आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानव आणि संस्कृती यांचं नातं अतूट आहे. प्रत्येक संस्कृतीत काही असे घटक असतात ज्यामुळे ती दुसऱ्या संस्कृतींपेक्षा वेगळी दिसते. आता हे घटक कोणते तर, भाषा, खाद्यसंस्कृती, इत्यादी. पोशाख हा पण कोणत्याही संस्कृतीतील महत्त्वाचा घटक. पण आज या पोशाखवरूनच कर्नाटकमध्ये वाद सुरू आहे. हा वाद काय आहे? तो कशामुळे सुरू झाला? त्याची पार्श्वभूमी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.
तर हिजाब परिधान करण्यावरून झालेला हा वाद नेमका काय आहे, ते समजून घेऊयात.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर स्थित ज्युनिअर कॉलेजमध्ये काही मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थीनींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेवरून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली. काही आंदोलने ही हिजाबच्या समर्थनार्थ होती तर काही आंदोलने ही हिजाब पद्धतीचा विरोध करण्यासाठी.
हिजाब परिधान केला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला ही काही कर्नाटकातली पहिली घटना नाही. हिजाब परिधान केला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला ही घटना सर्वात आधी डिसेंबर 2021 मध्ये घडली. त्यावेळी चिकमगळुरू जिल्ह्यातील कोप्पा येथे फर्स्ट ग्रेड गव्हर्मेंट कॉलेजमधील हिंदू विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये सर्वांना समान गणवेश असावा या करता “समान गणवेश धरणे आंदोलन” केले. नंतर 6 जानेवारी 2022 ला मंगळुरूमधील कॉलेजमध्ये अशीच घटना घडली. जानेवारी महिन्यात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये समान गणवेश असावा की नसावा हा वाद कर्नाटकात सुरू झाला. 31 जानेवारी 2022 रोजी उडुपीतील विद्यार्थिनींनी हा वाद थेट कर्नाटक उच्च न्यायालयात नेला आणि त्यामुळे कर्नाटकसोबत देशातील धार्मिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
हिजाब परिधान करण्यावरून वाद झाला पण हा हिजाब म्हणजे काय प्रकार आहे ते आता पाहू. हिजाब या शब्दाचा अर्थ कुठलीही गोष्ट झाकणे हा आहे. हिजाब हे एक प्रकारचं कापड आहे. मुस्लिम स्त्रिया हे कापड आपल्या डोक्यावरून, केसांवरून, आणि मानेवरून गुंडाळून घेत असतात. मुस्लिम स्त्रियांच्या मते हिजाब हे अदब आणि सुरक्षित असल्याची भावना निर्माण करते.
आता हिजाबचे विविध प्रकार आहेत. ते प्रकार पुढीलप्रमाणे..
निकाब किंवा नकाब
निकाब किंवा नकाब म्हणजे चेहरा झाकण्यासाठी वापरलेलं कापड. यामध्ये डोकं पूर्णपणे झाकलेलं असतं. इस्लाममध्ये कोठेही चेहरा झाकण्यास सांगितलेलं नाही, फक्त डोके आणि केस कापडाने झाकले पाहिजेत. काही कट्टर इस्लामी देशांत महिलांना तोंड झाकणे हे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत डोके, चेहरा झाकणे आणि फक्त डोळे उघडे ठेवणे हे निकाब किंवा नकाबचे काम आहे. हे कापड महिलांची मान आणि खांद्यापासून छातीपर्यंत येते. निकाब किंवा नकाब हे काळ्या रंगाचे असते.
बुरखा
निकाब किंवा नकाबचा पुढचा स्तर म्हणजे “बुरखा”. जिथे नकाबमध्ये डोळे सोडून पूर्ण चेहरा झाकलेला असतो, तिथे बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. डोळ्यांच्या जागी एक मोकळी जागा तयार केली जाते व या जागेला पारदर्शक कापडाने झाकलं जातं. बुरख्यासोबत शरीर झाकणारा एक झगा ही घातला जातो. मुस्लिम स्त्रिया परपुरुष आपल्याकडे आकर्षित होऊ नये म्हणून परिधान करतात.
अल-अमीरा
“अल-अमीरा” हा पण हिजाबचाच एक प्रकार आहे. अल-अमीरा हा दोन कपड्यांचा संच आहे. यामध्ये डोक्यावर टोपीसारखे कापड घेतलं जातं. आणि दुसरं कापड थोडं मोठं असतं जे डोक्याभोवती गुंडाळून छातीवर ओढलेलं असतं.
