The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कंपनीमुळे भारतीयांना नोकरी आणि छोकरी दोन्ही शोधणं सोपं झालंय

by Heramb
29 September 2025
in विश्लेषण, गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर दोन मोठी आव्हाने असतात. कदाचित ही आव्हाने यशस्वीरीत्या पार पाडावीत यासाठीच शालेय जीवनापासूनच पालकांची आणि विद्यार्थ्यांची धडपड सुरु असते. अनेकवेळा तर या दोन गोष्टींच्या पलीकडेही काहीतरी आयुष्य आहे असे विद्यार्थ्यांना वाटतच नाही. वरवर जरी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असले तरी एक उत्तम नोकरी आणि त्याचबरोबर एक उत्तम पगार मिळवणे हेच ध्येय अनेकांसमोर असतं. कधीतरी यामध्ये ‘प्रसिद्धी’ची अपेक्षासुद्धा असते.

नोकरी/व्यवसायाबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे जीवनसाथी! गेली काही दशके भारताचं सामाजिक जीवन या गोष्टींचा विचार करूनच आपलं कार्यक्षेत्र निवडत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने तसं न करता खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे काही वेगळं करायचं ठरवल्यास समाज आणि नातेवाईक त्याला वेड्यात काढतात. अशाच एका ध्येयवेड्या आणि काही वेगळं करू इच्छिणाऱ्या तरुणाची कथा आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याने अनेक आव्हानांचा सामना करत विद्यार्थ्यांच्या जीवनातील या दोन मुख्य समस्यांवर जवळ जवळ कायमचाच तोडगा काढला आहे.

इन्फोएज या कंपनीने ही दोन अवघड कामे अत्यंत सोपी केली, ज्यामुळे लाखो तरुणांचे आयुष्य बदलले. इन्फोएजने भारतातील कोट्यवधी तरुणांच्या जीवनात क्रांती केली आहे. शिक्षणानंतर नोकरी शोधणे आणि नोकरीनंतर लग्नासाठी जीवनसाथी शोधणे ही दोन अग्निदिव्ये इन्फोएजच्या मदतीने आता एका क्लिकवर पूर्ण होतात.

बेरोजगारीसारख्या भीषण समस्येवर काही प्रमाणात तरी इन्फोएजने तोडगा काढला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही या इन्फोएज कंपनीबद्दल पहिल्यांदाच ऐकत असाल तर नोकरी.कॉम आणि जीवनसाथी.कॉम ही दोन प्रसिद्ध संकेतस्थळे इन्फोएजच्याच सेवा आहेत.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त संजीव बिखचंदानी यांनी १९९५ साली या कंपनीची उत्तर प्रदेशातील नोएडा येथे स्थापना केली. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २०२० साली भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. नोकरी.कॉम, जीवनसाथी.कॉम या पोर्टल्सबरोबरच स्थावर मालमत्तेच्या किंवा विकाऊ घरांच्या शोधासाठी तयार करण्यात आलेले ९९एकर्स.कॉम आणि शैक्षणिक कार्यांसाठी वापरण्यात येणारे शिक्षा.कॉम हे संकेतस्थळसुद्धा या इन्फोएज कंपनीच्याच सेवा आहेत. एकच कंपनी माणसाच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करते अशा अद्भुत कंपनीच्या संस्थापकांबद्दल जाणून घेण्यासाठी हा लहानसा प्रयत्न..



विद्यार्थीदशेत असताना आपण काही वेगळं आणि नवीन करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, किंबहुना तरुण विद्यार्थ्यांमध्ये तितकी क्षमता आणि अनेक नवकल्पनाही असतात. पण काही कारणांमुळे ‘काही नवं करण्याच्या’ प्रक्रियेला आळा बसतो. मग कदाचित त्यासाठी कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक कारणं असू शकतील, ज्यामुळे त्या कल्पनेला अचानक ब्रेक लागून पारंपरिक पद्धतींमध्ये वाहत जाणाऱ्या गर्दीत असे विद्यार्थी अडकून पडतात.

