आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कुस्तीमध्ये मोहम्मद अली, फुटबॉलमध्ये पेले आणि क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांना जे स्थान आहे तेच स्थान हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद यांचे आहे. मेजर ध्यानचंद यांच्याशिवाय भारतीय हॉकीचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. भारतीय लष्करातील शिपाई ते मेजर पदापर्यंतचा प्रवास पूर्ण करणारे ध्यानचंद यांच्यातील धाडसीवृत्तीही वाखाणण्याजोगी होती.
त्यांच्या खेळाचे काही किस्से इतके लोकप्रिय आहेत की, त्यांच्यावर आजही चर्चा होताना दिसते. मेजर ध्यानचंद यांचे भारतप्रेम तर अतुलनीय होते. जमर्नीचा हुकुमशहा हि*टल*रचा प्रस्ताव नाकारून त्यांनी शेवटपर्यंत भारताचीच सेवा केली.
मेजर ध्यानचंद आणि हि*टल*र यांच्यातील हा किस्सा आवर्जून वाचायलाच हवा.
१९३६ साली हि*टल*रच्या जर्मनीत ऑलम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या महिनाभर आधी म्हणजेच १७ जुलै १९३६ रोजी जर्मनी आणि भारतीय हॉकी संघ यांच्यात एक सराव सामना झाला होता ज्यात जर्मनीकडून १-४ अशा फरकाने भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.
एकापेक्षा रथी-महारथी समजले जाणारे खेळाडू संघात असूनही भारतीय संघाचा असा पराभव होणे, ही भारताची नाचक्कीच होती. हा पराभव मेजर ध्यानचंद यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. ऑलम्पिक सामन्यात याची पुनरावृत्ती होऊ नये, ही चिंता त्यांना सतावत होती. याच चिंतेने त्यांची रात्रीची झोप उडवली होती. दुसऱ्या दिवशीच त्यांनी आपल्या संघासाठी एक नवी रणनीती आखली. हॉकीमध्ये भारताच्या नावाचा एक दबदबा निर्माण झाला होता आणि भारताची प्रतिमा डागाळली जाणार नाही याची त्यांना खरी काळजी होती.
ऑलम्पिक सामन्याचा दिवस उजाडला. ५ ऑगस्ट १९३६ रोजी पहिला सामना हंगेरी विरुद्ध होता. या सामन्यात भारतीय खेळाडू अधिक आत्मविश्वासाने खेळत होते. हंगेरीला ४ गोलनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर अमेरिकेला ७-० आणि जपानला ९-० अशा मोठ्या फरकाने हरवत भारताने पुन्हा एकदा हॉकीमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यानंतर भारताचा सामना होता फ्रांसशी. या सेमी-फायनल सामन्यातही भारताने फ्रांसला १०-० अशी मात दिली.
ऑलम्पिकचे सुवर्णपदक भारताशिवाय कुणीच नेणार नाही असेच काहीसे वातावरण झाले. आतापर्यंतच्या सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करण्याची संधी दिली नव्हती. ध्यानचंद यांच्या खेळाबद्दल तर आधीच अनेक समज-गैरसमज पसरले होते. त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक बसवला असल्याचेही आरोप त्यांच्यावर करण्यात आले. कित्येकदा त्यांची हॉकी स्टिकही बदलण्यात आली होती.
जर्मनी संघ देखील आपल्या प्रतिस्पर्धी संघांना हरवून फायनलपर्यंत पोहोचला होता. हुकुमशहा हि*टल*रला तर हार बिलकुल पसंत नव्हती. त्याच्या देशात त्याच्याच संघाविरुद्धचा हा सामना होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर थोडे दडपण असणे साहजिक होते. आधीच जर्मनीकडून त्यांना चांगलाच फटका बसला होता. जर्मन संघ आपल्यापेक्षा अधिक मजबूत आहे अशी काहीशी भारतीय खेळाडूंची मानसिकता बनली होती. मेजर ध्यानचंद यांची मानसिकताही यापेक्षा वेगळी नव्हती.
या अंतिम सामन्यासाठी जर्मनीने विशेष तयारी केली होती. आपल्या संघाच्या कामगिरीवर हि*टल*रला अभिमान होता. त्याला या अंतिम सामन्यात आपल्या संघाकडून खूप अपेक्षा होत्या. या सामन्यासाठी त्याने स्टेडीयममध्ये विशेष बदल करवून घेतले. आपल्या खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी दूरून लोकांना बर्लिनमध्ये बोलावून घेतले. तो स्वतःही या अंतिम सामन्यासाठी हजर राहणार होता. काही झाले तरी आपला संघ जिंकला पाहिजे, एवढेच हि*टल*रला माहिती होते.
एक महिन्यापूर्वीच झालेल्या सामन्यात आपण भारताला मात दिली होती. त्यामुळे भारतीय संघाला हरवणे काही फार मोठी बाब नाही, अशी जर्मन खेळाडूंची मानसिकता होती. त्यांच्यावर या सामन्याचे अजिबात दडपण नव्हते.
