The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. सलीम अली होते म्हणून सायलेंट व्हॅली टिकली, नाही तर…

by द पोस्टमन टीम
14 March 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जिम कॉर्बेट हे प्राणीप्रेमी म्हणून भारतातच नाही तर जगभरात विख्यात आहेत. त्यांच्या शिकार कथांच्या लिखाणाने हजारो वाचकांच्या काळजात धडकी भरवली, तसंच अनेकांच्या मनात प्राणी आणि पर्यावरणाबद्दल प्रेमही रुजवलं. अनेक नर*भक्षक वाघांची शिकार केल्यानंतर; शिकारी हीच ओळख ठसवल्यानंतर जिम कॉर्बेट हे प्राणीप्रेमी बनले.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. अशीच काहीशी कथा भारतात पक्षी निरीक्षणाचा पाया रुजवणाऱ्या डॉ. सलीम अली यांची आहे.

मुंबईच्या खेतवाडीमध्ये डॉ. सलीम अली यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणी कुणीतरी छर्र्याची बंदूक भेट म्हणून दिली. या बंदुकीने आजूबाजूला दिसणारे पक्षी मारण्याचा छंद त्यांना जडला. त्यांनी मारलेली एक चिमणी इतर चिमण्यांपेक्षा जरा वेगळी दिसली. तिच्या गळ्याखाली पिवळ्या रंगांचा एक ठिपका दिसला. त्यांनी उत्सुकतेने तो पक्षी आपल्या मामांना दाखवला. त्याची ओळख विचारली. मामांनाही ते माहित नव्हतं.

मात्र, त्यांनी दुर्लक्ष करून सलीमच्या उत्सुकतेचा बळी जाऊ दिला नाही. त्यांनी त्या पक्ष्याला आणि सलीमला घेऊन थेट ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ गाठली. तिथल्या तज्ज्ञांनी सलीमला त्या पक्ष्याची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे इतर अनेक भुसा भरलेले पक्षी दाखवून त्या बद्दलची माहितीही दिली.



मामांनी घडवलेली ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ची भेट ही डॉ. सलीम अली यांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली. या भेटीने त्यांच्या मनात पक्ष्यांच्या जगाबद्दल अपार उत्सुकता जागवली आणि त्याची परिणिती म्हणून भारतात पक्षी निरीक्षणाची मोठी परंपरा निर्माण झाली.

शालेय शिक्षणानंतर डॉ. सलीम अली यांना प्राणीशास्त्रात पदवी घ्यायची इच्छा होती. मात्र, विद्यार्थी म्हणून ते लौकिकार्थाने ‘हुशार’ कधीच नव्हते. त्यांना इंग्रजीसह अनेक विषयांमध्ये अडचण होती. त्यामुळे त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला नाही.

विज्ञानाच्याच नाही तर एकूणच उच्च शिक्षणाचा नाद सोडून ते ब्रम्हदेशात रवाना झाले. तिथे त्यांच्या बंधूंच्या व्यवसायात ते मदत करत होते. फावल्या वेळात जवळच्या जंगलात फेरफटका मारायचा. तिथल्या पक्ष्यांचं निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवायच्या, हा छंद डॉ सलीम अली यांनी जोपासला.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

ब्रह्मदेशातच सन १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला. आयुष्यभर साथ देणारी आणि खंबीरपणे शब्दशः ‘पाठराखण’ करणारी आयुष्याची साथीदार त्यांना तेहमिना त्यांच्या रूपाने मिळाली. डॉ. सलीम अली यांच्या बंधूंच्या व्यवसायाला अपेक्षित यश न मिळाल्याने सन १९२४ मध्ये रंगून इथला व्यवसाय बंद करून ते भारतात परत आले.