अबाया
“अबाया” हा पण हिजाबचाच एक प्रकार आहे आणि बुरख्याचा उपप्रकार आहे. बुरख्यात आणि अबायामध्ये फरक एवढाच असतो की बुरख्यात संपूर्ण शरीर झाकलेलं असतं तर अबाया डोकं आणि शरीर झाकलेलं असतं पण चेहरा उघडा असतो.
दुपट्टा
“दुपट्टा” हा पण एक हिजाबचाच प्रकार आहे. दुपट्टा हा सलवार कमीजचा एक भाग आहे. दुपट्टा हा मुख्यतः डोकं झाकण्यासाठी वापरला जातो.
हिजाबबद्दल कुराण काय सांगतं?
इस्लाम धर्मात मुस्लिम स्त्रियांनी हिजाब घालण्याची प्रथा जरी असली तरीही कुराणामध्ये हिजाब हा शब्द न वापरता “खिमार” हा शब्द वापरण्यात आला आहे. आता खिमार म्हणजे काय? तर खिमार हेही हिजाब सारखेच कापड असते जे स्त्रीच्या शरीराला पूर्णपणे झाकते. हिजाब संदर्भात कुराणात काही वचनं दिली आहेत ती पुढीलप्रमाणे.
कुराणमधील 24:31 (सुरह 24: वचन 31) यामध्ये, “आणि हे पैगंबर, श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा.”
कुराणमधील 33:53 (सुरह 33: वचन 53) यामध्ये, हिजाब म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यात विभाजन करणारा पडदा असा उल्लेख केलेला आहे. कुराणमधील 33:59 (सुरह 33: वचन 59) यामध्ये, असे म्हटले आहे की “हे नबी, आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्यांना त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.”
तर अशाप्रकारे कुराणमध्ये स्त्रियांचा पेहराव कसा असावा याबद्दल सांगितलं गेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर्व गोष्टी फक्त स्त्रियांनाच सांगितलेल्या आहेत का? तर तसे नाही, कुराण मधील 24:30 (सुराह 24: वचन 30) यामध्ये, “Qul lil’mu’minina yaghuddu min absarihim wayahfazu furujahum dhalika azka lahum inna al-laha khabirun bima yasna’una” या वचनाचं भाषांतर पुढीलप्रमाणे-
“हे पैगंबर, श्रध्दावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी. आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे, ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात अल्लाह त्याची खबर राखणारा आहे”. या वचनातील “yaghuddu min absarihim” हे फार महत्वाचं आहे यातील मिन अबसरीहीम या शब्दाचा अर्थ वाईट दृष्टी असा होतो. आता वाईट दृष्टी कुणावर हे सांगण्याची गरज नाही.
वरील परिच्छेदात हिजाबबद्दलचा धार्मिक पैलू आपण पाहिला आता हिजाबबद्दल भारतीय संविधान आणि कायदा काय सांगतो? हे समजून घेऊ.
भारतीय संविधानातील कलम 25 हे कोणत्याही भारतीय नागरिकाला सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार, प्रसार आणि धार्मिक व्यवहारासंबंधीचे स्वातंत्र्य देते. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या धार्मिक प्रथेला खरंच संविधानिक संरक्षणाची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी “आवश्यक धार्मिक प्रथा चाचणी (Essential religious practices test)” या प्रक्रियेचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. पण ही सर्वोच्च न्यायालयाची प्रक्रिया भारतीय नागरिकांच्या धर्माच्या स्वातंत्र्याच्या आड येते अशी या प्रक्रियेबद्दल टीका केली जाते.
आता हिजाब परिधान करण्यावरून हे काही पाहिलं प्रकरण नाही जे न्यायालयात गेलं याचा आधी तीन वेळा केरळ उच्च न्यायालयाने हिजाब परिधान करण्यावरून निकाल दिले आहेत. हे निकाल काय आहेत ते पाहू, 2015 साली ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्टसाठीनॅशनल टेस्टिंग एजंसी यांनी ड्रेस कोड निर्धारित केला होता. ड्रेस कोडची सक्तीचा मुख्य उद्देश हा परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून होता आणि निर्धारीत ड्रेस कोडमध्ये हिजाबचा समावेश नव्हता. 2 मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालून परीक्षा केंद्रावर आल्या व त्यावरून वाद झाला जो पुढे कोर्टात गेला. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने त्या दोन मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्यास परवानगी दिली पण त्यांना हे ही सांगितलं की जर पर्यवेक्षकाला परीक्षेदरम्यान जर काही संशयास्पद आढळून आले तर त्यांना झडती घ्यायची परवानगी आहे.
