पाकिस्तानच्या या गावात भाजीपाल्याप्रमाणे बंदुका विकल्या जातात

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यावर आपल्याला अनेक स्टॉल्स दिसतात. शहरात तर प्रत्येक वस्तूसाठी एक मोठी बाजारपेठ असते. कुठे कपड्यांचे स्टॉल्स, कुठे भाज्यांचे, कुठे फळांचे, कुठे मिठाईचे असे अनेक प्रकारचे दुकानं आपापल्या वस्तूंची आकर्षक सजावट करून विक्रीसाठी सज्ज असतात. सणासुदीच्या दिवसांत तर या बाजारपेठांवर विशेष चकाकी आलेली दिसते. नेहम पेक्षा गर्दीने फुललेल्या बाजारपेठा, त्यांची चित्रे, बातम्या आपल्यासाठी अजिबात नव्या नाहीत.

परंतु जगात एक अशीही बाजारपेठ आहे जिथे, फळे भाज्या किंवा कपडे नाही तर बंदुके, बॉम्ब विकले जातात. हो! आणि तेही खेळण्यातील नव्हे अगदी खऱ्याखुऱ्या बंदुका आणि बॉम्ब!

पाकिस्तानमधील दर्रा आदम खेल या शहरात ही शस्त्रास्त्रांची बाजारपेठ आहे. जिथे पावलापावलावर बंदुकीची दुकाने आहेत आणि या दुकानातून ओळीने बंदुकांची मांडणी केलेली असते. ती ही विक्रीसाठी.

अगदी साध्या बंदुकीपासून ते AK-47 सारख्या बंदुकापर्यंत सगळी हत्या या बाजारात खुलेआम विकली जातात.

पाकिस्तानच्या पेशावर प्रांतात असलेल्या दर्रा आदम खेल या शहराचा इतिहासच रक्तरंजित आहे. ब्रिटीश सैन्य आणि गावकरी यांच्यातील लढाईत पहिल्यांदा या शहरात रक्ताचे पाट वाहिले. त्यानंतर ४०च्या दशकात या शहरात पठाण आणि शिखांच्या दंगली झाल्या.

आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानचाच भाग असूनही या शहरात पाकिस्तानी कायद्याला काडीचीही किंमत नाही.

या शहराच्या वेशीवरच एक पोलीस चौकी आहे. शहरात प्रवेश करण्यापूर्वीच इथे तुम्हाला सूचना देण्यात येते की, या शहरात पाकिस्तानी कायदा लागू नाही. त्यामुळे शहरात जर तुमचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी पाकिस्तानी सरकार घेणार नाही. या शहरात पश्तून लोक मोठ्या संख्येने राहतात. इथली कायदा आणि सुव्यवस्था देखील त्यांच्याच हातात आहे.

जगातल्या बहुतेक देशात ज्या-ज्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आहे, अशा सर्वच प्रकारच्या अवैध वस्तूंची इथे वैधपणे खरेदी-विक्री केली जाते. हिरोईन, चरस, गांजासारख्या नशेच्या वस्तू इथे सहज मिळतात. याशिवाय दुर्मिळातील दुर्मिळ हत्यारं देखील इथे मिळू शकतात.

या शहराचा कारभार पठाण नियंत्रित करतात, त्यामुळे पाकिस्तान सरकार देखील या व्यापारात हस्तक्षेप करत नाही. या शहरातील हा बाजार सुमारे शंभर ते दीडशे वर्ष जुना आहे. अर्थात, सुरुवातीला या बाजारात हत्यारे विकली जात नसत. चोर, दरोडेखोर जो माल लुटत असत तो इथे आणून विकत असत. थोडक्यात लुटीचा माल विकण्यासाठी वसवलेला हा चोरबाजार होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चोरी केलेल्या गाड्या, घरातील सामान अशा वस्तूंची पूर्वी इथे विक्री होत असे.

