आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीने देश सोडण्यापूर्वी भारतीयांना पुरतं भरडून काढलं पण जाता जाता काही गोष्टी अशा दिल्या, ज्यांच्यामुळे लोक आजही त्यांचे आभार मानतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे क्रिकेट! १७९२ मध्ये भारतात पहिला क्रिकेट क्लब स्थापन झाल्यानंतर गोऱ्या साहेबाच्या या खेळात भारताच्या राष्ट्रीय संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याची मान्यता मिळवण्यासाठी तब्बल १४० वर्षं वाट बघावी लागली.
त्यानंतर १९५२ मध्ये भारताने आपला पहिला कसोटी विजय मिळवला. या संघाला खरी चकाकी चढली ती सत्तर-ऐंशीच्या दशकात, जेव्हा दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावसकरांसारखे खेळाडू या ‘रन’मैदानात उतरले.
या दोघांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता तो ‘वासू परांजपे’ नामक भारतीय क्रिकेटविश्वातील आधुनिक द्रोणाचार्याने!
ख्यातनाम प्रशिक्षक वासू परांजपे यांनी विठ्ठल पाटील आणि माधव मंत्री यांच्यासोबत मिळून दादर क्रिकेट क्लबची धुरा आपल्या खांद्यावर मिरवत मुंबईसाठी गुणवंत क्रिकेटर्सची अशी फौज निर्माण केली जिचा प्रभाव भारताच्या राष्ट्रीय संघावरही कायम राहिला. प्रतिभावान युवा खेळाडूंबाबत त्यांनी केलेली भाकिते सत्यात उतरू लागली. आपल्या रत्नपारखी नजरेने नवनवे खेळाडू शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यालायक बनवण्यासाठी वासूजींनी एकहाती राबवलेलं स्काऊटींग भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी लाभदायक ठरलं. सुनील गावसकरांपासून ते रोहित शर्मापर्यंत विस्तारलेल्या त्याच्या ‘एकलव्यां’चा खेळच वासूजींची महानता अधोरेखित करतो.
आपल्या वडिलांची महानता आणि परंपरा अबाधित राखण्यासाठी जेव्हा जतीन परांजपे यांनी क्रिकेटविश्वात पाऊल ठेवलं, तेव्हाच ‘खाण तशी माती’ ही म्हण सार्थ झाल्याचा प्रत्यय आला. रणजीमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या जतीन यांना दुखापतींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट फारसं खेळता आलं नसलं तरी क्रिकेटशी त्यांची जोडली गेलेली नाळ अबाधित राहिली.
आपल्याला आपल्या देशासाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता येणार नाही हे कटू सत्य पचवून त्यांनी आपला मार्ग बदलायचं ठरवलं आणि पुढे याच मार्गावर चालून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला कॉर्पोरेट विश्वात महत्त्व प्राप्त करून दिलं.
२००६मध्ये जतीन यांनी भारतीय क्रीडाविश्वातील अग्रगण्य ब्रँड्सपैकी एक असलेल्या ‘नाईकी’ (Nike) साठी ‘स्पोर्ट्स मार्केटिंग हेड’चा पदभार स्विकारला. त्यावेळी भारतात नाईकीसाठी क्रिकेटर एस. श्रीशांत हा एकमेव ब्रँड अँबेसिडर होता. या देशात क्रिकेटसाठी असलेली क्रेझ पाहता हे चित्र नाईकीसाठी नक्कीच आशादायक नव्हतं. त्यामुळे जतीन यांनी एक नवा आणि आश्वासक चेहरा ब्रँड अँबेसिडर म्हणून मिळवण्यासाठी स्काऊटींग सुरु केलं. आपल्या पित्याकडून असे खेळाडू निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या नजरेचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं. तेच इथं कामी आलं.
खेळाडूचं नाव आणि मानधनाची जागा रिकामी सोडलेल्या तयार कंत्राटांचा गठ्ठा बॅगेत ठेवून भारतभर नवं टॅलेंट शोधत असताना त्यांना कुठूनतरी एका युवा फलंदाजाविषयी कळलं. हा प्रतिभावंत खेळाडू आपल्या आक्र*मक शैलीसाठी प्रसिद्ध होता आणि भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचाही एक अविभाज्य घटक होता.
