आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जानेवारी २०२१ मध्ये भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी वर्णी लागली. त्यांच्या रुपात पहिल्यांदाच जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला एक महिला कारभारीण मिळाली. मात्र, अमेरिकन राजकारणात एक महिला अशी होऊन गेली आहे जिनं कमलाच्याही अगोदर अमेरिकेचा कारभार पाहिला अन् तेही राष्ट्राध्यक्ष म्हणून!
आता तुम्ही म्हणाल अशी नोंद तर कुठेच दिसत नाही. अमेरिकेतील मागील कित्येक निवडणुकांचा इतिहास धुंडाळला तर त्यातही कुठे महिला राष्ट्राध्यक्ष झाल्याचं दिसत नाही. तुमचंही बरोबर आहे. एका महिलेनं अमेरिकेचा कारभार पाहिल्याची अधिकृत नोंद नाही कारण तिची निवड रितसर निवडणूक होऊन झालीच नव्हती! आपल्या पतीच्या जागी देशाचा कारभार पाहणारी ही महिला होती तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा..
आपल्याकडे गाव-खेड्यांमध्ये पतीचा जो हुद्दा असेल तो अनधिकृतपणे आपोआप त्याच्या पत्नीला मिळतो. उदाहरणार्थ पाटलाची बायको पाटलीण, मास्तरची बायको मास्तरीण, डॉक्टरची बायको डॉक्टरीण म्हणून ओळखली जाते. राजकारणात सध्या काहीसं वेगळ चित्र दिसत. महिला सरपंच असलेल्या बहुतांशी गावांमध्ये त्यांचे पतीच गावचा कारभार पाहतात आणि खरी सरपंच मात्र, नामधारी होऊन राहते.
असाच एक किस्सा अमेरिकेत देखील घडला होता. फरक फक्त इतकाचं आहे की, तिथे एका महिलेनं आपल्या पतीच्या जागी देशाचा कारभार पाहिला होता. ती महिला होती एडिथ बोलिंग-विल्सन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांची पत्नी. तसंही अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या पत्नीला ‘फर्स्ट लेडी’म्हणून संबोधल जातं. त्यांना मोठा सन्मानही दिला जातो. मात्र, एडिथ यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून खरखुरं कामकाज सांभाळलं होतं.
एडिथ बोलिंगचा जन्म १५ ऑक्टोबर १८७२ रोजी व्हर्जिनियाच्या वायथविले येथे झाला. तिचे वडील (विल्यम होलकॉम्ब बोलिंग) सर्किट कोर्टाचे न्यायाधीश होते. तिच्या आईचं नाव सारा स्पीयर्स. एडिथचं सुरुवातीचं शिक्षण घरीचं झालं. तिच्या आजीनं तिच्या शिक्षणात आणि जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. ठाम निर्णय घेण्याची वृत्ती एडिथनं आपल्या आजीकडूनचं घेतली होती.
जेव्हा एडिथ १५ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मार्था वॉशिंग्टन कॉलेजमध्ये दाखल केलं. त्या कॉलेजमध्ये उत्कृष्ट संगीत शिकवलं जाई त्यामुळं तिला त्या शाळेत टाकण्यात आलं. मात्र, तिचं अभ्यासात मन रमलं नाही. ती अतिशय बेशिस्त विद्यार्थीनी ठरली. तिथे ती फक्त एक सेमिस्टर टिकू शकली नंतर तिनं कॉलेज सोडून दिलं.
आपल्या बहिणीला भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेलेल्या एडिथची भेट नॉर्मन गाल्ट यांच्याशी झाली. गाल्ट शहरातील प्रमुख ज्वेलर होते. ते दोघे प्रेमात पडले, या जोडप्यानं ३० एप्रिल १८९६ रोजी लग्न केलं. १९०३ साली, एडिथला एक मुलगा झाला मात्र, त्याच्या लगेच मृत्यू झाला. कठीण बाळंतपणामुळं ती पुन्हा कधीच आई होऊ शकली नाही. जानेवारी १९०८ मध्ये, वयाच्या ४३ व्या वर्षी नॉर्मन गाल्टचा अनपेक्षितपणे मृत्यू झाला.
