आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
बौद्ध धर्म हा भारतातील एक प्राचीन धर्म. बौद्ध धर्माचा उदय भारतातच झाला. यापूर्वी भारतात वैचारिक गोंधळाची परिस्थिती होती. निरनिराळ्या वैदिक देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ आवश्यक असल्याचे सांगत ब्राह्मण वर्ग यज्ञाचा पुरस्कार करत होता, तर त्याला उत्तर देताना चिंतन करत, रानावनात भटकत आपल्या धर्माचा पुरस्कार करणारे आणि त्यासाठी कितीही परिश्रम करायला तयार असणारे श्रमण यज्ञसंस्थेला विरोध करत ती कशी फोल आहे हे सांगत होते.
अशा वैचारिक खळबळीच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धांचा उदय झाला. जगातील दुःखांवर उपाय शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी घरदार सोडून ते बाहेर पडले. घराबाहेर पडून निरनिराळे ध्यान आणि तपश्चर्येचे मार्ग यांचा अनुभव घेतल्यावर, वैशाख शुद्ध पौर्णिमेला बोधीवृक्षाखाली त्यांना दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांनी सांगितलेली जीवनविषयक तत्त्वे बौद्ध धर्मामध्ये समाविष्ट आहेत.
बौद्ध धर्माचा भारत सोडून श्रीलंका, म्यानमार, चीन, जपान अशा अनेक देशांमध्ये प्रसार झाला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा भारताबाहेर प्रसार करण्यास प्रोत्साहन दिले.
बौद्ध धर्माचा प्रसार होण्याच्या काळात अनेक शहरांचा उदय झाला. या काळात अनेक मध्यवर्ती संस्थानेही उदयास आली. याच काळात अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. विविध मठ धर्म आणि विद्वत्तेची केंद्रे बनली. मात्र कालांतराने या धर्माला भारतात उतरती कळा लागली. अर्थातच ही क्रिया एका रात्रीत घडून आलेली नाही, तर ती शेकडो वर्षे अविरत चालू असलेली एक प्रक्रिया होती.
बौद्ध धर्माचा भारतात ऱ्हास होण्यामागे अनेक घटक आहेत. पण त्यामधील मुख्य कारण म्हणजे गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर भारताचे झालेले प्रादेशिकीकरण. यामुळे बौद्ध धर्माला असलेला आश्रय बऱ्याच प्रमाणात कमी झाला. भारतातील प्रादेशिक राजसत्ता हिंदू ब्राह्मणांच्या सेवेत रुजू झाल्या. याच कालावधीत उत्तर भारतावर अनेकांनी आक्रमण केले.
यामध्ये मुख्यतः हूण, तुर्क, मंगोलियन, अरब, पर्शियन हे आघाडीवर होते. त्यांनी नालंदा विश्वविद्यालय आणि बौद्ध धर्माचा वारसा सांगणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक संस्था नष्ट केल्या. बंगालचे इस्लामीकरण झाल्यानंतर आणि नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, आणि ओदंतपुरी ही विद्यापीठे उद्ध्वस्त झाल्यानंतर बौद्ध धर्माला अजूनच उतरती कळा लागली.
बौद्ध धर्म लयाला जाण्याची सुरुवात थोडीफार गुप्त काळातच झाली होती. चौथ्या ते सहाव्या शतकापर्यंत गुप्तवंशीय राजे सत्तेवर होते. या काळात बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांच्यातील भेदांच्या सीमारेषा धूसर होत गेल्या. याच काळात ब्राह्मणांनी राज्यांबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित केले.
जसजशी ही गोष्ट पुढे गेली, तसतसा बौध्द मठांनी जमिनीच्या महसुलावरील नियंत्रणाचा अधिकार गमावला. दुसरीकडे गुप्तवंशीय राजांनी कुशीनगरसारखी बौद्ध देवळे उभारली. नालंदासारख्या विद्यापीठांची निर्मिती केली. यासंबंधी त्या काळात भारताला भेट देणाऱ्या तीन चिनी प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहे.
