाला प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि निष्णात शिकारी म्हणून प्रसिध्द असलेले जिम कॉर्बेट यांचे नाव देण्यात आले आहे.
आता शिकारी असूनही जिम कॉर्बेट यांचे नाव या उद्यानाला का याचे आश्चर्य वाटले असेल ना?
याच उद्यानाच्या ठिकाणी एकेकाळी न*रभ*क्षक वाघ आणि बिबट्यांनी प्रचंड द*हश*त माजवली होती. लोकांना दिवसाढवळ्या देखील घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. कधीकधी तर हे वाघ आणि बिबट्या थेट घरात घुसत, अंगणात बांधलेल्या जनावरांना सहज ओढून नेत.
जळणासाठी किंवा जंगलातील रानमेवा गोळा करण्यासाठी जंगलात जाण्याचा कोणीही विचारही करत नसे. आपापल्या शेतात काम करणे देखील इथल्या नागरिकांना अशक्यप्राय झाले होते. कारण दिवसाच्या कुठल्या वेळी हे वाघ किंवा बिबट्या येतील आणि फरफटत नेतील याचा नेम नाही. या परिसरातील सर्वच लोक अगदी जीव मुठीत घेऊन जगत होते.
एका न*रभ*क्षक वाघाने तर कुमु-गढवाल परिसरातील तब्बल ४३६ लोकांना जीवे मारले होते. अशा परिस्थिती शिकारी जिम कॉर्बेट या लोकांसाठी देवदूतासारखे धावून आले. सरकार देखील या न*रभ*क्षक वन्यजीवांच्या त्रासाने हैराण झाले होते. अशा परिस्थितीत काय करावे याचे उत्तर कोणाकडेच नव्हते.
जिम कॉर्बेट एक निष्णात शिकारी होते. न*रभ*क्षक वाघाचासुद्धा ताबा कसा मिळवायचा हे त्यांना चांगलेच माहिती होते. त्यांनी पहिल्यांदा ४३६ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या न*रभ*क्षक वाघाला शिकार करून ठार केले. त्यानंतर १९१० साली त्यांनी न*रभ*क्षक बिबट्याची शिकार केली. या बिबट्याने जवळपास ४०० लोकांचा जीव घेतला होता.
१९२६ साली त्यांनी १२६ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या बिबट्याची शिकार केली. जिम कॉर्बेट यांनी अशाप्रकारे स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला की, जिथे कुठे न*रभ*क्षक वन्यजीव दिसतील त्याठिकाणी लोकं जिम कॉर्बेट यांना बोलावून घेत. जिम कॉर्बेट यांच्या नजरेस एकदा का असं न*रभ*क्षक वन्यप्राणी दिसला की ते त्यांची शिकार केल्याशिवाय जंगलातून परत येत नसत.
अशा शिकारीच्या वेळी कित्येकदा जिम कॉर्बेट आणि जंगली प्राण्यांच्यात हाणामारी देखील होत असे. परंतु, जिम आपल्या साहसाने या क्रू*र प्राण्यांवर मात करून त्यांची शिकार करत असत.
जंगलात जाऊन जंगली प्राण्यांशी लढून त्यांना जीवे मारणारे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे हे जिम कॉर्बेट होते तरी कोण?
जिम कॉर्बेट यांचा जन्म २५ जुलै, १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊ पर्वतरांगांत वसलेल्या नैनिताल येथे झाला. हा भाग सध्याच्या उत्तराखंड राज्यात येतो. क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे जिम हे आठवे अपत्य. जिमचे वडील क्रिस्टोफर हे नैनीतालमध्ये पोस्टमास्तर म्हणून नोकरीला होते.
हिमालयीन पर्वत रांगांत वाढलेल्या जिम यांना लहानपणापासूनच जंगली प्राण्यांबद्दल आकर्षण होते. जंगलातून भटकण्यात आणि झाडावर लटकून जंगली प्राण्यांचे निरीक्षण करण्यातच त्यांचा दिवसच्या दिवस जात असे.
जंगलातील बारीकसारीक गोष्टींचा तपशील ते आपल्या स्मरणात नोंदवून ठेवत. त्यांच्या याच सवयींमुळे जंगलाशी त्यांची नाळ जोडली गेली. नैनीतालच्या ओक ओपनिंग्ज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्यांनी बंगाल आणि वायव्य पंजाब रेल्वेत नोकरी केली.
१९०७ ते १९३८ या काळात त्यांनी ३३ न*रभ*क्षक वन्यप्राण्यांची शिकार केली. यामध्ये १९ वाघ तर १४ बिबटे होते. सरकारी नोंदीनुसार या न*रभ*क्षक प्राण्यांनी १२०० लोकांचा जीव घेतला होता. जिम कॉर्बेट यांनी शिकार केलेले हे प्राणी आधीच जखमी झालेले असत. जखमी अवस्थेत त्यांना शिकार करणे शक्य नसल्याने ते मानवी वस्तीत येऊन ह*ल्ला करत आणि भूक भगवत.
कॉर्बेट यांनी लिहिलेल्या “मॅन इटर्स ऑफ कुमाऊ” या पुस्तकात त्यांनी या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. त्या न*रभ*क्षक वाघांपैकी काही वाघ असेही होते जे बंदुकीच्या गोळीने जखमी झाले होते. नरभक्षक प्राण्यांची शिकार करण्यात जिम तरबेज होतेच. पण, मानवासाठी हानिकारक नसलेल्या इतर कुठल्याही प्राण्याला आपल्यामुळे इजा होणार नाही याचीही ते काळजी घेत असत.
परंतु, नंतर जिम यांना याची जाणीव झाली की अशाच प्रकारे न*रभ*क्षक वाघांची आणि बिबट्यांची आपण शिकार करत राहिल्यास त्यांची संख्या कमी होईल. त्यांचे जतन केले नाही तर ही प्रजाती नष्टसुद्धा होऊ शकते. पुढे त्यांनी वाघांची शिकार करणे सोडून दिले. लोकांना आत्मसंरक्षण करण्यासाठी ते प्रेरणा देऊ लागले.
जिम कॉर्बेट आपल्या उर्वरित आयुष्य वन्यजीव संरक्षक म्हणून जगले. वाघांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवले. उतारवयातच त्यांनी “मॅन इटर्स ऑफ कुमाऊ” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला १९२८ साली केसर-ए-हिंद पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
१९३६ साली जिम यांनी मित्र चाम्पियान याच्यासोबत पहिले राष्ट्रीय उद्यान स्थापण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कुमाऊच्या डोंगरात त्यांनी राष्ट्रीय उद्यान स्थापण्याचे काम हाती घेतले. वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला. पुढे भारत स्वातंत्र झाल्यानंतर ते आपल्या बहिणीसोबत कायमचे केनियाला निघून गेले.
१९५५ साली त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी उभारलेल्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानाला त्यांचेच नाव देण्यात आले. भारतातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