मग या प्रचंड प्रवाहातून बाहेर येणं अवघड होऊन बसतं. किंबहुना या प्रवाहातून बाहेर पडता आलं तरी फार उशीर झालेला असतो. म्हणूनच पारंपरिक पद्धतींबरोबर वाहवत जाणाऱ्या या गर्दीत न पडता आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्यातच त्या ‘नवकल्पनेला’ यश मिळतं आणि कदाचित ते यश ‘वाहवत’ जाणाऱ्या त्या गर्दीवर प्रचंड प्रभाव पाडण्यातही यशस्वी होतं. साधारण याच प्रकारच्या अनेक उद्योजकांच्या कथा असतात. संजीव बिखचंदानी यांची कहाणीही अशीच आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

काहीतरी मोठे करावे असे संजीव बिखचंदानी यांना शिकत असताना वाटले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर काही काळ नोकरी करावी लागेल आणि नंतर काही मोठे काम करायचे अशी त्याची इच्छा होती. पण नेमके काय करावे याबद्दल अद्याप स्पष्टता नव्हती. संजीवने अर्थशास्त्र मुख्य विषय घेऊन बीए केले आणि १९८४ साली लेखा कार्यकारीची (अकाउंट्स एक्झेक्युटिव्ह) नोकरी मिळवली.

त्याने याठिकाणी तीन वर्षे काम केले. १९८७ साली ही नोकरी सोडून तो अहमदाबादच्या आयआयएममध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला. अपेक्षेप्रमाणेच १९८९ साली ‘कॅम्पस प्लेसमेंट इव्हेंट’मध्ये ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या कंपनीत उत्पादन कार्यकारी (प्रोडक्ट एक्झेक्युटिव्ह) म्हणून त्याला नोकरी मिळाली. ही कंपनी तेव्हा हिंदुस्थान मिल्कफूड मॅन्युफॅक्चरर्स (एचएमएम) म्हणून ओळखली जात असे.

त्याची नोकरी चांगली चालली होती, पण त्याचा काहीतरी वेगळं आणि मोठं करण्याचा निश्चय त्याला सतत खुणावत होता. वर्षभराच्या नोकरीनंतर एके दिवशी संजीवने ही नोकरीसुद्धा सोडली. एचएमएममधील नोकरीत त्याला महिन्याला ८ हजार रुपये पगार मिळत असत. तत्कालीन आर्थिक परिस्थिती पाहता ८ हजार ही खूप मोठी रक्कम होती.

पण काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी गमवावे लागते. नोकरी सोडण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीचा सल्ला घेतला होता. त्याने आपल्या पत्नीला सांगितले- ‘आता तुझ्या पगारात घरखर्च भागवावा लागेल, कारण मी माझी नोकरी सोडून काम करणार आहे.’ स्वतःचा व्यवसाय सुरु करावा अशी सुरभीचीही इच्छा होती. ते दोघेही आयआयएम अहमदाबादमध्ये एकाच वर्गात शिकत असत.

संजीव बिखचंदानी यांनी त्यांच्या घरातील नोकरांच्या खोलीतून काम सुरू केले, त्यासाठी ते वडिलांना भाडेही देत असत. १९९० साली त्यांनी त्यांच्या एका मित्रासोबत दोन कंपन्या स्थापन केल्या. एकाचे नाव इंडमार्क आणि दुसऱ्याचे नाव इन्फोएज असे होते. तीन वर्षे एकत्र काम केल्यानंतर, दोन्ही भागीदार १९९३ साली वेगळे झाले.

माहिती तंत्रज्ञान विभाग संजीव बिखचंदानीकडे आला. सध्याच्या ‘पेस्केल’प्रमाणे इन्फोएजचे मुख्य काम पगाराशी संबंधित सर्वेक्षण करणे हे होते. कोणत्या कंपन्या एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना आणि अभियंत्यांना प्रवेश स्तरावर किती पगार देतात याचे सर्वेक्षण ही कंपनी करत असत. या माहितीच्या आधारे सविस्तर अहवाल तयार करून ते वेगवेगळ्या कंपन्यांना विकत असत.

या कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांत कमाई पुरेशी नसल्याने संजीवने अनेक संस्थांमध्ये जाऊन कोचिंग दिले. या कोचिंगमधून तो महिन्याला सुमारे २००० रुपये कमवू शकला जेणेकरून त्याचा स्वतःचा खर्च भागत असे. दोन्ही पार्टनर्स वेगळे झाल्यानंतर संजीवला त्याच नोकरासाठीच्या खोलीत परत जावे लागले. त्याने त्याचा खर्च कमी केला. त्याचा खर्च भागवण्यासाठी त्याने एका कंपनीत सल्लागार संपादक म्हणून नोकरी मिळवली. येथे त्याने जवळजवळ ४ वर्षे काम केलं.

१९९६च्या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत ‘आयटी एशिया’ प्रदर्शन सुरु होते. संजीवने आवर्जून या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. डब्लूडब्लूडब्लू (www) लिहिलेल्या एका स्टॉलवर त्याची नजर पडली. व्हीएसएनएलचे (VSNL) ई-मेल खाते विकले जात आहेत, हे स्टॉलवर पोहोचल्यानंतर संजीवला समजले. संजीवने आणखी प्रश्न विचारल्यावर विक्रेत्याने ई-मेल म्हणजे काय आणि ते कसे वापरले जातात हे सविस्तरपणे सांगितले. यानंतर, विक्रेत्याने इंटरनेटवर काही ब्राउझिंग देखील केले आणि जगभरातील किती माहिती इंटरनेटवर मिळू शकते हे दाखवले.

याच संधीने संजीवच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. एचएमएममध्ये काम करत असताना लोकांना वर्गीकृत जाहिराती किती आवडत होत्या हे संजीवला आठवले. वर्गीकृत मासिकांची ३० ते ४० पाने काळजीपूर्वक वाचली जात असत. बहुतेक लोक त्यामध्ये  नोकरीची यादी तपासायचे. याचंच ‘आंतरजालीकरण’ करायचं संजीवने ठरवलं. त्यावेळी भारतात फक्त १४००० इंटरनेट यूजर्स होते, पण संजीवला हा आकडा पुरेसा वाटला.

संजीवने त्या ई-मेल विक्रेत्याला त्याच्यासाठी वेबसाइट तयार करण्यास सांगितले. सर्व सर्व्हर्स अमेरिकेत असल्याने त्यांच्यासाठी वेबसाइट तयार करू शकत नाही असे त्या किरकोळ विक्रेत्याने सांगितले. कारण त्या सर्व वेबसाईट्स अमेरिकेतूनच होस्ट केल्या गेल्या होत्या. आता ही एक वेगळीच समस्या होती.

पण लवकरच या समस्येवरही तोडगा निघाला. त्याचा मोठा भाऊ अमेरिकेतील एका बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक होता. संजीवने लगेच त्या भावाला फोन केला आणि त्यांना एक वेबसाइट सुरू करायची आहे, ज्यासाठी सर्व्हरची गरज आहे असे सांगितले. पण त्याच्याकडे पैसे नसल्याने काही काळानंतर पेमेंट केले जाईल हे भावाने मान्य केले.

सर्व्हरचे भाडे त्यावेळी २५ डॉलर्स होते. संजीवचा भाऊ ते भाडे आता देणार होता. कृतज्ञता म्हणून संजीवने त्याच्या कंपनीचे ५ टक्के शेअर्स न विचारता त्याच्या भावाच्या नावे केले. त्याने भारतातील आणखी दोन लोकांना कंपनीचे शेअर्स देऊन जॉब.कॉम सुरु केलं. वेबसाइट तयार करण्यात आली होती, परंतु वेबसाईटचे लाँच प्रलंबित होते.

