आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
“तो जगातील सर्वोत्तम खेळांडूंपैकी एक आहे. आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याचं पदक निश्चित आहे!”
हे उद्गार होते माजी भालाफेकपटू ‘उव होन’ यांचे अन् तेही २०२१ च्या ऑलिम्पिक्सच्या तीन वर्षांपूर्वींचे! २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्यानंतर होन यांनी आपल्या शिष्याबद्दल काढलेले हे कौतुकाचे शब्द आहेत. २०२१ सालच्या टोकियोच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर, होन यांचे शब्द खरे ठरले. नीरज चोप्रानं भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकूण गौरवशाली इतिहास लिहिला. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात देशासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. नीरजच्या कामगिरीनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा झाला.
नीरजच्या या यशामागं उवे होन नावाची एक खमकी वक्ती उभी आहे. नीरजच्या सुवर्ण कामगिरीनंतर उवे होन हे नाव कदाचित भारतीयांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल. या व्यक्तीनं निरजला सर्व अडचणींचा सामना करण्याचं सामर्थ्य देऊन भारतीयांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या उवे होन यांचं स्वत:चं कर्तृत्व देखील कमालीचं होतं, त्याबाबत हा विशेष लेख…
जर्मनीच्या नेरुप्पिनमध्ये जन्मलेल्या (१६ जुलै १९६२) होन यांच्यामध्ये लहानपणापासूनच भालाफेकीचं उत्कृष्ट कौशल्य होतं. अतिशय कमी वयापासून त्यांनी चमकदार कामगिरी सुरू केली होती.
१९८१ ची युरोपियन कनिष्ठ चॅम्पियनशिप ८६.५६ मीटरच्या थ्रोसह जिंकली. त्यांचा थ्रो त्यावेळी कनिष्ठ पातळीवर विक्रम ठरला. त्यापाठोपाठ त्यांनी १९८२ च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ९१.३४ मीटरच्या उत्तुंग थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं. १९८३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी भाग घेतला नाही.
१९८४च्या ऑलिम्पिकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवण्याची होन यांना संधी होती. मात्र, दुर्दैवानं त्यांना ती मिळाली नाही कारण पूर्व जर्मनीनं त्यावर्षीच्या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. १९८५ मध्ये, होन यांनी आयएएएफ वर्ल्ड कप आणि युरोपियन कप जिंकला. नंतर मात्र, शस्त्रक्रियेमुळे १९८६ मध्ये नाईलाजास्तव त्यांना त्यांची कारकीर्द संपवावी लागली.
उवे होनच्या एका विक्रमाचा किस्सा जगप्रसिद्ध आहे. २० जुलै १९८४ रोजी, बर्लिनच्या फ्रेडरिक-लुडविग-जहान-स्पोर्टपार्क येथे ऑलिम्पिक डे अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेत, होन यांनी तब्बल १०४.८० मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्याअगोदर, मे १९८३ मध्ये अमेरिकेच्या टॉम पेट्रानॉफने ९९.७२ मीटर अंतरावर भाला फेकून विश्वविक्रम स्थापन केला होता. होन यांनी टॉमचा विश्वविक्रम एका वर्षात मोडून काढला होता.
१९८०च्या मध्यात भाल्याची रचना बदलण्यात आली, असं सांगितलं जातं. भाल्याच्या गुरुत्वाकर्षण केंद्रात बदल करण्यात आले. ते चार सेंटीमीटरनं पुढं आणलं गेलं, जेणेकरून वारंवार सपाट आणि अस्पष्ट लँडिंग ओळखता येईल. कारण ही बाब मैदानावरील अंतर मोजणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होती. १९८६ साली नवीन डिझाईन अंमलात येईपर्यंत होन यांचा शाश्वत विश्वविक्रम स्थापित झालेला होता. नवीन डिझाइनसह कोणताही भाला फेकपटू होन यांच्या रेकॉर्डच्या जवळपास फिरकू शकलेला नाही.
१९९६ मध्ये नवीन भाल्याच्या डिझाइनसह झेक प्रजासत्ताकचा जेन झेलेझ्नीनं ९८.४८ मीटरचा विश्वविक्रम केलेला आहे.
मैदानाचं वेड असलेल्या होनला जास्त काळ घरी स्वस्थ बसण शक्य झालं नाही. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर होन यांनी नवोदित खेळाडूंना भालाफेकीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. १९९९ पासून त्यांनी भालाफेकीचं व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. होन यांनी चीनचा राष्ट्रीय विजेता झाओ क्विंगगँग याला देखील प्रशिक्षण दिलेले आहे. २०१७ मध्ये, होन यांनी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनशी (एएफआय) करार केला.
ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्डधारक नीरज चोप्रासह इतर भारतीय भालाफेकपटूंना त्यांनी प्रशिक्षण दिलं. तीन वर्षे भारतीय भालाफेक चमूचे प्रशिक्षक म्हणून होन यांनी काम पाहिलं. २०२१ च्या सुरुवातीला भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) यांच्याशी मतभेद झाल्यामुळं होन यांनी देश सोडला होता.
होन आणि बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांना ब्लॅकमेल करून नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप होन यांनी केला होता. देश सोडून जाण्यापूर्वी मात्र, ऑलिम्पिक विजेता होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्य नीरजला देण्याची काळजी त्यांनी घेतली होती.
२३ वर्षीय नीरजनं ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत झेक प्रजासत्ताकचे खेळाडू जेकूब वाडलेज्च आणि विटझस्लाव व्हेसेलीला मात दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारताचं पहिलं सुवर्णपदक होतं तर, २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर देशासाठी हे दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं. नीरज भारतीय अॅथलेटिक्सचा अग्रदूत झाला. सर्किटवर सातत्यानं चांगली कामगिरी करून त्यानं आपली क्षमता सिद्ध करून दाखवली.
देशाच्या खात्यात आणखी एक ऑलिम्पिक सुवर्णपदक जोडून, आपण एक दुर्मिळ रत्न असल्याचं त्यानं सर्वांना दाखवून दिलं. प्रत्येक खेळाडू किंवा विद्यार्थ्याच्या यशामध्ये त्याच्या गुरूची सर्वात मोठी भूमिका असते. नीरज चोप्राचं करिअर घडण्यामागं देखील होन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजनं एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. एशियन गेम्समध्ये तर नीरजनं ८८.०६चा राष्ट्रीय विक्रम स्थापन केला आणि आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवलं आहे.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये होन यांनी अनेक पदकं मिळवलेली आहेत. अनेक पदकविजेते खेळाडू घडवले आहेत. मात्र, त्यांना स्वत:ला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आलं नव्हतं. आतापर्यंत त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी देखील कुणी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं नव्हतं, याची खंत होन यांना कायम होती. कित्येकदा त्यांनी ती बोलूनही दाखवली होती. आता मात्र, नीरज चोप्रा नावाच्या गुणी आणि त्यांच्या लाडक्या शिष्यानं होनची ही इच्छा पूर्ण केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून नीरजनं उवे होन यांना एक प्रकारे गुरूदक्षिणाच दिली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










