आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
विज्ञानाच्या आधाराने अनेक क्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या मनुष्य प्राण्याच्या असुरक्षिततेची भीती मात्र कधीच संपली नाही. संपणारही नाही. आत्मसरंक्षणासाठी, शिकारीसाठी किंवा यु*द्धजन्य परिस्थितीत उपयोगी ठरतील म्हणून माणसाने अश्मयुगीन काळातील दगडी ह*त्यारांपासून ते आजच्या काळातील अ*णुबॉ*म्बपर्यंत अनेक ह*त्यारांचा शोध लावला.
अर्थात, आज प्रत्येकजण ह*त्यारांचा उपयोग आत्मसंरक्षणासाठीच करतो असे नाही. पण, काही लोकांना वैयक्तिक गरज म्हणून तर काही लोकांच्या व्यवसायाचा भाग म्हणून ह*त्यार बाळगावे लागते.
ह*त्यारांच्या दुनियेत पण कालानुरूप अनेक बदल होत गेले. नवे तंत्रज्ञान येईल तसे ह*त्यारांची रचना, आकार आणि वजन यात फरक होत गेला. यातही बंदुकीची गोष्ट काही वेगळीच.
चीनमध्ये तेराव्या शतकापासून बंदूक-सदृश नळीचा वापर केला जात होता. ज्यात दारू भरून ह*ल्ला करता येत असे. आधुनिक बंदुकीची ही पहिली आवृत्ती.
आजपर्यंत यात अनेक बदल होत गेले. छर्रे भरून वार करता येणाऱ्या नळीच्या बंदुका, डबल नळीच्या बंदुका असे बंदुकांचेही रूप काळाच्या ओघात पालटत गेले. यात रिव्होल्व्हरचा शोध लागल्यावर मात्र बराच फरक पडला. एक तर रिव्होल्व्हर आकाराने छोटी असल्याने बाळगायला आणि वापरायलाही सहज जमते. शिवाय कामगिरी चोख बजावते.
आधुनिक शस्त्रास्त्रांच्या खजिन्यात रिव्होल्व्हरचे स्थान एकदम हटके आहे. पूर्वीच्या लांबलचक नळी असणाऱ्या जड बंदुकींपेक्षा ही छोटी रिव्होल्व्हर वापरणे आज जास्त सोयीचे वाटते.
१८३०च्या आसपास या रिव्होल्व्हरचा शोध लागला. तोपर्यंत एक नळीवाली किंवा दोन नळ्यांची बंदूक वापरात होती. यात लोखंडापासून बनवलेले छर्रे घालून गोळ्या चालवल्या जात.
जर बारा गोळ्या चालवायच्या असतील तर गोळी घालण्याची प्रक्रिया १२ वेळा करावी लागायची आणि एक गोळी घालण्यासाठी कमीतकमी २० सेकंदाचा तरी वेळ लागत असे. म्हणूनच या बंदुकीने ह*ल्ला करण्यासाठी जास्त वेळ लागत असे. इतक्या वेळेत जर समोरच्यानेच चाकू किंवा इतर ह*त्याराने वार केला तर जीवानिशी जाण्याची शक्यता होती.
परंतु, बराच काळ लोकं अशाच प्रकारच्या बंदुका वापरायचे कारण याशिवाय लोकांकडे दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. इतक्यात एकोणिसाव्या शतकातच यात नवीन शोध लागला आणि शस्त्रास्त्रांच्या दुनियेचा इतिहासच बदलून गेला.
१८३६ साली सॅम्युएल कोल्ट नावाच्या एका व्यक्तीने अशा बंदुकीचा शोध लावला ज्यात एकाच वेळी ५ गोळ्या भरता येतील. म्हणजे जर एखाद्याला दहा गोळ्या चालवायच्या असतील तर त्याला फक्त दोन वेळा पाचपाच गोळ्या भराव्या लागतील. सुरुवातीला मोठी बंदूक चालवणाऱ्याला ही छोटीशी रिव्होल्व्हर वापरणे म्हणजे थोडेसे वाईट वाटत असे. पण, काळाच्या ओघात झालेला हा बदल सर्वांनीच स्वीकारला. शिवाय मोठ्या बंदुकीमुळे जो काही त्रास होत होता तो तर या छोट्याशा गनने वाचवलाच होता.
एक तर, वापरायला आणि बाळगायलाही ही बंदूक फारच सोपी होती. याच कारणाने हळूहळू लोक या बंदुकीला पसंत करू लागले. या बंदुकीचा खप वाढला आणि याची फॅक्टरी देखील जोरात सुरु झाली.
सॅम्युएल कोल्टचा जन्म कनेक्टिकट हार्टफोर्ड येथे झाला. त्याचे वडील आधी शेती करायचे. नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कोल्टचे आजोबा म्हणजे आईचे वडील सैन्यात होते. त्यामुळे सॅम्युएलला लहानपणापासूनच बंदुकांचे आकर्षण होते. वडिलांचा कापडगिरणीचा व्यवसाय होता. तिथे त्याने यंत्राच्या रचनेचे बारकाईने निरीक्षण केले होते.
वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याने घर सोडले आणि तो जहाजावर खलाशी म्हणून काम करू लागला. अमेरिकेवरून भारताला येणाऱ्या एका जहाजावर त्याने कॅप्स्टन पाहिले आणि त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलीची कल्पना सुचली. १८३५ साली त्याने युरोपमध्ये याचे पेटंट घेतले आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याने अमेरिकेकडूनही पेटंट मिळवले.
आपल्या बंदुकीसाठी ग्राहक शोधण्याच्या प्रयत्नात कोल्टने अमेरिकन सचिव कार्यालयाचा दौरा केला. त्यांनी कोल्टच्या या शस्त्राला निरुपयोगी ठरवून नाकारले. सरकारनेच कोल्टच्या ह*त्यारात दोष शोधल्याने हळूहळू लोकांचाही या ह*त्यारावरील भरोसा उठला आणि कोल्टच्या रिव्होल्व्हरची विक्री दिवसेंदिवस कमी होत गेली.
खरेदी कमी झाल्याने कोल्टला बंदुका तयार करण्याची फॅक्टरी चालवणे अशक्य झाले. कोल्टच्या फॅक्टरीवर त्याच्या शेअर्स धारकांनी कब्जा मिळवला आणि कंपनीला दिवाळखोर घोषित केले. शेवटी बंदूक निर्मितीच्या त्या फॅक्टरीचा लिलाव करण्याची वेळ आली.
फॅक्टरीचा लिलाव झाल्याने कोल्ट आता पूर्णतः संपून गेला असे काहींना वाटले. कोल्टच्या रिव्होल्व्हरच्या शोधाला जास्ती दिवसही झाले नव्हते, इतक्यात त्याला कंपनीचा लिलाव करण्याची वेळ आली. अर्थात, सॅम्युएलला यामुळे प्रचंड दु:ख झाले असले तरी तो हरला नव्हता.
१८४४ साली अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुका लागणार होत्या. जेम्स के. पोल्क हे राष्ट्रपतीच्या पदासाठीचे उमेदवार होते. पोल्क यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. त्यांना टेक्सास आणि पश्चिमी क्षेत्रात अमेरिकेचा विस्तार करायचा होता. हीच संधी साधून कोल्ट यांनी त्याच्यासमोर आपल्या रिव्होल्व्हरचा प्रस्ताव मांडला.
कारण, अमेरिकेचा विस्तार करण्याचा निर्णय झालाच तर यु*द्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा कोल्ट यांना अंदाज होता. यु*द्धाच्या काळातच त्यांना आपल्या बंदुकी अधिक प्रमाणात विकत आल्या असत्या.
राष्ट्रपतींनी देखील सॅम्युएलच्या या प्रस्तावावर सहमती दर्शवली. कारण, यु*द्ध सुरु झाल्यानंतर रिव्होल्व्हरची गजर भासणारच होती हे राष्ट्रपतींना देखील मान्य होते. त्यांनी सॅम्युएलला रिव्होल्व्हर बनवण्याची परवानगी दिली.
आपल्या सैनिकांजवळ अशा प्रकारची बंदूक असलीच पाहिजे ही राष्ट्रपतींची देखील इच्छा होतीच. सॅम्युएलने या संधीचा चांगला फायदा उठवला आणि बंद पडलेली फॅक्टरी पुन्हा सुरू केली.
अमेरिकेसाठी गृहयु*द्धाचा काळ अतिशय खडतर होता. संपूर्ण अमेरिका द्वेषाच्या आगीत होरपळत असताना सॅम्युएलला मात्र या आगीवर आपली पोळी शेकून घायची होती. याच काळात कोल्ट रिव्होल्व्हरची मागणी प्रचंड वाढली. प्रत्येकाला ही रिव्होल्व्हर खरेदी करायची होती. पण, सॅम्युएलने साऊथमधल्या आपल्या जुन्या ग्राहकांनाच प्राधान्य दिले.
अमेरिकेत यु*द्ध सुरु होताच सॅम्युएलला आपल्या उत्पादनात दुपटीने वाढ करावी लागली. कोल्टला आता इतके काम होते की त्याच्या फॅक्टरीत आता हजार कामगार काम करत होते, जे दिवसाला दीडशे बंदुका तयार करत होते.
१९६१ साली सॅम्युएल अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जाऊन बसले. गृहयु*द्धाचा फायदा झालेली सॅम्युएल ही एकमेव व्यक्ती असेल.
१९ जानेवारी, १८६२ रोजी वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी सम्युएल कोल्टचे निधन झाले. कोल्टच्या निधनानंतर त्याने स्थापन केलेल्या कंपनीची मालकी त्याच्या पत्नीला मिळाली. परंतु १९०१ साली तिने ही कंपनी काही भागधारकांना विकून टाकली.
कोल्टच्या या रिव्होल्व्हरनंतर बंदुकीच्या बनावटीत अनेक बदल होत आधुनिक पिस्तॉल आणि रायफलसारख्या उंची बंदुका आल्या. पण कोल्टने ही रिव्होल्व्हर अशा काळात आणली होती, जेव्हा चांगली बंदूक म्हणजे काय हे देखील लोकांना माहित नव्हते. कोल्टची ही बंदूक म्हणजे जग बदलवून टाकणारा एक नवा शोध होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.








