आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपण अनेकदा पाहतो आपल्याकडे भाऊबंदांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये शेताच्या बांधावरून वाद असतात. कधी-कधी हे वाद इतके विकोपाला जातात की, जीवाचं किंवा संपत्तीचं मोठं नुकसान होऊन बसतं. जगाच्या पाठीवर असे दोन देश आहेत. ज्यांच्या वादामध्ये एका देशाचं मोठं नुकसान झालं. इंग्लंड आणि स्कॉटलंड अशी या दोन देशांची नावं आहेत. इंग्लंड जवळपास सगळ्या जगावर राज्य करणारा देश. असं म्हटलं जाई की, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता.
साम्राज्यवादाची सुरुवात इंग्लंडनं आपल्या शेजाऱ्यांपासूनच केली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड मिळून एकत्र झालेला देश आहे. (यापैकी उत्तर आयर्लंड हा देश नसून एक प्रदेश आहे, त्याचं नियंत्रण इंग्लंड करतं). यात स्कॉटलंड आणि इंग्लंडचा पूर्वीपासून वाद आहे. अगदी जसा दोन शेजाऱ्यांचा असतो तसा. या वादाला सुरुवात कशी झाली आणि त्याचे काय परिणाम झाले ते आपण पाहू.
ज्यांना इतिहासाचा लळा आहे किंवा जे त्याचा आदर करतात त्यांच्यासाठी आणि स्कॉटिश लोकांसाठी १८ डिसेंबर १६६० हा दिवस नक्कीच कायम लक्षात राहील.
जवळपास ३६१ वर्षांपूर्वी ग्रेट ब्रिटनच्या उत्तर समुद्रातील थंड पाण्याखाली स्कॉटलंडच्या इतिहासाचा मोठा ठेवा कायमचा नाहीसा झाला. एका भयानक घटनेत, कित्येक शतकांमधील स्कॉटलंड किंगडमचा लिखित इतिहास नष्ट झाला.
साधारण एखाद्या आक्र*मकानं दुसऱ्यावर आक्र*मण केलं की, तो त्या ठिकाणचे अतोनात हाल करतो. तो प्रदेश अक्षरश: ओरबाडून काढला जातो. स्कॉटलंडच्या बाबतीतही असंच झालं. स्कॉटलंडवर आक्र*मण आणि कब्जा करणाऱ्या दोन माणसांनी इतिहासातील अनेक नोंदी नष्ट केल्या. त्यातला एक होता इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला आणि दुसरा होता ऑलिव्हर क्रॉमवेल. सध्या इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या इतर समकालीन राष्ट्रांच्या तुलनेत स्कॉटलंडकडं आपल्या इतिहासाच्या लेखी साहित्याची प्रचंड कमतरता आहे. त्यासाठी याच दोन व्यक्ती कारणीभूत आहेत.
कोव्हान्टरच्या नेतृत्वाखालील स्कॉटिश संसदेनं चार्ल्स दुसरा याला ग्रेट ब्रिटन, आयर्लंड आणि फ्रान्सचा राजा म्हणून गौरविल्यानंतर क्रॉमवेल जुलै १६५० मध्ये स्कॉटलंडला आला. स्कॉटिश सैन्यानं एडिनबर्गच्या पूर्वेला मजबूत बचावात्मक फळी तयार केली. परंतु, ३ सप्टेंबर रोजी अनुभवहीन स्कॉटिश सैन्याला क्रॉमवेलच्या आधुनिक मॉडेल आर्मीच्या विरोधात यु*द्धात यावं लागलं. यात त्यांच्या दारूण पराभव झाला.
४ ते ५ हजार स्कॉट्स क्रॉमवेलच्या सैन्यानं ताब्यात घेतले. यातील अनेक जणांचा कैदेत मृत्यू झाला आणि काहींना गुलाम म्हणून विकलं. इंग्रजांनी एडिनबर्ग ताब्यात घेतलं परंतु नॅशनल रेकॉर्डस किल्ल्यावरून स्टर्लिंगपर्यंत नेण्याची परवानगी दिली. स्टर्लिंगमध्ये सर्व दस्तावेज सुरक्षित करण्यात आले. मात्र, ऑगस्ट १६५१ मध्ये स्कॉटलंडमधील क्रॉमवेलचा जनरल, जॉर्ज मॉन्क (जार्ज मॉन्क पुढे अल्बेमार्लेचा पहिला ड्यूक झाला) यानं स्टर्लिंग कॅसलही ताब्यात घेतलं.