बुद्धाने स्थापन केलेला बौद्ध धर्म मुळात भारतात प्रस्थापित झालेला असल्यामुळे भारत हे बौद्धधर्मीय लोकांसाठी पवित्र आणि पूजनीय स्थान होते. त्यामुळे अनेक चिनी प्रवासी पण भारतात बौद्धधर्माच्या अध्ययनासाठी येत असत. यापैकीच एक म्हणजे ह्वेन त्सांग. तो भारतात आला त्यामागचा त्याचा हेतू बौद्ध धर्माचे अध्ययन करण्याबरोबरच राजकीय परिस्थिती समजावून घेणे हाही होता.
त्याची भारतातील मोहीम विविध पैलूंवर प्रकाश टाकते. असे मानले जाते की ह्वेन त्सांगला एका स्वप्नामुळे भारतयात्रा करण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यावेळी यु*द्ध असल्यामुळे तांग सत्तेच्या राजाने प्रवास करण्यास मनाई केली होती. परंतु ह्वेन त्सांगने या प्रवासासाठी जुळवाजुळव केली आणि यात्रेसाठी निघाला. वास्तविक त्याच्याकडे चीनची सीमा पार करून भारतात येण्यासाठी परवानगी नव्हती, परंतु सीमेवर त्याला रोखल्यावरही तो आपल्या हट्टावर कायम राहिला आणि तसाच पुढे चालत राहिला. हे शक्य झाले ते केवळ त्या सैन्याचा नेता स्वतः बुद्धाचा अनुयायी असल्यामुळे.
आपल्या प्रवासादरम्यान ह्वेन त्सांगने वाळवंटामधून तसेच अनेक खडतर वाटांवरून यात्रा केली. तेरा वर्षे भारतात प्रवास केला. चीनला भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची ओळख याच प्रवाशामुळे झाली, त्यामुळे भारतीयांसाठी त्या काळात त्याचे महत्त्व मोठे होते.
दुसरीकडे चीनसाठीही ह्वेन त्सांग हे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, कारण त्याने येथे बौद्ध धर्माचे अध्ययन करून पुढे चीनमध्ये परतल्यानंतर बुद्धांच्या संदेशांचा आणि उपदेशाचा चीनमध्ये प्रसार केला. ह्वेन त्सांग चीनमधै परत गेल्यानंतर तेथील सम्राटाने त्याला त्याच्या यात्रेबद्दल लिहिण्यास सांगितले होते. मात्र या सम्राटाला बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान जाणून घेण्यापेक्षा भारत आणि इतर देशांची परराष्ट्रनीती आणि संरक्षण यांची ओळख करून घेण्यात जास्त रस होता.
ह्वेन त्सांग ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्याने एक अनपेक्षित प्रकार पाहिला. त्याच्या म्हणण्यानुसार त्या काळात गुप्त घराण्याच्या सम्राट हर्षवर्धनाची सत्ता होती. मात्र अनेक बौद्ध भिक्षूंना मारले जात होते आणि बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर हल्ले होत होते. आत्तापर्यंत त्याच्या मते हर्षवर्धन हा एक आदर्श राजा होता आणि त्याच्या मनात बौद्ध धर्माबद्दल आदर होता. परंतु या मतालाही धक्का लागला.
ह्वेन त्सांगने अजून एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे गोडा राज्याचा सम्राट शशांक याने बोधगयेतील बोधिवृक्ष कापून टाकल्याचा. याच बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांनी आपली तपश्चर्या पूर्ण केली होती. ह्वेन त्सांगच्या लेखांवरून अनेक गोष्टींची कल्पना येते. यावरून त्या काळातल्या जातीव्यवस्था, हवामान, मोठ्या नगरांमधील जीवन यांची माहिती होते.
त्या काळात ह्वेन त्सांगने तक्षशिला, कश्मीर, कनोज, मथुरा, बोधगया, लुंबिनी, यासह गुजरातमध्ये देखील प्रवास केला होता. त्याने आपल्या लेखनामध्ये गुजरातच्या समृद्धीचाही उल्लेख केलेला आहे. परत जाताना त्याच्याकडे त्याच्या लिखाणाच्या हजारो प्रती होत्या. परंतु परतत असताना सिंधू नदीला आलेल्या पुरात यातल्या बऱ्याचशा प्रती नष्ट झाल्या.
त्या काळात चिनी प्रवासी भारत आणि इतर देशांची परिक्रमा करण्यासाठी सिल्करूटची निवड करत. आज चीन याच सिल्करूटला आपल्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेअंतर्गत पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