१९९० च्या दशकाच्या मध्यावर आर्थिक मंदीचा काळ सुरू झाला होता. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. लाँच करण्याची हीच योग्य वेळ आहे असे संजीव आणि त्याच्या टीमला वाटले. त्याच्या टीमने अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांमधून डेटाबेस तयार केला. या डेटाबेसमध्ये सुमारे एक हजार रेझ्युमे, नोकऱ्या आणि भरती सल्लागारांचा डेटा होता आणि या डेटासह नौकरी.कॉम देखील सुरू करण्यात आले.

यापूर्वी, सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्यांच्यासाठी तयार केले गेले होते. भारतातील फक्त भारतीयांचे हित साधणारे आणि त्यांच्यासाठी तयार केले गेलेले नोकरी.कॉम हे पहिलेच ऑनलाईन पोर्टल होते. त्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी इंटरनेटबद्दल माहिती पुरवण्यास सुरुवात केली. भारतातील लोकांना इंटरनेटबद्दल सांगण्यासाठी काही भारतीय उदाहरणेही देणे आवश्यक होते, त्यामुळे नोकरी.कॉमचे नाव आपोआप वृत्तपत्रांमध्ये वापरले जाऊ लागले. त्याच्या प्रमोशनसाठी कंपनीला काही वेगळा खर्च करावा लागला नाही.

पहिल्या वर्षी नौकरी.कॉमने अडीच लाख रुपयांचा व्यवसाय केला. तर ८० टक्के नोकऱ्या मोफत उपलब्ध होत्या. पुढच्या वर्षी १८ लाखांचा व्यवसाय झाला, म्हणूनच अनेक लोकांनी व्यवसाय निधीसाठी संजीव बिकचंदानीला फोन करायला सुरुवात केली. पण बिकचंदानी निधी घेण्यास तयार नव्हते, त्यांना वाटले की निधी नसतानाही कंपनी चांगली कामगिरी करत आहे.

पण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्याची जाणीव संजीवला झाली आणि या कंपनीला व्यवसाय निधीची आवश्यकता भासू लागली. सन २००० साली कंपनीने आयसीआयसीआय व्हेंचर्सकडून ७.३ कोटींचा निधी घेतला आणि त्या निधीच्या बदल्यात कंपनीचे १५% शेअर्स त्यांना दिले. त्यानंतर प्रगतीचा ‘नॉनस्टॉप’ प्रवास इन्फोएजने केला आणि आज इन्फोएजचे मूल्यांकन सुमारे ८५,७६० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सन २००६ साली बॉम्बे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणारी ही ‘भारतातील पहिली डॉट कॉम’ कंपनी बनली. इन्फोएजने कालांतराने जीवनसाथी.कॉम सुरु केले. आजमितीस या कंपनीकडे जीवनसाथी.कॉम शिवाय नौकरीगल्फ.कॉम, शिक्षा.कॉम, ९९एकर.कॉम  आणि फर्स्टनौकरी.कॉम हे ऑनलाईन पोर्टल्स आहेत. शिवाय या कंपनीने झोमॅटो, व्हेकेशन लॅब्स, उन्नती आणि पॉलिसी बाजार इत्यादी मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

एका नोकराच्या खोलीपासून सुरुवात झालेली कंपनी आज भारताच्या काही मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, याचे कारण म्हणजे संजीव बिखचंदानी यांनी कुठेतरी पारंपरिक प्रवाहात वाहून जाण्यापासून स्वतःचा बचाव तर केलाच पण आपल्या बौद्धिक सामर्थ्याने ते आज यशाच्या शिखरावर आहेत. इन्फोएज या कंपनीची ही कथा अनेक नवउद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एक काळ होता जेव्हा फक्त 1.44 MB साठी भलीमोठी फ्लॉपी डिस्क बाळगावी लागायची

Next Post

या देशाचा राजपरिवार उदरनिर्वाहासाठी मासे विकतो आणि हॉटेल चालवतो

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या देशाचा राजपरिवार उदरनिर्वाहासाठी मासे विकतो आणि हॉटेल चालवतो

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.