आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पॉर्न चित्रपट बनवल्याप्रकरणी २०२१ मध्ये राज कुंद्राचं नाव चर्चेत आलं होतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, आणि व्यापारी असलेला राज कुंद्रा हा ‘हॉटशॉट्स’ या आपल्या ॲपसाठी पॉर्न मूव्हीज शूट करायचा असा त्याच्यावर आरोप आहे. हा आरोप खरा की खोटा ही गोष्ट वेगळी; मात्र नेटीझन्सनी त्यावर मोठ्या प्रमाणात मीम्स बनवून मजा घेतली हे नक्की.
तुम्हाला माहितिये का, की तुमच्या दैनंदिन वापरातील एक साधी-सरळ वेबसाईट ही देखील पॉर्नमधून मिळालेल्या पैशांचा वापर करुन सुरू करण्यात आली होती. ही वेबसाईट आहे – विकिपीडिया!
विकिपीडिया ही वेबसाईट माहिती नाही असा व्यक्तीच इंटरनेवर सापडणं अवघड. अगदी शाळेच्या प्रकल्पापासून ते कॉलेजमधील प्रोजेक्टसाठी म्हणून प्रत्येकाने कधी ना कधी विकिपीडियाची मदत घेतलीच आहे. विकिपीडिया नसतं, तर कित्येक जण अक्षरशः नापास झाले असते, इतकं आपण त्यावर विसंबून आहोत.
माहितीचा एक मोठा आणि मोफत स्त्रोत म्हणून विकिपीडियाकडे पाहिलं जातं. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, विकिपीडियावर जाहिरातीही नसतात. केवळ लोकांकडून मिळालेल्या मदत निधीमधून हे सुरू आहे. एका अर्थाने विकिपीडिया ही ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेली वेबसाईट’ म्हणता येईल. मात्र, या विकिपीडियाची सुरुवात ही पॉर्नमधून मिळालेल्या पैशातून करण्यात आली होती, ही गोष्ट अगदी थोड्या लोकांना माहिती आहे.
जिमी वेल्स या व्यक्तीने विकिपीडियाची स्थापना केली होती. मात्र, यासाठी लागणारा पैसा हा त्याच्या आधीच्या वेबसाईटमधून कमावला होता.
१९९६ साली जिमीने बोमिस डॉट कॉम नावाची एक वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट म्हणजे खरंतर खास पुरुषांसाठीचं एक सर्च इंजिन होतं. स्पोर्ट्स, ऑटोमोबाईल आणि ‘मुली’ अशा पुरुषांना आवडणाऱ्या गोष्टींसंबंधी माहिती शोधण्यासाठी या सर्च इंजिनचा वापर केला जात.
मात्र, यातील बाकी कॅटेगरींपेक्षाही ‘बोमिस बेब रिपोर्ट’ हा सर्वात प्रसिद्ध आणि जास्त सर्च केला जाणारा भाग होता. या बेब रिपोर्टमध्ये प्रौढ साहित्य, आणि महिलांची तसेच सेलिब्रिटींची नग्न छायाचित्रे अशा गोष्टींचा समावेश होता. ठराविक रक्कम भरल्यानंतर तुम्हाला सेलिब्रिटींची ही छायाचित्रे पहायला मिळत होती. बेब रिपोर्ट व्यतिरिक्त या वेबसाईटवर बोमिस प्रीमियम हा पर्यायही उपलब्ध होता. या प्रीमियम व्हर्जनच्या तीन दिवसांच्या ‘ट्रायल’साठी २.९५ डॉलर्स एवढे पैसे आकारण्यात येत होते. बोमिसचंच आणखी एक सर्च इंजिन होतं, ज्याचं नाव होतं बेब इंजिन. इंटरनेटवर केवळ इरॉटिक साहित्य शोधण्यासाठी हे सर्च इंजिन तयार करण्यात आलं होतं.
