आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गेली अनेक वर्षे भारतात क्रिकेट खेळला जात आहे. आजवर असे अनेक खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांच्यामुळे भारतात क्रिकेट लोकप्रिय झाले आहे. पण भारतातील सर्वांत पहिला क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का ?
जर तुम्हला हे उत्तर माहिती नसेल तर चला जाणून घेऊ कोण होते महाराजा रणजितसिंह आणि त्यांचे भारतीय क्रिकेटमध्ये काय महत्त्वपूर्ण योगदान दिले होते?
भारतीय क्रिकेट टीम आज जे यश संपादन करते आहे त्यामागे रणजित सिंह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
रणजित सिंह यांना भारतातील पहिला क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते.
रणजित सिंह यांचा जन्म १० सप्टेंबर १८७२ रोजी झाला. त्यांचे नाव रणजित सिंह होते पण त्यांना रणजी म्हणून लोक ओळखायचे. १९०७ मध्ये महाराजा रणजी राजगादीवर बसले. असे म्हणतात की, ते एक अत्यंत उत्तम शासक होते. त्यांनी प्रजेची अनेक कामे केली. जामनगर ही त्यांची राजधानी होती. त्यांनी तिथे बंदर उभारले, रस्ते आणि रेल्वेमार्ग यांचा विकास केला. महाराज असले तरी ब्रिटिश सैन्यात एक अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. इतकेच नाही तर, त्यांनी पहिल्या महायु*द्धात फ्रान्समध्ये ब्रिटिश सैन्य दलाचे स्टाफ ऑफिसर म्हणून काम पाहिले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास महाराज रणजी यांच्या विना पूर्ण होत नाही. असे म्हणतात की, राजा रणजी यांचे क्रिकेटवर फार प्रेम होते. ते या खेळात पटाईत देखील होते. यामुळे त्यांना इंग्लंडच्या बाजूने खेळण्याची संधी मिळाली होती. ते उत्तम फलंदाज होते. त्यांच्या शॉट्समुळे बऱ्याचदा इंग्रजसुद्धा अचंबित व्हायचे. इंग्लंडच्या सर्वात दर्जेदार गोलंदाजांचा ते सहज सामना करायचे. त्यांचा प्रत्येक शॉट प्रोफेशनल होता.
राजा रणजी इंग्लंड संघाकडून मॅच खेळायचे. त्यांच्या टीममध्ये राजा रणजी यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळले. त्यांच्यासमोर कोणाचाच निभाव लागत नसे. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी मोठे नाव कमावले होते. संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी १५ कसोटी सामने खेळले. त्यांनी २ शतकं आणि ६ अर्धशतकं देखील केली होती. त्यांचा एव्हरेज ४४.९५ चा होता. त्यांची फलंदाजी चांगली असली तरी बॉलिंगच्या बाबतीत राजा रणजी इतके प्रतिभावान नव्हते. त्यांनी संपूर्ण करिअरमध्ये फक्त चार सामन्यात गोलंदाजी केली होती.
१८९६ साली राजा रणजी यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाच्या विरोधात लढायचे होते. हा त्यांचा पहिलाच सामना होता. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३०५ धावा केल्या होत्या. त्यांच्या बॅटिंगसाठीच त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी अगोदर उत्तम फलंदाज म्हणून कामगिरी केली होती. राजा रणजी बॅटिंगसाठी आले. कोणालाच वाटले नव्हते की राजा रणजी इतकी उत्तम कामगिरी करू शकतील. त्यांनी पहिल्या सामन्यात १५४ धावा करून शतक केले. त्यांची कामगिरी बघून ब्रिटिश लोकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
कोणालाच वाटले नव्हते की एक भारतीय खेळाडू इतकी उत्तम कामगिरी करू शकतो. त्या संपूर्ण मालिकेत राजा रणजी यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चांगलेच वाभाडे काढले होते. त्यांनी त्या सिझनमध्ये २७८० रन्स केले होते. यामुळे त्यांनी एक नवीन रेकॉर्ड रचला होता.
असे म्हणतात की राजा रणजी हे भारतात लोकशाही रुजवण्याच्या विरोधात होते. भारतात राजेशाही कायम राहावी आणि ब्रिटिश राज्य असावे यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले, अनेक संस्थानिकांना त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न देखील केला होता. राजा रणजी आपल्यासारख्या अनेक राजांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांची तब्येत बिघडली. हळूहळू त्यांची अवस्था इतकी वाईट झाली. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच ते दगावले.
महाराज रणजी जरी इंग्लंडच्या बाजूने खेळायचे तरी ते भारतीय खेळाडू होते. त्यांच्यामुळे क्रिकेट भारतात रुजले. त्यामुळे त्यांच्या नावाने राजा रणजी यांच्या नावावर सुप्रसिद्ध ‘रणजी ट्रॉफी’ची सुरुवात झाली. ४ नोव्हेंबर १९३४ रोजी मद्रास आणि म्हैसूर संस्थानांच्या दरम्यान रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळण्यात आला. १९३४ साली या ट्रॉफीवर मुंबईच्या संघाने आपले नाव कोरले. यानंतर मुंबईच्या संघाने सलग १५ वेळा ही ट्रॉफी पटकावली. भारतीय क्रिकेटची पायभरणी करणारे राजा रणजी व त्यांचे क्रिकेटसाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