क्रॉमवेलनं स्टर्लिंग कॅसलमधील सर्व कागदपत्रे टॉवर ऑफ लंडनमध्ये नेण्याचे आदेश दिले. स्कॉटलंड हे क्रॉमवेलच्या नेतृत्त्वात कॉमनवेल्थ अंतर्गत आलेलं पहिलं संघटन होतं. त्याला स्कॉटलंडच्या इतिहासात काहीही रस नव्हता.
ही कागदपत्रे फक्त त्याच्या शक्तीचं प्रतीक म्हणून लंडनला नेण्यात आली होती. मात्र, अडचण अशी होती की त्यांच्यासाठी तिथे जागाच नव्हती. तिकडे कागदपत्रांआभावी स्कॉटलंडमधील कायदेशीर प्रकरणांचं निराकरण करणं आणखी किचकट झालं होतं. शेवटी आपल्या मृत्यूपूर्वी क्रोमवेलनं काही कायदेशीर कागदपत्रे १६५८ साली परत स्कॉटलंडला पाठवली.
डिसेंबर १६६० मध्ये किंग चार्ल्स दुसरा यांनं स्कॉटलंडची उर्वरित कायदेशीर कागदपत्रे स्कॉटलंडला परत नेण्याचे आदेश दिले. ग्रॅव्हसेंड येथे गरुड नावाच्या यु*द्धनौकेवर सर्व कागदपत्रे ठेवली गेली. मात्र, येऊ घातलेल्या वादळाचा धोका लक्षात घेऊन ही कागदपत्रे बर्टनिसलँडच्या ‘एलिझाबेथ’ या व्यापारी जहाजाचा कॅप्टन जॉन वेमीसच्या ताब्यात देण्यात आली. त्याच्या कार्गोमध्ये कागदपत्रांचे ८५ हॉगशेड्स होते. त्याचं वजन जवळपास दोन टन होतं.
नेमकी कोणती कागदपत्रे एलिझाबेधवर देण्यात आली होती याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु, काही प्रारंभिक अहवालांनुसार, राजा रॉबर्ट ब्रुस आणि त्याचा उत्तराधिकारी किंग डेव्हिड दुसरा यांच्या काळातील जवळपास सर्व सनदी व नोंदी, १४व्या आणि १५व्या शतकातील इतर अनेक दस्तावेज या जहाजावर होते.
हवामान खराब झाल्यानंतर नॉर्थम्ब्रियन किनारपट्टीच्या आसपास असणारी एलिझाबेथ पाणी घुसून बुडाली. एलिझाबेथसोबत स्कॉटलंडच्या अनेक दशकांतील राष्ट्रीय नोंदी समुद्राच्या तळाशी गेल्या.
जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा वॉल्ट यंग या २१ वर्षीय मुलानं साक्ष दिली. तो एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. त्याच्या साक्षीनुसार, एलिझाबेथचा कॅप्टन जॉन ही कागदपत्रे जहाजावर घेण्यास तयार नव्हता. कारण, जहाजामध्ये अगोदरच कुठुन तरी पाणी गळती सुरू होती. तरी देखील जबरदस्ती कागदपत्रे जहाजावर देण्यात आली होती.
‘नॅशनल रजिस्टर्स ऑफ स्कॉटलंड’नं स्पष्ट केल्याप्रमाणे, ‘एडिनबर्ग-नॉर्थम्प्टन या करारानं पहिल्या स्वातंत्र्य यु*द्धाचा अंत झाला. या करारानुसार स्कॉटलंडला त्यांच्या ऐतिहासिक नोंदी परत देण्याची तरतूद होती. परंतु, इंग्लंडनं स्कॉटलंडला काहीही परत दिले नव्हते. पुढे इंग्लंडनं काही कागदपत्रे स्कॉटलंडला परत पाठवले. मात्र, तोपर्यंत फक्त २०० कागदपत्रेच शिल्लक राहिली.’
क्रॉमवेलनं आपल्या काळात ही कागदपत्रे इथे-तिथे न हलवता स्कॉटलंडमध्येच ठेवली असती तर ती आजतागायत सुरक्षित राहिली असती. मात्र, त्याने तसे केले नाही. त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं स्कॉटलंडचा मोठा ऐतिहासिक ठेवा पाण्यात गेला. या कागदपत्रांअभावी आजही स्कॉटलंडमध्ये अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडचणी निर्माण होतात आणि याचा दोष सर्वस्वी इंग्लंड आणि क्रॉमवेलच्या माथी जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