जर्मनीचा संघ भारतीय संघाच्या तुलनेत मजबूत आहे, अशी चर्चा जोरात सुरू होती. जर्मनीचा विजय होणारच असाही अनेकांनी पक्का समज करून घेतला होता.
१५ ऑगस्ट १९३६ रोजी हा सामना पार पडला. मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने स्वतःवरील दडपण झुगारून दिले. ते आता जर्मनीशी भिडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते. कॅप्टन ध्यानचंद यांनी आपल्या शब्दांतून आपल्या खेळाडूंचे मनोबल उंचावले होते. सामना सुरु झाला आणि काही मिनिटांतच ध्यानचंद यांनी प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. जर्मन संघाला गोल करण्याची संधीच न देता ते एकामागून एक गोल करत सुटले.
ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे भारताने ८-१ अशा फरकाने हा सामना जिंकला आणि ऑलम्पिकच्या सुवर्णपदकावर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. या सामन्यात एकट्या ध्यानचंद यांनी सहा गोल करून जर्मनी आणि हि*टल*रच्या स्वप्नांचा चुराडा केला होता.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण होते आणि ते ही हि*टल*रच्या हस्ते! हि*टल*र आणि ध्यानचंद समोर आल्यावर त्यांच्यात काय बोलणे होईल याचा कयास बांधण्याचे काम प्रसारमाध्यमातूनही सुरु होते. हि*टल*रला सामोरे जाण्याच्या कल्पनेने ध्यानचंद यांना आदल्या रात्री झोपच लागली नव्हती.
त्यादिवशी बक्षीस घेण्यासाठी मेजर ध्यानचंद स्टेजवर गेले आणि हि*टल*रने त्यांना सुवर्णपदक प्रदान केल्यानंतर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली. त्याने मेजर ध्यानचंद यांना न्याहाळले, तेव्हा ध्यानचंद यांच्या फाटक्या बुटाकडे त्याचे लक्ष गेले. ध्यानचंद यांच्या फाटक्या बुटातून त्यांचा अंगठा बाहेर डोकावत होता.
त्याने ध्यानचंदना विचारलं, “भारतात काय करतोस?”
ध्यानचंद अजूनही दबावात होते, तिरसट स्वभावाच्या हि*टल*रशी बोलणे म्हणजे एक कसोटीच होती. त्यांनी उत्तर दिले, “लष्करात आहे,” हे उत्तर ऐकून हि*टल*रने पुन्हा एकदा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
“सैन्यदलात कुठल्या पदावर आहेस?” हि*टल*रचा पुढचा प्रश्न.
“पंजाब रेजिमेंटमध्ये लान्स नायक आहे,” ध्यानचंद यांनी उत्तर दिले.
“जर्मनीत आलास तर तुला जर्मनीचे नागरिकत्व देईन आणि सैन्यदलात कर्नल पदही!” हि*टल*रने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीत येण्याचा प्रस्ताव ठेवला.
यावर ध्यानचंद आत्मविश्वासाने पण नम्रपणे उत्तरले, “नाही. मी भारताचे मीठ खाल्ले आहे. माझ्या देशाचा मला अभिमान आहे. मी माझा देश सोडू शकत नाही.”
ज्या हि*टल*रसमोर उभे राहतानाही भल्याभल्यांची भंबेरी उडत असे, त्या हि*टल*रला ध्यानचंद यांनी एका झटक्यात नकार दिला होता. या उत्तराने हि*टल*र आणखीनच प्रभावित झाला. ध्यानचंद यांनी सामना तर जिंकला होताच पण, त्यांनी एका क्रू*र हुकुमशहाचे मनही जिंकले होते. त्यांच्याकडून आलेल्या नकाराबद्दल हि*टल*रला वाईट वाटले नाही. उलट त्यांच्या स्वाभिमानी बाण्याचा त्यानेही आदर केला.
मेजर ध्यानचंद यांचा त्याने योग्य तो आदर सत्कार केला आणि त्यांना सन्मानाने निरोप दिला. तो भलेही जर्मनीचा हुकुमशहा असेल पण ध्यानचंद हॉकीचे बादशाह होते, हे सत्य त्यानेही स्वीकारले.
भारताबद्दल इतकी आत्मीयता, प्रेम आणि समर्पण असणाऱ्या ध्यानचंद यांच्याबद्दलचा हा किस्सा वाचल्यानंतर आपली छाती अभिमानाने फुलून येते. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत १९५६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी, अशा हिऱ्याला भारतरत्न का मिळाला नाही, हा प्रश्न अजुनही त्यांच्या चाहत्यांना छळतो.
भारत सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले जाईल आणि मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल अशी अशा आजही त्यांच्या चाहत्यांना आहे. खरे तर हा मेजर ध्यानचंद यांचा हक्कच आहे. तुम्हाला काय वाटते?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