ब्रह्मदेशातल्या वास्तव्याच्या काळात तेहमिना यांना डॉ. सलीम अली यांना असलेला पक्ष्यांच्या अभ्यासाचा ध्यास जाणवला होता. भारतात आल्यावर डॉ. सलीम अली यांनी आपल्या आवडीच्या पक्ष्यांच्या क्षेत्रात उदरनिर्वाहाचं साधन शोधावं, यासाठी तेहमिना यांनी प्रोत्साहन दिलं. मात्र, सलीम अलींचं अपुरं शिक्षण ही अशी नोकरी मिळवण्यातली मोठी अडचण होती. मात्र, इच्छा असली की मार्ग निघतो हे डॉ. सलीम अली यांच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरलं. जवळच्या ओळखीतून त्यांना ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’मध्ये अल्प वेतनाची का होईना; पण नोकरी मिळाली.

काही काळात थोडासा पैसा गाठीशी बांधून डॉ. सलीम अली यांनी जर्मनी गाठली. कारण त्या वेळी भारतात पक्षिशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. जर्मनीत पक्षिशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन डॉ. सलीम अली यांनी काही काळ इंग्लंडमध्ये या क्षेत्रात काम केलं. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले. मात्र, भारतात पक्षिशास्त्राचा मागमूसही नसल्याने त्यांना नोकरी मिळणे कठीण काम झालं.

मायावी मुंबई महानगरात राहणं कठीण झाल्याने डॉ. सलीम अली यांना आपला मुक्काम अलिबागजवळ किहीम इथे हलवावा लागला. मात्र, इथे येणं त्यांच्या पथ्यावरच पडलं. या निसर्गरम्य ठिकाणी त्यांना आपला पक्षी निरीक्षणाचा अभ्यास नेटाने पुढे नेणं सोपं झालं.

इथे त्यांनी सुगरण या पक्ष्याच्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित केलं. सुगरण पक्ष्यावर सखोल अभ्यास करून त्यांनी शोधनिबंध लिहून तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे पाठवला. ‘बीएन्‌एच्‌एस’च्या जर्नलमध्ये तो प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध झाला. या लेखाने डॉ. सलीम अली यांचं नशीब पालटवलं. या शोधनिबंधाने त्यांना पक्षीतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली.

पक्ष्यांची शिकार करून, त्यांच्या शरीरात भुसा भरून त्याचा संग्रह करणं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास नाही; हे त्यांनी भारतालाच नाही तर जगाला दाखवून दिलं. इथून पुढे त्यांनी विशेषतः भारतात पक्षिशास्त्र रुजवलं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशभरात हजारो पक्षिनिरीक्षक आणि अभ्यासक तयार झाले

पक्षी संशोधक म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर सन १९३० पासून डॉ. सलीम अली यांना ब्रिटिश सरकारच्या आणि देशभरातल्या विविध संस्थानांच्या पुढाकाराने चालवल्या जाणाऱ्या पक्ष्यांशी संबंधित उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू लागली. पक्ष्यांचा संहार करून त्यांच्या शरीराचा अभ्यास करण्यात आपल्याला रस नाही. हे काम कोणीही अल्पशिक्षित आणि पक्ष्यांबाबत असंवेदनशील असलेला माणूसही करू शकेल; अशी भूमिका डॉ. सलीम अली यांनी ठामपणे घेतली.

आपण केवळ पक्षी निरीक्षण करून त्यांच्या जीवनशैलीबद्दल अभ्यास करून त्याच्या नोंदी करून ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे डॉ. सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या अभ्यासाला मोठी गती मिळाली. देशाच्या वेगवेगळ्या भागात अधिवास असलेल्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. वायव्य सरहद्द प्रांतापासून ते केरळच्या जंगलांपर्यंत आणि कच्छच्या वाळवंटापासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत त्यांनी अथक प्रवास केला.

या प्रवासात त्यांनी असंख्य पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून त्याच्या नोंदी करून ठेवल्या. पक्ष्यांचे वर्तन, कालमान आणि हवामानानुसार पक्ष्यांच्या वर्तनात होणारे बदल, त्यांच्या स्थलांतराच्या पद्धती, विणीचे हंगाम अशा बाबींवर मोठ्या प्रमाणावर माहिती जमा केली.