सुरुवातीच्या आयुष्यात अनेक धक्के सहन केल्यानंतर १९१५ साली एडिथच्या आयुष्यानं मोठ वळण घेतलं. एकदा एडिथ तिचा मित्र ऑल्ट्रूड गॉर्डन आणि त्याच्या प्रेयसीसोबत बाहेर गेली होती. गॉर्डन त्यावेळी व्हाईट हाऊसची डॉक्टर कॅरी ग्रेसनला डेट करत होता. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांची बहिण हेलन बोन्स डॉक्टर कॅरीची जवळची मैत्रिण होती. त्यामुळं एडिथ आणि हेलन बोन्स यांची ओळख झाली. तिनं एडिथला चहासाठी व्हाईस हाऊसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
एडिथ जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये गेली तेव्हा राष्ट्राध्यक्ष विल्सन पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडले. लवकरच त्यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. त्यांच्या नात्याविषयी अमेरिकेत आणि युरोपमध्ये जोरदार चर्चा रंगल्या. विल्सन यांना एडिथसोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांचे राजकीय सल्लागार घाबरले. विल्सन आणि एडिथची भेट केवळ तीन महिन्यांची होती. याशिवाय निवडणुका देखील तोंडावर होत्या.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या वर्षभरातच एडिथशी लग्न केल्यानं विल्सनचा पराभव होऊ शकतो, अशी भीती राजकीय सल्लागारांना वाटली. त्यांनी एडिथ आणि विल्सनमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे देखील प्रयत्न करून पाहिले. मात्र, त्यांना यश आलं नाही. शेवटी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि एडिथ यांचा विवाह तर झालाच आणि ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून देखील आले.
१९१९ साली कामाच्या अतिव्यापामुळं राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांची प्रकृती खालावली. एक दिवस विल्सन बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे एडिथला आढळले. विल्सन पूर्णपणे कार्य काम करू शकत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये एडिथनं खंबीरपणे देशाच्या कारभारात पाऊल टाकलं आणि निर्णय घेण्यास सुरुवात केली. विल्सन राजीनामा देणार नसल्याचं तिनं जाहीर केलं.
राजीनामा दिला तर विल्सन नैराश्यात जातील, अशी तिला भीती होती. आपल्या पतीची एवढी काळजी करण्यानं अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं. कॅबिनेट, काँग्रेस, प्रेसपासून ते अगदी लोकांपर्यंत तिनं विल्सनची वैद्यकिय स्थिती यशस्वीपणे लपवून ठेवली. यातंच एडिथचं मोठ यश मानलं जातं. सार्वजनिकरित्या प्रसिद्ध होणारे वैद्यकीय बुलेटिन ती स्वत: तपासल्याशिवाय प्रसिद्ध करत नसे.
विल्सनला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळं जी काही कामं किंवा निर्णय असतील ते माझ्या कानावर घाला, असं तिनं सर्वांना सांगून ठेवलं होतं. सुदैवानं, ऑक्टोबर १९१९ ते मार्च १९२१ या एक वर्ष आणि पाच महिन्यांच्या काळात अमेरिकेला कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला नाही.
सनदी अधिकाऱ्यांशी मात्र, तिचा काही प्रमाणात संघर्ष झाला. सचिवानं एकदा विल्सनच्या परवानगीशिवाय कॅबिनेटची बैठक बोलावल्याचं एडिथला समजल तेव्हा तिने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. जे काही लहान-सहान मुद्दे होते ते एडिथनं समर्थपणे हाताळले.
एडिथनं १९२४ पर्यंत आपल्या पतीचा मृत्यू होईपर्यंत त्यांची प्रचंड काळजी घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर तिनं आपलं उर्वरित आयुष्य त्यांचा वारसा सांभाळण्यासाठी समर्पित केलं. तिच्या पतीच्या सर्व कागदपत्रांचे साहित्यिक अधिकार स्वत:कडे ठेवून ते व्हाईट हाऊसमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी ठेवले होते. मात्र, ज्यांच्यावर तिचा विश्वास नव्हता अशांना तिनं आपल्याकडे प्रवेश नाकारला.
दुसऱ्या महायु*द्धापूर्वी, तिनं विल्सनच्या ‘लीग ऑफ नेशन्स’च्या व्हिजनचा सन्मान करणाऱ्या कार्यक्रमांसाठी युरोपला अनेक भेटी दिल्या. तिनं डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणात कधीही सक्रीयपणे सहभाग घेतला नाही. तरी देखील तिला १९२८ साली उपराष्ट्राध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवार मानलं गेलं होतं. त्यावर्षी एडिथनं राष्ट्रीय अध्यक्षीय अधिवेशनात भाग घेतला आणि व्यासपीठावर भाषण देखील केलं होतं. तिनं अनेक सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली. एडिथ विल्सनचे अनेक राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींशी सलोख्याचे संबंध होते. ग्रेस कूलिज, एलेनोर रूझवेल्ट आणि मामी आयसेनहॉवर यांच्याशी तर तिची घनिष्ठ मैत्री होती.
२८ डिसेंबर १९६१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने एडिथ विल्सनचं निधन झालं. त्या दिवशी त्या मेरीलँड आणि व्हर्जिनिया दरम्यान, पोटोमॅक नदीच्या पलीकडे असलेल्या वुड्रो विल्सन पुलाच्या लोकार्पण समारंभात पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार होत्या. विशेष म्हणजे ज्या दिवशी एडिथचा मृत्यू झाला त्यादिवशी वुड्रो विल्सन यांची १०५ वी जयंती होती. वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रलमध्ये आपल्या पतीच्या शेजारीच एडिथवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










