आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘तुमचा जन्म गरीब म्हणून झाला तर त्यात तुमचा काही दोष नसतो पण जर तुमचा मृत्यूसुद्धा त्याच परिस्थितीत झाला तर त्याला सर्वस्वी दोषी तुम्ही असता’ हे वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. जगात असे कितीतरी उदाहरणे आहेत जे गरीब घरी जन्माला येऊन पण त्यांनी आपल्या कष्टाने पुढे जाऊन यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं मिळवलं. अशा व्यक्तिमत्त्वांपैकीच एक म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन.
अमेरिका हा जगातील एक बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. भारताप्रमाणेच अनेक मोठे नेते अमेरिकेच्या इतिहासात सापडतात. असेच एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे रोनाल्ड रेगन. रोनाल्ड हे ८ वर्षं अमेरिकेचे राष्ट्रपती होते.
एक सामान्य लाईफ गार्ड ते राष्ट्रपतीपद, इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास फारच रंजक आहे.
६ फेब्रुवारी १९११ या दिवशी इलिनाय राज्यात रोनाल्ड यांचा जन्म झाला. नंतर काही वर्षांनी रोनाल्ड यांचा पूर्ण परिवार डिक्सन येथे स्थलांतरित झाला. तेव्हा रोनाल्ड हे ९ वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांनी तिथेच एक चपलांचे दुकान चालू केले, व आपल्या उदरनिर्वाहाची सोय केली.
डिक्सन इथेच ते लहानचे मोठे झाले. रोनाल्ड यांना लहानपणापासून खेळांमध्ये विशेष रुची होती. शाळेत असताना त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवलं. त्याच्याच भरवशावर ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लाईफ गार्ड म्हणून काम करू लागले.
पुढे रोनाल्ड यांनी डिक्सनमधल्या युरेका महाविद्यालयात प्रवेश मिळवला. इथे ते अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात पदवीचं शिक्षण घेत होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच त्यांची अभिनयाविषयीची आवड निर्माण झाली. साहजिकच त्यांच्या मनात चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न सजू लागले.
पण हे स्वप्न लगेच पूर्ण होईल एवढं साधं आणि सोपं नक्कीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात अपयश पदरी पडूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. उपजीविकेचे साधन म्हणून एका रेडिओ अँकरची नोकरी पत्करली. शेवटी १९३७ साली रोनाल्ड यांना ती एक संधी मिळालीच. त्याचंच रोनाल्डने सोनं केलं. वॉर्नर बंधूंच्या स्टुडिओसोबत सोबत चक्क ७ वर्षांचा अभिनयाचा करार त्यांनी केला.
चित्रपट क्षेत्रात त्यांचं पाऊल पडलं. या क्षेत्रांत आल्यानंतर त्यांनी अनेक छोटीमोठी कामं केली. अडचणी येऊनही ते थांबले नाहीत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीत ५० चित्रपटांमध्ये काम केले.
१९४७ ते १९५२ या कालावधीत रेगन यांना स्क्रिन ॲक्टर्स गिल्डचे अध्यक्षपद मिळाले, आणि याच दरम्यान त्यांची ओळख प्रसिद्ध अभिनेत्री नेन्सी डेवीससोबत झाली. रेगन यांचा नुकताच घटस्फो*ट झाला होता. त्यांनी १९५२ मध्ये नेन्सी डेवीस या अभिनेत्रीसोबत दुसरं लग्न केलं.
हळूहळू रेगन यांचं जीवन स्थिर होत गेलं. त्यांनी १९५४ साली ‘द जनरल इलेक्ट्रिक थिएटर’ ही साप्ताहिक दूरदर्शन नाटक मालिका आयोजित केली. या मालिकेमुळे निवेदक म्हणून त्यांनी अमेरिकेचा दौराही केला.
यानंतर रोनाल्ड यांनी राजकीय चर्चांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सरकारच्या योजनांवर, धोरणांवर आपली मते व्यक्त केली, आणि इथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९६०च्या सुरुवातीला रेगन अधिकृतपणे रिपब्लिकन नेते झाले.
१९६४ साली त्यांनी अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार बॅरी गोल्डवॉटर यांच्यासाठी टीव्हीवर एक भाषण दिलं होतं. ते भाषण अतिशय गाजलं आणि त्याबरोबरच रोनाल्ड रेगन पूर्णपणे राजकीय वर्तुळात उतरले.
या प्रसिद्धीनंतर जवळपास दोन वर्षांनी त्यांनी पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला तब्बल १० लाख मतांनी हरवून रोनाल्ड रेगन कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदी विराजमान झाले. १९७० मध्ये देखील पुन्हा एकदा त्यांनाच निवडलं गेलं.
याच वर्षी रेगन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचीसुद्धा तयारी केली होती. परंतु याकडे पक्षाने दुर्लक्ष केले. नंतर १९८० च्या निवडणुकीच्या दरम्यान रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रपती राष्ट्राध्यक्षअधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.
१९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज एच. बुश हे त्यांचे प्रतिस्पर्धी अध्यक्ष जिमी कार्टर आणि उपराष्ट्राध्यक्ष वॉल्टर मोंडाले यांच्याविरूद्ध उभे राहिले.
या निवडणुकीत रोनाल्ड यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. ते वयाच्या ६९व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेलेले सर्वांत वयस्कर व्यक्ति होते. एवढं वय असून निवडणूक लढवल्याने त्यांना प्रचंड प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. पण त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत सर्व निंदकांंना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आजवरच्या इतिहासात रोनाल्ड रेगन हे एकमेव असे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी आपल्या विरोधी उमेदवाराला इतक्या मोठ्या फरकाने हरवलं होतं.
१९८० च्या अध्यक्षीय निवडणुकीत रेगन यांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा सर्वाधिक मतदारांची मते मिळाली. रेगन यांनी इतिहासातील सर्वाधिक ५४,४५५,०७५ इतकी लोकप्रिय मते आणि ५२५ मतदार मते मिळविली. त्यांना एकट्याला सुमारे ५१% लोकप्रिय मते मिळाली होती. त्या निवडणुकीत अमेरिकेच्या ५० पैकी ४९ राज्यांत रेगन यांच्या पक्षाने विजय मिळाला होता.
खरंतर हा विजय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा विजय होता. या विजयामुळे समोरचा पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत झाला होता. यानंतर रेगन हे १९८१ ते १९८९ हा सुमारे ८ वर्षं अमेरिकेचे राष्ट्रपती होते.
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर केवळ दोन महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्यावर ३० मार्च १९८१ रोजी गोळ्या घालून ह*ल्ला करण्यात आला. जॉन हिनक्ले जूनियर या मानसिक रोग्याने हा राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यावर ह*ल्ला केला होता.
यावेळी सुदैवाने राष्ट्राध्यक्षांच्या हृदयात गोळी न लागता ती बाजूला लागली आणि त्यांचे प्राण वाचले, आणि त्यांना पुनर्जन्म मिळाला. रेगन यांना काही दिवसांतच दवाखान्यातून सोडण्यातही आलं. पण या घटनेचे परिणाम हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर झाले.
या घटनेमुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