डॉ. सलीम अली यांच्या या कामात त्यांच्या पत्नी तेहमिना या कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. डॉ. सलीम अली यांच्या अभ्यास प्रकल्पांचे संपूर्ण नियोजन तेहमिना यांनी आखले. सन १९३९ मध्ये तेहमिना यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ सलीम अली यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. काही काळ ते अक्षरश: कोलमडून गेले. मात्र, कालांतराने ठाम निर्धाराने स्वतःला त्यातून सावरून उरलेलं आयुष्य पूर्णपणे पक्ष्यांच्या अभ्यासासाठी अर्पण करण्याचा निश्चय त्यांनी केला आणि देशभरातल्या पक्ष्यांच्या अभ्यासाचा अनमोल ठेवा जगाला प्रदान केला.

डॉ. सलीम अली यांनी आयुष्यभर पक्ष्यांचा अभ्यास केला. त्यावर अनेक शोधनिबंध लिहिले. जगभरात पक्षी तज्ज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त केला. मात्र, त्यांनी हे ज्ञान केवळ अभ्यासक आणि तज्ञांपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या लिखाणामुळे लोकांमध्ये पक्ष्यांबद्दल उत्सुकता आणि आस्था निर्माण झाली. त्यातूनच देशभरात हजारो हौशी पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक घडले.

डॉ. सलीम अली यांचं सन १९४३ मध्ये लिहिलेलं ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्‌स’ हे पुस्तक आजही भारतातले पक्षी ओळखण्यासाठी संदर्भ म्हणून वापरलं जातं. त्यांनी लिहिलेल्या ‘हँडबुक ऑफ बर्ड्‌स ऑफ इंडिया ॲन्ड पाकिस्तान (पिक्टोरियल गाईड)’ या तब्बल १० खंड असलेल्या ग्रंथाने त्यांना पक्षी अभ्यासाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली.

डॉ. सिडने डिलन रिप्ली यांच्या बरोबर अभ्यास करून डॉ. सलीम अली यांनी भारतीय पक्ष्यांच्या १ हजार २०० जाती आणि २ हजार १०० उपजातींच्या वर्तनाच्या आणि वर्णनाच्या नोंदी आणि सर्वांगीण शास्त्रशुद्ध माहिती छायाचित्रांसह उपलब्ध करून दिली.

सन १९५० ते ६० च्या दशकात भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान आणि केरळमधल्या ‘सायलेंट व्हॅली’ राष्ट्रीय उद्यानात प्रस्तावित असणाऱ्या प्रकल्पांना डॉ. सलीम अली यांनी ठामपणे विरोध केला. त्या काळात भारतात ‘पर्यावरण’ ही संकल्पनाच विचारात घेतली जात नव्हती. मात्र, प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीच्या या ठिकाणांच्या पर्यावरणाची हानी होणार असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

‘ताजमहाल नष्ट झाला तर पुन्हा बांधता येईल. परंतु ‘सायलेंट व्हॅली’सारखे जंगल एकदा नष्ट झाल्यावर पुन्हा निर्माण करता येणार नाही,’ या शब्दात तत्कालीन पंतप्रधान चरणसिंग यांची त्यांनी कानउघाडणी केली. त्यांच्या या उद्गाराने पंतप्रधान संतप्त झाले होते. मात्र, डॉ, सलीम अली यांच्या शास्त्रशुद्ध मांडणीमुळे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने हे प्रकल्प रद्द केले. इतकेच नाही तर त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचं संरक्षित केलं.

डॉ. सलीम अली यांनी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून, पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आणि आपल्या मार्गदर्शनाखाली घडवलेल्या शिष्यांच्या माध्यमातून दुर्मिळ प्राणी व पक्षी आणि एकूण पर्यावरणाबाबत सामान्य नागरिकांमध्ये केलेले प्रबोधन हा भारतल्या पर्यावरण संरक्षण चळवळीचा पाया ठरला. अर्थातच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ. सलीम अली यांचं स्थान अढळ आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ना*झी सैन्याचे गुप्त संदेश उलगडून हिने दोस्त राष्ट्रांच्या विजयाचा पाया घातला होता

Next Post

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा 'गलता' कुंड कधीही आटत नाही!

'पिंजऱ्यातल्या गोरीलाला ठोसा मारू दे' म्हणून माईक टायसनने झु अधिकाऱ्याला लाच ऑफर केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.