2016 साली परत केरळ उच्च न्यायालयाने हाच निर्णय Amna Bint Basheer Vs CBSE या 2016 च्या प्रकरणात महिला परीक्षार्थींना परीक्षे दरम्यान हिजाब परिधान करता येईल आणि हिजाब परिधान करणे हे Essential Religious Practice आहे असं जाहीर केलं पण जर गैर प्रकाराचा संशय आला तर हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थीनींची तपासणी होऊ शकते असे ही सांगितले. पण 2018 साली Fathima Tasneem vs State of Kerala या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना हे सांगितले की एखाद्या संस्थेचे सामूहिक अधिकार किंवा मूल्ये ही वैयक्तिक अधिकार किंवा मूल्यांच्या पेक्षा जास्त महत्वाची असतात.
हिजाब परिधान करण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिजाबबद्दल काय विचार आहेत? ते समजून घेणे ही गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आणि इस्लाम दोन्ही विषयांवर भरपूर अभ्यास होता. त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात इस्लाम आणि फाळणी यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मुस्लिम स्त्रियांनी हिजाब आणि बुरखा परिधान करणं हे अत्यंत अप्रगत समाजाचं लक्षण आहे. मुस्लिम समाजात सुधारणा होण्याची अत्यंत गरज आहे असं ही त्यांनी म्हटलं होतं.
आतंकवादी संघटना तालिबान आणि त्यांचे हिजाबबद्दल काय विचार आहेत ते पाहू. मागच्याच वर्षी 15 ऑगस्ट 2021 ला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. अजून देश काबीज करून महिना झाला नसेल तोवर तालिबानने आपलं शैक्षणिक धोरण जाहीर केलं. त्या धोरणात मुलामुलींना एकत्र शिक्षण घेता येणार नाही. तरी या धोरणात एक महत्त्वाची सुधारणा आहे असं म्हणता येईल की महिलांना शिक्षण मिळणार आहे. तालिबानच्या 1996 ते 2001 या पहिल्या कार्यकाळात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली गेली होती. पण आत्ताच्या तालिबानने मुलींना शिक्षणाची परवानगी दिली असली तरीही मुलींनी व महिलांनी हिजाब घालणे हे बंधनकारक केले आहे.
कर्नाटकात हिजाब परिधान करायचा की नाही हा वाद काही अचानक सुरू झालेला नाही, या वादाचं खरं कारण आहे कर्नाटक एज्युकेशन ऍक्ट 1983 आणि या ऍक्टमधीलही कलम 133(2). कर्नाटक एज्युकेशन ऍक्ट 1983मधल्या कलम133(2) अनुसार कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, व कोणत्याही शैक्षणिक संस्थानी जर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जर एखादा गणवेश निश्चित केला असेल तर तो गणवेश शैक्षणिक संस्थांच्या आवारात परिधान करणे हे त्या विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल.
हा आदेश लागू करताना कर्नाटक सरकारने Asha ranjan vs state of bihar या 2017 च्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार दिला आहे. Asha ranjan vs state of bihar 2017 या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की सार्वजनिक हित हे वैयक्तिक हितापेक्षा जास्त महत्वाचं असतं आणि जर तुम्ही Fathima Tasneem vs state of Kerala 2018 चा निकाल पहिला तर या केरळ उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या सुनावणीची पुनरावृत्ती केली आहे.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेने त्यांच्या आवारात गणवेश परिधान करणे बंधनकारक का केले? तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समानता प्रस्थापित व्हावी म्हणून. एखाद्या शैक्षणिक संस्थेत किंवा त्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात जेव्हा आपण पाऊल ठेवतो त्यावेळी त्या शैक्षणिक संस्थेच्या नियमांचे, मूल्यांचे काटेकोरपणे पालन करणे व आपल्या पोशाखाबद्दलचे धार्मिक अथवा वैयक्तिक विचार जर घरी ठेवले तर यात आपलं, त्या शैक्षणिक संस्थेचं आणि समाजाचं कल्याण आहे. पण साधा विचार करा आज आपण जर एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या गणवेशा संदर्भातल्या नियमाचे पालन करू शकत नसू तर भविष्यात या देशाच्या संविधानात दिलेल्या मूल्यांचं, कर्तव्यांचं आणि या देशाच्या कायद्याचं आपण पालन करू शकू का? हा साधा विचार आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर करायला हवा. आज जर आपल्या देशातील नागरिकांनी धर्म, पंथ, जाती विसरून कायद्याचे काटेकोरपणे पालन केले तर कुठे आपला समाज प्रगत होईल व या देशाची भरभराट होईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