बोमिसच्या एकूण कमाईपैकी केवळ १० टक्के भाग हा बेब रिपोर्ट आणि इतर प्रौढ साहित्यातून येत होता. मात्र, बोमिसच्या विकिपीडिया पेजनुसार त्यांच्या वेबसाईटवर ९९ टक्के प्रौढ साहित्यच सर्च केलं जात होतं. पॉर्नशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न फसल्यानंतर, २००५ मध्ये जिमीने आणखी एक काम केलं. त्याने आपल्या विकिपीडिया पेजमध्ये १८ बदल केले. यात त्याने आपल्या पेजमधून बोमिस बेब्स, सॉफ्टकोअर पॉर्न आणि इरॉटिका यांसंबधी सर्व रेफरन्स लिंक्स डिलीट केल्या.
आता खरंतर विकिपीडियाचीच अशी पॉलिसी आहे, की तुम्ही स्वतःचं पेज स्वतःच एडिट करू शकत नाही. म्हणजे, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे. कारण विकिपीडिया अगदी कोणीही एडिट करू शकतं. मात्र, नैतिकदृष्ट्या ते बरोबर नसल्याचं म्हणत विकिपीडिया तुम्हाला तसं न करण्याचं आवाहन करतं. विशेष म्हणजे वेल्सने हा नियम स्वतःच लिहिला आहे. वेल्सच्या म्हणण्यानुसार, “स्वतःबद्दल स्वतःच लिहिणे म्हणजे सोशल फसवणूक आहे”. मात्र तरीही जिमीने ही फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाच.
अर्थात, त्याने विकिपीडियामधून रेफरन्स डिलीट केले म्हणजे काही ते इंटरनेटवरुन डिलीट झाले असं नाही. कुठे ना कुठे या गोष्टी उपलब्ध होत्याच. २०११ मध्ये टाईम मॅगझीनने ‘टॉप १० विकिपीडिया मूमेंट्स’ अशी एक यादी प्रसिद्ध केली. यामध्ये वेल्सने आपल्या पेजमध्ये केलेल्या बदलांचाही उल्लेख करण्यात आला होता. या यादीमधील ‘हू फाऊंडेड विकिपीडिया’ या मूमेंटमध्ये या सर्व प्रकाराचा उल्लेख करण्यात आला आहे.
यात दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञान विषयातील लेखक रॉजर्स कॅडेनहेड याने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला. आपल्या ‘वर्कबेंच’ या ब्लॉगमध्ये रॉजर्सने हा खुलासा केला होता. विशेष म्हणजे, यावेळी वेल्सने केवळ आपल्या स्वतःच्या माहितीमध्ये नाही, तर विकिपीडियाचे सहसंस्थापक लॅरी सेंगर यांच्या माहितीमध्येही बदल केले होते.
लॅरी हे विकिपीडियाचे ‘को-फाऊंडर’ आहेत असा उल्लेख असलेली वाक्यं त्यांनी आपल्या पेजमधून डिलीट केली होती. सेंगर यांनी २००२ मध्ये विकिपीडियामधून राजीनामा दिला होता. वेल्ससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते.
वेल्स यांनी विकिपीडिया एडिट करण्याबाबत विचारले असता सेंगर म्हणाले होते, “असं वाटतंय तो (वेल्स) इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतोय”.
जिमीने कितीही इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला, तरी इंटरनेटवर काहीही लपून राहत नाही. विकिपीडिया सुरू करण्यासाठी सुरुवातीला आवश्यक असणारी बँडविड्थ आणि सर्व्हर हे बोमिस या वेबसाईटनेच ‘डोनेट’ केले होते. तसंच, वेल्सही बऱ्याच वेळा बोमिस कंपनीकडून विकिपीडियासाठी चेकच्या माध्यमातून डोनेशन देत होता. एकंदरीतच विकिपीडियाला लागणारा निम्म्याहून अधिक पैसा आणि साहित्य हे जिमीकडून – म्हणजेच बोमिसकडून आलं होतं; आणि बोमिसला मिळणारा जवळपास सगळा पैसा हा पॉर्नच्या माध्यमातून मिळत होता. म्हणजेच, जर लोकांनी तेव्हा बोमिसवर पॉर्न सर्च केलं नसतं, तर कदाचित आज विकिपीडियाही अस्तित्वात नसतं, असंच म्हणता येईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