त्याचा खेळ आणि आवेश पाहून जतीन यांना आपल्याला हव्या असलेल्या ‘उत्तम खेळाचं प्रदर्शन करणारा लक्षवेधी चेहरा’ मिळाल्याची खात्री पटली आणि त्यांनी त्या खेळाडूला करारबद्ध केलं. या खेळाडूचं नाव होतं- विराट कोहली!
विराटचा खेळ पाहून भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी २००५पासून किट स्पॉन्सरर असलेल्या नाईकीने आपल्या किटमध्ये बॅटचाही समावेश केला. जतीन यांचा विश्वास सार्थ ठरवत विराटने पुढच्याच अंडर-१९ विश्वचषकात आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवलं आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात दिमाखात प्रवेश केला.
नाईकी इंडियासाठी सहा वर्षं काम केल्यानंतर २०१६ मध्ये जतीन यांची भारताच्या राष्ट्रीय संघासाठी असलेल्या निवड समितीमध्ये वर्णी लागली. २०११चा एकदिवसीय विश्वचषक विजेता भारतीय संघ २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर काहीसा खचून गेला होता. अशावेळी कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडून विराट कोहलीकडे सोपवण्यात आली.
२०१६ नंतर भारतीय संघात आमुलाग्र बदल दिसून आले. के. एल. राहुल, जसप्रित बुमरा, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्यासारखे नव्या दमाचे खेळाडू कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी२० या तिन्ही प्रकारांमध्ये खेळण्यासाठी सज्ज होत होते तर इशांत शर्मा, अमित मिश्रा, गौतम गंभीर, अंबाती रायडूसारख्या खेळाडूंना आपलं राष्ट्रीय संघातलं स्थान सोडावं लागलं.
रणजी करंडक, दुलीप करंडक, हजारे करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक यांसोबतच भारतीय क्रिकेटविश्वाचं अविभाज्य अंग बनलेली आयपीएल स्पर्धा पाहता, निवड समितीचा सदस्य म्हणून जतीन यांची जबाबदारी निश्चितच वाढली होती. प्रत्येक खेळाडूची शारीरिक आणि मानसिक स्थिती वेळोवेळी परखणे हे त्यांचं अलिखित कर्तव्यच बनून गेलं होतं. चालू मॅचमध्येही सीमारेषेच्या आणि डगआऊटच्या जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला कर्णधाराच्या निर्णयांविषयी अनपेक्षितपणे वेगवेगळे प्रश्न विचारून त्याचा सामन्यामध्ये असलेला इंटरेस्ट जाणून घेण्यात आणि त्याला प्रोत्साहन देण्यात ते तरबेज होते.
नव्या खेळाडूंना टीममध्ये अवघडल्यासारखं वाटू नये यासाठी जतीन हिरीरीने पुढाकार घेत असतात. निवड समितीचा सदस्य असल्याने सांघिक कामगिरी हा त्यांच्या अभ्यासाचा व कामाचा विषय आहे. त्याबाबत ते अतिशय काटेकोरपणे सूचना देतानाही दिसतात. त्याचबरोबर, प्रत्येक खेळाडूच्या कठोर प्रशिक्षणासोबतच त्याच्या गरजांवरही त्यांचं लक्ष असल्याने संघातील प्रत्येकजण त्यांच्याकडे आधार म्हणून पाहतो.
भारतीय संघाच्या कामगिरीला साजेसं मार्केटिंग करण्यातही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. प्रत्येक खेळाडूची मैदानावरील कामगिरी ही सर्वोत्तमच राहील यासाठी ते जितकी धडपड करत असतात, तितक्याच प्राणपणाने त्या खेळाडूच्या आणि परिणामी संघाच्या कॉर्पोरेट ग्लॅमरसाठीही ते झटत राहिले आहेत.
२०१७ मध्ये, संपूर्णतः क्रीडाविश्वाला वाहिलेला ‘खेलोमोअर’ नावाचा एक भारतीय स्टार्टअप सुरु करून जतीन परांजपे यांनी स्पोर्ट्समध्ये असलेल्या व्यावसायिक संधीचं सोनं करून दाखवलं आहे. एक क्रिकेटर ते एक व्यावसायिक हा त्यांचा यशस्वी प्रवास फक्त या खेळावरील निस्सीम प्रेमामुळे शक्य झाल्याचं ते सांगतात.
आजही भारतीय संघासाठी एका भक्कम आधाराची आणि पाठीराख्याची भूमिका निभावताना आपल्या क्रिकेटतपस्वी पित्याचा समृध्द वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