१९८०च्या काळात या बाजारात अधिक तेजी आली. सोव्हिएत संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धात मुजाहिद्दीनने भाग घेतला. त्याकाळात इथे हत्यारांची विक्रमी विक्री होऊ लागली. त्यानंतर हळूहळू हे शहर म्हणजे पाकिस्तानी तालिबान्यांचा बालेकिल्ला बनले. या शहरात हत्यारांची आवक वाढली.

शहरातील लोकांनी याचा खूप फायदा घेतला. रशिया आणि अफगाणीस्तानच्या युद्धात या शहरातील लोकांना खूप फायदा झाला. एका रात्रीत या गावातील व्यापार दुपटीने वाढला. या शहरात राहणारा प्रत्येकजण हत्यारांच्याच विक्रीचा व्यवसाय करतो.

या गावातील लोकांना दुसरा कुठला व्यवसाय करण्याची गरजच भासत नाही आणि ते करतही नाहीत. इथला हा व्यवसाय आता इतका सामान्य बनला आहे की, दुकानात छोटी मुले देखील बंदुका विकायला बसतात. ज्या लोकांना महाग बंदुका घेणे परवडत नाही, त्यांच्यासाठी हाताने बनवलेल्या देशी बंदुका मिळतात.

इथल्या बाजारपेठेत मशीनगन, सब-मशीन गन, छोट्या तोफा इतकेच नाही तर रॉकेट लॉंचर देखील सहज मिळतात. ही हत्यारे इथेच तयार केली जातात आणि ही हत्यारे तयार करण्याचे प्रशिक्षण यांना सरकारकडूनच दिले जाते.

सरकारने बंदुका तयार करण्याच्या जुन्या मशिन्स यांना भंगारच्या भावात दिल्या होत्या, असे म्हणतात. सरकारची हीच मोठी चूक ठरली. या मशिन घेतल्यानंतर इथल्या लोकांना बंदुका बनवण्याचे काम सोपे झाले. दर्रा शहरातील बंदूक तयार करणाऱ्या मजुरांसमोर कुठलेही नवे हत्यार ठेवले तरी, केवळ दहा दिवसात ते तसेच, अगदी हुबेहूब दुसरे हत्यार बनवून दाखवू शकतात.

दहशतवाद्यांना देखील याच बाजारपेठेतून हत्यारांचा पुरवठा केला जातो. AK-47 सारखी बंदूक इथे फक्त सात हजारात मिळते. इथल्या इतर हत्यारांची किंमत देखील अगदीच कमी आहे.

मात्र, दहशतवादी इथल्याच बाजारपेठेतून हत्यार खरेदी करून ते पाकिस्तानी लष्कराविरोधात वापरतात हे कळल्यापासून सरकारने या बाजारपेठेची नाकाबंदी केली आहे. अर्थात, त्यांनी इथल्या बाजारपेठेत थेट हस्तक्षेप केलेला नाही पण शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली असून, यासाठी जादा फौज तैनात केली आहे.

या बाजारपेठेतून शास्त्र विकत घेऊन येणाऱ्याला पाकिस्तान सरकार त्वरित अटक करते. सरकारच्या या धोरणामुळे इथल्या बाजारपेठेवर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळे या बाजारपेठेतील तब्बल २५०० दुकाने बंद पडली आहेत. पर्यटकांना देखील या बाजारपेठेत जाण्यास मज्जाव केला आहे.

त्यामुळे आता हत्यारांऐवजी इथले लोक रोजच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी-विक्री करत आहेत. अनेकांनी आपला जुना हत्यारांचा व्यापार बंद केला आहे. त्यांच्याकडील हत्यारे बनवण्याच्या मशिनी त्यांना आता विकायच्या आहेत.

एकेकाळी हत्यारांची ही बाजारपेठ जगातील सर्वात मोठी बाजारपेठ होती. अफगाणिस्तानी अतिरेकी देखील इथल्याच बाजारपेठेतून हत्यार खरेदी करत असत. पर्यटक खास ही बाजारपेठ पाहण्यासाठी परदेशातून इथे येत असत. आता पूर्वीसारखी मोठी उलाढाल इथे होत नसली तरी आजही इथे बंदुका विकल्या जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!