दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव पेशव्यांच्या इतिहासाच्या खुणा जपतोय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. अशाच काही ऐतिहासिक ठिकाणांपैकी पुण्यापासून अगदी जवळ आणि दिवे घाटाच्या पायथ्याला एक तलाव आपल्याला पहायला मिळतो. हा तलाव आपण दिवे घाट चढताना कायम पाहत असतो पण फार कमी लोकं या ऐतिहासिक तलावाला भेट देत असतात. हा ऐतिहासिक तलाव ‘मस्तानी तलाव’ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे.

पुण्यामधून आपण ‘सासवड’ कडे जाऊ लागलो की साधारणपणे २० कि.मी अंतरावर दिवेघाटाच्या अलीकडून एक रस्ता आपल्याला ‘वडकी’ या गावापर्यंत घेऊन येतो. पूर्वी याठिकाणी जाण्यास जवळपास ३ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, आता रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला ‘मस्तानी तलाव’ आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे.

दिवे घाटामधून दिसणारे ‘मस्तानी’ तलावाचे दृश्य.

तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे.

या तलावाच्या पश्चिमेस आपल्याला तीन बुरुजांचे बांधकाम पहावयास मिळते. तसेच ‘मस्तानी तलाव’ याच्या काठावर एक गणपतीचे मंदिर देखील आहे.

या गणपतीच्या मंदिरातील मूर्ती अत्यंत सुरेख आहे. तसेच ‘मस्तानी तलाव’ याच्या भिंतीवरून थोडे चालत गेले असता आपल्याला एक शिवलिंग देखील पहायला मिळते. या तलावाच्या इथे आपल्याला एक भूयाराचे तोंड देखील पहायला मिळते. या सुंदर ‘मस्तानी’ तलावाजवळ आपल्याला एक शिवमंदिर आणि हनुमानाची मूर्ती देखील पहायला मिळते.

या मस्तानी तलावाच्या बांधकामासंबंधात आपल्याला एक ऐतिहासिक पत्र मिळते ते पत्र पुढीलप्रमाणे:-

‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसिजे. छ. १२ मोहरमी सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वी नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तर दक्षिण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्ण पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात, कोठे चार हात येणे प्रमाणे होते. पुढे उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोल्यांतील ओढे व दक्षिणेकडील कळ्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तळ्यात आणिले आहेत. सदरहू लिहिण्याप्रमाणे लिंगोजी निंबोणकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले’.

 

‘मस्तानी’ तलावाचा बंधारा.

तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हा ‘मस्तानी तलाव’ बांधून घेतल्यावर पुढे नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये इ. स. १७५१ मध्ये या तळ्यासाठी काही रक्कम खर्च केल्याचे ‘नानासाहेब पेशवे’ यांच्या रोजनिशीमध्ये दिलेले आहे.

‘मस्तानी तलाव’ हे नाव कसे पडले या संबंधीत २५० वर्षांपूर्वीचा एक महत्वाचा कागद पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथे इतिहास संशोधक ‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडला असता त्यामध्ये एक नोंद त्यांना मिळाली त्या नोंदीमध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-

‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’ 

‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडलेले ‘मस्तानी तलाव’ या संबंधित कागद. छायाचित्र क्रेडीट / सौजन्य राज मेमाणे.

‘बाजीराव पेशवे’ यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून ‘मस्तानीकडे’ सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. या नोंदीमध्ये असलेल्या बागेचा आज कोठेही पत्ता मात्र लागत नाही. मात्र हे स्थळ अजूनही उपेक्षित आहे.

गणपती मूर्ती, शिवलिंग असलेले मंदिर आणि ‘मस्तानी’ तलावाचे भुयार.

मुळातच ‘दिवेघाट’ आणि ‘सासवड’ या परिसरात पाऊस खूप कमी पडतो तसेच या तलावातील गाळ मध्यंतरी काढला होता परंतु परत तो साचला आहे. त्यामुळे या तलावात जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा हा ‘मस्तानी तलाव’ पाण्याने भरतो अन्यथा हा तलाव कोरडा असतो. मध्यंतरी जोरात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरलेला होता. ‘मस्तानी तलाव’ संपूर्ण पाण्याने भरल्याचे वृत्त देखील काही वृत्तपत्रांमधून झळकले होते. असा हा ‘वडकी’ गावाजवळील सुंदर ‘मस्तानी तलाव’ नक्कीच भेट देण्यासारखा आहे!


सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित.

संदर्भग्रंथ:-

१) बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी:- ग. चि. वाड, इंदूप्रकाश प्रेस, १९०६.
२) ‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडलेला ‘मस्तानी तलाव’ या संदर्भातील कागद त्याची बातमी:-   http://mtonline.in/ECXoUZ/a31my
कसे जाल:-

पुणे – हडपसर – वडकी


महत्वाचे:-
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!